माझे फेसबुकवरील मित्रमंडळी बाबतचे साधारणतः आज केलेले निरीक्षण !
मित्रानो, मनांत आले, आज थोडे लिहावेसे वाटले म्हणून लिहिले. यातून कोणास काही बोध झाला अथवा नाही झाला तरी माझे त्याबाबत कसलेही म्हणणे नाही, अथवा कोणाबाबत कसलाही आक्षेप नाही, तक्रार नाही.
१. काही मंडळी येथे फक्त उपस्थित असतात, त्यांना शोधून पाहिल्याशिवाय ते सापडत नाहीत. आपल्याला शंका येते की हे आपले फेसबुक-मित्र होते ते सध्या मित्रांच्या यादीत आहेत का नाही? आपण शोधून पाहावे, ते असतात - 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती चंदनापरी' या उक्तीस जागून असंख्य 'tag' केलेली चित्रे घेऊन उभे असतात. बऱ्याच दिवसांत त्यांनी त्यांच्या स्थळावर स्वतः काही हालचाल केलेली नसते आणि त्यांची तशी काही इच्छा असल्याचे देखील दिसत नाही. (कदाचित त्यांना वेळही मिळत नसेल किंवा त्यांची उपस्थिती त्यांच्या समजुतीनुसार फेसबुकवर प्रार्थनीय असेल)
२. काही मंडळी येथे उपस्थित असतात, ते फक्त लक्ष ठेवीन की त्यांना काही समोर हल्ला करण्यासारखे दिसते आहे का? याची ते वाट पाहतात आणि तसे काही असू शकते असे त्यांना वाटले की तत्काळ त्या लिखाणावर, चित्रावर, प्रतिक्रियेवर ते हल्ला करतात. त्यांचा उत्साह काही वेळा तर इतका काही वाखाणण्यासारखा असतो की आपल्या चर्मचक्षुंना जे अजिबात दिसत नाही अथवा कितीही वेळा त्या लिखाणाचे वाचन अथवा चित्राचे अवलोकन केले तरी आपणाला आहे त्यापेक्षा वेगळा असा कोणताही अर्थ लागत नाही; पण त्या लिखाणातून, चित्रातून त्यांच्या दिव्यचक्षुला भलभलत्या बाबी दिसतात, भयंकर जातीयवाद झालेला दिसतो, हजारो वर्षांचा अन्याय दिसतो आणि त्यामुळे त्यांना नाईलाजाने अन्याय निवारणार्थ भाग घ्यावा लागत आहे, अशी त्यांची भूमिका असते. या बाबतीत ते विचार-प्रचाराकाशी, विचार-प्रकाशकाशी स्नेहपूर्ण संबंध राखून असतात. काही वेळा अशी चर्चा ही निष्फळ, निरर्थक आणि निष्कारण आहे असे जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र ती चर्चा बऱ्याच जणांना फलदायी ठरत असल्याचे समजते, त्यातून त्यांच्या बऱ्याच बाबी साध्य होतात. 'आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी' ही म्हण त्यातूनच तर निर्माण झाली नसावी?
३. काही मंडळी येथे उपस्थित असतात ती 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान' या भावनेने त्यांना, त्यांच्या मनाला वाटेल ते लिहित असतात आणि समाधान मिळवीत असतात. कोणी काही प्रतिक्रिया दिली, नाही दिली तरी ते त्यांच्या मनाला लावून घेत नाही आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तव्यात ते कसलीही कसूर करीत नाही.
४. काही मंडळी येथे उपस्थित असतात ती यासाठी की आपल्या समाजात शिक्षणामुळे, संस्कारामुळे, त्यांना आलेल्या अनुभवामुळे जर काही एकोप्याची भावना निर्माण होत असेल, एकमेकांचे झालेले काही विनाकारणचे गैरसमज दूर होत असतील अथवा तशी काही शक्यता निर्माण होत असेल तर या महाभागांना ते अजिबात सहन होत नाही, पण त्यांची अडचण अशी असते की 'हे त्यांना सहन होत नाही असे त्यांना सांगता येत नाही', त्यामुळे ही मंडळी जे बिचारे पूर्वीचे झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत असतील, ते हाणून पडण्याचा जीव तोडून प्रयत्न करीत असतात. काही वेळा तर या पेक्षाही भयानक परिस्थिती असते, ज्यांचे त्यांचे गैरसमज, द्वेषभावना ही जर आपोआप शिक्षणामुळे, त्यांच्या अनुभवामुळे कदाचित दूर होणार असते ते देखील यांना अजिबात सहन होत नाही. अशी भावना देखील निर्माण होणे हे कसे चुकीचे आहे अथवा त्यांची त्यामुळे कशी फसवणूक होत आहे, हे अटीतटीने पटविण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांमधील दरी मिटत असेल तर मिटू देत नाही, दरी नसेल तर निर्माण करतात, थोडी दरी असेल तर रुंदावतात आणि समाजप्रबोधन करतात. गेल्या काही वर्षात या व्यक्तींना बऱ्यापैकी भाव आला असल्याने त्यांची मागणी वाढलेली आहे. विशेषतः आता 'फेसबुक' सारखे माध्यम त्यांना उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रभाव बऱ्यापैकी वाढलेला दिसतो. मी असेही ऐकलेले आहे की सध्या हा अत्यंत फायद्याचा आणि महत्वाचे म्हणजे बिनभांडवली धंदा आहे. मला मात्र यातून अद्याप काहीही समजले नाही. मला व्यवहाराचे काहीही समजत नाही, याबाबत आमच्या घरात एकमत आहे किंवा 'एकमत' आहे, ते अत्यंत प्रभावशाली आहे. (ते 'एकमत' निर्णायक असून नेहमीच बहुमताची बरोबरी करते; हा आपल्यापैकी बहुतेकांना अनुभव असेल आणि ते माझ्याशी निदान या बाबतीत तरी तत्काळ सहमत होतील, ही मला खात्री आहे. याबाबत त्यांनी मला अगदी गुपचूप कळविले तरी चालेल, त्यांच्या सहमतीबाबत पूर्ण गुप्तता पाळली जाईल याची त्यांनी खात्री बाळगावी.)
५. काही मंडळी येथे आवर्जून उपस्थित असतात ती का उपस्थित असतात हे मलाही अद्याप समजलेले नाही पण कदाचित 'आपली उपस्थिती येथे प्रार्थनीय आहे', म्हणून 'हे आग्रहाचे निमंत्रण' त्यांना असल्याने, 'आता या आग्रहाचा अनमान कसा करणार?' या भावनेने येथे 'अगत्याने उपस्थित असलेले' बरेच जण पाहिलेले आहेत.
६. काही मंडळी येथे उपस्थित असतात, निरंतर सक्रियपणे उपस्थित असतात, आपल्या मित्रांच्या यादीत देखील असतात पण त्यांच्या कार्यतत्परतेची, कार्यबाहुल्याची आणि कार्यक्रमाची आपणास कसलाही सुगावा लागू देत नाही. आपल्यास त्यांची कालांतराने आठवण आल्यावर वाटते की 'सध्या ते सक्रिय नसावेत' पण त्यांचे फेसबुक वरील खाते पहिले की ते अत्यंत भरभराटीस आलेले असून, जोमात चाललेले असल्याचे दिसते. यास जादूटोणा का हातचलाखी का दृष्टीभ्रम म्हणावे याबाबत माझा अजूनही संभ्रम आहे. आता 'जादूटोणा' वगैरे शब्दांचा आधार घेतल्यास विनाकारण कायद्याचा बडगा उगारला जाईल अशी भिती वाटते, पण त्यामुळे असे का होते अथवा होत असावे याचा मात्र खुलासा होत नाही आणि माझी समस्या तशीच राहते. मी माझ्यापुरता सोपा अर्थ कडून मोकळा होतो की त्यांच्या भरभराटीत त्यांना आपला सहभाग नको असेल किंवा आपल्या सहभागामुळे त्यांच्या भरभराटीत काही व्यत्यय येत असेल. जावू द्या, कोणाचे कशाला वाईट चिंतावे? मी फक्त एवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो की या गोंधळात आपले काही नुकसान तर होत नाही ना? त्याची काळजी घ्यावी आणि ती शक्यता दूर करावी, नष्ट करावी.
सध्या मला माझ्या आजच्या अवलोकनामधून एवढेच समजलेले आहे, ते लिहिले, राग मानू नये आणि गैरसमज तर अजिबात करू नये. (यातील सर्व व्यक्ती आणि प्रसंग जरी अनुभवावर आधारलेले वाटत असले आणि ते आपल्यास पक्के बसले तरी तो योगायोग समजावा आणि 'तो मी नव्हेच' असे मानून 'अगा जे घडलेच नाही' असे म्हणत स्वस्थ बसावे.
No comments:
Post a Comment