Friday, November 10, 2017

श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सर !

श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सर !




मी त्यावेळी बहुतेक आठवीत असेल ! सरदार जी. जी. हायस्कूल मधे ! दिवाळीची शाळेची सुटी संपली होती. तसे पाहीले तर शाळेत माझी सर्व विषयांत बऱ्यापैकी परिस्थिती होती. वर्गात माझ्यापेक्षा जास्त मार्क्स कोणाला नसत. पण इंग्रजी व गणिताची शिकवणी लावावयास हवी, कारण ते विषय कठीण असतात हा त्यावेळचा समज. इंग्रजी ही परकीय भाषा म्हणून कठीण तर गणित हा विषय ‘दांडी उडण्यासाठी’च असतो, अशी ही त्यावेळची वस्तुस्थिती असायची ! माझी गणिताची अजिबात काळजी नव्हती. असलीच तर थोडी अडचण असायची, इंग्रजीची ! अर्थात माझा इंग्रजी हा विषय मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या, सर्वसामान्य विद्यार्थ्याचा जेवढा चांगला असेल किंवा असावयास पाहीजे तितका माझा पण होता. पण जरा जास्त मेहनत घेऊन इंग्रजी चांगले व्हायला हवे, पुढे सर्व विषय हे इंग्रजीत असतात, याची कल्पना होती.

एके दिवशी वडील संध्याकाळी घरी आले अन् मला व माझ्या चुलत भावाला म्हणाले, ‘अरे, तुम्ही उद्यापासून इंग्रजीच्या शिकवणीला जात जा, प्रकाश मुजुमदारांकडे ! मी सांगून आलोय, माझी दोन मुलं पाठवतो म्हणून ! भोईवाड्यात घर आहे.’ मला वाटलं ‘चला, काही जास्तीचे शिकायला मिळेल.’ आईने विचारले, ‘आता दिवाळीनंतर मधेच शिकवणीचे कसे काय डोक्यात आले ? निम्मे वर्ष तर संपलंय !’
‘भोईवाड्यात भेट झाली, लक्ष्मण मुजुमदारांकडे गेलो होतो. त्यांचा पुतण्या होता तिथं, म्हटलं सध्या काय सुरू आहे ? तर म्हणाला ‘सध्या काही नाही, एम्. ए. झालोय, इंग्रजीत ! नोकरीचे बघतोय !’ म्हटलं वाट काय बघायची, शिकवण्या सुरू कर.’ तशा नुकत्याच सुरू केल्या आहेत हे सांगीतल्यावर, ‘माझी दोन मुलं पाठवतो’ म्हणून सांगीतलं. पोरं जातील उद्यापासून ! जाऊ दे.’ दुसऱ्या दिवसापासून मी आणि दत्ता म्हणजे माझा चुलतभाऊ, आम्ही दोघं शिकवणीला जायला लागलो. श्री. प्रकाश गंगाधर मुजुमदार अर्थात मुजुमदार सरांकडे !

भोईवाड्यातील त्यांचे बैठे जुने घर ! आसपास सर्व भोई लोकांची घरे, त्या लोकांच्या घराबाहेरच भट्ट्या लागलेल्या असायच्या ! भट्ट्यांशेजारी काट्याचा मोठा भारा ! हळद लावून काही वेळा डाळ्या व मीठ लावून ओले करून खारे शेंगदाणे वाळत टाकलेल्या, भट्टीखाली काटे सारत कडक जाळावर लोखंडी कढईतील वाळूत तडतडून कढईबाहेर येणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ लाह्या ! त्यांच्या मोठ्या लोखंडी लांब दांड्याच्या झाऱ्यावर झपकन उचलले जाणारे काळे फुटाणे ! शाळेच्या वयांतील हे आसपासचे जाणवलेले वातावरण कितपत अभ्यास करू देईल, हा प्रश्न त्या वेळी कधी डोक्यातही आला नाही, आता येतोय !

दुसरे दिवशी वही व पुस्तक घेऊन गेलो. तो तिथं मला वर्गातील दोन तीन मुले आलेली दिसली. ‘तू पण यायला लागला का ?’ या पहिल्या प्रश्नाला ‘आजपासून’ हे उत्तर दिले. त्यांच्या घरातील पुढच्या खोलीत आम्हाला बसण्यासाठी जाड सतरंजी टाकलेली होती, आम्ही शिकवणीला येणारे सात-आठ जण होते. सर आले. आम्ही सर्व बसलो. सर मध्यभागी बसले, म्हणाले ‘आता आपण पहिले ‘ग्रामर’ शिकणार आहोत. हे व्यवस्थित आले की तुम्हाला इंग्रजीत काही तरी लिहीता येईल. बरोबर कसे लिहावे, लिहीलेले बरोबर आहे का, हे समजेल ! बाकी पुस्तकातील धडे नंतर पाहू.’ पुस्तकातील धड्यांव्यतिरिक्त काही शिकतो आहे यांचे कुतूहल, तर आपला अभ्यास मागे पडेल ही चिंता !

सरांनी एकाची वही घेतली व लिहीले - ‘Tenses’ ! एकूण तीन ‘टेन्स’ आणि त्यांत प्रत्येक ‘टेन्स’ मधे चार प्रकार ! रोज एक ‘काळाचा’ प्रकार, त्याचे उपप्रकार ! मग तपशीलवार सांगणे - याचा वापर केव्हा करायचा, याची क्रियापदे कशी तयार होतात, त्याने अर्थात काय बदल होतो, विशिष्ट अर्थ ध्वनीत करायचा असेल तर वाक्य कसे लिहायचे ! काळ आणि काळांचे विविध प्रकार संपले ! सुरू झाले मग ‘Clauses’ ! त्यांचे प्रकार व उपप्रकार ! रोज घरी जातांना आपण काही तरी शिकतो आहे हे जाणवायचे. शिकवणे आणि बोलणे इंग्रजीत पण बऱ्याच वेळा स्वच्छ मराठीत देखील ! शिकवण्याचे शास्त्रात भाषा कशी शिकवावी या बद्दल काय सांगीतले याची मला कल्पना नाही, पण त्यांनी शिकवलेलं डोक्यात शिरत होतं, मनांत साठत होतं ! शिकवणीला जाऊन दोन-तीन महिने झाले असतील. पुस्तकातील धड्याला विशेष हात लागलेला नव्हता, पण आता वाटायला लागले की आपण आता काहीतरी इंग्रजी लिहू शकू. आपण लिहीलेलं दुसऱ्याला पण समजेल ! आपल्याला जे वाटतंय तेच त्याला पण जाणवेल !

व्याकरणाची थोडी प्राथमिक, आवश्यकतेपुरता तयारी झाल्यावर त्यांनी पुस्तकातील धडे शिकवायला घेतले. आम्हाला या प्रत्येक धड्याचे स्वरूप बदललेले वाटत होते. तसे पाहिले तर हे सर्व धडे अगोदर पण वाचले होते, पण त्यांचे हे रूप जाणवले नव्हते. हे आम्हाला नवीन रूप होते. हा शिकलेल्या व्याकरणाचा परिणाम होता, हे इंग्रजीचे नवे स्वरूप दाखवले ते मुजुमदार सरांनी !
‘इंग्रजी वर्तमानपत्र वाचत जा. नाही समजलं तरी वाचत जा. इंग्रजी सुधारेल.’ सर सांगत. ते त्यावेळी आम्ही काही फार मनावर घेतले नाही. आम्ही यांवरच खूष होतो की आपल्याला इंग्रजी समजतंय, आपलं वाटतंय ! इंग्रजीचा परकेपणा थोडा कमी झाला होता. त्या वर्षी समाधानाने इंग्रजीचा पेपर दिला.

आठवी झाली. नववी झाली आणि दहावी आली. मुजुमदार सरांची त्यांच्या विद्यार्थ्यांची बहुतेक ‘शालांत परिक्षेची’ पहिलीच बॅच ! सरांनी शिकवण्यांत यापूर्वी पण कधी हातचे राखून शिकवले नाही, ते आता या शालांत परिक्षेच्या घडीला कृपण होणारच नव्हते, सर्व विद्यार्थ्यांना सढळ हातानेच देणार होते यांत शंकाच नव्हती. परिक्षा आली. आम्ही पेपर दिले. चांगले गेले. शालांत परिक्षेचा निकाल लागला. सन १९७७ च्या शालांत परिक्षेत केंद्रात सर्वप्रथम पण त्यांचाच विद्यार्थी होता - मी ! — आणि इंग्रजीत पण सर्वप्रथम व दुसरा त्यांचाच विद्यार्थी होता - मुकुंद मुजुमदार आणि मी !

निकाल जाहीर झाला त्यावेळी मी आजोळी होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलो. तो पावेतो गांवात ही बातमी समजली होती. रावेर सारख्या तालुक्यांतील रावेर गांवात बातमी पसरायला वेळ तो काय लागणार ? सकाळी आल्यावर शाळेत गेलो, गुणपत्रक घेतले. घरी आलो. त्याच दिवशी सकाळीच मुजुमदार सर घरी आले होते - माझे अभिनंदन करायला ! ‘प्रत्यक्ष शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी येऊन अभिनंदन करणे’ विद्यार्थ्याला यापेक्षा मोठे कोणते बक्षीस आहे ? विद्यार्थ्याच्या आईवडिलांना यापेक्षा मोठा आनंद कशात असणार ?

आठवीपासून ते अकरावीपर्यंत मी श्री. मुजुमदार सरांकडेच इंग्रजीची शिकवणी लावली होती. आठवीला जसा मी शिकवणीला जायला लागलो तेव्हा सर दहा रूपये महिन्याला घ्यायचे शिकवणीचे ! मी अकरावीला गेलो तरी सरांचा दहा रूपये महिनाच होता शिकवणीचा ! कधीही चार वर्षांत फी वाढवली नाही, त्यांचे कसे भागत असावे, देव जाणे ? हा प्रश्न आता सुचतोय ! शिकवणी अगदी नियमीत, खाड्याची तर गोष्टच नाही. फक्त सरांना बहुतेक टायफॉईड झाला होता, त्याच वेळी काही दिवस शिकवणी बंद होती.

अजून एक सांगायचे म्हणजे, आमच्या पैकी काही विद्यार्थ्यांनी, बहुतेक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची' इंग्रजीची काही परीक्षा असावी, ती देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सांगीतलेले एक पुस्तक आणि विख्यात इंग्रजी नाटककार शेक्सपियर याचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे नाटक होते. शेक्सपियरच्या नाटकात काय महत्वाचे असते, तो का महान नाटककार आहे, हे शिकविले. त्या धंद्यांच्या पात्रातील परिचयासोबतच आपल्या आयुष्यांत पण अशी पात्र अशी पात्र कशी भेटतात हे पण त्यामुळे अनुभवता आले. या दहा रुपये महीना फी घेणाऱ्या आमच्या शिक्षकाने तो संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला, कोणतीही वेगळी फी न घेता. आजच्या प्रत्येक गोष्टीत वेगळा पैसे द्यावा लागतो या 'पंजाबी डिशेश' अनुभवणाऱ्या काळांत आम्ही 'पोटभर जेवणाची थाळी' घेऊन बसलो होतो, त्याचा कोणताही वेगळा चार्ज द्यावा लागला नाही आम्हाला ! या गोष्टी आता कोणाला पटतील नाही पटतील, पण आम्ही अनुभवल्या आहेत !

या दहा रूपये फी असतांनाच्या काळांत पण आर्थिक अडचणी असणारे असायचे. मग नियमीत फी देणे व्हायचे नाही. त्यांना कोणी सांगीतले, ‘सर, वडिलांनी सांगीतले आहे, या महिन्याची फी पुढच्या महिन्यांत देवू. सध्या अडचण आहे.’ तर सर त्याचे ‘सध्या अडचण आहे.’ हे वाक्य म्हणायच्या आंत ‘बरं’ म्हणायचे, त्याच्यावर अविश्वास न दाखवता, काहीही न बोलता. त्या विद्यार्थ्याला जी अडचण त्याच्या घरी असायची ती अडचण तर खरोखर सरांच्या पण घरी असायची ! पण सर कधी ते त्याच्याशी वागण्यात जाणवू देत नसत, आम्हा कोणालाही !

अकरावीनंतर गांव सुटले, शिक्षणासाठी बाहेरगांवी गेलो. कायद्याचे शिक्षण घेतांना माध्यम इंग्रजी असायचे. त्यावेळेस थोडे जाणवायचे मुजुमदार सरांनी आपल्याला काय शिकवले आहे ? कायद्याच्या विविध कलमातील मजकूर कसा वाचल्यावर, कुठल्या शब्दावर थांबल्याने काय अर्थ होतो ? आता समजते आहे दहा रूपया महिना घेऊन सरांनी आपल्याला काय शिकवले आहे ! मी या बाबतीत भाग्यवान, फार भाग्यवान ! मला केवळ उत्तम शिकवणारेच शिक्षक मिळाले नाही तर मला माझ्या बहुसंख्य शिक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ते अगदी आजही त्यांची भेट झाल्यावर जाणवते.

आपल्या प्रत्येकाच्या या जीवनाच्या वाटचालीत किती लोकांनी आपल्याला मदत केली असते ! कोणी आपल्यासाठी उजेड दाखवत असते, काही वेळा ते दिसतात तर काही वेळा दिसत पण नाही, पण त्यांनी दाखवलेला उजेड आपली वाट प्रकाशमय करतो. चालतांना असंख्य वेळा धडपडलो, खाली पडलो तर उठवून मार्गावर लावणारे भेटतात. भुकेने जीव कासावीस झाल्यावर कळवळून पोट धरून खाली बसलेल्या आपणांस कोणी आपल्या जवळची शिदोरी उघडून, स्वत:च्या घासातील घास काढून देतात, आपल्या पोटाला आधार वाटल्यावर आपण तरतरीत होऊन उठतो व मार्गस्थ होतो. अपयशाच्या गर्तेत काही वेळा पडल्यावर किती वेळ येथे रहावे लागेल याची कल्पना नसतांना, ही देवाने पाठवल्याप्रमाणे माणसं येतात आणि हात धरून आपल्याला बाहेर काढतात; मग कपडे झटकत आपण सावरतो अन् पुढे चालायला लागतो. आपल्या मार्गातील यांचा सहभाग लक्षात घेतला तर आपल्या यशांत कोणाकोणाचा किती सहभाग असतो नाही !

मध्यंतरी मुजुमदार सरांनी बहुतेक प्रकृतीच्या कारणाने, सकाळी सहा-साडेसहापासून ते संध्याकाळपर्यंत असलेल्या शिकवण्या, एकदम बंद केल्या. आता कधीपासूनच सर कोणालाही इंग्रजी शिकवत नाही. अलिकडे तर ज्यांना हे सर्व माहिती नसेल त्यांना ‘सर’ म्हणत असावे ते ‘रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर’ यांचे चेअरमन आहेत म्हणून असावे, असेच वाटत असेल. पण काहीही असो आता रावेरला मुजुमदार सर म्हणजे नेमके कोण हे सांगावे लागत नाही, कोणीही त्यांच्या घरांपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांची ‘माधवाऽऽ’ ही हाक आठवली, अन् सोबत हे सर्व !

No comments:

Post a Comment