Monday, February 26, 2018

आनंदाचे दुःख

आनंदाचे दुःख 

मी सातवी किंवा आठवीला असेल. आमच्या घरी त्यापूर्वी पासून एक पोरसवदा तरूण यायचा.त्यावेळी त्याचे वय नेमके सांगता येणार नाही, पण साधारणत: वीस बावीस वय असावं, असं आज वाटतंय. गोरापान, गोलसर चौकोनी चेहरा, देखणेपणात जमा होणारा ! कपाळ बऱ्यापेकी उंच, त्यावर मध्यभागी दुरून दिसत असलेली आडव्यी गंधाची रेघ ! मात्र आपण त्याच्या जरा जवळ गेल्यावर, ती गंधाची रेघ नसून कपाळावरची आठी आहे, हे लक्षात यायचं. मला तर ती रेषा, नेहमीच त्याच्या कपाळावरची भाग्यरेषा असल्यासारखी वाटायची. माणसांचं भाग्य त्या वेळी पण मला समजत नव्हतं आणि आज पण नाही. मात्र भाग्यवान व दुर्भागी जीव बरेच बघीतलेत आणि आजही बघतोय ! आसपास जर लक्ष दिलं तर ते कोणालाही पावलोपावली दिसतात. त्यांच्या नांवाचा, कामाचा आणि भाग्याचा संबंध नसलेले, हे जीव या जगांत येतात, त्यांचे जे काही कार्य त्यांच्या भाग्यात असेल ते करतात, आणि निमूटपणे एखाद्या दिवशी चालते होतात, समोरच्याला हळहळ लावून, हुरहूर देत ! जरा बसक्या आवाजात बोलणारा, हा मध्यम उंचीचा, ज्याला मजबूत म्हणता येईल अशा शरीरयष्टीचा ! बऱ्याच वेळा खाकी अर्धी चड्डी आणि अर्ध्या बाहीचा मनीला घालून हा आमच्याकडे यायचा ! काही वेळा वेगळ्या रंगाची कापडं असायची अंगावर ! त्याच्या त्या अर्ध्या चड्डीमुळे व मनिल्यामुळे, त्याचे मजबूत शरीर त्यातून स्पष्ट दिसायचे. ‘आनंद’ यांचे नांव, नांवाप्रमाणेच आनंदी दिसायचा ! हा खरोखर आनंदी आहे का ?, किंवा जीवनातील आनंद म्हणजे काय ? हे समजण्याचे आमचे त्यावेळी वय नव्हते, आणि आजही हे तत्वज्ञान समजले आहे, असा माझा दावा नाही. त्यावेळेस आम्हांस लहानपणापासूनच व्यायामाचे महत्व कोणी ना कोणी सांगत असायचे, स्वाभाविकच त्याचे कुतूहल निर्माण व्हायचे व नंतर आवडही निर्माण व्हायची. याला पण व्यायामाची आवड, आखाड्यात जायला आवडायचे ! आनंद पण नियमीत आखाड्यात जायचा, त्याचे शरीर त्याची साक्ष होते.
‘आनंद’ हा बाह्मणाचा मुलगा ! वडील लहानपणीच कायमचे सोडून गेलेले ! घरी विधवा आई, मोठा भाऊ व वहिनी ! घरी आई गलितगात्र, त्यामुळे ती तशी नांवालाच होती. घरी थोडीफार शेती होती, बागायती ! बाह्मणाची शेती, तो कशी करणार आणि त्याला कोण कशी करू देणार ? त्यामुळे शेती होती, पण उत्पन्न नव्हते. मोठ्या भावाचे शिक्षण बेतासबात, त्यामुळे त्याने सुरूवातीला कसले तरी सायकल दुरूस्तीचे काम केले. नंतर लाउडस्पिकर भाड्याने देणे, त्यावरून गांवात व खेडोपाडी जाहिरात करणे वगैरे काम याचा भाऊ करायचा, आणि घरातील मंडळींच्या रोजच्या जेवणाची कशीबशी व्यवस्था करायचा. आमच्या खेडेवजा गांवात, जेथे कुठं खुट्ट वाजलं, तरी गांवातील प्रत्येक घरांत ज्याचा आवाज ऐकू येतो, तेथे कोण व कसल्या कामाची लाउडस्पिकरवरून जाहिरात करणार आहे ? थोडाफार धंदा होई तो निवडणूकीच्या काळांत, व गांवात काही सभासमारंभ असले तरच ! निवडणुका व समारंभ पण दैनंदिन असण्याचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात जेमतेम हातातोंडाशी गाठ पडत असलेले हे कुटुंब !
आनंद हा आमच्यापेक्षा वयाने बराच मोठा, पण आम्ही लहान मुलं पण त्याला ‘आनंद’ याच नांवाने हाक मारायचो. आमच्या बाळगोपाळ मंडळींचा आनंद अतिशय आवडता, आमच्यासारखा होऊन काही वेळा आमच्यात गप्पा मारायचा. त्याच्या ताकदीचे आम्हाला कोण कुतूहल व कौतुक ! आम्हा मुलांची, त्याला त्याच्या नांवाने हाक मारलेली कधी आईच्या, आजीच्या कानावर आली तर मग, आजी वा आई सांगायची, ‘अरे, असं उध्दटासारखं बोलू नये आपल्यापेक्षा मोठ्यांशी ! तो मोठा आहे तुमच्यापेक्षा, त्याला दादा म्हणावं !’ मग यांवर, ‘असू द्या हो काकू, त्यांना काय समजते ? लहान आहेत.’ असे म्हणून तो त्या विषयावर पडदा पाडायचा. मग काही दिवस आम्ही बालगोपाळ मंडळी त्याला ‘दादा किंवा आनंददादा’ म्हणून हाक मारून बोलवायची. सर्व गांव, लहानथोर मंडळी ही आनंद या एकेरी नांवाने बोलवत असलेल्या या आनंदला, आमच्यासारख्यांच्या ‘दादा वा आनंददादा’ या बहुमानाने मारलेल्या हाकेची सवय नव्हती. त्याच्या कानापर्यंत ही हाक लवकर जायची नाही, आपल्या या नांवाने कोणी बोलवत असावं हेच त्याची बुद्धी स्विकारत नसावी ! मग दोन तीन हाका दिल्यावर त्याच्या लक्षात यायचं, की आपल्याला हाक देतंय कोणी, यांवर, ‘हं, काय आहे ?’ हे त्यानं विचारले की, ‘आईने बोलावलेय’ हे आमचे उत्तर ठरलेले ! बहुमानाने बोलावण्याचा व ऐकून घेण्याचा पण अनुभव लागतो, तेव्हा सवय होते बहुमानाची. सवय नसलेल्या कानाला, अशी कोणी बहुमानाने हाक मारली, तर ती आपली वाटत नाही, आपल्यासाठी वाटत नाही. तो त्या दिशेने अपरिचितासारखे, त्रयस्थपणे बघतो. आनंदची अवस्था तशी होत असावी.
न बोलावतां पण अधूनमधून घरी येणारा आनंद कोणी बोलावल्यावर येणार नाही, असे शक्यच नव्हते. ‘अरे आनंद, उद्या पाहुणे येताहेत. पाणी जास्त लागेल.’ आई सांगायची. ‘काकू, काळजी करू नका. मी भरून देतो हौद !’ आनंदचे तात्काळ उत्तर ! मग साधारणपणे सकाळची वेळ असेल तर मग, ‘काकू, चहा द्या ! म्हणजे पेट्रोल पडल्यावर गाडी चालायला लागेल.’ हे आनंदचे बोलणं ऐकण्याच्या अगोदरच, आईने चुलीवर किंवा स्टोव्हवर चहाचे आधण ठेवलेले असायचे. चहा प्यायल्यावर, मग आनंद आडाजवळ जायचा, रहाटाच्या दोराला असलेली बादली आडात सोडायचा आणि बादल्यांमागून बादल्या न मोजता संपूर्ण हौद भरून द्यायचा.
घामाने थबथबलेला आनंद, मग टॉवेल लावून स्वच्छ आंघोळ करायचा. त्याचे हौद भरून, आंघोळ करून कपडे घालून होईपावेतो, आईचा स्वयंपाक झालेला असायचा. पाने मांडलेली असायची किंवा त्याचे एकट्याचेच पान असायचे. आई त्याला जेवायला हाक द्यायची. तो यायचा, पानावर बसायचा. निवांत जेवण करायचा. जेवतांना काही वेळा आई बोलायची, ‘अरे, असे किती दिवस चालणार ? काही तरी कायमचा उद्योग कर. तू ब्राह्मणाचा मुलगा, कुठे जमाखर्च लिही, भिक्षुकी कर ! हे असं कोणी बोलावले की त्याचं काम करून दे, याचं करून दे, हे किती दिवस चालणार ?’ आईचा आवाज कातर झालेला असे.
‘काकू, तुम्हाला काय वाटते, मी प्रत्येकीकडेच जातो ? नाही, तुमच्यासारखी दोन-चार घरं आहेत, जी मला केलेल्या कामाकडे न पहाता घरच्यासारखे पोटभर जेवू घालतात, तेथेच मी जातो, घरचे म्हणून ! पुष्कळ वेळा तर भूक लागल्यावर, ‘भूक लागली, जेवायचं आहे’ असं सांगूनही मी जेवलो आहे.’ आनंद सांगायचा.
‘अरे बाबा, घरचे धान्य आहे, ती तापीमाय देते आहे, त्यांत तुझा वाटा आहे, काही मागच्या जन्मीचा, म्हणून तुला जेवू घालते आहे.’ आई म्हणायची.
‘नाही काकू, मी परवा कुस्तीचा फड होता यात्रेत, तो मारला, सव्वाशे रूपये मिळाले.’ आनंद उत्साहाने सांगायचा.
‘रोज का कुस्त्यांचे फड होणार आहेत ? आपल्याला नियमीत असे काही तरी मिळायला हवे.’ आई तिचा धागा सोडत नसे.
‘काकू, मी आता मागच्या आठवड्यापासून मार्केट कमिटीत हमाली सुरू केली आहे. पोत्यामागे दर बरा आहे. कष्टाचं काम आहे, पण दोन पैसे मिळतात.’ आनंद सांगायचा.
‘अरे तू ब्राह्मणाचा ना रे, मग हमाली काय करतोस ?’ आईला वाटणारे दु:ख तिच्या स्वरात आलेले असे.
‘हेच, हेच म्हणतात मला तिथं पण ! मी म्हणतो, ‘मी चोऱ्या तर करत नाही, कष्टाचेच पैसे कमवतो ना ? पण पटत नाही कोणाला ! पाच-पंचवीस रूपये मिळतात रोज ! काकू, माझ्यासाठी मुलगी पहा एखादी, गरिबाघरची असू द्या. आपल्याला मोठ्याची नको आणि देणार तरी कोण ? लग्न करायचेय मला !’ आनंद आईला आपली मागणी सांगायचा. यांवर काय बोलावे हे आईला सुचत नसे.
‘हो, पहाते कोणी बघण्यात आली तर ! पण काय सांगणार तिला, ‘मुलगा हमाली करतो म्हणून ?’ आई ! यांवर त्याचा पण चेहरा गोरामोरा होई. ब्राह्मणाच्या मुलाने पैलवानकी करून ठीक, पण हमाली करून पोट भरणे समाजाला मान्य नव्हतेच.
‘असं कसं ? आमच्याकडे शेती आहे, बागायती ? रहायला घर आहे. माझी ही अशी तब्येत आहे, बायकोकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कोणाची हिंमत होणार नाही ! हे त्यांना सर्व सांगता येईल. अजून काय हवं ?’ आनंदच्या सरळ भाबड्या मनाला या मतलबी जगाचे नियम कसे सांगावेत, हेच आईला समजत नसे.
असे दिवस चालले होते. सकाळ उजाडल्यावर उठावे, आखाड्यात जावे, नंतर आंघोळ करावी, कोणाचा काही निरोप आला तर तेवढे काम करून द्यावे, जेवण करावे व आपल्या नित्य कामास लागावे, ही दैनंदिनी आनंदाची होती. जास्तीचे दळण आणायचे असेल, तर दळणाचे बाचके डोक्यावर घेऊन दळण आणून द्यायचा. कोणाकडे कसलेही लग्नकार्य असले, कसला काही कार्यक्रम असला, कोणी पाहुणेरावळे येणार असले, कोणा म्हाताऱ्याकोताऱ्यांस किंवा अगदी तरण्याताठ्या मुलीला गांवी पोहोचवायचे किंवा आणायचे असेल तर विश्वासाचे नांव म्हणून पुढे येई ते - आनंदचेच ! लग्नकार्य असो, साखरपुड्याचा समारंभ असो किंवा घरचा कसलाही कार्यक्रम असो, आनंदला हक्काने बोलवायचे त्याच्या ठरलेल्या घरातले घर असेल तर त्याने यावे, घरच्यासारखे काम करावे, कोणी खुशीने काही दिले तर याने घ्यावे. याला अगदी सोवळ्यात स्वयंपाक होणार असला तरी थेट स्वयंपाक घरांपर्यंत जाण्याची मुभा त्याला होती. ब्राह्मण असल्याचा जो काही फायदा मिळाला असेल त्याला, तर हा एवढाच होता. बाकी सर्वत्र तोटा, मानहानी आणि त्रासच ! ब्राह्मण असल्याने त्याच्या मागचे कष्ट काही कमी झाले नव्हते आणि कमी होत देखील नाही म्हणा, किंबहुना वाढतातच ! अजून कोणा काही मुलीने, तिला भक्कम संरक्षण लाभणार असले तरी आनंदकडे आपली दृष्टी वळवली नव्हती. आनंद अजूनही अधूनमधून आईला त्याच्यासाठी मुलगी बघायला सांगायचा, शेजारच्या काकूला पण सांगायचा. मात्र अजून काही त्याच्या लग्नाचा योग आला नव्हता.
एके दिवशी दुपारी शाळेतून घरी आलो, तर घरी चर्चा सुरू होती. ‘कोणीतरी अदावत ठेवली असणार ! गरीब ब्राह्मणाचे तरणेताठे, गोरेगोमटे पोर, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. समोरून कोणी आलं असतं तर चार जणांना याने लोळवलं असतं ! कोणीतरी घाला घातला बिचाऱ्यावर ! मुंजाला मारले, चांगलं नाही होणार, ज्याने कोणी केलं असेल त्याचं ! लोकांना चांगलं पहावलं जात नाही, सरळ काम करणारी माणसं ! बिचाऱ्याचा जीवापरी जीव गेला, तो परत थोडी येणार आहे. परमेश्वरसुद्धा गरिबांचा वाली नसतो.’ मला समजेना नेमके काय झाले ते ! मी विचारल्यावर फक्त एवढेच समजले की, - आपल्याकडे अधूनमधून येणारा आनंददादा आता या जगात नाही. त्याला मरण काही चांगले आले नाही.
लहानपणी शालेय जीवनात विविध लेखकांची पुस्तके वाचली, त्यांत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व ‘पु. ल. देशपांडे’ यांची पण पुस्तके होती. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘चितळे मास्तर’ लक्षात आहे, ‘हरितात्या’ समजलाय, ‘अंतू बर्वा’ पण वाचलाय ! तशा सर्वच वल्ल्या वाचल्याय, बघीतल्या आहेत ! ‘नारायण’ याची छटा दाखवणारा हा काहीसा ‘नंदा प्रधान’ पुलंनी जर बघीतला असता, तर कसा लिहीला असता ? ‘नारायण’चे लग्न झालेले होते आणि नारायण आपल्या पत्नीसह, मुलांसह समारंभात सामील व्हायचा. पण या बिचाऱ्या आनंदाचे लग्नच झाले नव्हते, लग्न समारंभासहीत सर्व समारंभात, हा नुसताच एकटा प्रत्येक ठिकाणी खपत असायचा. देखणे, बलदंड शरीर असलेला हा आनंद, पुलंच्या नंदा प्रधानासारखाच देखणा व दु:खी होता, हेच ते काय साम्य !
परमेश्वर पण काय एकेकाच्या कपाळी भाग्य लिहीतो, त्याचे जे काय तरणेताठे, बलदंड आयुष्य असेल, ते त्याने आयुष्यभर जरी आनंद हे नांव घेवून जगलेले असले तरी, त्याच्या आयुष्यात त्याला हवा असलेला खरा आनंद कधी आलाच नाही. आयुष्यभर सर्वांना आपल्या कामाने, आपल्यावरच्या विश्वासाने आनंद देणाऱ्याच्या जीवनांत हे असे दु:खद मरण लिहीले असावे ?
केव्हा कुठे काही तरी दृष्टीस पडते माझ्या, आणि स्मृतीतील आठवणींचे कागद असे फडफडत उडायला लागतात. लहानपणचे कागद, त्यावरील लिहीलेले काही वेळा नीट वाचता येत नाही की समजत नाही. त्यावेळचे न समजलेले जे काही वाचून, आता काहीतरी समजते, उमजते ते लिहीण्याचा प्रयत्न करावा.

२५.२. २०१८

No comments:

Post a Comment