Saturday, January 18, 2020

बैल, छत्री आणि लालसर पंचा !

बैल, छत्री आणि लालसर पंचा !
काही काही माणसं ही गांवावरून ओवाळून टाकलेली असतात, गांवाला भयंकर उपद्रवी व त्रासदायक असतात. त्यांचा हक्कांबाबतचा कायदा फार पक्का असतो. त्याचे निर्लज्जासारखे ते सर्वांसमोर त्याचे प्रदर्शन करतात, परिणामी भिडस्त व पापभीरू माणसं, ही मुकाट्याने त्यांचा मुजोरपणा सहन करतात. त्यांच्या कर्तव्याबाबत मात्र बोंब ! आपण त्या गांवचेच नाही, अशी त्यांची तऱ्हा ! मात्र एखादेवेळेस अशी काही घटना घडते, की त्यांचा बऱ्यापैकी हिशोब बसला जातो, अगदी व्याजासहीत. अशीच एक ही घटना ! तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची. आता कदाचित काहींना समजणार नाही, तर काहींना कालबाह्य वाटेल.
गांवाकडची गोष्ट ! फटफटलं, पहाट झाली, की कामाला जाणारे शेतकरी, मजूर ! हे सर्व बहुतेक लवकर उठून शेतात कामाला जायचे. त्यावेळचे शेताचे रस्ते, विचारू नका. सर्व कच्चे रस्ते आणि त्याची अवस्था पावसाळयात तर विचारायलाच नको. रस्त्यावरचा चिखल अगदी सरसरीत लगदा असायचा. पायताण घालून जाण्यापेक्षा अनवाणी जाणं परवडायचं अशा वेळी ! शिष्टासारखे नव्या वहाणा पायात घालून गेलेले, कित्येक जण रस्त्याच्या मधोमध एक वहाण एका पायात, आणि दुसरा पाय अनवाणी, त्याची वहाण दोन्ही हातात धरून बघताय, काय झाले तिला, अशा अवस्थेत उभे असलेले दिसायचे.
सर्व माणसांची जाण्यायेण्याची लगबग असायची, ती मात्र पावसाळ्यातच ! केव्हा पाऊस येईल याचा नेम नसायचा. तो आला, की झाडाखाली आसरा घ्या ! डोक्यावर गोणटं उलट दुमडून पण काही जात असायचे. चालतातालता असे काही रस्त्यात घसरून पडणे, मग अंग चिखलाने लडबडणे, यांत कोणाला काही विशेष वाटत नसे, कारण शेतातल्या कामात पण मातीत खेळावे लागे. त्यामानाने रस्त्याने जाणाऱ्या बैलगाड्यांवर बसलेली माणसे भाग्यवान ! त्यांचा या चिखलात घसरून पडण्याशी फारसा संबंध येत नसे. मात्र बैलगाडीला रस्ता मोकळा करून देण्याच्या नादात, रस्त्याने चालणाऱ्यांना, रस्त्याच्या इतके काही कडेला जावे लागे, की तिथं असलेल्या निसटाणीवरून, घसरून त्यांना पुन्हा रस्त्यात पडायची नामुष्की येई. हातातले जेवण्याचे गाठुडं सर्व खराब होई. काही वेळ तर या गडबडीत, पाय काट्यावर पडे, कारण कोणाच्या शेताच्या हद्दीवर, शेतात ढोरंढाकरं घुसू नये, म्हणून काट्यांचे कुंपण लावलेले असे. मग हे संकट आल्याने अज्ञात पोकळीत शिव्यांचा त्राग्याने मनाशीच भडीमार होई.
या गडबडीत चिखलात भरलेल्या पायात काटा जाऊन, तो पायात मोडला, की भयंकर त्रासदायक प्रकार होई. लंगडत लंगडत, उचकत उचकत चालत, घरी किंवा शेतात पोहोचल्यावर, तो बारीक सुईने कोणाकडून तरी काढून घ्यावा लागे. काहीवेळा तो अर्धवट निघे, आणि बाकीचा पायातच राही. मग त्या ठिकाणी कणभर गूळ लोखंडी सराट्यावर घेऊन, जरा चुलीच्या किंवा शेकोटीच्या जाळावर धरत. तो गूळ वितळून पातळ होई, की तो रस अगदी सराट्यासहीत, जिथे काटा टोचला असे, तिथं टेकवला जाई. काही वेळ पायाला चटका जाणवे, मात्र काटा काढण्याच्या नादात बरीच कातडी सोलली गेली असेल, तर चटका जोरात बसे. असे केल्यामुळे काटा वर येतो, लगेच काढता येतो, ही समजूत.
काही वेळा, ज्यांचे शेत त्यांच्या घरापासून जरा जवळ असे ते, किंवा ज्यांची गाडी काही कारणाने शेतात राहिली, किंवा बैलगाडी नादुरुस्त असली, मात्र बैलांकडून तर शेतात काम करून घ्यायचे आहे, अशावेळी मग ते, बैलांना जू बांधून त्यांवर नांगर, वखर उलटे टाकलेले अशा स्थितीत, बैलांमागे शेतकरी कासरा घेऊन जात असे. हा एक अजून धोकादायक प्रकार असे. यांना जातांना जागा कमी लागत असल्याने, जाताजाता बैलाच्या शेपटीचा फटकारा किंवा बैलाचे तोंड आपल्याला लागायचे. काही वेळा बैल रस्त्यात उधळायचे, त्यावेळी मात्र बैल सावरणारा आणि रस्त्याने जाणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडत असे. त्यात पण माणसांची, त्यांच्याजवळ असलेल्या सामानाची पडझड व सांडलवंड होत असे. काही वेळा ही धावपळ अचानक, लगबगीने, विनाअंदाज करावी लागत असल्याने यांत खरचटणे, रस्त्यावर फरफटत जाणे, जमिनीवरून अधांतरी उचलले जाऊन मग उंचावरून पडणे वगैरे प्रकार क्षणात आणि विनासायास होत असत. काही वेळा अशा अपघाती घटना मुद्दाम घडाव्या, म्हणून देखील काहींचा जाणीवपूर्वक प्रयत्न असे, कारण दुसऱ्याची फजिती करायची आणि ती बघायची, तेवढीच करमणूक !
गांवात एक जण होता, त्याला काहीही नांव द्या, कारण असा उपद्व्यापी प्रत्येक गांवात असतो. तो आपल्यासोबत कायम काळी छत्री आणि खांद्यावर लालसर पंचा बाळगायचा. तो रस्त्याने जात असला, अन् बैलगाडी मागून येत असली, की हा अचानक त्याच्या छत्रीची उघडझाप करायचा. काही वेळा बैलाच्या डोळ्यासमोरून लालसर पंचा विनाकारण झटकायचा. बैलाची काय भावना आहे, कल्पना नाही, पण बैल छत्रीच्या उघडझापीने व लाल कापड डोळ्यांसमोर दिसले, की बावचळतात, बिथरतात आणि नियंत्रणाबाहेर जातात. या बैलांचे पण तसेच व्हायचे. ते अचानक डोळ्यांसमोर काळे लालसर नाचले, की बावचळायचे. अशा बावचळलेल्या क्षणी माणूस काय करेल, याचा नेम नाही; ते तर बिचारे जनावर ! ते आपल्या अंगभूत ताकदीने व मस्तीने सर्व बंध तोडायला बघायचे. त्यामुळे गाडीवानाला बैलांना सावरतां सावरतां नाकी दम यायचा. गाडीवान बैलाचे कासरे ओढताओढता इतक्या काही विचित्र शिव्या द्यायचा, की पुन्हा त्याच द्यायला सांगीतल्या, तर देता येणार नाही. या आरड्याओरड्यामुळे बैल रस्त्याच्या पटकन दुसऱ्या कडेला जायचे, अन् तिकडून मुकाटपणे चालणारे धडपडून व ठेचकाळून पडायचे. आणि ‘अरे अरे अरे’ म्हणता म्हणता, बैल खाली मान घालत, तिरपे बघत किंवा खालून मान वर करून मानेला हिसडे देत, झपकन उडी मारल्यासारखे करत गाडी पुढे न्यायचे. एका हाताने कासरा आणि दुसरा हात व दोन्ही पायांनी बैलगाडीतील सामान पडू नये, म्हणून धडपड करत गाडीवानाची क्षणांत दमछाक व्हायची. काही वेळा तो पण गाडीतल्या गाडीत वेडावाकडा व्हायचा. गाडीत बसलेल्या सर्वांची बुडे एका क्षणात किंचींत वर येऊन दुसऱ्या जागेवर धडपडायची. गाडीतून पडून नये म्हणून स्वत:ला सावरावे, का सामान आवरावे, का खिशातल्या व पिशवीतल्या वस्तू सावराव्या, या द्विधा मनस्थितीत बसणाऱ्यांचे काहीतरी तंत्र बिघडायचेच ! गाडी वेडीवाकडी पुढे गेलेली असायची. ही गंमत पहात, हा मग मनाशीच हसत, मागे रेंगाळायचा.
रस्त्याने जाताजाता, अधूनमधून कोणी नसतांना कोणाचा पाण्याचा बांध फोडणे किंवा दुसऱ्या वाफ्यात लावून देणे, हा त्याच्या हाताचा मळ होता. मग शेतात पाय ठेवल्याबरोबर जेमतेम पावशेर वजनाची चप्पल ही चिखलामुळे पाचकिलोची होऊन जायची. माणूस पायाला वजन बांधून चालणाऱ्या पैलवानासारखा चालायला लागायचा. हा तिथं नसायचा, पण मनातल्या मनांत डोळ्यांसमोर ते चित्र आणून खूष व्हायचा.
याच्या या स्वभावाबद्दल गांवात त्याला बरेच जण बोलायचे, कारण याचे उपद्व्याप सर्वांना माहीत असायचे. मात्र यांवर त्याची काही उत्तरे लोकांच्या पाठ झाली होती.
‘मी केले हे कशावरून म्हणताय ? पुरावा हवा. नाही त्याचे आरोप माझ्यावर करू नका.’
‘रस्त्याने जातांना छत्री, पंचा न्यायचा किंवा नाही, यांवर कायद्याने कोणी बंधन आणू शकत नाही.’
‘छत्री केव्हा उघडायची, किंवा उघडून लगेच बंद करायची, किंवा तिची उघडझाप करायची, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या बैलगाडीकडे पाहून मी कधीही असे केलेले नाही, करत नाही. छत्री व बैलगाडीचे येणे हा योगायोग असू शकतो. त्याच्या परिणामांस मी जबाबदार नाही.’
‘मी कोणत्या रंगाचा पंचा वापरावा, आणि त्याचा कसा वापर करावा, यांवर कायद्याने कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही. माझ्या पंचाने बैलांची माथी भडकतात आणि ते उधळतात, ही केवळ तुमची कल्पना आहे. याला कसल्याही पुराव्याचा आधार नाही.’
सर्व गाव व गांवकरी याच्या वागणुकीने त्रस्त झाले होते. हा रस्त्यावर जात असला, तर लोक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जायचे. थांबून जायचे. काही तर घाबरून, हा पार दिसेनासा होईपर्यंत झाडाखाली आराम करायचे. काहींनी याच्या येण्याजाण्याच्या वेळेचा छडा लावला, आणि ती वेळ टाळून ते जाऊ लागले.
या त्याच्या अशा उत्तराने, वागणुकीने त्याने एकदोनदा पोलीसस्टेशनच्या पण वाऱ्या केल्या होत्या. मात्र याचे बिनतोड मुद्दे ऐकल्यावर फौजदार चरफडण्या व्यतिरिक्त काही करू शकला नाही. कावेबाजपणे वागणारे आणि कायदेबाज लोकांपासून पोलीसस्टेशन पण जरा जपून असते. कोणतीही गोष्ट निष्कारण त्यांच्यावर शेकून, गाजावाजा खूप होतो. मग ते निस्तरता निस्तरता विनाकारण तिसऱ्याच भानगडी त्यांच्या मागे लागतात. मात्र अशा व्यक्तींसाठी पोलीसस्टेशन संधीची वाट अवश्य पहात असते. हे असे जास्त काळ किंवा कायमचे चालू शकत नाही. शेरास सव्वाशेर कोणीतरी भेटतोच, किंवा तशी वेळ यावी लागती. ती वेळ आली.
एकदा त्याच्या अशाच उपद्व्यापाने एकाचा पाय जोरात मुरगळला. त्याला जमीनीवर पाय टेकवता येईना. त्याच्या पोराला याची शंका होतीच. दिवस पावसाळ्याचेच होते. त्याच्या पोराने दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाण्याची तयारी केली. त्याला तशी सवय नव्हती. त्याने नुसते बैलाच्या मानेवर जू ठेवले आणि त्यांवर वखर पालथे घालून तो निघाला. पावसाळ्याचे दिवस असल्याने त्याने पण छत्री, त्या वखराच्या दांड्याला बांधली. पुढे समोर हा चालतच होता. पाऊस सुरू झाला. मुलाने छत्री सोडवली आणि उघडली. बैलाच्या पाठीवर पावसाचे थेंब पडले, त्याची पाठ थरारली. त्याच्या कानाने ‘भप्प’ असा छत्री उघडल्याचा आवाज टिपले. बैलाची चाल वाढली. पाऊस सुरू झाला. त्याने पण भप्पकन छत्री उघडली आणि ती या बैलांच्या डोळ्यांसमोर नाचली. बैल उधळले. समोर हा दिसत होताच. एका क्षणात हा जमिनीपासून वर उचलला जाऊन, सरसरीत चिखलात पडला. त्याच्या क्षणभर अगोदर, आभाळ दिसणे, म्हणजे काय, याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने, त्याने जो काही किंकाळी वेड्यावाकड्या आवाजात फोडली, ते ऐकून शेजारपाजारच्या शेतातून काही जण धावून आले. वहाता शेताचा रस्ता व सकाळची वेळ, त्यामुळे शेतात जाणारे सर्वजण ही गंमत बघायला आवर्जून थांबले.
त्याच्या सुप्रसिद्ध छत्रीची अवस्था केवीलवाणी झाली. त्याला चिखलातून उठता येईना. कपडे सर्व चिखलाने लडबडलेले ! पायांतील दोन्ही चपला हवेतूनच नाहीशा झालेल्या ! समोर जवळच दोन्ही बैल ! हे पाहून त्याची कंबरच खचली. हे एका क्षणांत घडले. शेवटी त्या पोराच्या लक्षात आले. त्याने बैलांना बाजूला ओढले. पाऊस पडत होता. त्याचेकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्याला कसेबसे उचलले आणि एकाची बैलगाडी थांबवून त्यांत टाकले. तोवर जरा तरतरी आली असावी.
‘चला भाऊ, बरं वाटते ना ? दवाखान्यात जायचे का घरी ? ‘ गाडीवाल्याने विचारले.
‘बरं आहे. घरी सोड.’ तो.
‘ठीक आहे. घरी सोडतो तुम्हाला.’ गाडीवाला.
‘पण भाऊ, ती छत्री नसती ना, तर हे इतकं घडलं नसतं !’ गर्दीतील एक जण !
— छत्रीमुळे पडलो, हे सांगायची त्याला चोरी होती. पण एक झाले, त्यानंतर त्याची छत्री आणि लालसर पंचा कायमचे गुप्त झाले.
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करण्यास हरकत नाही.)
© ॲड. माधव भोकरीकर

27.12.2019

No comments:

Post a Comment