Tuesday, December 26, 2017

नाते सांभाळले, अन -------------!

नाते सांभाळले, अन -------------!

पूर्वीच्या काळी, साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी, शेतकरी कुटुंबातील पाचसहा भाऊ आणि त्यांची मुलेबाळे, तीनचार बहिणी आणि या सर्वांचे आईवडील एकत्र रहायचे, अगदी एका ठिकाणी, हे काही नवीन नव्हते ! हा घरातीलच मोठा कबीला, तेवढाच मोठा गोतावळा आणि शेजारपाजार ! ती मंडळीपण नातलगांसारखीच ! घरांतील मंडळींना सर्वाना स्वतःच शेतासाठी कष्ट करावे लागत. मजूर कोण आणि मालक कोण ? म्हटले तर सर्वच मजूर आणि मालक ! कारण सर्वानाच तर शेतांत राबायचे आहे, तेंव्हाच तर पोटाला जरा पोटभर खायला मिळणार. सर्वजण एकत्र रहात असले की प्रत्येकाच्या सुखात जसे वाटे पडायचे तसेच दुःखात पण दुःखीतांस आधार मिळायचा, त्याला सांभाळून घेतले जायचे. पूर्वी नेहमीच खेडेगावांत दिसत असलेली अशी उदाहरणे, आता कमी झालेली आहेत पण तरीही अजूनही थोडी का होईना पण आजही दिसतात, दिवसेंदिवस कमी होत चाललीय हे खरंय. प्रत्येकाला स्वतःची पडलेली आहे असे म्हणा का प्रत्येक स्वार्थी झाला आहे असे म्हणा का आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी या फक्त बोलायच्या कल्पना राहीलेल्या आहेत, अंमलात आणायच्या नाही अशी समजूत झाली आहे कुणास ठाऊक ?

घटना साधारणतः १९६१ सालातील, शेतकऱ्याचा अशाच गजबजलेल्या घरातील ! चारपांच भावंडातील मोठा भाऊ देवाला प्रिय झाला आणि एकत्र कुटुंबाची जबाबदारी ही आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याच्या नंतरच्या भावाकडे आली. मोठया भावाचा एकच मुलगा आणि त्याची आई अगोदरच त्याला सोडून गेली होती. घरांतील आईबापाविना हा पोरगा सांभाळला तो त्याच्या काकाने आणि काकूने ! त्यांनापण मुलेबाळे होतीच पण फक्त एकच मुलगी ! घरात भांड्याला भांडे लागायचे पण मुलाच्या काकाने आपल्या कर्तव्यांत कधी कसूर केली नाही. या भाऊबहीणीच्या नात्यांत काही कधी चुलतपणा डोकावला नाही आणि नातं सख्खच राहिलं ! यथावकाश मुलाचे लग्न झाले, घरी सुनबाईची पावलं लक्ष्मीची पावलं बनून आली. काकाला एका जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले. इतर भावांना त्यांची मिळकतीतील हिस्से दिलेले होतेच ! पण या आईबापाविना असलेल्या पोराला सांभाळता सांभाळता हे काका त्याच्यातच केंव्हा राहू लागले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. इतके हे काकापुतणे एक विचाराचे झाले होते. त्यानंतर मुलीचे लग्न झाले आणि मुलगी तिच्या घरी सासरी गेली. मुलीच्या लग्नात या भावाने कसली उणीव पडू दिली नाही. 

यापूर्वीच काकाने त्याच्या हिश्यातील काही जमिनी, घरे विकली; थोडी जमीन आणि एकदोन घरे राहीली होती. या पुतण्याचाही हिस्सा याच्याजवळच होता. काका-पुतणे असे वेगळे नातेच माहीत नव्हते. काका कुटुंबाच्या कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आणि सर्व जबाबदारी पुतण्याने सांभाळली. काकाला वेगळे रहाण्याची काही आवश्यकताच नव्हती आणि तसा विचारही कोणाच्या मनांत नव्हता. आईबापाविना असलेल्या या पोराला काकाने स्वतःचा पोरगाच समजून मोठे केले आणि मग हा पुतण्या, काकाला आपला बाप म्हणूनच सांभाळू लागला. त्याचे दुखणे-खुपणे, जेवण-खाण, उठ-बस हे सर्व पुतण्या, त्याची पत्नी पहायची. मुलगीपण कधी अधूनमधून बापाला पहायला म्हणजे भेट घ्यायला यायची आणि त्यांची उस्तवार जावईबापूंच्या पाहुणचारासहीत हा पुतण्या आणि त्याची पत्नी बघायची. काकाला समाधान वाटायचे, आपल्या पश्चात आपल्या मुलीची काही काळजी नाही. म्हातारा मनाशीच खूष व्हायचा आणि देवाचे आभार मानायचा. 'माझ्यानंतर तुझेच आहे सगळे, तूच पाहतो आहे आता कधीचे. आता माझा काही भरवसा नाही. काय कुठे नांव लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज वगैरे द्यायचे असतील तर दे, माझे अंगठे घे, मी द्यायला तयार आहे'. म्हातारा काका समाधानाने म्हणायचा. 'शेतीबाडी आणि घरंदारं काय कुठे पळून जाताहेत का. मीच तर पाहतोय सर्व आणि तू काही अजून जात नाही वर, पोराचे लगन पहायचे आहे अजून !' पुतण्या काकाची समजूत काढायचा. असे करता करता अर्जफाटे झालेच नाही, शेतीबाडी आणि घरदार म्हाताऱ्याचेच नांवाने राहीले आणि कोणतीही वाट न पहाता देवाने शेवटी एकदा या काकाला आपल्याकडे बोलावून घेतले. सन १९९२ च्या दरम्यानची ही गोष्ट ! या पुतण्याने काकाचे सर्व अंत्यसंस्कार आपल्या बापाप्रमाणे केले आणि आपले पितृऋण फेडले. त्याला लहानपणीच गेलेला आपला बाप तरी कुठे आठवत होता? मुलीला बापाचे समजले, मुलगी आली, चार दिवस राहीली, बापाचे जाण्याने झालेले दुःख हलके केले आणि निघून गेली. मुलगापण आपल्या कामाला लागला.

वर्ष-दीडवर्ष झाले, दरम्यान बहिणीचे कान कोणी फुकले कोणांस ठावूक पण तिने कसलासा निर्धार केला. आणि एका दिवशी त्या भावाला या बहिणीची तालुका कोर्टामार्फत नोटीस आली ! बहिणीने भावाविरुद्ध दावा केला होता, वर्ष होते १९९३ ! आपल्या बापाची सर्व मिळकत आपल्याला मिळावी कारण आपण त्याचे एकमेव वारस आहोत म्हणून ! लहानपणापासून सख्खे-चुलत माहित नसलेली ही भावंडं, सख्ख्या भावाबहिणीप्रमाणे एकत्र राहीलेले हे भाऊ बहीण आता मिळकतीसाठी कोर्टांत उभे होते.  नेमका हक्क कोणाचा यांवरून वाद सुरु होणार होता, नव्हे सुरु झाला होता. बहिणीला जसे सांगणारे होते तसे भावाला देखील सांगणारे होते. कायदा भलेही थोडा बहिणीच्या बाजूने असेल पण समाज, समाजाचा पाठींबा भावाच्या बाजूने होता. भावाने त्याच्या लहानपणापासून काकाने स्वतःच्या मुलाप्रमाणे कसे सांभाळले हे सांगीतले, त्याचप्रमाणे आपणही काकासोबत वडिलांप्रमाणेच कसा व्यवहार केला हे सांगीतले. या बहिणीच्या लग्नात कायकाय केले हे सांगीतले. काकाला काय केले नाही अगदी सर्व केले हे सांगीतले. काका कित्येक वेळा 'शेतीबाडी, घरे नांवावर करून घे' हे सांगत असतांना देखील मी तसे केले नाही कारण माझ्या मनांत पाप नव्हते, हे सांगीतले. त्याचा आणि त्याच्या वडिलांचा हिस्सापण काकाजवळच होता हे देखील सांगीतले. दोन्ही बाजूने भरपूर कागदपत्रे रंगली, साक्षीपुरावे झालेत. नात्यांबद्दल वाद नव्हताच ! कायदा सरळ होता. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातील तरतुदीनुसार मुलीला वडिलांच्या मिळकतीत हक्क मिळाला. सन २००५ मध्ये दाव्याचा निकाल बहिणीच्या बाजूने लागला. भावाला, समाजाला आणि नातेवाईकांना जरा वाईट वाटले. बहिणीच्या बाजूने निकाल लागला असल्याने त्यांचेकडील मंडळी खूष होती. भावाने तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयांत दाद मागीतली. वरील जिल्हा न्यायालयाने देखील बहिणीची बाजू उचलून धरत तालुका न्यायालयालाच निकाल सन २०११ मध्ये कायम केला. भावाला वाईट जसे वाटले तसा संतापही आला. 'काकाचे मी केले ते मिळकत मिळण्यासाठी नाही हे नक्की ! पण मग त्यावेळी ही बहीण काय करत होती ? फक्त मिळकत हवी, जबाबदाऱ्या नकोत.' मनांतल्या मनांत भाऊ पुटपुटू लागला. ही अवस्था बहिणीच्या हितचिंतकांना समजल्यावर त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.

हे दोन्ही निकाल अनुभवल्यावर भावाला वाईट वाटले. समाजाच्या विचार काहीही न मानता, न्यायालये कसे निकाल देतात आणि कायदापण कसा आहे हे समजतच नाही, भावाचा जीव गत काळातील घटना आठवून तीळतीळ तुटत होता. भावाने शेवटी जिद्द धरली आणि जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नामदार उच्च न्यायालयांत दाद मागण्याचे ठरविले. तो माझ्याकडे आला, संतापलेल्या मनाने पण निराश भावनेने ! 'जवळची माणसे इतकी बदलतात ? पैसा इतका मोठा आहे ? नातीगोती पैशासमोर सर्व खोटी ? हिच्या बापाचे कसलीही अपेक्षा न धरता आयुष्यभर करणारा मी, त्यावेळी ही कुठे गेली होती? ' त्याचा संताप आपल्या समाजाच्या विचारसरणीला साजेसा होता. त्याने सांगीतलेल्या घटनेवरून आणि घडलेल्या परिस्थितीवरून कायकाय करता येईल याचा विचार केला. खालील न्यायालयांत काय लिहावयाचे, सांगावयाचे अथवा पुरावा देण्याचे राहून गेलेले आहे हे पाहीले. जुन्या आणि नवीन हिंदू कायद्याचा विचार करून नामदार उच्च न्यायालयांत अपील दाखल केले.

त्यापूर्वी पक्षकाराला बहिणीला काहीतरी द्यावे लागेल याची स्पष्ट कल्पना दिली. नवराबायकोचे भांडण, भाऊबंदकीचे भांडण, कायमच्या शेजाऱ्याचे भांडण वगैरे केसेस असतील तर मी शक्यतोवर आपसांत होत असेल तर पहातो. संबंध टिकले तर चांगलेच, हे माझे पाहिलेपासूनचे धोरण आहे. त्याने काही वेळा आर्थिक नुकसान होते पण मानसिक फायदा होतो. आजकाल मानसिक फायद्याला कोणी विचारात नाही, पण मला बरे वाटते आणि मी ते करतो. मी त्याला म्हटले 'हे बघ, आजपर्यंत जर तुम्ही बहीणभावाने एकमेकांबद्दल दुजाभाव बाळगला नसेल तर अजूनही काही वेळ गेलेली नाही, गावांत नातेवाईकांसोबत, संबंधितांसोबत बैठक घ्या. हे सर्व सांगा. याचे परिणाम सांगा. आपल्याला समाजातच रहायचे आहे, तुमचे मन स्वच्छ ठेवा. मनांत पाप येऊ देऊ नका आणि जुन्या उखाळ्यापाखाळ्या काढू नका. काहीतरी मार्ग निघेल.' पक्षकार थोडा मनातून हलला. 'पहातो.' म्हणून त्याच्या गावी गेला.

दोन्ही खालील न्यायालये विरुद्ध असल्यावर नामदार उच्च न्यायालयांत अपील दाखलसुद्धा करून घेणे किती अवघड असते आणि त्याची नोटीस काढणे किती कठीण असते, हे यातील जाणकारांनाच माहीती आहे. न्यायालयासमोर हे अपील निघाले. मी युक्तीवाद केला. न्यायालय माझ्या बाजूने जवळपास नव्हतेच मात्र जुना हिंदू कायदा, नवीन हिंदू कायदा, मुलगा आणि त्याचे धर्मशास्त्राप्रमाणे प्रकार, घडलेली घटना आणि त्याचा काळ, याचा निकालावर होणारा संभाव्य परिणाम आणि याबद्दलची पूर्वीची निकालपत्रे वगैरे सांगीतल्यावर न्यायालय थोडे हलले. शेवटी अशा घटना झाल्या तर समाजातील अशा परिस्थितीत अडचणीतील म्हाताऱ्या माणसांसाठी कसा निर्णय घेतला जाईल, हे सांगीतल्यावर थोडे गांभीर्य आले. मात्र तरीही परिस्थिती कठीणच होती. न्यायालयाने 'आपसांत करण्यास तयार आहे का ?' हे विचारल्यावर 'आम्ही सुरुवातीपासूनच तयार आहोत, पण समजावून सांगणारे नाहीत किंवा अडथळे आणणारे आहेत.' हे सांगीतल्यावर 'पुढील दिनांकास बहिणीला हजर ठेवा' असे कोर्टाने सांगीतले. ही बातमी त्या बहिणीपर्यंत गेलेलीच होती.

याने सर्व नातेवाईकांना ही घटना सांगीतली, बैठक बसली. सर्वांची चर्चा सुरु झाल्यावर, 'संबंध पैशासाठी बिघडू देऊ नका. तुझ्या बापाचे तू सासरी गेल्यावर यानेच केले मग त्याचे काय ? तुला जर बहीण असती आणि ती अडचणीत असती तर काय केले असते ? वगैरे दोन्ही बाजूने भरपूर चर्चा झाली. वातावरण निवळले. कोर्टाचा निरोप त्याने बैठकीत सांगीतला. बहीण पुढील तारखेस उच्च न्यायालयांत आली. तिने एक मुदत मागून, वकील लावले. न्यायालयाने एक मुदत दिली. माझे त्याच्या बहिणीशी बोलणे तिच्या वकिलांसमोर झाले, मी एकच विचारले, 'बाई, आज कायदा तुमच्या बाजूने आहे. खरे आहे. पण या तुमच्या भावाने तुमच्या वडिलांवर त्याच्या वडिलांप्रमाणे विश्वास ठेवला आणि तो त्याच्याशी मुलाप्रमाणे वागला. हे बरोबर आहे ना ?' बाई काही बोलेना. मी सुरु ठेवले, 'हे पहा, ही अशी नंतर जर तुमच्यावर वेळ आली तर तुमच्या पुतण्याने तुमच्याबद्दल काय करावे? तुमच्याशी कसे वागावे ? तुमची मुलगी त्याच्याशी कशी वागेल ? डोळ्यासमोर या गोष्टी आणा. नीट विचार करा. तुमचे जन्मापासूनचे संबंध आहेत. मी काय परका माणूस ! या न्यायालयाची हद्द फक्त याच कायद्यापुरती आणि येथेच चालते. या न्यायालयाचा एकवेळ हिशोब चुकेल पण तो वर जो या सर्व न्यायाधीशांचा न्यायाधीश बसलेला आहे, त्याचा हिशोब कधी चुकत नाही. तो कोणावर अन्याय करत नाही. तो आपल्या कृत्याचे पुरेपूर माप आपल्या पदरांत टाकतो. इथे जमले नाही तर त्याला केस हातांत घ्यावी लागेल. मग तो विचारणारसुद्धा नाही कोणाला !' आता बाई रडवेली झाली होती. 'साहेब, पैका मोठा वाईट ! मले पैक्याशिवाय कोण आहे. हा इतला खर्च येतो आहे जगायले अन दवापाण्याला, कोण देणार ?' बाई बोलली. मग मी माझ्या पक्षकाराकडे वळलो. 'हिची अडचण काय आहे ते गावी जाऊन पहा. ती दूर करा अन मग मला भेटा.' माझा पक्षकार चाट झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. ''बहिणीची अडचण दूर करणे हे भावाचे काम आणि भावाची मदत करणे हे बहिणीचे काम ! ते करा आणि मग मला भेटा. अनायासे कोर्टाने मुदत दिली आहे.' मी म्हणालो.

ही मंडळी गावांत गेल्यावर ही घटना नातेवाईक मंडळींना सांगीतली, 'आता वेळ दवडू नका. जे ठरले आहे किंवा जे ठरेल ते अमलांत आणा.' असे सांगीतले. भावाच्या ताकदीप्रमाणे आणि बहिणीच्या अडचणीप्रमाणे पैसे देण्याचे ठरले, कारण बहीण शेती करायला येणार नव्हती किंवा तेथे रहायला येणार नव्हती. दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे दिवाळीला, आखाजीला तिने तिचे माहेर समजून यावे आणि भावाने तिच्याशी भावाप्रमाणे व्यवहार करावा, हे ठरले. हे पहायला ती नातेवाईक मंडळी होतीच ! भावाचे आणि बहिणीचे प्रतिज्ञापत्र तहसीलदार यांच्यासमोर झाले ते नामदार उच्च न्यायालयांत दाखल करण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे निकाल करावा असे ठरले. ठरल्याप्रमाणे सर्वांचे झाले आणि न्यायालयासमोरील प्रकरण यानुसारच निकालात निघाले. त्यावेळी न्यायाधीशांनी काय ठरले हे विचारल्यावर त्या बहिणीने सर्व व्यवस्थीत सांगीतले. न्यायाधीशांनाही समाधान वाटले.

कायद्यानुसार आणि कायद्यांत सांगीतलेला अधिकार, न्याय हा काही वेळा आपल्या समाजात चालत आलेल्या रूढी आणि नैतिकतेनुसार असलेल्या अधिकारापेक्षा आणि न्यायापेक्षा भिन्न असतो.  समाजातील बहुसंख्य घटकांना अजूनही कायद्यापेक्षा समाजात चालत आलेल्या रूढी आणि नैतिकतेनुसार असलेल्या अधिकाराचा आणि न्यायाचा पगडा जास्त असतो. समाजाची नैतिकता, नितीमूल्ये ही जर असलेल्या कायद्याच्या विरुद्ध नसतील तर त्यांच्यात एकमेकांत संघर्ष निर्माण होत नाही. अशावेळी समाजातील पुढारीपण प्राप्त झालेल्या घटकांना ही जबाबदारी पार पाडावी लागते आणि समाजातील शांतता टिकवावी लागते.    

(ही घटना संक्षीप्त स्वरूपात 'जळगांव लोकमत' यांत दिनांक १७. १२. २०१७ आणि २४. १२. २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती )







No comments:

Post a Comment