Saturday, January 18, 2020

देववाणी शिकवणारे आमचे कै. पुरुषोत्तम विष्णु पुराणिक सर !

देववाणी शिकवणारे आमचे कै. पुरुषोत्तम विष्णु पुराणिक सर !
तसं बघीतलं तर, आम्ही शाळेत असतांना, बऱ्याच शिक्षकांचा परिचय, आम्हाला आम्ही शाळेत जाण्यापूर्वीच झालेला असायचा; कारण आमचं गांव, रावेर, ते केवढं ! ते जरी तालुक्याचे गांव असले तरी, गांवातील जवळपास सर्व एकमेकांना नांवाने जरी नाही, तरी चेहऱ्याने ओळखत असतील, एवढी आपुलकी म्हणा, वा जवळीक म्हणा, होती ! गांवात विविध कार्यक्रम व्हायचे तिथं बहुतेकांचे, येणेजाणे असायचेच ! शिक्षक मंडळी ही गांवातील शिक्षीत आणि समाजाला दिशा देणारी मंडळी समजली जायची. त्यांचा परिचय तिथं शाळेत जाण्याअगोदरच व्हायचा !
गांवातील भाजीबाजारात तर भाजी घेण्याचा निमित्ताने, बहुतेकांना जावं लागायचंच ! भाजी बाजाराजवळच आहे आमचा पाराचा गणपती, हा रावेर गांवचे ग्रामदैवत ! त्या मंदीराच्या रस्त्यावरून येणारा जाणारा तर प्रत्येक जण, जरी त्याला मंदीरात चढून जाऊन नमस्कार करणे शक्य नसेल तर, पायातील चपला घाईघाईने काढून तेथूनच, गणपतीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. त्या पलिकडच्या गल्लीत, रामस्वामी मठ ! रामस्वामी या थोर सत्पुरूषाने तिथं संजीवन समाधी घेतली. रावेर गांवच्या ‘समस्त ब्रह्मवृंदाची’ ती जागा ! गांवातील सर्वात जुना, अठरापगड जातींचा ‘सार्वजनिक गणपती’ मठात बसणार आणि सर्व गांव तिथं दर्शनाला येणार !
त्या भाजीबाजाराजवळ माझे दोन वर्गमित्र रहायचे. एक म्हणजे गजानन प्रचंड आणि दुसरा रविंद्र वानखेडे ! काही वेळा मी अभ्यासाला तिथं जायचो, पण माझ्या आईचा मित्रांनी एकत्र अभ्यास करण्यावर फारसा विश्वास नव्हता. मित्र फक्त गप्पा मारण्यांत अभ्यास विसरून जातात, हा तिचा विश्वास ! माझा एकट्यानेच अभ्यास चांगला होतो, हे तिचे मत. प्रचंड यांच्या घरासमोर पुराणिक सरांचे घर होते. तिथं बऱ्याच वेळा शिकवणीला आलेले विद्यार्थी व्हरांड्यात बसलेले असत.
सरदार जी. जी. हायस्कूलला मी पाचवीला प्रवेश घेतला. आठवीपासून मला संस्कृत होते, हिंदी व संस्कृत हा संयुक्त अभ्यासक्रम ! पुराणिक सर, हे आम्हाला फक्त एकच वर्ष शिकवायला होते, दहावीला ! मी दहावी ‘अ’ या वर्गात होतो. तो वर्ग शिकवायला मिळावा, ही बहुतेक शिक्षकांची पण इच्छा असायची, हे आम्हाला नंतर समजले. संस्कृत शिकवणारे तीन-चार शिक्षक आमच्या शाळेत होते. पुराणिक सर आम्हाला संस्कृत आणि इंग्रजी शिकवायचे !
उंच, सडसडीत बांधा, काळ्याकडे झुकणारा वर्ण, डोक्याचे कुरळे केस मागे वळवलेले ! अंगात पांढरा मनीला आणि बहुतांशवेळा पांढरा पायजमा ! अगदी क्वचित पॅंट घालायचे. शर्टच्या डावीकडे खिसा, त्यांत निळ्या शाईचा आणि तांबड्या शाईचा असे दोन शाईचे पेन ! काही वेळा डोळ्यावर, तर काही वेळा चष्माच्या घरात असलेला काळपट चाॅकलेटी चष्मा !
पुराणिक सर आम्हाला तसे पूर्वीपासूनच परिचयाचे ! आमचा शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी ‘विद्यार्थी बंधू संघ’ या नांवाने गणेश चतुर्थीला पाच दिवसाचा गणपती बसवायचो. गणपतीची स्थापना विद्यार्थ्यांचा सेक्रेटरी करायचा. त्या दिवशी गणपतीची स्थापना शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हायची, ती एकतर पुराणिक सर किंवा व्यवहारे सर यांच्या मंत्राने ! पाच दिवसांनंतर गणेशाचे विसर्जन व्हायचे ते गांवाच्या बाहेरील टेकडीकडील डोहात, त्यावेळी पण आमच्यासोबत या दोघांपैकी कोणीतरी असायचे. नंतर व्यवहारे सरांची बदली कन्या शाळेत झाल्यावर पुराणिक सरच असायचे सोबत ! रामस्वामी मठात स्वामींचे दरवर्षीचे उत्सव, गीता जयंतीचे कार्यक्रम व्हायचे, तिथं पण पुराणिक सर दिसायचेच !
दहावीच्या अभ्यासक्रमातील काही भाग हा पूर्वी जोशी सरांनी शिकवला होता. त्यांचे पण शिकवणे अप्रतिम ! त्यानंतर काय कोण जाणे, पण पुराणिक सर आम्हाला इंग्रजी शिकवायला आले. शिकवायला आले, तसे त्यांनी व्याकरण आणि धडे यांवर सारखाच भर द्यायचा हे सांगीतले. संस्कृत मात्र ते दहावीला पहिल्यापासून शिकवीत. इंग्रजी असो, वा संस्कृत ही भाषा जशी आपल्याला येणं महत्वाची आहे, तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाचे, हे त्या परिक्षेत मार्क्स मिळवणे, हे आहे. ‘तुम्हाला भाषा खूप चांगली आली, आणि परिक्षेत नापास झालात, तर तुम्हाला भाषा येत नाही, हेच सिध्द झाले असते’ हे त्यांचे ठाम मत ! परिक्षेचे स्वरूप, येणारे प्रश्न, त्यांचे स्वरूप, कोणता विषय किंवा प्रश्न किती मार्कांना, या दोन्ही भाषांत व्याकरण किती मार्कांचे येणार आणि पुस्तकातील धड्यांवर किती मार्कांचे विचारणार, यांची तंतोतंत कल्पना पुराणिक सरांना असे, आणि ते आम्हाला देत ! पुस्तकातील धड्यांवर किती मार्कांचे आणि कवितांवर किती मार्कांचे विचारणार, हे पण त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे श्रम सार्थकी लागावे, विनाकारण श्रम करावे लागू नये, अभ्यास योग्य दिशेने व्हावा, याची त्यांच्याएवढी काळजी क्वचितच कोणी घेतली असेल.
संस्कृत शिकवतांना, ते खास रंगात येत ! संस्कृतमधे पाठांतराला जसे महत्व आहे, तसे काय पाठ करायचे आणि कसे पाठ करायचे, याला जास्त महत्व आहे, असे ते नेहमी सांगत ! संस्कृतातील कोणत्याही शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर तुम्हाला इकडेतिकडे जायची गरज नाही. त्या शब्दाच्या अर्थासाठी, त्याच शब्दाकडे नीट बघावे लागते, तोच शब्द अर्थ सांगतो. संस्कृत शब्द हे त्याचा अर्थ सुचवतात, हे त्यांनी कित्येक शब्दांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यामुळे संस्कृत शिकण्याची सोपी पद्धत समजली, युक्ती समजली.
‘हे पहा, तुम्ही माझ्या पद्धतीने पाठांतर केले, तर जरी तुम्ही परिस्थितीने पुढे संस्कृत पंडीत होऊ शकले नाही, तरी पण जाणकार व्हाल, निदान रसिक निश्चित व्हाल, ही मला खात्री आहे.’ असे ते आवर्जून सांगत. पाठांतर करतांना, त्यातील दीर्घ, ऱ्हस्व, विसर्ग, वगैरे लक्षात ठेवत उच्चारच तसे करायचे, म्हणजे संस्कृत लिहायची वेळ आली, तर त्याप्रमाणेच लिहायचे, लिहीतांना चुका होत नाही, शुद्ध लिहीले जाते.
संस्कृतातील सुभाषितमाला शिकवणे, ही तर त्यांची अत्याधिक आवडती बाब ! सुभाषिताचा वाच्यार्थ, ध्वन्यार्थ वा व्यंगार्थ ते व्यवस्थित सांगत ! त्यांत दडलेला अर्थ ते उलगडून दाखवत ! सुभाषितात काही कूट श्लोक असत, अशावेळी त्याचे दोन अर्थ कसे, हे तर अप्रतिमपणे सांगत !
‘नीलकंठ’ म्हणजे मोर आणि शंकर, हे दोन्ही अर्थ कसे होतात ? भगवान शंकर एकदा घरी आले, पार्वतीला राग आला होता. ती दार उघडायला तयार नव्हती त्यावेळचे संभाषण पुराणिक सर समजावून सांगत होते. आता मला फार आठवत नाही, जेवढे आठवते, ते सांगतो.
दरवाजा उघडायला शंकरांनी सांगीतले. यांवर ‘कोण ?’ म्हणून पार्वतीने विचारणा केली.
‘मी नीलकंठ (शंकर) आहे’ हे सांगीतल्यावर पार्वती म्हणते, ‘नीळकंठ (मोर) मग बागेत जा आणि तिथे नर्तन कर !’ यांवर शंकर त्रस्त झाले, ते पुढे म्हणाले -
‘मी हिमालयाच्या दुहितेचा पती आहे,’ या शंकराच्या आवाजावर, ‘मग नदीचा पती समुद्र इकडे कसा आला ?’ या प्रश्नाने शंकराला निरूत्तर करते. या दोन्ही शब्दांची त्यांनी सुंदर फोड करून सांगीतली होती. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे यथास्थित दिल्यावर देखील शंकराला, पार्वती माता आटोपली नाही. शेवटी तो भोळा सांब पार्वतीस शरण जातो, आणि त्याचा हा याचनेचा स्वर ऐकल्यावर, ती जगज्जननी पार्वती दरवाजा उघडून शंकराला आंत घेते. यांतील शृंगारीक वर्णन जसे सरांनी सांगीतले, तसे शब्दांतील श्लेष आणि त्याचे सामर्थ्य कसे असते, हे पण सांगीतले.
पुस्तकातील चुकीची वचने कोणती, आणि बरोबर कोणती, आणि ती का बरोबर आहेत, हे पण स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.
‘मी सांगतो, तसे उत्तरपत्रिकेत लिहा. तुम्हाला गुण द्यावेच लागतील.’ एवढा विश्वास त्यांचा स्वत:वर होता. गाईडवर त्यांचा विश्वास नसायचा. एखादे महत्वाचे रूप, सुभाषित, उत्तर किंवा परिच्छेद शिकवण्याच्या ओघात आले असेल, आणि ते परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असेल तर, ते त्याच्या उजवीकडे ‘Very Imp’ किंवा ‘Imp’ किंवा ‘Most Imp’ असे त्याच्या महत्वाप्रमाणे लिहून ते अधोरेखित करत.
‘ते परिक्षेत आल्याशिवाय रहाणार नाही’, हे पण सांगत ! यांवर आपण त्यांना विचारले, ‘कशावरून परिक्षेत येईल असे सांगता आपण ?’ यांवर ते उत्तरणार की ‘ही फसवी रूपे आहेत. तुमची परिक्षा घ्यायची असते, ती असेच प्रश्न विचारून !’ असे सांगत ! खरोखर त्यांनी सांगीतलेले प्रश्न येतात, हे जुनी मंडळी सांगत. यांवर ‘पुराणिक सरच बोर्डाची प्रश्नपत्रिका काढतात’ अशी पण बातमी फुटली होती.
पेपर अतिशय कडक तपासणे, हे आमच्या शाळेच्या प्रत्येक शिक्षकांचे वैशिष्ट्य ! मात्र त्यामधे सरांमधे तिवारी सर आणि मॅडममधे पितळे बाई, यांना कोणीही स्पर्धक नव्हते. वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला पण आपले मार्क दुसऱ्या कोणाला सांगतांना लाज वाटेल, असे मार्क्स असत. यांच्या कडक पेपर तपासण्याचे किस्से पुन्हा केव्हातरी ! मात्र शाळेचे आणि शिक्षकांचे तसेच नांव होते परिसरांत ! आमची दहावीला प्रिलीमिनरी परिक्षा झाली, पुराणिक सरांनी पेपर शाळेच्या किर्तीला जागून कडक तपासले होतेच. सर्वांना उत्तरपत्रिका वाटल्यावर मात्र ते म्हणाले, ‘आता जितके गुण मिळाले असतील, असाच जर अभ्यास ठेवला, तर तुमचे दहा टक्के वार्षिक परिक्षेत वाढू शकतात.’
संस्कृत शिकवणारे संस्कृती पण जपण्याचा प्रयत्न करत असतात, अशी आपली भावना ! आम्हाला भगवद्गीतेतील एक श्लोक होता अभ्यासात !
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥
आपणच आपले शत्रू कसे, आणि आपणच आपले मित्र कसे यांत सांगीतले आहे, हे त्यांनी सांगीतले.
एका दिवशी अचानक त्यांना काय वाटले, कोणास ठाऊक ? ते आमच्या वर्गावर आले. तसा अभ्यासक्रम तर संपलेला होता. विषयाची रिव्हिजन सुरू होती. त्यांनी विचारले आम्हाला, ‘काही कोणाला अडीअडचण असेल तर विचारा’ असे पण त्यांचे सांगणे नेहमीच असे. दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोणता विद्यार्थी कुठे जाईल, हे कोण सांगणार ? पुन्हा या वर्गात भेट होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यांच्या मनांत काही तरी असावे, त्यांच्यातला विद्यार्थ्याची निरंतर काळजी वहाणारा शिक्षक त्यांना स्वस्थ बसू देत नसावा ! फळ्यावरील लिहीलेले तसेच राहू देत त्यांनी विद्यार्थ्यांकडे बघीतले. टेबलाच्या पण थोडे पुढे आले, आणि अचानक त्यांनी सर्व वर्गाला संबोधले,
‘मी सर्वांना एक प्रश्न विचारतोय. कोणाला उत्तर येत असेल तर सांगा. दहावीच्या परिक्षेच्या अभ्यासक्रमातील हा प्रश्न नाही, त्यामुळे तुम्हाला उत्तर आले किंवा नाही आले, तरी परिक्षेत काही फरक पडणार नाही. मात्र हा प्रश्न या परिक्षेतला नाही, पण तुमच्या जीवनाच्या अभ्यासक्रमातील आहे, तुमच्या आयुष्यातल्या परिक्षेत येणारा आहे. याचे उत्तर पहा कोणाला येते का ? उत्तर कोणाला आले नाही, तर नंतर सांगेल, असे म्हणाले.
‘दारू पिणे वाईट आहे, तेव्हा दारू पिऊ नको’ हे कोणाला सांगावे ? असा त्यांचा प्रश्न होता. प्रश्न विचारल्यावर आम्हा काही विद्यार्थ्यांचे हात उत्साहाने वर आले. ‘जो भरपूर पितो त्याला सांगावे !’ असे सर्वसाधारण काहींनी उत्तर दिले. मात्र पूर्ण असे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणाला आले नाही. ते क्वचितच हंसत. पण त्यांच्या चेहऱ्यावर किंचिंत हसू जाणवले.
‘याचे उत्तर सोपे आहे, आणि तुम्हाला न पटणारे आहे. याचे उत्तर - जो दारू पीत नाही, त्याला सांगावे की दारू पिऊ नको !’ पुराणिक सरांचे उत्तर ! यांवर आम्ही विद्यार्थी अवाक् होणे स्वाभाविक होते. त्यांवर त्यांनी जे सांगीतले, ते आज पण मी विसरलो नाही. त्यांनी सांगायला सुरूवात केली -
आज आपली परिक्षा तोंडावर आली आहे. काही दिवसांनी परिक्षा होईल, परिक्षा झाल्यावर आपली भेट होईल, किंवा होणार नाही. कोणी कुठे जाईल शिकायला, काही आपल्या उद्योगाला पण लागतील. आपले या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक हे नाते संपेल त्यावेळी ! मात्र ते नाते संपले, तरी गुरू व शिष्य हे नाते संस्कृतीप्रमाणे रहावे, असे मला वाटते. लक्षात ठेवा, आपली बुद्धी जोवर शाबूत आहे, तोवर ते मनाला नियंत्रणांत ठेवेल. तुम्ही तुमचे मन एकदा का ताब्यात ठेवले, की तुम्हाला काहीही निर्णय बुद्धीचा योग्य वापर करून घेता येतात. तुमची दारू पिण्याची इच्छा झाली, तुम्ही दारू प्यायला सुरूवात केली, की तुमची बुद्धी चालत नाही. तुमच्या बुद्धीचे नियंत्रण सुटले, की मग तुमचे मन थोडीच तुमच्या ताब्यात रहाणार आहे ? तुमच्या मनाचा एकदा का तोल ढळला, की बुद्धीने निर्णय घेणे संपते. नंतर सुरू होतो, तुमचा उतरतीचा प्रवास ! तुम्ही सांगायला सुरूवात करतात, की दारू पिणे कसे चांगले, त्यामुळे कसे काही नुकसान होत नाही. तुम्ही वारंवार हेच सांगतात. न पिणाऱ्यांना बहकवतात ! त्यांना नंतर काहीही सांगून उपयोग होत नाही, आपली शक्ती व्यर्थ जाते. ती व्यर्थ जाऊ नये, यांवर चांगला मार्ग म्हणजे, जो दारू पीत नाही, त्यांना सर्व सांगा. तो चुकूनही दारूकडे वळायला नको. तिकडे प्यायला हात गेला, की हे सर्व आठवून त्याचा हात आपोआप मागे यायला हवा ! हे ‘Most Imp’ आहे, लक्षात ठेवा. मला विसरलात, तरी चालेल पण मी शिकवलेले ‘Most Imp’, ‘Very Imp’ ‘Imp’ कधीही विसरू नका. ते लक्षात ठेवा, आयुष्यातल्या कोणत्याही परिक्षेत तुम्ही कधी नापास होणार नाही. हे संस्कृत, देववाणी शिकवणाऱ्या शिक्षकाचे सांगणे आहे.
सर बोलत होते, आम्ही ऐकत होतो. एका सोप्या प्रश्नाचे उत्तर इतके वेगळे असू शकते. भलेमोठे असू शकते आणि आयुष्यभर लक्षात ठेवावे असे असू शकते. तास संपल्याची घंटा शाळेच्या शिपायाने, हरिभाऊने दिली. त्याने आम्हाला भानावर आणले. आम्ही जेमतेम पंधरा-सोळा वर्षाचे विद्यार्थी सुन्न होऊन गेलो होतो. पुराणिक सरांनी संस्कृत तर अवश्य शिकवले होते, पण आयुष्यभर जपावी लागणारी संस्कृती शिकवली होती. सुसंस्कृतपणे कसे जगायला हवे हे सांगीतले होते.
सरांनी हे शिकवायला आता खूप वर्षे झालीत, सन १९७७ साली शिकवले होते. त्यांच्याप्रमाणे तंतोतंत सांगायचे, तर बेचाळीस वर्षे झालीत. काही वर्षांनी पन्नास पण होतील, त्यापेक्षा पण जास्त होतील. काळ कोणासाठी थांबत नाही. आज पुराणिक सर नाही या जगांत, पण सरांनी शिकवलेली शिकवणूक आणि त्यांची ही ‘Most Imp’, ‘Very Imp’ ‘Imp’ शिकवण व वाक्ये अजून आठवतात ! —- आणि मग अशी कधीतरी लिहावी वाटतात !

31.12.2019

No comments:

Post a Comment