Wednesday, December 20, 2017

गाता गळा अन् शिंपता मळा !

गाता गळा अन् शिंपता मळा !
घराच्याच मागे असणारी आमची जिल्हा परिषदेची ‘मराठी मुलांची शाळा नं. २’ आमच्याच नातेवाईकांच्या घरात भरायची. मला जवळपास शैक्षणिक आयुष्यभर सकाळी शाळा व कॉलेजला जावे लागल्याने सकाळी भल्या पहाटे उठायची सवय आपोआपच लागली. आता शाळा, कॉलेज संपले तरी ती सवय जात नाही आणि जावू पण नये, मला चांगली आहे.
घरातून टण् टण् टण् ऽऽऽ अशी घंटा ऐकू आली की आम्ही शाळेत पळायचो आणि वाजवणारा हातात वाजवण्याचा गज हातात असलेल्या अवस्थेत असतानाच किंवा फारतर त्याच्या जागेवर जाण्याच्या आंत आम्ही तेथे पोहोचलो असायचो. मुले प्रार्थनेला खाली पटांगणात गोळा होत असायची. प्रार्थना शक्यतोवर एक वाणी नांवाचा अन् अजून एक जण म्हणायचा. प्रार्थना होती, साने गुरूजींचे गीत ! — जगाला प्रेम अर्पावे ! फार छान म्हणायचा तो !
एकदा तेथे दोन मुली उभ्या राहिल्या, प्रार्थना म्हणायला ! ‘तायडे गुरूजी आहे ना, शाळा नं. १ मधले, त्यांची मुलगी आहे ही. पाचवीला आहे.’ शेजारचा तिसरीतल्या मला सांगत होता. ‘तुला कसे काय माहीत ?’ माझा स्वाभाविक प्रश्न ! ‘पाराच्या गणपतीजवळ रहातो मी. तेथेच रहातात तायडे गुरूजी, म्हणून !’ त्याचे उत्तर ! त्या दोन मुली प्रार्थनेला उभ्या राहिल्या अन् खणखणीत, स्वच्छ शब्दांच्या उच्चारात प्रार्थना म्हटली.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।
जगी जे हीन अतिपतीत, जगी जे दीन पददलीत
तयां जावून उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
बालपणीच्या कोवळ्या मनांवर हे साने गुरूजींचे करूणेने भरलेले, वेदना व्यक्त करणारे शब्द फार परिणाम करून गेले. प्रार्थना म्हटले की सर्वप्रथम आठवते ती ही माझ्या ‘मराठी शाळा नं. २’ मधील ही प्रार्थना !
जसा मी पाचवीला गेलो, तसे मला ‘सरदार जी. जी. हायस्कूल’ येथे टाकले. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा नुकतीच सुरू झाली होती. मराठी शाळेत जमीनीवर बसणारे आम्ही आता लाकडी बेंचवर बसायला लागलो होतो. वर्षभर सर्व विषय एकच गुरूजी किंवा बाई शिकवणार, हा अनुभव असलेल्या आम्हांस, प्रत्येक विषयाला वेगळे ‘सर’ किंवा मॅडम’ हे विशेषच वाटू लागले होते. शाळा भरल्याची, मधल्या सुटीची, सुटी संपल्याची आणि शाळा सुटल्याची घंटा ऐकण्याची सवय असलेल्या आम्हाला, इथे प्रत्येक तासाला घंटा होते हे पाहून आश्चर्यचा वाटले होते. आणि ती पण, शाळेचा कोणीतरी उत्साही व दांडगट विद्यार्थी पळत जावून कशीतरी चमत्कारिक, वेडीवाकडी घंटा न वाजवता, येथील युनीफॉर्म घातलेला शिपाई वाजवतो, हे बघीतल्यावर तर माझ्या आश्चर्याचा कडेलोट झाला होता. तास हा साठ मिनीटांचा असतो हे गणित मराठी शाळेत शिकलेलो आम्ही, इथला हायस्कूल मधला तास म्हणजे ‘पिरीयड’ हा पस्तीस मिनीटाचा असतो, हे समजल्यावर अवाक झालो होतो. सगळेच नवीन ! हे सगळे पाहून, आम्हाला निष्कारणच मोठे व श्रीमंत झाल्यासारखे वाटू लागले होते.
आम्हा पाचवीतल्या मुलांना व पाचवीच्या वर्गाला येथे हायस्कूलमधे काही किंमत नसते, हे मला मी सहावीला गेल्यावर समजले. प्रत्येक पिरीअडला पिरीअड संपल्याची घंटा झाली, की कोणीतरी नवीन सर यायचे. ते काही वेळा काहीतरी शिकवायचे तर काही वेळा गप्पा मारायचे, प्रत्येकाला त्याचे नांव, गांव, कोठून आला वगैरे विचारायचे. ‘या वर्षाचे नवीन टाईमटेबल आल्याशिवाय नीट वर्ग भरणार नाही’ हे मला माझ्याच वर्गातल्या ‘अनुभवी’ विद्यार्थ्यांनी सांगीतले.
पूर्वी प्रत्येक वर्गात असे वर्ष दोनवर्षांचे ‘अनुभव’ असलेले विद्यार्थी बऱ्यापैकी असायचे, आता तसे अभावानेच आढळतात, असे समजते. अनुभवाची किंमत राहिलेली नाही आता, हेच खरे ! त्यावेळी अभ्यासक्रम कठीण होता का शिकवणारे नीट नव्हते का मुलं अभ्यास करत नव्हते का पालक मुलांना बऱ्यापैकी ‘वाजवत’ असल्याने मुलांचे शिक्षणातील लक्ष उडायचे कोणास ठावूक ? त्यावेळी मार्कस् पण जेमतेम मिळायचे, मुलांचे ध्येय फक्त ‘पास’ होण्याचे असायचे, ते सुध्दा जेमतेम साध्य व्हायचे. आता मात्र फारच प्रगती झालेली दिसतेय. ‘नापास’ झालेले तर कोणी दिसतच नाही म्हणतात. बहुतेकांना डोळे फाटतील इतके मार्कस् आणि काहींना तर शंभर टक्क्यांच्या पण वर मिळतात, असे ऐकले. मी जर आता शाळेत शिकायला असतो, तर मला नाही वाटत माझा काही निभाव लागला असता !
आमच्या शाळेत त्यावेळी आसपासच्या खेड्यांवरून येणाऱ्या विद्यार्थांची पण संख्या बऱ्यापैकी असायची. आसपास म्हणाव्या तितक्या शाळा नव्हत्या आणि ही शाळा म्हणजे नावाजलेली शाळा ! एकेका वर्गाच्या दोन-तीन तुकड्या असायच्या.
रिकाम्या पिरीअडला कोण येईल याचा भरवसा नसायचा. काही वेळा शारिरीक शिक्षणाचे सर यायचे, सरोदे सर किंवा कोल्हे सर ! ते बहुतेक सरळ आम्हाला मैदानावर घेऊन जायचे. सरोदे सरांजवळ बारीक लवलवती अशी हिरवीगार कडुलिंबाची काडी असायची. त्यांना ती काडी सतत लवलवायचा नाद होता. त्यामुळे जवळच्या विद्यार्थ्याला सूंऽसूंऽऽ असा आवाज यायचा. तो आवाज ऐकणे त्यांना आवडायचे का तो आवाज आम्हाला ऐकवायला आवडायचे, देव जाणे ! पण त्यामुळे नंतर सर्व कामे शिस्तीत व्हायची. कोल्हे सर म्हणजे त्यांच्या गळ्याला शिटी असलेली वायर गुंढाळलेली असायची. ती जोरात लागते, असे बऱ्याच अनुभवी विद्यार्थ्यांचे मत होते. सरोदे सर व आम्ही मैदानावर गेल्यावर एकतर कबड्डी किंवा लंगडी खेळायला लावायचे. थोड्या वेळानंतर मग थांबवायचे अन् गप्पा मारायचे आमच्याशी. हिरव्यागार काडीचा सूंऽऽ सूंऽऽ आवाज करणारे हेच, हे आम्ही विसरलेले असायचो. कोल्हे सर मात्र काही वेळा शाळेने बागकामासाठी राखून ठेवलेल्या भागांत न्यायचे व बागकाम करायला लावायचे. काही वेळा मैदानात खेळायला लावायचे. या दोघांच्यातला बहुसंख्य विद्यार्थ्यांना आवडणारा समान गुण म्हणजे हे विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून मैदानावर न्यायचे, हा होय !
पण आम्हा मुलांना आवडायचा तो सैय्यद सरांचा तास ! हे उर्दू शिकवणारे होते. पण यांना पिरीअड तुलनेने कदाचित कमी असावेत, त्यामुळे शाळा नुकतीच उन्हाळ्याच्या सुटीनंतर सुरू झाली की शिक्षक नसलेल्या वर्गावर हे बऱ्याच वेळा यायचे. ‘हं, बच्चों ! अब क्या करना ? बोलो ।’ त्यांचे वाक्य ! ‘सर गाणं, सर गाणं !’ सर्वांचा एकच कल्ला व्हायचा. ‘किसको आता है गाना, कौन गानेवाला हैं’ त्यांची विचारणा. मग काही जण ज्याला जे आवडेल व आठवेल ते गायचा. पाचवीत असतांना असेच एकदा एकाला बाहेरून घेऊन आला, त्याला पाहिल्यावर पुन्हा ‘होऽऽऽऽ’ असा गलका ! त्याला म्हणायचा आग्रह सुरू झाला. ‘नफरत करनेवालोंके सिनेमें प्यार भर दूॅं’ हे गाणं त्याने म्हटले, वर्ग स्तब्ध होता. सर पण खूष दिसत होते. खरंच छान म्हटलं ! कोण म्हणून विचारल्यावर ‘संजय बाळापुरे’ हे नांव सांगीतले. नंतरही बऱ्याच वेळा तो अशा पिरीअडला गाणं म्हणायचा, वेगवेगळ्या वर्गातून म्हणायचा ! त्यावेळी अशा गाण्याचा अर्थ समजण्याचे वय नव्हते, पण चांगलं म्हणतोय हे समजायला वयाची आडकाठी नसते. तुम्ही चांगला स्वर लावा, पाळण्यातले बाळ रडायचे थांबते. संगीताचे सामर्थ्य आहे ते.
नंतर आठवीत पुन्हा एक गाणारा मित्र भेटला, राजेंद्र थोरात ! हा अकरावी पर्यंत वर्गात होता. हा तर खरंच छान गायचा. त्यावेळी नुकताच ‘कभी कभी’ हा चित्रपट आला होता. त्यातील गाणी छानच आहेत. तो जेव्हा ‘मैं पल दो पलका शायर हूॅं, पल दो पल मेरी जवानी हैं’ किंवा ‘इक दिन बिक जायेगा माती के मोल, जगमें रह जायेंगे प्यारे तेरे बोल’ किंवा ‘कभी कभी मेरे दिलमें खयाल आता हैं’ वगैरे गाणी म्हणायचा तेव्हा सारा वर्ग स्तब्ध असायचा. मुकेशची गाणी फारच सुंदर म्हणायचा. त्याचा भाऊ रावेरला स्टेट बॅंकेत नोकरीला होता. माझ्या अकरावी नंतर मी जळगांवला शिकायला गेलो अन् त्यानंतर त्याची भेट नाही.
कॉलेजला आल्यावर बारावीपासून वर्गात एक ‘संत’ नांवाचा होता. त्याचा आवाज पण छान ! हा शास्त्रीय संगीतावर आधारलेली व तशी ठळक बैठक असलेली गाणी म्हणायचा ! महंमद रफीची गाणी तर अफलातूनच ! एकदा त्याला असाच घरी घेवून गेलो होतो. त्यावेळी मी तबला शिकत असल्याने घरी तबला होता. कॉलेजचे वय, त्याला हे सांगीतल्यावर तो त्याच्या जवळची वहीच घेऊन घरी आला. मग काय ? तो गाणं म्हणतोय आणि मी तबला वाजवतोय ! आमचे घरमालक शेजारीच रहायचे. त्या मावशीपण येवून बसल्या. मग विचारले, ‘कोण रे तू ?’ त्याने ‘संत’ म्हणून आडनांव सांगीतल्यावर त्या पण विचारांत पडल्या, पण त्यांना नेमके नाते आहे का हे काही आठवलं नाही. त्यांचेपण आडनांव ‘संत’ होते. हा गाणारा मित्र ‘संत’ हा पण कॉलेज संपल्यावर काही भेटला नाही.
संजय बाळापूरे भेटतो एखादे वेळी गांवी गेलो तर ! त्याने संगीत शिकायचा प्रयत्न केला, माझ्या आईकडे यायचा तो शिकायला ! पण तो प्रयत्न तेवढ्यावरच राहिला, फार पुढे गेला नाही. दुसरे दोन मित्र म्हणजे राजेंद्र थोरात व संत यांची तर नंतर भेट पण झाली नाही. यांनी व या सारख्यांनी माझ्या या संगीताच्या रोपावर शिंपण केले, ती आवड तरारली, टवटवीत झाली कायमची ! आता नाही कोमेजणार ! माणूस दुसऱ्या व्यवसायात गेला की पोटापाण्यासाठी आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. काही वेळा दैवाने मिळालेली प्रतिभा ही पोटापाण्यासाठी उपयोगाला अवश्य येते पण काही वेळा ही देणगी फक्त छंद म्हणून राहून जाते. मला संगीताची जन्मजात आवड माझ्या आईमार्फत देणाऱ्या परमेश्वराने माझ्यावर खूप उपकार केलेले आहेत.
निवांतपणी, आपण आवड म्हणून एखाद्या गायकाचे गायन किंवा वादकाचे वादन ऐकत बसावे. पं. भीमसेन जोशींचा तोडी, पं. जितेंद्र अभिषेकींचा व डॉ. वसंतराव देशपांडे यांचा मारवा, पं. कुमार गंधर्व व विदुषी किशोरी आमोणकर यांचा भूप ! पं. डी. व्ही. पलुस्कर यांनी गायलेले काहीही ! पं. रविशंकर यांची सतार, उस्ताद अलीअकबरखाॅं यांची सरोद, पं. किशन महाराज, पं. सामता प्रसाद, उस्ताद थिरकवा यांचा तबला ! काय सांगावे आणि किती सांगावे ? काहीही ऐकायचे ठरवावे आणि त्या नादब्रह्मात आपला शीण, थकवा घालवून ताजेतवाने व्हावे.
कशामुळे कोणत्या आठवणी जाग्या होवून मनांत गर्दी करतील काही सांगता येत नाही. आता सकाळी औरंगाबादहून जळगांवी जातांना नेहमीप्रमाणे गाडीत रेडिओ लावला होता. आकाशवाणी औरंगाबाद लागले होते. काही मराठी आणि त्यानंतर हिंदी चित्रपटातील गाणी लागली होती. कानावर गाणी पडत होती आणि मन थेट माझ्या मराठी शाळेतील प्रार्थना म्हणणाऱ्या मुलांपर्यंत फिरून आले. मनाचा वेग, मनाची गती खरोखर मनच कुंठीत करून टाकणारी असते, अशी कुठेतरी कोणत्या काळात, कोणत्या विचारांत आपल्याला फिरवून आणते, आपले शरीर एकाच ठिकाणी ठेवून !

17.12.2017

No comments:

Post a Comment