Monday, December 4, 2017

एक व्रतस्थ कार्यकर्ता - श्री. बापूराव मांडे

मा. बापूराव मांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार मा. भैयाजी जोशी यांच्या शुभहस्ते आज भुसावळ येथे झाला.




कार्यक्रमाला मा. गुणवंतराव सरोदे, मा. एकनाथराव खडसे, मा. गिरीषभाऊ महाजन आणि मान्यवर मंडळी हजर होती. संघपरिवारातीलच नाही तर विविध विचारसरणीची, विविध स्तरातील, तत्कालीन आणि नवोदीत मंडळी हजर होती. या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित झाली. त्यातील माझा अनुभववजा लेख -
————————- ————————
एक व्रतस्थ कार्यकर्ता - श्री. बापूराव मांडे
आपणांस कदाचित श्री. प्रभाकर मुरलीधर मांडे या नांवाने थोडा परकेपणा वाटू शकतो; मात्र हा परकेपणा 'बापूराव मांडे' हे नांव ऐकले की या नांवाने क्षणांत नाहीसा होतो. तुम्हा आम्हा सर्वांना ते परिचित आहे, ते 'बापूराव मांडे' या नांवाने ! त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हा लिहीण्याचा योग !
आपल्या कोणा विशेष चिरपरिचिताचा असा काही कार्यक्रम असला, की त्यांचे इतके वय असेल यांवर आपला विश्वास बसत नाही लवकर ! काय सांगता, त्यांचे इतके वय आहे ? याचे कारण तत्कालीन आपल्या तो पावेतोच्या अनुभवातील सर्व घटना, दरम्यानचे विविध साजरे केलेले उत्सव, वेळोवेळी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, महत्त्वपूर्ण बैठकी, त्यातील गप्पागोष्टी, विविध आंदोलने वगैरे या सर्व अगदी आपल्याला अलिकडच्या वाटतात. वेळ जणू पुढे गेलेलाच नाही, तेव्हापासून तो थांबलाच आहे असे वाटते. मग लक्षात येते, अरे आपले वय आज किती आहे ? हे आपण लक्षात घेतले की हळूहळू आपण वर्तमानात येतो, आपल्याला आजच्या परिस्थितीचे भान येते; की केवढा मोठा २५-३० वर्षांचा कालखंड पहातापहाता झरकन आपल्या हातातून, डोळ्यांसमोरून निघून जातो.
पूर्वीपासूनच कै. डॉ. नरहर पुरूषोत्तम जोशी यांचे घर म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' जळगांव जिल्ह्यातील रावेरचे कार्यालय समजले जायचे. संघाच्या प्रचारकांचा कायम रहिवास व संघ परिवारातील सर्व मंडळींचे तेथे येणेजाणे, गप्पागोष्टी व बऱ्याच वेळा बैठका ! तिथेच मला ही सर्व मंडळी भेटली. तेथे कोणाकोणाची व माझी भेट झाली ? श्री. भैयाजी जोशी, डॉ. गुणवंतराव सरोदे, श्री. अरूणदादा पाटील, कै. डॉ. अविनाशराव आचार्य, श्री. भार्गवराव सरपोतदार, कै. गोपीनाथ मुंडे, श्री. लालकृष्ण आडवाणी !
त्या काळी मी एल्एल्. बी. चा अभ्यास संपवून १९८५-८६ ला रावेरला आलो नुकताच आलो होतो. अर्थात तो पावेतो मला होता तो रावेर येथील शालेय वयातील संघ हा आम्ही अनुभवला तो आमचे मित्र श्री. भरत अमळकर, श्री. सुनील पाटील यांच्या शाखेवरील उपस्थितीत ! नंतर जळगांव येथील महाविद्यालयीन काळातील विद्यार्थी परिषदेत रमलो ते 'श्री. चंद्रकांतदादा पाटील,'श्री. चंद्रकांत धुळूप' या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या कार्याने व आनंद घेतला तो त्यांच्या सहवासातील 'अभाविप' यांचा अनुभव ! नंतर श्री. शशिकांत घासकडबी होते तिथे विस्तारक म्हणून !
येथे रावेरला आल्यावर अधूनमधून माझ्या भेटीगाठी व्हायच्या त्या तत्कालीन प्रचारक श्री. लालचंद टाटिया, श्री. अप्पा कुलकर्णी, श्री. सौमित्र गोखले, श्री. भाऊराव पाटील वगैरे यांच्या ! यांच्यासोबत वारंवार उल्लेख यायचा तो श्री. बापूराव मांडे यांचा ! हा कालखंड साधारणत: १९८६ ते १९९३ पावेतोचा ! त्यावेळेस अजून एक नांव लक्षात ठेवावे लागेल ते म्हणजे प्रचारक असलेले श्री. विठ्ठलराव नवरे यांचे ! त्यानंतरच्या भेटीगाठी मग बऱ्याच नित्याच्या पण प्रसंगानुरूप व्हायच्यात ! श्री. अनिल वळसंगकर हे नंतर आले, दि. ६ डिसेंबर, १९९२ नंतर !
मलाच लक्षात असलेला नाही तर सर्व जगतालाच लक्षात असलेला विशेषत्वाचा काळ म्हणजे 'विश्व हिंदु परिषदेने' त्यावेळची काढलेली 'गंगामाता भारतमाता यात्रा' आणि 'राम जनमभूमी आंदोलन' ! हा काळ कोण आणि कसा विसरणार ? या अत्यंत महत्त्वाच्या काळात श्री. बापूरावांकडे जबाबदारी होती ती १९९० पर्यंत 'जळगांव जिल्हा कार्यवाह' म्हणून आणि सन १९९१ ते १९९६ या काळात 'विश्व हिंदु परिषदेचे' जिल्हा मंत्री म्हणून ! या काळांत आपल्या समाजाने, समाजातील प्रत्येक गटाने व समाज नेत्याने प्रत्येक माणसाच्या 'राष्ट्रीयत्वाच्या भावनेला' साद घातली. त्यावेळी आपल्या लक्षात आले नाही पण आता लक्षात येते की एवढ्या विपरीत परिस्थितीत, शासनही विरूद्ध असतांना ही माणसं काय काम करून गेली आहेत, काय असेल त्यांच्यात ?
त्यावेळी या रामजन्मभूमी आंदोलनांत कोण नव्हते ? सातपुडा पर्वतात रहाणारे वनवासी होते की ज्यांनी इतकी माणसं आपल्या देशांत आहेत हे कधी आजपर्यंत पाहिलेच नव्हते; एवढेच काय त्यांना ही सगळी माणसे 'आपली माणसं' आहेत हे पण कधी माहिती नव्हते. जी माणसं आजपावेतो आयुष्यभर शेळ्यामेंढ्या घेवून पोटापाण्यासाठी गांवोगांव, रानोंमाळ फिरत होती त्यांनाही समजले की प्रभू रामचंद्र हे आपले आहेत व ही सर्व माणसं आपली आहेत. जसे आपले मठ-मंदीरे सोडून संतमहंत बाहेर पडले; तसेच दूर कुठे रानांवनांत, दऱ्याखोऱ्यात रहाणारी साधू मंडळी बाहेर पडली, ती प्रभू रामचंद्र हा तुमचा पूर्वज आहे हे सांगण्यासाठी !
श्री. बापूराव मांडे यांनी तत्कालीन परिस्थतीत जिल्हाभर वेगवेगळ्या व्यक्तींवर जी जबाबदारी सोपविली होती, त्यातील माझ्यावर पण ही 'रामजन्मभूमी संबंधी' जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी आम्ही म्हणजे २५-३० वर्षांची मुले ! ही त्यांनी सोपविलेली जबाबदारी आम्ही जबाबदारी म्हणून मानत कुठे होतो ? हे तर आपले कर्तव्य आहे, ते आपण करायला पाहिजे. ही अशी मनोभूमिका तयार करणे ही सामान्य बाब नाही. आता या निमित्ताने मागे वळून पहातांना लक्षात येते की ही विविध विचारांची, आचारांची व राजकीय पक्षांची देखील माणसं या माणसाने जिल्हाभर फिरून कशी एकत्र बांधली असतील ? आमच्यासोबत कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा मुलगा नव्हता ? अयोध्येस त्यावेळी जळगांव जिल्ह्यातील संख्या ही लक्षात घेण्याइतपत मोठी होती.
या निमित्ताने आम्ही गांवोगांव जायचो तर गांवातील, घरांघरांतील अन्नपूर्णांनी आम्हाला व आमच्या सोबतच्यांना देखील ममतेने त्यांच्याजवळ जे आहे त्यातून जेवू घालून तृप्त केले. ही सर्व तयारी, ही सर्व काळजी व हे सर्व नियोजन करणे आणि ते यशस्वीपणे पार पाडणे हे सोपे काम नाही. सन १९९६ ते २००६ या काळात त्यांनी परिवाराची जबाबदारी सांभाळली ते 'भारतीय जनता पक्षाचे' कारकत्वाची ! सन २००६ नंतर त्यांचेवर अशी ठरवून कोणती जबाबदारी नाही. मात्र सातपुडा पर्वतात 'हरिपुरा' येथे त्यांनी जे 'गोसेवा केंद्र' सुरू केलेले आहे, ती समाजाप्रती व्यक्त केलेली त्यांची एक श्रद्धाच होय ! त्यापूर्वीपासून गेली पंचवीस वर्षे भुसावळ येथील 'संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची' प्रमुख जबाबदारी ते पार पाडत आहे.
त्यावेळी 'रामजन्मभूमी आंदोलनाचे वेळी' पन्नाशीत असलेल्या या माणसाने त्यावेळी ज्या तडफेने काम केले ते पाहिल्यावर आमचा कसा विश्वास बसणार की श्री. बापूराव मांडे आता पंचाहत्तरीत आले ! माझ्या डोळ्यांसमोर त्याचवेळचे मिळेल त्या वाहनाने फिरणारे श्री. बापूराव येतात ! डोक्याला उन्ह लागू नये म्हणून पांढरा लांब बागायतदार रुमाल बांधून 'राजदूत मोटारसायकल'वर येणारा त्यांचा चेहरा आजही दृष्टीसमोर येतो.
कोणी आजही श्री. बापूरावांना सांगीतले की, 'हे पहा, आता आपल्याला हे काम करायचे आहे, तुमच्याशिवाय कोण करणार ?' तर मला नाही वाटत ते नाही म्हणतील ! --- वयाच्या ऐंशीपंचाऐंशीत प्रत्यक्ष कोंढाणा किल्ल्यावर लढाईला जाणाऱ्या शेलारमामाचे रक्त या माणसांच्या अंगी खेळत असते, तो त्याची पंचाहत्तरी साजरी केली तरी स्वस्थ थोडाच बसणार आहे ?

22. 11.2017

No comments:

Post a Comment