Tuesday, May 26, 2015

- आणि तिला संस्कृतने वाचविले !


मित्रांनो, amarujala.com यांत मी एक संस्कृतसंबंधाने बातमी या goo.gl/J2eHSH लिंकवर वाचली. बऱ्याच जणांना यांत अतिशय गंमत वाटली, काहीना हेवा वाटला, काहीना संस्कृत शिकून मुर्खासारखे काय करणार आहे? ती कालबाह्य भाषा आहे; असेही वाटले, काहींना हा 'ब्राह्मणी कावा' वाटला कारण आपल्या 'जातीयवादी मूर्ख लोकांनी सर्व बाबी या जातीजातीत वाटून घेतल्या आहेत; अगदी देवदेवता, महापुरुष सुध्दा ! त्यांच्या मूर्खपणापुढे मती गुंग होते आणि समाजविघातक असलेल्या 'अशा बुद्धीवंतांचे' वाईट वाटते. मित्रांनो, आपली संस्कृती कधीही विचारविन्मुख करणारी नव्हती तर ती नेहमीच विचार प्रवर्तक, नवनवीन विचार देणारी राहिलेली आहे. भारताने या जगतास हे न परतफेड करण्याजोगे उपकार केलेले आहे; जगातून दूर-दूरहून पायपीट करून येथील विद्यापीठात शिक्षण घ्यावयास विद्यार्थी येत असत; शिक्षण घेवून आपल्या देशांत या भारतभूमीच्या ज्ञानसंपन्नतेचे नांव घेवून जात असत, 'भारताच्या ज्ञानसंपन्नतेची ही पताका त्यांच्याही देशांत फडकावीत असत. हे आपणांस अभिमानाचे होते आणि आजही आहे. मात्र नंतर 'ज्ञानशत्रू', असलेल्या असंस्कृत, दुष्ट, क्रूर आणि या संपूर्ण जगताचे ज्ञानशत्रू लुटारूंनी आपल्या भारतभूमीवर आक्रमण केले आणि संपत्ती लुटीसोबतच, अंगावर आजही काटा आणणाऱ्या कृत्यांबरोबरच त्यांनी आमच्या ज्ञानसंपादनाची ही केंद्रे त्यांनी भुईसपाट करून फक्त आमचेच नाही तर संपूर्ण जगताचेच कायमचे नुकसान केलेले आहे. ज्ञानसंपादनास विरोध करणारे हे संपूर्ण जगताचेच शत्रू आहेत आणि अशा प्रवृत्तीच्या कोणासही, 'तो कोण आहे' याचा कसलाही विचार न करता, आपण सर्व समाजाने त्याचा कठोरपणे विरोध करून त्याची अशा तऱ्हेची कृत्ये हाणून पाडली पाहिजेत. तो कितीही सबळ असला आणि त्याला कोणाचाही पाठींबा असला तरी आपणा सर्वांना एकत्रितपणे पाउल उचलल्यास काहींही अशक्य नाही. असो.

कर्नाटकांत शिमोगा शहरापासून जवळपास १० किलोमीटर दूर, तुंग नदीच्या किनारी असलेल्या मुत्तुर या गांवी सर्व गांववासी हे अगदी आपसांत देखील संस्कृत भाषाच पूर्वापारपासून बोलत आलेले आहे. यावरून मला एक अतिशय गमतीदार घटनेची आठवण झाली. 

माझी एक नातेवाईक-मुलगी कॉलेजला जाणारी होती, आता ती अर्थशास्त्रात 'Ph. D.' मिळवती झालेली आहे, मात्र तिच्या महाविद्यालयीन काळातील ही घटना असावी. ती कलाशाखेची - अर्थशास्त्र हा विषय घेतलेला ! संस्कृत हा तिचा आवडता विषय पण, ही आवड तिला तिच्या आईकडून मिळाली, ती संस्कृतची जाणकार, पदवी-द्विपदवीधर ! या मुलीला शालेय अभ्यासक्रमांत जेवढे संस्कृत शिकावयास मिळाले असेल तेवढेच ! ती स्वस्थ बसली नाही, 'संस्कृत भारती'च्या माध्यमातून तिने संस्कृतची इतकी उत्तम तयारी केली की ती संस्कृत सहजपणे, ओघवते आणि संभाषणात बोलू लागली, कोणासही समजण्यासारखे बोलू लागली, तिची ही प्रगती पाहून विविध ठिकाणी 'संस्कृत वर्ग' घेण्याची जबाबदारी 'संस्कृतभारती'ने तिचेवर वेळोवेळी सोपविली, तिने ती समर्थपणे पार पाडली आणि आजही यथाशक्ती पार पाडत आहे. आपणा सर्वांना अभिमानाचा विषय आहे. पण येथे आज हा विषय नाही, एकदा मी तिच्याकडे गेलो होतो, ती घरी नव्हती, थोड्या वेळांत बाहेरून आली आणि एकदम हसू लागली. 'काय झाले ?' मी विचारणा केली, 'गम्मत झाली' असे म्हणत पुंन्हा हसू लागली, तिला बोलता येईना. थोड्यावेळाने जरा सावरल्यावर तिने सांगितले. 

ती कॉलेजला जातांना दुचाकी चालवण्याचा परवाना घाईघाईने घरीच विसरून गेली होती. घाई असल्यावर नेहमी कोणत्याही कारणाने जसा उशीर होतो, त्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम रस्त्याने जातांना रस्त्यावर वाहतूकनियंत्रकाने तिला थांबविले, दुचाकी चालविण्याचा परवाना मागितला; तो घरी असल्याने दाखविता येत नव्हता, येणार नव्हता, हे तिला माहीत होते. महाविद्यालयातील मुलगी, तिला एक कल्पना सुचली, सर्व संभाषण संस्कृतमधून करायचे ठरवले, मराठी अजिबात समजत नाही असे धोरण स्विकारले, तिने त्या वाहतूक-नियंत्रकाला संस्कृतमध्ये 'काय म्हणतोस ?' म्हणून विचारले, त्याला समजेना, 'काय म्हणाली' ही पोरगी ? तो बुचकळ्यात पडला, उत्तर दिल्याचा आवाज तर आला पण त्याला काहीच समजले नाही. 'हे पहा पोरी,जास्त गडबड नाही, 'लायसन' दाखव, नाहीतर पावती फाडावी लागेल.' तिने 'तुम्ही काय म्हणत आहे, हे मला समजत नाही, मला समजेल अशा भाषेत बोला' असे संस्कृतमध्ये सांगितले. त्याला काहीच समजले नाही. 'ए पोरी, मला वाटेल ते बोलू नको, चांगल्या-चांगल्यांना सरळ केले आहे. मुकाट्याने 'लायसन' दाखव नाहीतर पैसे भर.' मात्र संभाषण अर्थात एकतर्फी संभाषण हे शांतपणे आणि एकाबाजूने संस्कृतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने मराठीत होत असल्याने 'आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी' अशी परिस्थिती होती. तिला त्याचे सर्व समजत होते, त्याची मात्र हिच्या उत्तरावर 'फक्त एक आवाज' यापेक्षा जास्त प्रगती नव्हती. असा चमत्कारिक आणि विचित्र अनुभव त्याला त्याच्या आयुष्यांत पहिल्यांदाच येत असावा. कोणाचीही गाडी थांबविल्यावर, कागदपत्रांची मागणी केल्यावर थोड्याच वेळात कागदपत्र दाखविले जायचे आणि ते बरोबर कसे नाहीत, त्यामुळे नियमभंग कसा झालेला आहे, आपणास नियमभंग कसा अजिबात सहन होत नाही, आपणांस नियमाप्रमाणे कसे काम करावे लागते वगैरे सर्व ऐकविल्यावर थोड्यावेळाने समोरच्या समोरच्याच्या खिशातून पैसे बाहेर यायचे नाहीतर तो मोबाईलवरून कोणाला तरी फोन करायचा आणि मग सर्व कागदपत्र बरोबर असल्याचा साक्षात्कार त्याला व्हावयाचा. त्यानंतर 'हे अगोदर का नाही सांगितले?' अशा भरतवाक्याने त्याची सांगता व्हायची. 

येथे आता फारच विचित्र परिस्थिती झालेली होती कारण या दोन्हीपैकी काहीही होत नव्हते, तर काय होत आहे हेच त्याला समजत नव्हते. गर्दी जमायला लागली होती, अर्थात ती आपल्याकडे सर्वात लवकर जमते. त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर, गर्दीतील जनता हसू लागली कारण असे नाटक अथवा अशा 'संस्कृत-मराठी' नाटकाचा हा  अभिनव प्रयोग ज्यातील संभाषण त्या नाटकांतील पात्रांनाच एकमेकांना समजत नाही' हे ते देखील प्रथमच पहात असावे. अर्थात त्यांनाही समजत होते अशातील भाग नाही मात्र हा वाहतूक-नियंत्रक चमत्कारिक पध्दतीने आणि विचित्ररितीने अडचणीत आला आहे, यातच ते सर्व खुषीत होते. तिने एक काळजी मात्र घेतली होती, तिचा स्वर अत्यंत नम्र होता, वडिलधाऱ्या माणसाशी बोलावे असाच होता, पण संभाषण संस्कृतमध्येच, की ज्याचा त्या वाहतूक-नियंत्रकाचा संताप वाढविण्यापेक्षा, हतबलता वाढविण्यापलिकडे दुसरा कोणताही उपयोग नव्हता. यामुळे हळूहळू त्याचा आवाज अजून वाढू लागला, जसा आवाज वाढू लागला तशी गर्दी अजून वाढू लागली, जशी गर्दी अजून वाढू लागली तशी इतरत्र जे निवांतपणे गम्मत पाहत होते त्यांनाही 'हे केंव्हाचे काय सुरु आहे ? एका मुलीशी हा ' Traffic Police' केंव्हाचा काय डोके लावून राहिला आहे ? याचा खुलासा व्हावा म्हणून ते देखील तेथे जमले, गर्दी अजून वाढली कमी होण्याचे नांव नाही. 

गर्दीतील जनता आता गमतीने संभाषणात भाग घेवू लागली, म्हणजे 'वाहतूक-नियंत्रक' आणि 'जनता' असे संभाषण सुरु झाले; कारण सुरुवातीला तिच्याशी त्यांनीही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्यावेळी संस्कृतशिवाय कोणतीही भाषा येत नसल्याने, तिचे आणि जनतेचेही संभाषण फार काळ चालू शकले नाही. गर्दीतील जनतेचीही परिस्थिती ही बरीचशी त्या 'वाहतूक-नियंत्रकासारखी' झाली मग त्यांना त्याची अडचण लक्षात आली. 'अहो, काय झाले ?' लोकांनी विचारले, 'पोरगी लायसन दाखवत नाही, अहो आमची काय ड्यूटी-बिटी आहे की नाही ? च्या मारी, तिला काहीबी विचारा, ती काय बोलते ते समजत नाही. बर, पोरगी गरिबावानी बोलते आहे तर आपण केस कशी काय करा ? पोरगी चांगल्या घरची वाटते, तिला त्रास देण्यात आपल्याला काय मजा वाटते काय ? पण हे निष्कारण त्रांगडे झाले, मी काय बोलतो ते तिला समजत नाही अन ती काय बोलते ते मला समजत नाही. साल्या, या भारतामध्ये किती भाषा आहेत कोणांस ठाऊक ? कोन कोणत्या भाषेत बोलेल याचा नेम नाही आणि आम्हाला अशा लोकांशी बोलत ड्युटी करावी लागतेय. दिवस कठीण आलेय. ' वगैरे वगैरे ---

शेवटी काहींच्या लक्षांत आले, ती संस्कृतमध्ये बोलत आहे. मग त्यांनी वाहतूक-नियंत्रकास 'पोरगी संस्कृतमध्ये बोलत आहे.' हे सांगितले. त्यावर त्याचा स्वर थोडा बदलला, 'पोरी, तू शिकलेली दिसते, चांगल्या घरची आहे. तुझ्याजवळ लायसन नाही हे मला माहीत आहे, पोरी, आमचे हे केस विनाकारण पांढरे झालेले नाहीत. पण तू देवाची भाषा बोलते आहे, अगदी मराठीसारखी बोलते आहे, मला कौतुक आहे. आम्ही आमची मराठीपण नीट बोलू शकत नाही आणि तू देवाची भाषा बोलते ! आम्हाला मात्र साहेबांची भाषा हवी आणि तू आपल्या मराठीच्या मायची, तिच्या आजीची भाषा बोलते, शाब्बास ! मी का तुह्यावर केस करणार होतो ? पण पोरी लक्षात ठेव, सर्व दिवस सारखे नसतात, प्रत्येक वेळी माझ्यासारखेच भेटतील असे नाही, तू निष्कारण अडचणीत येशील. येथे गरिबाला मदत करण्यांस कोणी तयार होत नाही, त्याला अडचणीत आणतात. आता जा, यापुढे मात्र गाडी चालवितांना लायसन ठेवत जा, ते दुसऱ्याबी कामांत येते. घाई हलगर्जीपणा कामाचा नाही. जा निवांतपणे कामाला जा !'       

No comments:

Post a Comment