प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात निरंतर धकाधकीचे, कष्टप्रद कामाचे, अपमानाचे, वैफल्याचे - निराशपणाचे, मनस्तापाचे, विश्वासघात अनुभवण्याचे, फसवणुकीचे, थोडक्यात आपले मनस्वास्थ्य ज्यामुळे बिघडू शकेल असे प्रसंग वारंवार येत असतात. आपण जर त्याच प्रसंगाने हबकून गेलो, त्रस्त झालो तर जीवनातील मिळणाऱ्या अमोल आनंदास आपण मुकू, निराशेच्या अवस्थेत कंटाळवाणे जिणे आपण जगू लागले तर आपले आयुष्य कमी होण्याव्यतिरिक्त आपणास काहीही मिळणार नाही, आपण आपले आरोग्य बिघडवून ठेवून खर्च मात्र वाढवून ठेवू, कुटुंबाची काळजी निष्कारण वाढवू. 'ठेवीले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे आपल्या संत पूर्वजांनी सांगितलेले आहे ते विनाकारण नाही. यातून जो मार्ग काढायचा असतो तो चिडचिड करून अथवा कोणावर संतापून नाही तर अत्यंत शांततेने, विचारपूर्वक आणि यांत आपण काही करू शकतो का? याचा भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 'स्थितप्रज्ञाप्रमाणे', सांगोपांग आणि साकल्याने विचार करून त्यावर निर्णय घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्याची समर्थपणे अंमलबजावणी करायची असते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीतून जातांना खूप त्रास होतो कारण गाड्यांची स्थिती, रस्त्यांवरील खड्डे, चालवणारे चालक आणि सोबत असणारे वाहक! त्यात भर म्हणून की काय गाडीला असलेली गर्दी, होणारी रेटारेटी वगैरे. त्यामुळे इतका त्रास होतो की पुन्हा बसने जावेसे वाटत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते, अर्थात ती खोटी आहे असे माझे म्हणणे नाही, पण अशाही परिस्थितीत जर आपण घडण्याऱ्या घटनांकडे थोडया वेगळ्या, खेळकर दृष्टीने पाहिल्यास आपल्याला प्रवासाचा आनंदही अगदी त्रास होत असतानाही घेता येतो, म्हणूनच मला आलेला अनुभव मी येथे देत आहे, तो माझ्या दृष्टीने.
एकदा जळगाव ते औरंगाबाद या गाडीने मी सहकुटुंब सायंकाळी निघालो. माझा प्रयत्न मी दुपारी निघावे असा होता, पण तो कठोरपणे आणि समर्थपणे हाणून पाडण्याचे काम सौ. ने कौशल्याने केले आणि 'नेहमीच तुमच्यामुळेच कसा उशीर होतो' हे मला पटवून दिले. अर्थात त्याबाबत मी शक्यतो प्रतिवाद करीत नाही, कारण त्याचा फारसा उपयोग होत नाही; मात्र आपला त्रास दुप्पट होतो (म्हणजे प्रवासाचा त्रास आणि प्रवासातील त्रास) हे मला आता अनुभवावरून लक्षात आले आहे. असो. बऱ्याच वेळेपासून गाडी लागलेली नसल्याने गाडीला फारच गर्दी होती, मात्र सुदैवाने आम्हास अगदी वाहकाच्या मागील जागा मिळाली, गाडी निघाली. वाहक तिकिटे देऊ लागला. गर्दी असल्याने तिकिटे देण्यास त्याला उशीर होत होता. मात्र सुट्या नाण्यांचा गोंधळ, फाटक्या नोटा, सज्ञान मुले अज्ञान दाखवण्याचा प्रवाश्यांचा प्रयत्न आणि तो हाणून पाडण्याचे वाहकाचे कसब हे एकाच वेळी अनुभवास येण्यामागील गम्मत, एकमेकांचे कमीजास्त पैसे लक्षात ठेवत, कसेबसे सर्वांना तिकिटे देवून वाहक आपल्या जागेवर बसला.
साधारणपणे १५ - २० मिनिटे गाडी पुढे गेली असेल किंवा नाही तोच गाडीत 'खळळळ' असा बाटली फुटल्याचा आवाज आला आणि लगेचच दारूचा वास आला. 'अरे, अरे गाडीतून दारूच्या बाटल्या नेत आहात?' मोठयाने आरडाओरडा झाला. वाहक आरडाओरडा ऐकून मागे आला, प्रवाश्याच्या गर्दीतून तेथे गेला, 'भाऊ, तुम्ही कमाल करता. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, दारूच्या बाटल्या महामंडळाच्या गाडीतून नेणे बेकायदेशीर आहे. बाटली कोणाची आहे?' यावर कोणीही उत्तर देण्यास तयार नव्हते. 'अरे, पहिले ती बाटली पहिले फेका, नंतर कोणी आणली याचा शोध लावा. कोणी कबुल करणार आहे का माझी बाटली आहे म्हणून, का हे सत्ययुग आहे?' अर्थात दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही हे होते, एकाने परस्पर वस्तुस्थिती स्पष्ट केली. 'अरे, आता काय फेकता? ती फुटली, तिच्या काचा फेका, पायाला लागतील.' एक प्रवासी ओरडला. 'पण मला हे समजत नाही, गाडीतून दारूच्या बाटल्या नेवूच कश्या देतात?' एका सात्विक संतप्त प्रवाशाचा संभावित प्रश्न. 'आता, प्रत्येक प्रवाश्याचे सर्व सामान तपासून पाहणार आहे का? आता येथे तुमचे सामान तपासले तर ते तुम्हास चालेल का?' एका प्रवाश्याने बाटलीवाल्याची बाजू घेतली का समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, याचा थांगपत्ता लागू दिला नाही. वाहक पुन्हा आपल्या जागेवर बसला.
पुन्हा साधारणतः १० - १५ मिनिटे झाली असतील की नाही, तोच मागून मोठ्यामोठ्याने आरडाओरडा ऐकू आला. 'अहो, कंडक्टरसाहेब, हा माणूस पहा मोठ्यामोठ्याने दारू पिवून गाणे म्हणतो आहे.' आता बाटली कोणी आणली होती, याचा आपोआप तपास लागला होता. त्या प्रवाश्याला अधेमध्ये उतरावे का त्याच्याच ठिकाणावर उतरावे, याची चर्चा सुरु झाली. वाहक पुन्हा त्याचेपावेतो गेला. 'याला आत्ताच्या आत्ता खाली उतरावा' हे एकाचे मत, तर 'याला अधेमध्ये उतरवल्यावर, त्याचे नंतर काही भलेबुरे झाले तर आपल्यावर येईल.' हे सडेतोड उद्गार ऐकल्यावर थोडी शांतता पसरली, तेवढ्यात गाडीच्या चालकाने गाडी थांबविली. पहूर आले होते, 'पहूर' असा पुकारा झाल्यावर तो गाणे म्हणणारा डुलतडुलत उतरला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पण तेवढयाने भागणार नव्हते कारण बस सुरु होते न होते तोच, एक कॉलेजकुमार ओरडला 'अरे मला उतरायचे आहे पण माझा मोबाईल सापडत नाही.' गाडीत हलकल्लोळ माजला. 'कोणी घेतला' हे वेगवेगळ्या स्वरात आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडून बोलले जात होते. तेवढयात बाकीचे प्रवासी बस सुरु करणेसाठी गर्दी करावयास लागले. कॉलेजकुमारची अडचणीची परिस्थिती ही होती की त्याचे शेजारी एक कॉलेजकुमारी बसली होती आणि त्यांच्या जळगावपासून गुलुगुलु गप्पा सुरु होत्या. त्याने आणि इतरांनी त्या मुलीला मोबाईलबाबत विचारल्याबरोबर बसमध्ये तिने मोठा स्फोट केला, 'कमाल करताय, मी कशाला मोबाईल घेऊ?' 'मग इतका वेळ कसल्या गप्पा सुरु होत्या, आणि मोबाईलमध्ये पाहणे चालले होते?' एकाने मोठयाने शंका बोलून दाखवली. तो अजूनही 'लेकी बोले सुने लागे' या तत्वाने बोलत होता. शेवटी मुलीच्या नादी कोण लागेल हा गंभीर प्रश्न आणि 'पहूर' येथे उतरायचे असल्याने तो कॉलेजकुमार उतरला, मात्र त्याने 'मी मोबाईल हरवल्याची पोलीसात तक्रार नोंदणार आहे' हे उतरता उतरता सांगितले. भरपूर प्रवासी नेहमीप्रमाणे पहुरला बसमध्ये चढले आणि बस सुरु झाली. प्रवासी पुन्हा आपल्या विश्वात रममाण झाले.
बसचा वाहक पुन्हा नवीन चढलेल्या प्रवाशांसाठी तिकिटे काढू लागला, दोन- तीन तिकिटे काढून झाली किंवा नाही तोच मघाच्याच कॉलेजकुमारीने मोबाईल सापडल्याची आरोळी ठोकली, त्याबरोबर 'हा मोबाईल नंतरच का सापडला, अगोदर का नाही?' 'आता हा कसा द्यायचा? हं, या निमित्ताने भेटता येईल.' 'पोलिसांकडे जमा करा, नसत्या भानगडीत पडू नका. हल्ली मोबाईल आहे का काही संशयास्पद आहे हे काही सांगता येणार नाही.' वगैरे मनस्थिती बिघडविणारे आणि डोक्याचे खोबरे करणारे आणि तशा परिस्थितीतही मनोरंजन करणारे संवाद ऐकू येवू लागले. बसचा वाहक त्रस्त होऊन गेला. त्याच्या मनात 'हा मोबाईल आपण घेतला आणि त्याचा मध्येच काही स्फोट झाला तर काय करायचे?' येथपासून ते 'मला या मोबाईलच्या भानगडीपाई बहुतेक पोलिस स्टेशनच्या फेऱ्या कराव्या लागतील आणि माझी सर्व रजा या कोर्टकचेऱ्यात संपेल आणि बायकोला काय संशय येईल ते सांगता येणार नाही.' अथवा 'मला बहुतेक चोरीचा आरोप ठेवून सस्पेंड करण्याचा डाव दिसत आहे.' हे विचार सुरु असल्याचे स्पष्टपणे त्याचे चेहऱ्यावर दिसत होते आणि मनांत येत होते. शेवटी मी त्याला म्हणालो 'मोबाईल ताब्यात घ्या आणि डेपोत जमा करा, मी सांगायला येईन.' मग त्याला आला, त्याने कॉलेजकुमारीकडून मोबाईल घेतला आणि 'आजकालच्या पोरांचे काही समजत नाही.' हा शेरा मारला. बस पुन्हा सुरु झाली, तो तिकिटे देवू लागला.
थोडा वेळ गेला, कदाचित १० - १५ मिनिटे असतील, तेवढयात त्याच्या खिशातून मोबाईलचा आवाज येऊ लागला, त्याचे लक्ष नव्हते, सारखा आवाज येत असल्याने त्याला तिकिटे देणे उमजेना, तो करवादून ओरडला, 'अरे, कोणाचा मोबाईल आहे? उचला आणि बोला काय ते.' त्यावर मी म्हणालो 'मोबाईल तुमच्याच खिशात वाजत आहे.' 'आं', त्याचा आश्चर्योद्गार. 'त्या कॉलेजकुमाराचा मोबाईल आहे.' मी स्पष्टीकरण दिले. 'हं' असे म्हणत त्याने मोबाईल घेतला आणि तो बोलू लागला. कॉलेजकुमार बोलत होता, चौकशी करत होता, मोबाईल परत मागत होता, वाहकाचे तिकिटे देण्याचे खोळंबले होते, प्रवासी गलका करू लागले कारण त्यांचे उतरण्याचे ठिकाण जवळ येत होते. शेवटी वाहकाने 'टन' अशी घंटा वाजवली आणि बस थांबली. त्याच्या खिशातून पुनःपुनः मोबाईलचा आवाज येतच होता. गाडीच्या चालकाला समजेना कोणतेही ठिकाण आले नसतांना बस थांबण्याची घंटा का वाजली? 'काय झाले शर्माजी?' चालकाचा प्रश्न. 'पाटील, काय लोक झाले आहे, साली मला माझी ड्युटीसुध्दा करू देत नाही. नोकरी जाण्याचे लक्षण आहे. आता या मोबाईलवाल्याशी मी सारखे काय बोलू?' वाहक शर्माजी संतापून त्रस्तपणे म्हणाले. चालक पाटील याला यातील कोणतीही घटना माहित नव्हती त्यामुळे तो चक्रावून गेला की शर्माजीची नोकरी जाण्यासारखी आता बस सुरु असतांना कोणती घटना घडली आणि ती आपण गाडी चालवत असतांना देखील आपल्यास माहीत पडू नये, हे म्हणजे फारच झाले. अशामुळे आपल्यादेखील नोकरीवर गदा यायची की गाडी चालवत असताना गाडीत काय घडते आहे याची आपणास कल्पना नको? चालक पाटील त्याच्या केबीनमधून खाली उतरला आणि वळसा घेवून गाडीत प्रवाश्यांच्या बाजूने चढला.
आता गाडी केंव्हा सुरु होईल यापेक्षा 'या मोबाईलच्या आवाजाचे काय करायचे?' हा प्रश्न त्या वाहक-शर्माजी आणि चालक-पाटील यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा होता. ही कोंडी काही केल्या फुटेना, लोकांचा आरडाओरडा फारच वाढला, 'पैसे परत करा' असे देखील काही प्रवासी म्हणू लागले. शेवटी मला राहवेना मी काही बोलणार तेवढ्यात पुन्हा मोबाईलची घंटा वाजली, 'हात तिच्या मारी. फेक तो मोबाईल.' वाहक आणि चालक एकदमच बोलले. 'त्याने पोलिसात तक्रार नोंदली आहे.' हे कोणीतरी म्हणाल्यावर त्यांनी तो विचार सोडून दिला, त्यांना सोडवा लागला. मी म्हणालो 'तो मोबाईल माझ्याजवळ द्या, मी बोलतो.' वाहकाला तेच हवे होते, त्याने तत्काळ मोबाईल माझ्याजवळ दिला, 'हे पहा, सारखी रिंग करू नका. हा मोबाईल आता मी बंद करत आहे, उद्या औरंगाबाद डेपोतून घेवून जावा.' असे म्हणून मी मोबाईल बंद केला आणि वाहक शर्माजीजवळ दिला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला, चालक-पाटील त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याने गाडी सुरु केली, वाहकाने दोन वेळा 'टण टन' अशी घंटा वाजविली आणि गाडी सुरु झाली. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाहक पुढच्या प्रवाशांची तिकिटे देवू लागला.
गाडी सुरु होती, साधारणपणे सिल्लोड जवळ येत होते. एका महिलेने तिकीट काढलेले नव्हते, 'कोठे जायचे आहे?' म्हणून वाहकाने विचारले तिने निर्विकारपणे 'सिल्लोडला' म्हणून सांगितले आणि १०० रुपयाची नोट काढली, वाहकाला देवू लागली. त्याने 'कोठून बसली?' म्हणून विचारले तर ती महिला मुत्सद्दीपणे लवकर उत्तर देईना. शेवटी वाहकाने विचारले 'अजंठ्याहून का?' तिने मान हलविली, त्यातून कसलाही अर्थबोध होत नव्हता, मात्र वाहकाने तिकीट फाडले. वाहक-शर्माजीमध्ये आता फारसे त्राण उरले नव्हते. त्याने तिकीट आणि सुटे पैसे त्या महिलेला दिले आणि सांगितले 'हं, हे तिकीट आणि हे उरलेले पैसे नीट मोजून घ्या.' आता त्या महिलेनेदेखील वाहकाची सत्वपरीक्षा पाहण्याचे ठरवले होते असे दिसते. तिने पुन्हा पहिल्यासारखी मान हलविली आणि सांगितले 'भाऊ, मले पैसे मोजता येत नाही, तूच मोजून दे आणि कमी भरले तर मी काय करू?' आता वाहक-शर्माजीचा कडेलोट झाला, 'माऊली, मी आता तुझ्या पाया पडतो, हे पैसे कोणाकडूनही मोजून घे. आज कोणाचे तोंड पहिले होते काही समजत नाही, जो तो माझ्या नोकरीवरच उठला आहे.' हे ऐकल्यावर त्या मुत्सद्दी म्हातारीने जास्त ताणून धरले नाही. तेवढयात सिल्लोड आले. म्हातारी गाडीतून उतरली. बस-स्थानक येण्याअगोदरच वाहक-शर्माजीने चालक-पाटीलला सांगितले 'आता, फक्त सिल्लोड बस-स्थानकावर बस न्यायची आणि लगेच थेट सुरु करून फक्त औरंगाबादलाच थांबवायची, कोणी काहीही म्हणो अधेमध्ये अजिबात थांबवायची नाही. साले, आपल्या नोकरीवर डोळा आहे, उद्या आपली नोकरी गेली तर काय वेळ येईल आणि असे अनुभव आणि असे प्रवासी म्हणजे 'असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ गाठ.'
सिल्लोड आले, बस थांबली आणि मग लगेच निघाली, ती फक्त औरंगाबाद आल्यावरच थांबली, आमचा आमचा जळगाव औरंगाबाद प्रवास पूर्ण झाला.

No comments:
Post a Comment