'आकाशवाणीच्या जळगाव' केंद्रामार्फत 'संगीत सभा' होती, 'नवजीवन मंगल कार्यालयात', कलाकार होते डॉ. वसंतराव देशपांडे ! शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार होते, कदाचित आकाशवाणी जळगावच्या इतिहासात असा कार्यक्रम पहिल्यांदाच असावा, कारण माझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात यापूर्वी आले नव्हते. कार्यक्रम त्वरित सुरु व्हावा असे तेथे असलेल्या श्रोत्यांसारखेच तेथील घड्याळास सुद्धा वाटत असावे. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन आकाशवाणीच्या निवेदिका सौ. मोहिनी पंडित करीत होत्या. साथीला तबल्यावर 'श्री. शशीकांत मुळे' आणि हार्मोनिअमला कोण होते आठवत नाही. हो, श्री. गोविंदराव पटवर्धन होते. मागे तानपुऱ्यावर साथीला श्री. हेमंत पेंडसे ( नंतर माझे जुने मित्र श्री. हेमंत पेंडसे यांनी आठवण करून दिली, थोडी दुरुस्ती केली. धन्यवाद) आणि त्यावेळी आकाशवाणीचे संगीत विभाग सांभाळणारे श्री. पातंजली मादुस्कर होते. कार्यक्रम रात्री ९ - ३० वाजता सुरु झाला आणि तो संपूच नये असे वाटले पण हुरहूर लावून संपला. त्याचे संपादित ध्वनीमुद्रण जळगाव आकाशवाणीवर आहे, अधूनमधून लावतात. कार्यक्रम अप्रतिम झाला, गर्दीचा कहर झाला. ही आठवण माझ्या मनांत अजूनही ताजी आहे.
मी मुंबईला गेलो होतो, साधारणतः १९८० च्या दरम्यानची गोष्ट असेल, दादरला 'श्री शिवाजी मंदीर' येथे 'कटयार काळजात घुसली' हा 'पुरुषोत्तम दारव्हेकर' लिखित आणि दिग्दर्शित नाट्यप्रयोग लागला होता. संगीत दिग्दर्शन 'पं. जितेंद्र अभिषेकी' यांचे ! कलाकार श्री. सावकार, श्री. घांग्रेकर, श्रीमती फैय्याज, सौ. पणशीकर आणि महत्वाचे म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे. त्यातील एक एक गाणे अंगावर रोमांच उठवीत होते, नाट्यलेखन परिणामकारक म्हणावे का संगीत उत्तम म्हणावे का कलाकार अप्रतिम आहेत हे समजावे ? मनस्थिती अशी झाली होती, काही झाले तरी नाटकाचा निवांतपणे आस्वाद घेत होतो,
त्यातील पदे ऐकतांना म्हणजे - 'घेई छंद मकरंद' हा संथ लयीतील 'सालगवराळी ' रागामधील तर तळपत्या तेजाने विद्युत गतीतील द्रुतलयीचे 'धानी' रागामधील, 'तेजोनिधी लोहगोल' हे 'ललत पंचम ' रागातील, 'दिन गेले भजनाविण' हे बिलावल रागातील, 'मुरलीधर श्याम हे नंदलाल' हे 'पूर्वा कल्याण' रागातील, 'या भवनातील गीत पुराणे' हे 'बिहागडा' मधील पद, 'पहाडी' च्या सुरातील 'लागी कलेजवा कट्यार' हे पद आणि रागमाला दर्शन देणारे 'सुरत पिया की' हे अप्रतिम पद, आसपासचे भान विसरून गेलो होतो, नाटक संपल्यावर मी धुंदीतच घरी आलो. त्यानंतर असे नाटक पाहण्याचा असा योग पुन्हा आला नाही.
डॉ. वसंतराव देशपांडे यांचे गायन त्या नंतर त्यांच्या अकाली, दुर्दैवी जाण्याने पुन्हा ऐकता आले नाही.
No comments:
Post a Comment