Tuesday, February 20, 2018

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं
जाईच्या पाकळया दवं अजून सलते गं


आमचे गांवातील घर म्हणजे, लहानपणी मला आठवते तसे, आमच्या गल्लीतील, भोकरीकर गल्लीतील ! गल्लीतील सर्व वयोगटांतील मुलामुलींसाठी ते त्यांचे स्वत:चेच घर होते; परकेपणा अजिबात नाही. किंबहुना घरी तरी कमी मस्ती करत असतील ही बालगोपाळ मंडळी, पण इथं त्यांना तसं बंधन नसे ! आमचं घर तसं मोठं असल्याने, त्यांना घरात किंवा अंगणात मस्तीला नुसता उत येई. घरातील बंगळीवर बसून मोठमोठे झोके घेणं, हा दिवसभरचा नित्याचा कार्यक्रम होता. त्यांना काही वेळा माझी आजी, आई, काकू रागे भरून बंधन घालत, घरी जायला सांगत, नाही असं नाही ! पण त्या रागावण्यात किंवा दटावण्यात, मुलांची काळजी जास्त डोकवायची का या दंग्याने त्यांच्या कामात अडथळा आल्याने व्यक्त झालेला त्रस्तपणा असायचा, हे ठरवणे कठीण असे. त्यांत घरातील माझ्यासारखी पण त्यांना सामील असत. त्यामुळे त्या रागवण्याचा, त्या मुलांवर तात्पुरता परिणाम होई, मुळापासून उपाय होत नसे, आणि तशी इच्छापण नसे; परिणामी ही सर्व मंडळी दुसऱ्या दिवशी पुन्हा वेळेवर आमच्या घरी हजर !
हाच गुण माझ्या येथील औरंगाबादच्या घराला लागला असावा. शेजारपाजारची बालगोपाळ मंडळी, आमच्या या तुलनेने छोट्या घरात, आनंदाने फिरत असते. पुस्तके, टेबलावरील कागद, रॅकमधील फाईल्स, पेन, पेन्सील वगैरे सर्व गोंधळापासून अलिप्ततेचे पांघरूण घेत ही मंडळी रमतात.
दोन-तीन दिवसांपूर्वीच शेजारची एक ठमकाई, अनुष्का नांवाची, अगदी नऊवार पातळ, नाकात नथ, हातांत बांगड्या, पायांत पैंजण लेवून, डोळ्यांत काजळ वगैरे घालून, नटून सजून आली होती. हात मेंदीने नक्षी वगैरे काढून छान रंगवले होते. मोगऱ्याच्या पानाएवढे जेमतेम हात असतील तिचे !
‘काका, माझ्या स्कूलचे गॅदरिंग आहे. आमचा डॉन्स आहे तिथं. मी आहे त्यात.’ मग तिचे, शाळेतील तिचा डॉन्स किती महत्वाचा आहे, हे मला सांगणं सुरू होतो.
‘अग, पण कोणती शाळा तुझी ?’ मी.
‘शाळा काय म्हणतां ? स्कूल आहे माझं, स्कूल ! ‘किंडर गार्डन’ नांव आहे. किती वेळा सांगायचे ? आता लक्षात ठेवा.’ तिची दटावणी.
‘बरं, मग पुढच्या वर्षी तू ‘एल्. के.जी’ ला जाणार का ‘प्ले ग्रुपला’ ?’ माझा सरळ प्रश्न !
‘अहो, आता मी ‘यु. के. जी.’ला आहे आणि पुढच्या वर्षी ‘फर्स्टला’ जाईल ! किती वेळा सांगायचे ? आणि असं ‘डाऊन डाऊन’ कसं काय मी जाईल ?’ तिचा मी अडाणी असल्याबद्दलचा पक्का ग्रह !
‘बरंऽऽऽ ! मी आता तुझा फोटो काढतो छान ! ड्रेस छान आहे गं. हात पण रंगवले आहेत छान ? रंग कोणता वापरला ?’ मी.
‘अहो, परवाच नाही का, मी हाताला मेंदी लावून आले होते ? तीच मेंदी आता लाल झाली.’ तिचे उत्तर !
‘पण परवा तर तुझ्या हातावर हिरवे हिरवे लावून आली होती. आता तर तुझे हात लाल दिसताहेत. असं कसं काय ?’ मी.
‘मेंदी हिरवीगारच असते, काका ! तशीच हाताला लावायची. दिवसभर ठेवावी लागते. मग हात धुतला की हात आपोआप लाल होतो. माहिती आहे ?’ तिचे मला, अडाणी काकाला, ज्ञानदान करणे.
‘मग जेवण कसे काय ?’ मी.
‘आईनी खाऊ घातले. अहो, हाताला मेंदी लावल्यावर कसं खाता येईल मला ? मेंदी नाही का जाणार पोटात ?’ मी किती अडाणी आहे, याचा तिला अंदाजच येत नव्हता.
‘पण, मधे तुझ्या हाताला मेंदी नव्हती तरी तुला काकू जेवू घालत होती.’ मी. तिचा चेहरा गोरामोरा झाला.
‘मला कंटाळा आला होता जेवायचा. पण भेंड्यांची भाजी होती ना, मग काकूच म्हणाली ‘मी खाऊ घालू का ? भेंड्यांची भाजी आहे. तुला आवडते ना.’ म्हणून मी हो म्हणाले. समजलं.’ ती ठमकाई ऐकायला तयार नव्हती. शेवटी माझी सौ. नेहमीप्रमाणे तिच्या मदतीला आली. ‘किती त्रास देताय ? तुम्ही फोटो काढा तिचा ? छान दिसतेय. तिच्या आईला कार्यक्रमावरून आल्यावर दृष्ट काढायला सांगते.’ माझी सौ.
‘बरं, मी फोटो काढून, तुझ्या बाबांना पण पाठवतो.’ मी तिच्या आवडीचा विषय काढत म्हटलं.
‘ठीक आहे. मी स्कूलचा डॉन्स करून दाखवते. त्यावेळी काढा. नीट काढा फोटो. पण खरं म्हणजे, व्हीडीओ करायचा असतो डान्सचा ! फोटो चांगले नाही वाटत इतके, पण व्हीडीओ काढता येईल का तुम्हाला ? नाही तर, जावू द्या. फोटोच ठीक आहे.’ ती ठमकाई.
मी फोटो काढले, व्हीडीओ पण काढला आणि तिच्या बाबांना पाठवल्याचे सांगीतले. जशी आली तशी लगेच पळाली, तिच्या घरी !
निर्व्याज, निरागस, आनंदी जीव ! छोट्या घटनांनी आनंदी होणारे, खुशीत नाचणारे आणि चिमुकल्या दु:खाने डबडबून, डोळ्यातून दु:ख वाहू देणारे, ते सर्वांसमोर दाखवणारे, दिसत असले सर्वांना तरी न रोखणारे, हे पारदर्शक मन असणारे जीव !
—— ——- ——— ——— ———-
आमच्या घरात आम्ही सर्व एकत्रच रहात. आताच्या नव्या पिढीसारखे सख्खे व चुलत यांचे अर्थ इतके नीट समजले नव्हते. चुलतच काय पण चुलतचुलत असलेले नाते पण, अजिबात लांब वाटत नसे. त्यामुळे हे सर्व नाते भाऊ, बहिणी, काका व काकू इतक्या सुटसुटीत नात्यात सांगता येई. गल्लीच्या अगदी पार टोकाशी रहात असलेला पण, आमचा शेजारीच असे. नातेवाईक आणि शेजारी हे इतके जवळजवळ आल्याने, शेजारी देखील पहातापहाता नातेवाईकांसारखे वागू लागत. कोणाच्या घरी काही कार्यक्रम असला, आणि भांडीकुंडी काही कमी पडली, तर गल्लीतल्या कोणत्याही घरातून मागून आणण्यात, कोणालाही कमीपणा वाटत नसे, किंवा ते देणाऱ्याला अहंपणा वाटत नसे.
या अशा वातावरणांत माझ्या बहिणी आणि शेजारच्या घरातील मुली वाढल्या. या सर्वच बहुतेक माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. काही लहान पण होत्या, पण त्यांना या मोठ्यांच्या कोणत्याही कामात, हरकाम्या सारखीच भूमिका निभवावी लागे. या सर्व मुलींचा, साधारणत: हिवाळयात, एक कार्यक्रम हमखास असे, तो म्हणजे हाताला मेंदी लावणे ! मेंदी लावायची, हे या गटाने ठरवले की मग शोध सुरू होई, तो मेंदीची झाडं चांगली कुठं बहरली आहेत याचा ! मेंदी त्या वेळी पण, मे. अवधूत शेट किंवा मे. रघुनाथ हरि यांच्या दुकानांत, भुकटीच्या स्वरूपात विकत मिळे. गांधी चौकातील गबाशेट तेली यांचे दुकान पण मोठे होते. पण विकत आणायचा बेत, थोड्या चर्चेनंतर या सर्व मुलींमध्ये हाणून पाडला जाई. मुख्य कारण म्हणजे, कोणालाही त्यांच्या घरातून हे असं हाताला मेंदी वगैरे लावण्याच्या थेराला पैसे दिले जात नसत.
‘हाताला मैंद्या लावताय ? घरच्या कामाला हात लावा, तेवढीच आईला मदत होईल. आधीच कामाच्या नांवाने बोंब आणि हाताला मेंदी लावली, की मग बघायलाच नको. ‘काम केलं की मग मेंदी झडेल ना तुझी’ अशी परिस्थिती होईल तुझी.’ अशा जळजळीत स्वरूपात, बहुतेक सर्वच घरातून, पैसे मागीतल्यावर उत्तर येई. तसेच दुकानातून मिळणारी मेंदी ही चांगली नसते, त्याच्यात कसल्या पाल्याची भुकटी करून टाकली जाते, त्याने हात जळजळतात, चरे पडतात, रखरखीत होतात वगैरे ऐकायला मिळायचे.
थोडक्यात मेंदी विकत आणायचा विषय बाद झाल्यावर, मग मेंदींची झाडं कुठं असणार हे ठिकाण डोळ्यांसमोर यायचे ! हायस्कूलजवळ विवऱ्याच्या देवघर म्हणून ओळखले जाणारे ‘कुलकर्णी’ यांचा मोठा बंगला आहे, त्याच्या सभोवताली मोठे शेत ! त्या बंगल्याभोवती मेंदीचे कुंपण असे, ती झाडं बऱ्यापैकी वाढलेली असत. त्याला धण्याच्या आकाराची मेंदीची बारीक फळं पण आलेली असत. त्या बंगल्यात गांवात कोणी बदलून आलेला बॅंकेतील किंवा वीजमंडळाचा अधिकारी रहात असे. त्याची बदली झाल्यावर पुन्हा नवा येई. त्याला पण मुलंबाळं असत, त्यामुळे हा आमच्या गल्लीतील मुलींचा थवा, तेथे मेंदीची पाने तोडायला गेला, की तेथे रहाणाऱ्याची मुलगी किंवा तेथे रहाणारीच, जर ती मेंदी लावणाऱ्या वयांत अजूनही असेल तर, आनंदाने व उत्साहाने सहभागी होई. मग काय विचारतां, त्यामुळे विरोध हा असा नसायचाच ! मेंदीच्या पानांचा हा भारा तोडून मग घरी आणला जाई. भारा आल्याची बातमी गल्लीत पसरे आणि आमच्या घरात सर्व गल्लीतील मुलींची वर्दळ एकदम वाढे.
‘अग, या सगळ्या पोट्ट्या त्या आडावर गोंधळ करताय. आडावर जाऊ नका देवू त्यांना. तो रहाट हलका आहे. तिथं कोणी आहे की नाही ? तो आडावरचा दगड, सगळा रंगवून ठेवतील. निसरडा करून टाकतील सगळा. पडलं कोणी, तर हात पाय रंगायचे पण आणि मोडायचे पण !’ माझी आजी तिच्या देवघरासमोर असलेल्या खाटेवरून, देवाकडे पहात पण या सर्व मुलींना बोले. त्यावेळी आमच्या आडावरचा आंघोळीचा दगड, म्हणजे निदान चार फूट लांब व अडीच फूट रूद असा होता. नवराबायको व मुलगा आरामात त्यांवर आंघोळ करू शकत, एवढा मोठा होता.
या दगडावर एका टोकाला, या मेंदीच्या पानातून एक घमेलभर पाने टाकली जात. नंतर त्या झुडूपाच्या काड्यांवरून सरासर पाने वरून खाली ओढून काढली जात. त्यांवर थोडे पाणी शिंपडले जाई. मग पाला वाटण्याची सुरूवात करण्याची वेळ येई. पाला बत्त्याने थोडा कुटून चदरवदर केला जाई. त्यावेळी मग ठोकण्याचा आवाज येई, तो आला की, ‘अग, पोरी काय करताहेत ? कुटताय की वाटताय ? परवा कुळाचार आहे. या काय पाट्या-वरवंट्यावर मेंदी वाटताय का ? पुरण कशावर वाटणार आहे ? सगळा पाटा-वरवंटा खराब होईल.’ हा आजीचा आवाज ! मग काकूंपैकी किंवा काकांपैकी, बहुतेक काकूच म्हणे, ‘मी धुवून टाकेल वरवंटा. करू द्या पोरींना. त्यांच्या त्याच करताय !’ काकूने सावरलेले असे.
‘अग, मग तू इथं काय करतेय ? तो जड वरवंटा पोरींच्या हातापायावर पडला म्हणजे ? त्या पोरी केवढ्या आणि वरवंटा किती जड आहे ?’ असे म्हणून आजी मग काकूला आडावर पिटाळे. तिथं या मुलींसमोर मी, माझी इतर भावंड, गल्लीतील मुली अगोदरच बसलेली असत. वरवंटा एकच असे आणि प्रत्येकीला आपण मेंदी वाटावी असे वाटे; हे जमणे शक्य नसे. मग काही वेळा शेजारच्या काकूंकडून त्यांचा वरवंटा आणला जाई. दोन्हीकडून मग मेंदी वाटणे सुरू होई.
वाटतावाटता मेंदीचे जरा घट्टसर वाटण झालं, की मग त्यांत अजून टाकायच्या राहीलेल्या गोष्टींची आठवण येई. कोणी मेंदी जास्त रंगावी म्हणून लिंबू पिळायला सांगे. लिंबाचे झाड मागेच होते, त्यामुळे लिंबू लगेच मिळत. ते झाल्यावर कोणाला त्यांत काथ टाकायचे सुचायचे. मग काथाची डबी शोधा. यावेळेस या लहान बहिणी व लहान भाऊ यांचा हरकामे म्हणून उपयोग करण्याची वेळ येई. या शोधाशोधीत काही सांडालवंड होई, गलका वाढे पण मुलींच्या आया जास्त वाढू देत नसत. मग त्या वाटणात काथाची सबंध डबी रिकामी केली जाई. मग अजून कोणी तरी सुचवे की ‘चिमणीची शीट’ यांत टाकावी, म्हणजे मेंदी लालभडक रंगते. यांवर मात्र प्रकरण स्तब्ध होई. टाकावी का नाही ? ती टाकायची कल्पना कशीतरीच वाटे, पण हात कसे लालभडक दिसले पाहिजेत. सरतेशेवटी लालभडक हात दिसणे महत्वाचे, यांवर एकमत होई. त्यावेळी आमच्यासारखे लहान भाऊ भिंतीवर, पत्र्यांवर चढून चिमण्यांची शीट गोळा करत. चिमणीचा जीव केवढा, तिची शीट केवढी आणि आम्हा गोळा करणारांचा जीव केवढा ! मग ती प्रयत्न करूनही किती मिळणार ? या गडबडीत कोणीतरी भिंतीवर चढताचढता पडे. मग रडारड ! हां, हूं करून कसेतरी तो विषय मार्गी लावला जाई. मिळालेली चिमण्यांची शीट त्या गोळ्यात जाई. त्यावेळी निदान चिमण्या भरपूर असल्याने ती अडचण नव्हती. आजच्या काळात तर चिमण्याच राहिलेल्या नाही, घरांत, गांवात ! चिंमण्यांना घर करायला जागाच नाहीत. शेवटी कोणी तरी पुन्हा टूम काढे, ‘भेंडीचे पाणी’ यांत टाकावे, म्हणजे मेंदी कशी हाताला पक्की चिकटून बसते. लालचुटूक रंग पक्का बसतो. त्या वेळी भेंडी ही सर्वसामान्याची भाजी नव्हती. त्यामुळे हा भेंडीचा प्रयोग जेथून मिळेल तेथून आणून, त्या सर्व चौकशांना उत्तरे देवून, बऱ्याच उशीरा पूर्ण होई. लक्षात ठेवावे लागे ते, वाटतांना जास्त पाणी टाकायचे नाही, मेंदीचा रस वाहून जाईल मग फक्त कुच्चा उरेल. तो काही कामाचा नसतो, हे पथ्य कायम डोक्यात ठेवावे लागे. शेवटी मग अगदी गुळगुळीत, जाडसर असा मेंदीचा वाटलेला गोळा तयार होई. तो नीट गोळा करून मग पातेल्यात ठेवला जाई.
आता पुढचा टप्पा मुलांच्या कामाचा नसे, कारण मेंदी फक्त मुलीच लावतात, हा तत्कालीन सर्वमान्य नियम ! त्यावेळी पण काही बंडखोर असत नाही असे नाही, पण अपवादानेच ! आमच्याकडे अपवाद कोणी नव्हते. मग अंतीम काम, ‘ज्याचसाठी केला अट्टाहास, हात सर्व हा मेंदीमय व्हावा’ तो येई. म्हणजे तो वाटलेला मेंदीचा गोळा, आपल्या हातावर हवा तसा, हवा तसे नक्षीकाम करून ठेवणे. हे फक्त ठेवणाऱ्याचेच कौशल्य नसे तर जिच्या हातावर ठेवला जाई, तिने तो सांभाळणे हे पण कौशल्याचेच काम असे. या गडबडीत काहींची मेंदी पडून जाई, काहींना हात धुवावे लागत. मेंदी भरपूर असल्याने पुन्हा लावता येई, एवढे मात्र असे. मेंदी लावण्याची खरी वेळ, म्हणजे रात्री मेंदी लावून, त्यांवर फडके गुंडाळून झोपून जाणे व सकाळी उठून आपल्या मेंदीची किंवा हाताची अवस्था पहाणे. या एवढ्या दिवसभराच्या दगदगीने सर्व मुली थकलेल्या असत. जेवण केले, हात धुतले, की मेंदी लावायला बसत. आई, काकू किंवा दुसरी बहीण फडके गुंडाळून देई आणि मग पहातापहाता झोप येई. संपूर्ण रात्र आपला हात मेंदीने कसा रंगला आहे, या स्वप्नातच निघून जात असावी.
सकाळी उठल्यावर काहींची मेंदी चांगली रंगलेली असे, तर काहींची मेंदी झोपेतच पडून गेली असे. त्यामुळे हात थोडाफार रंगलेला असे, नाही असे नाही. आता या उटारेटा करून मेंदी लावणाऱ्या आपापल्या घरी कधीच्याच गेल्या. भेटी जाऊ द्या, फोनवर बोलणं पण होत नाही. काही मेंदी लावणाऱ्या कुठे आहे, काय करताहेत याची पण कल्पना नाही. त्यावेळच्या मेंदीच्या पानावर त्यांच मन झुलतंय का नाही, याची मला कल्पना नाही. मात्र असा काही, त्या छोट्या मुलीने विषय काढून माझं मन मात्र त्या मेंदीच्या पानावरुन झुलतझुलत त्या आडाच्या दगडावर गेलं !
खरंच, त्या वाटलेली मेंदी हाताला लावली जायच्या काळातील मंडळी अजूनही येथे आहे, आता वयानं जरा मोठी झाली असतील ! त्यांना आठवत असतील का या गोष्टी ? त्यांच्या मोठेपणीच्या डोळ्यातील, या कोवळ्या आठवणी, त्यांना हुळहुळ्या करत असतील ? लहानपणचे हे मेंदी लावणारे हात, त्यांच्या मोठेपणी कुठं जातील आणि कुठं नाही ? त्यांना कधी पुन्हा मेंदी लावायला मिळेल का नाही ? —- या कधीही मेंदी न लावणाऱ्यास पण त्याची काळजी वाटते !

18.2.2018

No comments:

Post a Comment