Tuesday, October 3, 2017

थाट - कल्याण ! भाग - १

थाट - कल्याण ! भाग - १
आमच्या घरी आईने तिच्या संगीताच्या शिकवणीतून मिळालेल्या पैशातून हार्मोनिअम घेतला. तिला याचा कोण अभिमान ! तो घेतला जळगांवच्या 'एकनाथ बापूजी जाधव' यांचेकडून ! हे जळगांवातील संगीतातील वाद्यांच्या उपलब्धीबाबतचे जुने व वजनदार नांव ! मी 'एकनाथ बापूजी जाधव' यांना पाहिलेले आहे, आता ते नाही. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव 'दत्ता' हा व्यवसाय सांभाळत होते. अलिकडे कसा, माझ्या व्यवसायाचा ट्रॅकच बदलून गेलेला असल्याने, तिकडे जाणे पण होत नाही. सध्याचा हा वकिलीचा व्याप ! त्यामुळे संगीतक्षेत्र व त्यातील माणसांच्या भेटी पण कमीच झाल्या ! लहानपणापासून 'गायिकेचे पोर' ही उपाधी मिळालेल्या मला ते जन्मजात संस्कार टाकून देता येत नाही, अधूनमधून असे विचार मग उफाळतात जोरात कधीतरी ! मग बसावे काहीतरी टपटपवत येथे ! कोणी वाचते वा न वाचते, आवडते वा न आवडते याचा विचार न करता !
शास्त्रीय संगीत कोणाला आवडणार ? मी खरा तर तबल्याचे शिक्षण घेतलेला तबलावादक ! पदवीधर झालोय यांत ! पण 'धाऽग धिनगिन धात्रक धिनगिन धागेन धागेतीट किऽट धागेन ताऽऽ' अशा स्वरूपातले काही लिहायला लागलो तर कोण वाचणार आहे ? आता यांतील काय व किती वाजवतां येईल तबल्यावर याची शंकाच आहे. फक्त सध्या सांगायला ठीक आहे.
आकाशवाणीचा बराच पूर्वीचा मी मान्यताप्राप्त नाट्यकलाकार आहे ! यांत मुद्दाम सांगण्यासारखे की त्या वर्षी परिक्षक होते, कै. पुरुषोत्तम दारव्हेकर ! त्यांनी निवडलेला असल्याने थोडी कॉलर टाईट, सन १९७९ सालापासून ! अगदी ते माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून 'आकाशवाणी कलाकार' ! त्या काळातील मी सर्वात लहान वयातील नाट्यकलाकार असावा ! आता आकाशवाणीच्या प्रमाणे आमची स्थिती आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी सांगतां येतील पण या जुन्या गोष्टी झाल्या, आताच्या दृष्टीने रिकाम्या गप्पा ! आत्मस्तुती ! समर्थांच्या शब्दात 'मूर्खाचे उदाहरण' ! केव्हाकेव्हा करावासा वाटतो कारण आता विश्वास बसणार नाही कोणाचा; कोणी कोर्टात येऊन माझा युक्तीवाद ऐकला तर !
तर आईने त्या सर्वप्रथम घेतलेल्या हार्मोनिअमवर, आमच्या गल्लीतलाच त्यावेळचा मुलगा, श्री. प्रकाश काळे, याच्याकडून आॅईलपेंटने टाकलेले ! यांवरील माझे नांव व दिनांक २७.२.१९६७ मी नेहमी पहात आलेलो आहे. श्री. प्रकाश काळे यांनी मग रावेर सोडले व पुण्याला जाऊन पेंटर, चित्रकार म्हणून नांव कमवले. माझ्या वकिलीची पाटी, सन १९८५ साली मुद्दाम त्यांच्याकडूनच रंगवून घेतली होती.
त्या हार्मोनियमवरील दिनांकाच्या दोन-चार वर्षे अगोदर माझी आई शिकवण्या घेत असावी. ते मला काय आठवणार ? दि. २७.२.१९६७ रोजी माझे वय पाच वर्षांपेक्षा देखील कमी होते. हार्मोनिअमवर माझे नांव टाकले जावे, एवढे माझे कर्तृत्व तर अजिबातच नव्हते. मी रडलोच तर त्या वेळी कोणत्या स्वरात रडत असेल, हे तिलाच माहिती ! पण मी शांत होतो, असे सगळे म्हणतात.
त्या वेळी ही पेटी घेतल्यावर आईला उत्साह आला असावा किंवा प्रत्यक्ष पेटीसोबत आपल्याला शिकायला मिळणार या उत्सुकतेपायी देखील विद्यार्थी वाढले असावेत. विद्यार्थी बहुतेक मुलीच असायच्या, चिवचिवाट करणाऱ्या ! सर्वप्रथम 'सा रे ग म प ध नी सा' वगैरे अलंकार आणि त्याचे प्रकार झाले की मग हमखास आई शिकवायची ती 'सरगम' भूप रागाची ! हा राग कल्याण थाटातून निघतो. त्याचे वादी-संवादी, आरोह-अवरोह व पकड शिकवली जाई ! 'सासाधप गरेसारेग पगधपग' ही सरगम माझी खूप लहानपणीच दुप्पटीसह पाठ झाली होती. याचे लक्षणगीत, आलापगीत म्हणजे 'मुरली अधर धर श्याम' ! यांनंतर हळूहळू पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण होई. हं, हे सांगायचेच राहिले की आम्ही हे विद्यार्थी पूर्वीपासूनच जळगांवी माझ्या आईंच्या गुरूंकडे, कै. गोविंदराव कुलकर्णी' यांच्याकडे 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या' परिक्षेला बसवत असू ! बऱ्याच वर्षांनी आम्ही मग स्वतंत्र केंद्र केलं ! बहुतेक सन १९८१ साली ! आमच्या केंद्राच्या 'संगीत विद्यालय, रावेर' याच्या पहिल्या परिक्षक कदाचित जळगांवच्या सुवर्णा दातार असाव्यात ! त्यावेळच्या विद्यार्थिनींना आता नातवंडं झाली असावीत ! अधूनमधून कधीतरी आईची म्हणजे त्यांच्या काकूंची आठवण काढतात.
आजचे जरा जास्तच लिहीले जातंय असं वाटते कारण अजून अपूर्ण आहे. आज लिहीण्याचा गृहखात्याचा आदेश होता तो संगीतातील रागावर लिहीण्याचा ! कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर गृहखाते नाराज अजिबातच नको. आपण हे वाचा, थोडी कळ काढा ! लिहीतोय लगेच रागावर !

दिनांक २४ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment