नुकतीच माझ्या एक बातमी वाचण्यात आली; ती खरी अथवा खोटी याच्या तपशीलात मी जात नाही, ते या विषयासाठी आवश्यक आहे; असे मला वाटत नाही. अशा तऱ्हेच्या नोकरीबाबतच्या बातम्या असल्यानंतर त्यावर खालील मुद्दे लक्षात घेवून जर शास्त्रीयपणे विचार केला आणि भावनांना थोडे दूर सारले तर ते ज्यांना नोकरी मिळवायची आहे आणि ज्यांना नोकरी द्यावयाची आहे या दोघांच्या दृष्टीने हितकारक ठरू शकेल; पर्यायाने समाजाच्या, देशाच्या हिताचे ठरू शकेल.
आता आपण एखाद्या व्यक्तीच्या धर्माचा, त्याच्या जातीचा विचार नोकरी देतांना करणार आहोत का त्याच्या समाजास, देशास होणाऱ्या सेवेचा विचार करणार आहोत हा प्रश्न आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे जर अशा व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रसंग आपल्यावर स्वतःवर आला तर आपण त्यास ती नोकरी देवू का, तशी आपल्या मनात इच्छा तरी निर्माण होईल का ? हा देखील अत्यंत महत्वाचा आणि आपले अंतरंग दर्शविणारा प्रश्न आहे.
येथे 'केवळ परदुखः शीतळ' किंवा 'दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण' अशीच बाब आहे की आपण हे प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आपणास व्यक्त करीत आहोत अथवा ढोंगीपणाने, दांभिकतेने सांगत आहोत, हे ठरवावे. वाचा आणि विचार करा, उत्तर दिले अथवा नाही दिले तरी चालेल, प्रत्यक्ष कृती करून अंमलात आणले तरी चालेल.
१. मालकाला कोणताही नोकर नेमण्याचा अधिकार आहे किंवा नाही ? विश्वासार्ह नसलेल्या नोकरावरचा विश्वास संपुष्टात आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकणे योग्य आहे किंवा नाही ? का मालक दिवाळखोर होईपावेतो त्याने अशा नोकरास त्याचे नियमीत वेतन देवून आपला सर्वस्वी सत्यानाश करून घेणे योग्य ठरेल?
२. मालक व्यवसाय, उद्योग-धंदा करतो तो त्याचा, समाजाचा, देशाचा उत्कर्ष व्हावा, प्रगती, उन्नती व्हावी यासाठी करतो का निरोद्योगी, उपद्रवी, ऐतखाऊ समाज निर्माण व्हावा किंवा आपला सर्वधर्म समभाव, सहिष्णु वृत्ती दाखविण्यासाठी करतो ?
३. अशा तऱ्हेची चमत्कारिक चर्चा सुरु ठेवून आपण कोणता आदर्श मालकासमोर तसेच कामगारासमोर ठेवत आहोत याचे आपल्याला भान असते का ? नसल्यास त्याचा कोणता परिणाम कोणावर, अगदी देशाच्या प्रतिमेवर देखील, होऊ शकतो याचा आपण विचार करतो का ?
४. मालकास हव्या असलेल्या कार्यक्षम कामगारांची, कर्मचारी अथवा अधिकारी यांची खरीखुरी निकड अशाने भागविली जाते का ? याची आपण कधी चर्चा करतो का ? अशा तऱ्हेच्या रिकाम्या चर्चेमुळे गुणवान, कामसू, चारित्र्यसंपन्न अशा कर्मचाऱ्यांवर आपण अन्याय करीत आहोत आणि समाजविघातक, देशविघातक कृत्य करून देशाच्या प्रगतीस बाधा पोहोचविण्याचे काम करीत आहोत याची आपणास कल्पना आहे का ?
५. आपणास सत्त्याची काही चाड उरली आहे का ?
No comments:
Post a Comment