Tuesday, October 3, 2017

थाट - कल्याण ! यमन कल्याण - भाग - २

थाट - कल्याण ! यमन कल्याण - भाग - २

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या मार्फत घेतले जाणाऱ्या संगीताच्या परिक्षांचे केंद्र होते आमच्याकडे ! 'संगीत विद्यालय रावेर' या नांवाचे ! अर्थात याची सर्वेसर्वा आईच होती ! तिनेच लावलेला वेल होता तो ! मदतीला काही विद्यार्थी !
अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी राग यायचा - 'यमन कल्याण' ! याचा थाट कल्याण ! संपूर्ण जातीचा हा राग ! गंधार वादी आणि निषाद संवादी ! यांत सर्व स्वर शुद्ध, मध्यम मात्र तीव्र ! रात्रीच्या पहिल्या प्रहरात गायला जाणारा राग ! गंभीर प्रकृतीचा हा राग. याच्या 'सा रे ग, मा प, ध नि सां । या आरोहानंतर 'सां नि ध प, मा ग रे सा । हा अवरोह घेतला जायचा ! मंद्र सप्तकातील निषादावरून 'नि रे ग' म्हटले की 'नि रे सा' हे आलेच ! यमन-कल्याण डोळ्यांसमोर उभा !
पण यावरून मला लहानपणी काही राग ओळखतां येत नसे. तो लगेच ओळखता येई तो - नि रे ग, नि रे सा । असे कोणी म्हटले की मग या सुंदर पकडीनेच ! मग लक्षात येई की आता 'श्री देवी शारदा, नमन तुज पदकमल, कृपा की बरसात' हे पद ! माझे आज पण अतिशय आवडते. आज पण खूप विद्यार्थी शिकत असतील हे पद, यमन कल्याण शिकत असतांना ! देवी सरस्वतीची ही प्रार्थना, तिच्या रूपाचे, स्वरूपाचे स्तवन ! आमच्यावर कृपेचा वर्षाव कर ! आम्ही तुला वंदन करतो. हे सर्व भक्तीभावपूर्ण मागणे यमन कल्याण रागात ! मग डोळ्यापुढे सरस्वतीची मूर्ती उभी रहाते. संगीत शिकतांना शिक्षक विद्यार्थ्याला सर्वप्रथम जर राग कोणता शिकवत असतील तर 'भूप' किंवा मग 'यमन-कल्याण' हाच ! संगीतात रूची निर्माण करणारा आहे हा ! तुलनेने सोपा आहे, कानाला गोड वाटणारा आहे.
हा लोकप्रिय, कर्णमधुर व सोपा असलेला राग वेगवेगळ्या वेळी, प्रसंगावर कोण वापरणार नाही बरं ? नाट्यसंगीत, भावगीत, मराठी व हिंदी चित्रपट संगीतातील असंख्य गीते या रागावर आधारलेली आहेत. या रागातील गीते बघीतली तर यांतून काय व्यक्त झाले नाही ? भक्ती आहे, प्रेम आहे, विरह आहे, शांत रस आहे !
आता पहा यमन-कल्याण रागातील भक्तीरस !
1. 'कबिराचे विणतो शेले' हे गीत आपणा सर्वांना माहिती असलेले ! आजचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना संबोधले जाते, त्या कै. गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे गीत ! याला स्वरसाज दिला आहे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व कै. पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु. ल. देशपांडे यांनी ! हा दुर्मीळच योग ! भक्तीने ओथंबलेला व्याकूळ आर्त आवाज आहे माणिक वर्मा यांचा ! आपल्याला आश्चर्य वाटेल कारण हे तर चित्रपटातील गीत आहे. चित्रपट - देव पावला ! महाराज, चित्रपटात पण अशी गाणी असू शकतात ! या महाराष्ट्रातील माणसांनीच लिहीलेली व स्वरबद्ध करून गायलेली ! या दगडाच्या देशातील माणसांनीच ही लिहीलेली आहे. मग ही असेनलिहीणारी दगडाच्या देशातील जरी माणसं असली तरी प्रभू रामचंद्र का येणार नाही हो, शेले विणायला ? यमन कल्याण हा असाच आहे.
भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
राजा घनःश्याम !
दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनःश्याम !
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम !
हळु हळु उघडी डोळे, पाहि जो कबीर
विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ?
2. दुसरे गीत ! गीत कसले अभंग आहे हा ! 'नामाचा गजर गर्जे भीमातीर' हा संत नामदेवांचा अभंग !कोणाला माहिती नाही ? प्रत्यक्ष पांडुरंग ज्यांचा नैवेद्य खाण्यासाठी पृथ्वीवर अवतरले, ते संत नामदेव ! महाराष्ट्रातील भागवतधर्माची पताका ज्यांनी पंजाबात रोवली, गुरू ग्रंथसाहेबात ज्यांची अभंगवाणी घेतली आहे, ते संत नामदेव ! स्वरसाजात भिजवले आहे राम फाटक यांनी आणि गायले आहे भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांनी ! आता कोणाच्या त्याच्या क्षेत्रातील सामर्थ्याबद्दल मी काय सांगावे ? यांच्या भक्तीरसातील रसधारेला देखील यमनकल्याण हाच राग योग्य वाटला.
नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महीमा साजे थोर तुज एका ॥१॥
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडीती ।
उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनी गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ती तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणी लोळती ।
चरणरज क्षिती शिव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ।
करितो सांभाळु अनाथांचा ॥५॥
3. अलिकडील अजून एक चित्रपट गीतच आहे. 'प्रथम तुला वंदीतो' हे कै. डॉ. वसंतराव देशपांडे यांनी आपल्या गळ्याने ह्रदयातून गायलेले व घराघरात पोहोचविलेले गीत ! डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासोबत गात आहेत, अनुराधा पौडवाल ! चित्रपटातील प्रसंगात वसंतरावांबरोबर गात असलेली ही त्यांची मुलगी दाखवलेली आहे ! तिथं वेगळी नायिका आहे. इथं मात्र गातांना आहे 'अनुराधा पौडवाल' ! वसंतराव देशपांडे यांसारख्या कसदार, ताकदवान, लयकारीत संपन्न असलेल्या गायकासोबत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील वजनदार गायकासोबत गायला मिळणे हे भाग्यच ! खरोखर अनुराधा पौडवाल यांना हे गीत नक्कीच अभिमानाचे वाटत असणार ! यांतील कै. वसंतरावांचा भक्तीभाव व तादात्म्यभाव सरस, त्यांचे यमनकल्याणातील दाणेदार स्वर सरस का मागे मुलीला 'आता म्हण' असे खुणावल्यावर तिने उचललेला स्वर सरस ! अष्टविनायक या चित्रपटातील हे गीत आहे, संगीत दिलंय 'अनिल-अरुण' या जोडगोळीने ! यांनी मराठी चित्रपटाला खूप छानछान गाणी दिली आहेत. हे भक्तीरसपूर्ण गीत, यमनमधे ! अगदी गणपती पूजन सर्वप्रथम करतात त्याप्रमाणे हे गीत ऐकले व ऐकवले जाते. शांताराम नांदगावकर यांनी जी काही अप्रतिम गाणी लिहिलेली आहे, त्यातील जनतेच्या मनांत निरांजनीसारखी तेवत असलेली काही गाणी आहेत, त्यातील हे एक गाणे आहे.
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया
विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया
सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया
गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा देई कृपेची छाया
अजूनही यमन कल्याण संपलेला नाही. आयुष्यभर शिकल्यावर ज्यांना तो दिसायला लागतो ! अशांच्या मानाने हे काही भक्तीगीत लिहीलेले आहेत, मला थोडेफार समजलेले, त्यावरून हवं तर झलक म्हणता येईल ! अजून येथे शांतरस राहिला, शृंगाररस आहे अजून खूप आहे. पण डॉ. कै. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांचे 'प्रथम तुला वंदितो'लहे आपल्याला ऐकवावे असे वाटते.
काहीतरी मनांत येते, काहीतरी लिहीत बसावे ! 'बाबा, यांतून तुम्हाला काय मिळते, काय मिळणार ?' मुलं विचारतात ! यांना काय सांगणार, की जुन्या जळगांवात सायकलवरून माझ्याच तालात मी कै. बबनराव भावसारांकडे दलाल वाड्यात तबला शिकायला जात असल्यासारखे मला वाटते.

दिनांक २४ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment