Sunday, January 18, 2015

मकर संक्रांत आणि मकर संक्रमण

नुकतीच 'मकर संक्रांत' झालेली आहे. आपण आपल्या परंपरेप्रमाणे आणि सांस्कृतिक पध्दतीप्रमाणे हा सन 'तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला' हे बोलत थेट 'रथ सप्तमी' पावेतो साजरा करीत असतो. या दोन्ही सणांचे महत्व केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक, खगोलशास्त्रीय, ज्योतिष्यविषयक आणि सांस्कृतिक देखील आहे, म्हणून आपल्या या सणांकडे आपण केवळ उत्सव म्हणून न पाहता त्यातील तत्व समजावून घेतले पाहिजे आणि ते अंगिकारले पाहिजे.

आपल्या मराठी विश्वकोशामध्ये 'मकर संक्रमण आणि मकर संक्रांत' याबाबत महत्वाची माहिती थोडक्यात दिलेली आहे ती येथे देणे अयोग्य ठरणार नाही -

'सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. २२ डिसेंबरच्या सुमारास अवष्टंभ बिंदूवर वसंतसंपात बिंदूपासून २७० अंशांवर सूर्य येतो त्या वेळी सूर्याची दक्षिण क्रांती (खगोलीय विषुववृत्तापासूनचे कोनीय अंतर) सर्वांत अधिक म्हणजे २३° २७' असते. या वेळी सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त दक्षिणेस दिसतो, त्यानंतर तो उत्तरेकडे सरकू लागतो म्हणजे ⇨उत्तरायण सुरू होते. या वेळी सूर्य सायन मकर राशीत [निरयन-सायन] प्रवेश करीत असतो म्हणून यास सायन मकर संक्रमण म्हणतात.

स्थिर राशिचक्राच्या कल्पनेत क्रांतिवृत्तावरील (सूर्याच्या भासमान वार्षिक गतिमार्गावरील) एका ताऱ्यापासून क्रांतिवृत्ताचे १२ समान भाग म्हणजे राशी केलेल्या असतात. या राशी आकाशात तारकांसापेक्ष स्थिर (निरयन) असतात. सध्या या चक्राच्या आरंभबिंदूपासून वसंतसंपात बिंदू प्रतिवर्षी सु. ५०'' याप्रमाणे सु. २३° ३६' पश्चिमेकडे सरकलेला आहे. या दोहोंमधील कोनात्मक अंतरास अयनांश म्हणतात. यामुळे निरयन मेष राशीचा आरंभबिंदू सायन मेष राशीच्या आरंभबिंदूच्या पूर्वेस २३° ३६' आहे व सूर्याच्या सायन मेष संक्रमणानंतर सु. २३ दिवसांनी निरयन मेष संक्रमण घडते. त्याचप्रमाणे सायन धनू राशीतून मकर राशीत सूर्य २२ डिसेंबरच्या सुमारास प्रवेश करतो, तर निरयन धनू राशीतून निरयन मकर राशीत त्यानंतर सु. २३ दिवसांनी म्हणजे १४ जानेवारीच्या सुमारास प्रवेश करतो. यासच निरयन मकर संक्रमण म्हणतात (शुद्ध निरयन पंचांगाचे अयनांश सु. १९° ३६' असल्यामुळे या पंचागानुसार निरयन मकर संक्रमण २२ डिसेंबरनंतर १९ दिवसांनी म्हणजे १० जानेवारीस घडते).

लागोपाठच्या दोन वर्षांतील सूर्याचा मकर प्रवेशातील कालखंड हा नाक्षत्र वर्षाच्या अवधीइतका म्हणजे ३६५ दि. ६ ता. ९ मि. ९.७ सेकंद आहे (प्रत्यक्षात हा ११ मिनिटांपर्यंत कमीजास्त होत असतो). यामुळे मकर संक्रमणाचा क्षण दर वर्षी सु. ६ तासांनी पुढे सरकतो; पण दर चार वर्षांनी धरल्या जाणाऱ्या लीप वर्षामुळे निरयन मकर संक्रमणाच्या तारखेत बदल होत नाही. मात्र मकर संक्रमणाचा क्षण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळात येत असेल, तर पुण्यकाल त्याच दिवशी धरावयाचा व सूर्यास्तानंतर येत असेल, तर पुढचा दिवस संक्रांती म्हणून मानावयाचा अशी पद्धत असल्यामुळे मकर संक्रांत क्वचित एका दिवसाने पुढे जाऊ शकते.

वसंतसंपात बिंदू सु. ७०-७२ वर्षांनी एका अंशाने आणखी पश्चिमेकडे सरकणार असल्यामुळे अयनांश सु. एका अंशाने वाढतील व निरयन मकर संक्रमण एका दिवसाने पुढे सरकेल. ७२ वर्षांपूर्वी मकर संक्रमण १३ जानेवारीस येत असे.

मकर संक्रांत : सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतीय सण. वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते तेव्हा त्यांना हे संक्रमण अधिकच आनंददायक वाटत असले पाहिजे. पूर्वी उत्तरायणाचा प्रारंभ हाच वर्षारंभ असावा इ. प्रकारची मते आढळतात.

सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार,भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्या वेळी तिसऱ्या दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळेच संक्रात येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करीत नाहीत.

भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात त्या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला ’खिचडी संक्रांती’ असे म्हणतात. बंगालमध्ये त्या दिवशी काकवीत तीळ घालून बनलेला ’तिळुआ’ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूपसाखर घालून केलेला ’पिष्टक’ नावाचा पदार्थ खातात व वाटतात म्हणून तेथे संक्रांतीला ‘तिळुआ संक्रांती’ व ‘पिष्टक संक्रांती’ असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी ⇨पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगळ वा इंद्रपोंगळ, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगळ आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगळ साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीने किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो.

संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात. या दिवशी पितृश्राद्ध करावे असे सांगितले आहे. गंगा सागरात स्नान करून पिंड अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात स्त्रिया मृत्तिका घटाचे दान देतात व देवाला तीळ-तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यवाण लुटतात. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचे माहात्म्य सांगितल्याची कथा आढळते. या दिवशी तिळगूळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी वहिवाट आहे.

हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छापत्रे व तिळगूळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदुळ दुसऱ्यांच्या घरच्या आधणात शिजविण्याची व दुसऱ्यांच्या घरात असोला नारळ सोडण्याची कोकणातील प्रथा इ. गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत.'

No comments:

Post a Comment