Tuesday, February 13, 2018

तार, टपाल आणि फोन !

तार, टपाल आणि फोन !
मध्यंतरी भारतीय डाकविभागाने ‘तार सेवा’ कायमची बंद केली ! कालाय तस्मै नम: ! आणि तारेबद्दलच्या काही आठवणी मनाला हलवून गेल्या, हळवं करून गेल्या. ‘तार’ करायची म्हणजे बहुतेक त्यांत ‘Start immediately’ किंवा फार तर ‘Mother serious, Start immediately’ असेच लिहीता येत असावे, या शिवाय दुसरा मजकूर लिहायला परवानगीच नसावी, किंवा इतर काही लिहीलं तर बहुतेक ‘तार’ स्विकारतच नसावेत, ही आमची लहानपणी वाचलेल्या कथांमधून झालेली समजूत ! ‘Serious’ म्हणजे, ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’ या आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या ‘गीत रामायणातील’ उक्तीप्रमाणे सर्वांचे, सर्व काही संपलेले आहे, हाच अर्थ माझ्या डोक्यात बरेच दिवस पक्का बसला होता. अगदी बातमी सांगतांना पण त्यावेळी, कोणाच्या घरी काय झाले हे सांगतांना, ‘काल त्याच्याकडे तार आली होती, —-राव लगोलग, मिळेल त्या बसने गेले.’ हे गंभीरपणे बैठकीत सांगणारे असायचे. समोरच्याला येथील परिस्थितीचे गांभीर्य समजावे म्हणून काही वेळा, ‘त्याला तार करून हे सर्व कळव’ असे सांगीतले जायचे.
विवाह व मौजीबंधनाच्या वेळी, जरा उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्यांकडून त्याला येणे शक्य नसल्याची तार यायची, हे आपल्याला साजेसे म्हणून का त्याला शोभेसे म्हणून कोणास ठावूक ? मला मात्र तार आल्याचा अनुभव हा चांगली बातमी कळाल्याचाच आहे. मी एल् एल्. बी. ला सन १९८५ ला पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो, ही बातमी मला माझ्या भावाने तारेने कळवली होते.
पोस्टातला ‘तारवाला’, ‘एक्सप्रेस डिलीव्हरीवाला’ हे वेगळा माणूस असायचा. छोटे पोस्ट ऑफिस असले तर मग एकच जण हे काम करायचा. आमच्या गांवी एकच जण होता. जरा बेताची उंची, गोल चेहरा व काळसर वर्ण आणि खाकी पेहराव ! मग त्याच्या खिशात ती कार्बन पेन्सील व सहजासहजी न समजणारी नांवे लिहीलेला कागद असायचा. तो कोणाकडे तार वा एक्सप्रेस डिलीव्हरीचे टपाल घेवून आला, की त्याच्या भोवती ही बालगोपाळ मंडळी जमायची, घरातीलच नाही तर शेजारची पण ! आम्हाला व गल्लीतील सर्व चिल्लर कंपनीला गल्लीतील सर्व घरात मस्ती करण्याशिवाय दुसरे मुख्य काम नसायचे. मग घरातील वडिलधाऱ्यापैकी कोणी, मग सही करून ती तार घ्यायचे. ‘तारवाला’ म्हटल्यावर घरातील वातावरण निशब्द होऊन जात असे ते नेमके काय झाले, हे समजेपर्यंत ! शेवटी तार वाचून, मजकूर सांगीतला जायचा आणि एकतर सुटकेचा निःश्वास सोडला जायचा किंवा रडारड सुरू व्हायची किंवा धावतपळत जो समोर असेल त्याला टांगा आणायला पिटाळले जायचे.
यांतील थोडा काटकसरीचा प्रयोग पण त्यावेळी खूप जण नेहमी करायचे, तो म्हणजे - साध्या पोस्टकार्डावर पत्र लिहीले जायचे मात्र शेवटची ओळ ही ‘तार समजून निघून ये’ अशी असायची. कोणताही जास्तीचा खर्च न करता, कमीतकमी खर्चात भरपूर मजकूर लिहून, तो कोणाचीही घबराट उडणार नाही, याची काळजी घेऊन ते सर्व पोस्टकार्डाने कळवणाऱ्याच्या धोरणीपणाचे कौतुकच करायला हवे.
रोज काही कोणाचे टपाल यायचे नाही, पण हे माहीत असून देखील, आमच्या गांवी सकाळी साधारणत: आठ-पावणे आठच्या दरम्यान पठानकोटने येणारे टपाल भुरासिंग किंवा श्रावणच्या टांग्याने आणले जाई. पुढच्या गवत ठेवण्याच्या कप्प्यात पोतं, त्याच्या शेजारी पोतं आणि मागे दोन पोतड्या ! काही वेळा टांगा उलाल होऊ नये म्हणून टांगेवाला त्या पुढच्या पाटीवर दाबून बसत असे. पोस्टाचा माणूसही पुढेच बसे. हे सर्व पाहण्यासाठी रोजची नियमीत येणारी मंडळी पोस्ट ऑफिसवर हजर असे.
टपाल आल्यावर ते टांग्यातून शिपायामार्फत उतरवणे, मग त्याचे गांवातील विभागानुसार गठ्ठे बनवणे, ते आपापसांत ‘जोशीबुवांकडे’ का ‘ठाकूरनानांकडे’ द्यायचे हे ठरले जाई. त्यांत मनीआर्डरचे फ़ॉर्म किती, रजिस्टर, पार्सल, व्हीपीपी वगैरे बघीतले जाई. मग जोशीबुवा किंवा ठाकूरनाना आपापल्या टपालाचे सार्टिंग करत. त्यावेळी समोरच्या गजांच्या दरवाज्यासमोर ठाकूरनाना असत तर मागच्या गल्लीतील उघड्या गजांच्या खिडकीच्याजवळ, केऱ्हाळकरांच्या घराच्या जवळच्या बोळीत, जवळपास अंधाऱ्या जागेत जोशीबुवा टपाल लावत बसलेले असत. टपालाच्या सॉर्टिंगला दोन्हीकडे वेळ लागायचाच ! तोपावेतो समोर ‘टपाल आहे का’ हे विचारणाऱ्यांची गर्दी दाटत असे. तो पावेतो, जोशीबुवा व ठाकूरनानांनी टपाल विचारण्यास कोणकोण आले आहे, हे पाहून ठेवलेले असे. ‘हं, देव, घ्या तुमचे ! पाटील तुमचे नाही, नाईक नाही, महाजन तुमचे हे घ्या !’ असे ऐकू येई. ज्याच्याकडे टपाल आलेले असे, त्याला काहीही कारण नसतांना बरं वाटे, तर ज्यांचेकडे टपाल आलेले नाही, त्यांना विनाकारणच खट्टू वाटे. ज्याच्याकडे टपाल आले तो ते फोडून, उघडून घेऊन वाचतवाचत रस्त्याने जाई. कोणाला काही वावगे वाटत नसे. दिवाळीच्या वेळी दिवाळी म्हणून द्यावी लागणाऱ्यांत पोस्टमन पण असे.
त्यावेळी फोन हे तर फारच मोठेपणाचं लक्षण ! वाटेल त्याला फोन मिळत नसे. आपल्या घरातील फोनचा नंबर गांवातील निदान पंचवीस घरातील लोकांनी त्यांच्या संबंधीतांना दिलेला असे. हा असा नंबर दिलेला आहे, हे सांगण्याची पण कोणी तसदी घेत नसे. याला तुम्ही आजच्या भाषेत कदाचित बेजबाबदार पणा म्हणाल पण आमच्या गांवच्या हिशोबाने तो जिव्हाळा होता, आपुलकी होती. हा फोन आपला आहे, आपल्याला उपयोगी पडणारा आहे, ही भावना होती. आमच्या घरातील फोन तर ‘खासदार कोट्यातील’ होता. त्या वेळी फोनचे कनेक्शनच शिल्लक नव्हते म्हणे !
अशी ही एकेकाची तऱ्हा होती, वैशिष्टय होते, दरारा होता. आता तर कोणाच्याही हातात मोबाईल दिसतो. टपाल जवळपास नामशेष होत आलं आहे. फोन पण कमी होत आहेत. —— काही म्हणा पण पोस्टमनने आणून दिलेले टपाल पाकिट उघडून, त्यातील कागद झटकून वाचण्यात जो एक खानदानीपणा आहे, तो ई-मेल वाचण्यात नाही. तबकडीचे डायल फिरवून फोन लावून समोरच्याशी बोलण्याने जे ऐटीचे समाधान लाभते ते ॲपलच्या मोबाईलवरूनही बोलण्यात नाही.

9.2.2018


No comments:

Post a Comment