जळगाव येथे मी 'नूतन मराठा कॉलेज मध्ये', त्यानंतर 'एस. एस. मणियार लॉ कॉलेज' मध्ये मी शिकलो. त्यावेळी माझ्या भाग्यात अनेक गोष्टी आल्यात, डॉ. के आर सोनवणे हे 'नूतन मराठा कॉलेज मध्ये प्राचार्य होते. तेथे श्री. लाहोटी सर, श्री. एस वाय पाटील सर, श्री. वाघ सर, श्री. काटदरे सर, श्री. शेखर सोनाळकर सर, श्री. देशमुख सर, सौ. साळुंखे यांनी अतिशय अप्रतिमपणे शिकवले. श्री. बावस्कर सर हे आमच्या 'वादविवाद मंडळाची' जबाबदारी सांभाळायचे. मला असंख्य स्पर्धांमधून, वादविवाद - वक्तृत्व, कथाकथन - काव्यवाचन, नाटकांमधून, अगदी - तबलावादनातही आमच्या कॉलेजचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि हो, श्री. उज्ज्वल निकम सर (प्रसिध्द विधिज्ञ) हे आम्हाला 'नूतन मराठा कॉलेज मध्ये 'व्यापारविषयक कायदे आणि कराराचे कायदे' उत्तमपणे शिकवायचे.
माझ्या 'एस. एस. मणियार लॉ कॉलेज' मध्ये श्री. माथुर वैश्य सर, श्री. अत्रे सर, श्री. सरोदे सर, श्री. एच ए चौधरी सर, श्री. फालक सर, श्री. प्रकाश पाटील सर आणि कै. बेंडाळे सर तसेच पै. इस्माईल सर यां नामवंत वकील मंडळीनी आम्हाला फारच कळकळीने आणि मनापासून शिकवले, ही त्यांनी दिलेली शिदोरी मला आजही पुरत आहे. आज माझ्या सारख्याला समजते की यांचा आपल्याला शिकवण्यात किती वेळ वाया जात असेल की ज्यापासून त्यांना काहीही आर्थिक फायदा होणार नव्हता, मात्र जळगाव येथे 'लॉ कॉलेज' टिकले पाहिजे या भावनेने यांनी आम्हाला शिकवले होते. माझ्या महाविद्यालयीन काळाने, त्यावेळच्या शिक्षकांनी, मित्रांनी , कै. आचार्य डॉक्टर यांच्यासारख्या मोठ्या सामाजिक व्यक्तिमत्वाकडून मला बरेच शिकावयास मिळाले. या सर्वांचा उल्लेख येथे करणे अशक्य आहे.
त्याचवेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या उत्साहाने मी आकाशवाणीमधील नाटकाची आवाजाची चाचणी दिली की जी प्रत्यक्ष श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी घेतली आणि मी उत्तीर्ण झालो. त्यावेळी आकाशवाणी हे अतिशय समर्थ, लोकप्रिय आणि जवळजवळ एकमेव असे सर्वमान्य माध्यम होते, त्यानंतर आकाशवाणीच्या खूप नभोनाट्यात मी सहभागी झालो, ज्यावेळी कै. भैय्या उपासनी, कै. मोहिनी पंडित या होत्या. श्री. अशोक बढे, श्री. भगवान भटकर, श्री. विजयसिंग गावित, श्री. नीळकंठ कोठेकर, श्री. भगवंत इंगळे, श्री. गोपाल औटी, श्री. दत्ता सरदेशमुख, सौ. उषा शर्मा वगैरे मंडळी तेथे होती. वातावरण उत्तम आणि निरोगी होते. अनेक उत्तमोत्तम नाटकांत मला सहभागी होण्याची संधी मिळाली.
जळगावच्या 'विद्यार्थी परिषदेत' नेहमी जाणे येणे असे, त्याची काही जबाबदारीदेखील असे. त्यावेळी जळगाव येथे आज आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्री असलेले, श्री. चंद्रकांत पाटील हे 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे' पूर्णवेळ कार्यकर्ते होते आणि त्यानंतर ते 'महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशनात' 'प्रांत मंत्री' झाले, त्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ / पायाभरणी ही 'जळगावी'च झाली, ही भावना आहे.
जळगावी 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' श्री. शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यात नामवंत साहित्यिकांची भाषणे ऐकता आली, त्याचे दर्शन झाले, कै. माधव मनोहर, कै. ग वा बेहरे, कै. शिवाजी सावंत किती नांवे सांगावीत?
आज अचानक हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे त्यावेळी मी नुकताच वकील झालेलो होतो, नवीन असल्याने फारसे काम असल्याचा प्रश्नच नव्हता आणि तेथे मला 'वक्ता दशसहस्त्रेषु' असे मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण प्रथमतः प्रत्यक्ष ऐकावयास मिळाले, जिल्हा न्यायालयाजवळ 'जी एस ग्राउंड' आहे तेथे त्यांचे दुपारी भाषण झाले, स्वाभाविकपणे न्यायालयाचे जवळपास सर्व कामकाज 'वकिलाच्या अभावी' ठप्प झाले होते, त्याबाबत कोणीही तक्रार केल्याचे ऐकिवात नाही कारण जवळपास सर्वच पक्षकारही तेथेच होते. फक्त काही न्यायालयीन कर्मचारी आणि (नाईलाजाने ) न्यायाधीश हे न्यायालयात होते, बहुतांश कर्मचाऱ्यांनी देहधर्म या नावाने आणि झेपेल त्या कारणाने पळ काढला होता आणि बराच वेळ त्यांचा देहधर्म सुरु होता असे कळाले. महत्वाचे म्हणजे त्या काळात कोणत्याही न्यायाधीशांनी कोणाचेही काम ते गैरहजर असल्याने रद्द केले नाही. मात्र वकील मंडळी आल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांनी 'ते अडकून पडल्यासारखी भावना व्यक्त केली', त्यांना हेवा वाटणे हे स्वाभाविकच होते एवढे भाषण अप्रतिम होते, मात्र 'अटलजींचे अप्रतिम भाषण' या वाक्यात भाषाशास्त्रानुसार पुनरुक्तीचा दोष आहे, या माझ्या विधानाशी बहुधा बरेच जण सहमत होतील अशी खात्री आहे, त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांनी 'मा. अटलजींचे' भाषण ऐकण्याचा माझ्या भाग्याने योग आला. आता 'भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी' हे म्हणावयास फारच आनंद होत आहे.
No comments:
Post a Comment