Wednesday, October 18, 2017

किर्तनकार - मुकीमबुवा रावेरकर


किर्तनकार - मुकीमबुवा  रावेरकर

आज कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी !

दोन एकादशीमध्ये आपण मानतो, तो हा चातुर्मास सांभाळला जातो, आषाढी एकादशी म्हणजे ‘देवशयनी एकादशी’ ते कार्तिकी एकादशी म्हणजे ‘प्रबोधिनी एकादशी’ ! देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात. आपल्याला सोयीच्या असलेल्या कल्पना आपण प्रसृत करतो, मानतो व पाळतो. देवाला कसली आहे, झोप व जाग ! तो कायम जागा असतो, तुमच्या आमच्यासाठी ! पण आपण ‘प्रबोधिनी एकादशीला’ देव जागृत होतात हे मानतो, हे मात्र खरे !

अजून याची आवर्जून आठवण यायची दोन कारणे - एक म्हणजे या दिवशी जळगांवचा रथ असतो. प्रभू रामचंद्रांचा रथोत्सव असतो. जुन्या जळगांव मधील पुरातन मंदीर आहे, रामरायाचे ! त्यानिमीत्त हा वहने निघतात उत्सवा निमित्ताने व कार्तिकी एकादशीला रथ निघतो.

दुसरे म्हणजे - या दरम्यान तिथं तीन दिवस आमच्या गांवचे प्रसिद्ध किर्तनकार कै. सुधाकरराव मुकीमबुवा रावेरकर यांचे सलग तीन दिवस म्हणजे, नवमी ते एकादशी असे किर्तन व्हायचे. कार्तिकी एकादशीचे दिवशी शेवटचे किर्तन !

आज कार्तिक एकादशी म्हणून आठवले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

शाळेची सहामाही परिक्षा झाली की लगेच सुटी लागायची दिवाळीची ! त्या वेळी सहामाहीचे पेपर पाठोपाठ होत. साधारण आठवडाभर परिक्षा असे, यापेक्षा जास्त काळ अपवादानेच असेल. काही वेळा तर वेळेत परिक्षा संपावी म्हणून असेल पण एका दिवसांत दोन पेपर असत. पुढे दिवाळीची साधारणपणे तीन आठवडे सुटी दिसत असल्याने त्या एका दिवसांत दोन पेपर दिल्याचे पण आम्हाला काही वाटत नसे.
घरी आलो शेवटचा पेपर देवून, की घरी पत्र आले असायचेच, आजोळहून ! आई सांगायची ‘दिवाळीसाठी बोलावलंय आजोबांनी ! जाणार आहे का ?’ या प्रश्नाला काही विशेष अर्थ नसायचा. कारण कसे जायचे, हा प्रश्न असायचा. ‘जायचे का नाही’ हा प्रश्नच नव्हता. आई बहुतेक पाडवा झाल्यावर यायची पण आम्हाला गांवाला जायला मिळणार याचेच अप्रूप ! त्यावेळी आजच्या सारख्या महामंडळाने रावेर-जळगांव अशा भरपूर बसेस पण सुरू केल्या नव्हता. जळगांवी जाणारी विश्वासाची सोबत मिळाली तर त्याचे बरोबर पण मी जायला तयार असायचो.
जळगांवी पोचल्यावर मामा आणि मावशी यांना आनंद वाटायचा. जास्त आनंद होत असावा आजोबांना ! त्यांचे आजीला उद्देशून मामा-मावशींना नक्की वाक्य असायचे. ‘तिची नातवंडं आली आहेत आज, आता तुझी आई आपल्याकडे काही पहाणार नाही.’ यांवर आजी काही बोलत नसे, नुसती हसे. दुपारच्या वेळी मग फराळाचे पदार्थ तयार करण्याचे काम ! चिवडा बहुतेक सर्वात पहिले होई. मग चकल्या, करंज्या ! शेव, कडबोळी वगैरे धनत्रयोदशीला ! लाडू, अनारसे हे लक्ष्मीपूजनाचे दिवशी होत. पाडव्याचे दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी आई येई जळगांवला ! मग ती आणत असे काही, ताई म्हणून तिच्या भावांना !
रोज अकरा वाजता मुंबई आकाशवाणी केंद्राची ‘कामगार सभा’ कामगारांसाठी कार्यक्रम सुरू होई. शेजारी रेडिओ होता, तो सर्वांना गाणी ऐकता यावी या आवाजात लावला जाई. त्यांनी तसा लावला नाही तर त्यांचेकडे जाऊन ऐकणे किंवा जाऊन आवाज मोठा करून येणे ! यांत ना कोणाला कमीपणा वाटे, ना कोणाचा अहंभाव सुखावे ! सर्वांनाच हे सर्वसाधारण वागणे वाटे. सर्वांना रेडिओ घेणे त्यावेळी परवडत नव्हते का तशी मानसिकता होती, कोण जाणे ? पण गाणी सुंदर लागत त्या कार्यक्रमात ! गुरूवारची आर. एन्. पराडकरांची गाणी ! आजही त्यांची गाणी लागली की मला दिवाळीची सुटी व जळगांव आठवते.
माझे दुपारचे काम ठरलेले ! विविध स्त्रोत्रे आजोबांकडून शिकणे. सुरूवात भगवद्गीतेने झाली. ते एक त्यावेळी कंटाळवाणे वाटणारे काम असे. पण जरा ते काम आटोपले की नुकतेच केलेले फराळाचे खाता येई. चिवडा कितीही खाल्ला तरी त्या वेळी पोट का भरत नसे, हे मला आज पण समजले नाही. आता मात्र लगेच पोट भरते, असे का ? हे पण गूढ उकलत नाही. तेथील पाडवा, भाऊबीज झाली की आई बहुतेक निघून जाई. आम्ही थांबत असू तेथेच !
तेथे कार्तिक शुद्ध ११ ला रथ यात्रा असते. उत्सव असतो तेथे मोठा ! ते एक महत्वाचे होते. नवमी, दशमी व एकादशी अशी तीन दिवस तेथे आमच्या गांवचे, पण त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले किर्तनकार मुकीमबुवा यांचे किर्तन असायचे. मुकीमबुवा म्हणजे रावेर येथील कै. सुधाकर देवराव मुकीम ! यांची किर्तनातील किर्ती म्हणजे, आमच्या भागांत कोणी जर नुसता टकमक पहात ऐकत असला, की त्याला जाणीव करून देऊन ‘हे काय मुकीमबुवांचे किर्तन चालले आहे का ?’ असे सांगून कामांची आठवण करून दिली जाई. नंतर यांना या कामांची जाणीव ठेवून महाराष्ट्र सरकारतर्फे ‘किर्तनकार पुरस्कार’ देखील मिळाला. बहुतेक बाबामहाराज सातारकर यांच्यासोबत ! या किर्तनाच्या निमित्ताने ते महिनोमहिने बाहेरच असायचे. सध्या ते आपल्यांत नाही.
तर त्यांचे उत्सवा दरम्यान किर्तन व्हायचे ते नवी पेठेत ! बहुतेक तेथील प्रसिद्ध व्यापारी जोशी बंधू ठेवायचे किर्तन ! किर्तन अप्रतिम करायचे मुकीमबुवा ! सलग पंचवीस वर्षे किर्तन केले त्यांनी जळगांव येथे कार्तिक एकादशीच्या उत्सवात ! गर्दी किर्तनाला अफाट, त्या राजकोटीया यांच्या दुकानापासून ते थेट मद्रास बेकरीपर्यंत असायची ! त्या वेळी मला किर्तनातील त्यांचा पूर्वार्ध आवडत नसे तर उत्तरार्धातील गोष्ट आवडे. मी किर्तनाला गोष्ट ऐकता येते त्यासाठी जात असे. मात्र आजोबा म्हणायचे ‘पूर्वार्ध कसा सांगतात, यांवर किर्तनकार कसा आहे हे ठरते.’ हे मोठ्या माणसांचे तिरपागडे नियम मला काही त्या वेळी समजत नसत. पण त्यांनी, ‘आम्ही जाणो हरिचे पाय’ हे सुरूवातीचे त्यांच्या पूर्वजांचे म्हणजे ‘अमृतराय मुकीम’ यांचे पद सुरू केले की श्रोते सावरून बसायचे. पूर्वार्धात विवरणाला एखादे पद वा अभंग घ्यायचे आणि अगदी छान, विविध दृष्टांत देत सांगायचे. ‘मुकीमबुवांचे किर्तन, म्हणजे काही पहाणेच नाही.’ शेजारचे एक आजोबा माझ्या आजोबांना सांगत. ही बैठक असे थेट पूर्वार्ध संपेपावेतो !
मग उत्तरार्ध सुरू व्हायचा. मी आणि माझ्यासारखी तेथे आलेली नातवंडमंडळी मग सावरून बसायचे. एक जण तबक व त्यात हार बुक्का घेऊन यायचा. मुकीमबुवा हे गळ्यातील उपरणं मग कमरेभोवती गुंडाळायचे. तो तबक घेऊन आलेला उभा असायचा. तबक पेटीवाल्याच्या टेबलावर ठेवायचा आणि बुवांच्या गळ्यात हार घालायचा, कपाळाला बुक्का लावायचा. बुवा मग त्याच तबकातील चिमूटभर बुक्का घ्यायचे, श्रोत्यांमधे आसपास लावल्यासारखा उधळायचे, त्या तबक घेऊन येणाऱ्याला लावायचे. तो मग खाली उतरून सर्व श्रोत्यांना बुक्का लावायला सुरूवात करायचा.
मग बुवासाहेब सांगायचे ‘पूर्वार्धातील अभंगासाठी दृष्टांत म्हणून एक कथा सांगतो. त्यानंतर आम्ही सर्व बालगोपाळ रमून जायचो. कथा एखादे वेळी मंगळवेढ्याच्या संत दामाजीपंतांची लावली जायची. बादशहाचा अधिकारी, त्या वर्षीचा दुष्काळ आणि लोकांची अवस्था ! काही वेळा त्या दुष्काळाचे मंगळवेढ्याचे वर्णन ऐकून डोळ्यांत पाणी यायचे. संत मनाचे हे दामाजीपंत, त्यांच्या जीवाची होणारी तडफड, त्याची मुकीमबुवांची उदाहरणे आणि शेवटी जनतेला धान्यवाटप त्या बादशहाच्या गोदामातून !
दामाजीपंतांनी सर्व गांवाला बादशहाच्या गोदामातील त्यांना सांभाळायला दिलेले सर्व धान्य दुष्काळामुळे वाटून दिल्याने बरे वाटायचे. पण एकंदरीत बादशहाची आमच्या समोरची प्रतिमा पाहून दामाजीपंतांची खूप काळजी पण वाटायची. आमचा आवडता प्रसंग मग सुरू व्हायचा तो की इकडे दामाजीपंत पांडुरंगाची पूजा करताहेत, त्याला सांगताहेत ‘मला हे सांगायला उद्या बादशहाकडे जावे लागेल. याची काय शिक्षा मिळेल ते मला माहिती आहे. उद्यापासून तुझ्या पूजेला मी नसणार.’ आमच्या डोळे वहात असायचे.
त्याचवेळी हा पंढरीचा पांडुरंग दामाजीपंतांनी गांवासाठी दिलेल्या धान्याचा मोबदला, बादशहाला महाराच्या वेषात जाऊन सोन्याच्या नाण्यांच्या रूपात मोजत असायचा. थैलीतून नाणी पडताहेत आणि बादशहाची माणसं मोजताहेत. नाणी पडताहेत आणि माणसं मोजताहेत. मोजलेले नाण्यांचे वेगळे ढीग पुन्हा सारख्या पडतच असलेल्या थैलीच्या नाण्यांत मिसळून जातात. नाणे पडताहेत आणि माणसं मोजताहेत. हाती काहीच लागत नाही. शेवटी बादशहाचाच मोजणारा माणूस म्हणतो - जहापन्हा, ज्यादा भेज दिये । अपना अनाज कम था । आम्ही ही होत असलेली फजिती पाहून हसतोय. मोठमोठयाने ! प्रत्यक्ष पांडुरंग भक्तासाठी काय करणार नाही. तो पावती मागतो, धान्याचे पैसे मिळाल्याची बादशहाला ! बादशहा पावती देतो.
दुसऱ्या दिवशी दामाजीपंत उठतात. आता पांडुरंगाची आपल्या आयुष्यातली शेवटची पूजा करावी म्हणून देवघरात देवासमोर पाट मांडतात. तो तेथील पोथीवरील कागद पाहून उचलतात ! बादशहाच्या शिक्क्याचा कागद ! मजकूर वाचतात आणि काही न बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू होतात. त्यांना एवढेच बोलता येते, ‘आयुष्यभर भक्ती करतोय तुझी आणि तू माझा नोकर बनून दुसरीकडे जातोय. कोणत्या जन्माचे हे पाप आहे का पुण्य आहे ते पण मला समजत नाही.’
शेवटी मुकीमबुवा म्हणायचे, ‘आता जर तुम्ही दामाजीपंतांना विचारले की दुष्काळ केव्हा होता, तुम्ही धान्य कसे वाटले, बादशहाला पैसे कोणी दिले, त्याची पावती तुम्हाला कशी मिळाली, पुढे काय झालं ? तर ते एकच सांगतील आम्ही ते काही जाणत नाही, आम्हाला ते काही आठवत नाही. आम्हाला आठवते ते एकच - आम्ही जाणो हरिचे पाय !’ मग त्यांचा सुरूवातीचा अभंगाची एक ओळ भैरवीत मुकीमबुवा म्हणायचे आणि समस्त श्रोतृवृंदाला जमिनीवर हात टेकवून नमस्कार करत ‘हेचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा । तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा ।।’ म्हणत तबलापेटी वाद्यांवर हात ठेवत त्यांना थांबवायचे आणि आरती सुरू व्हायची. मी मनाने मंगळवेढ्यात दामाजीपंतांकडे तर शरीराने मुकीमबुवांना नमस्कार करण्यासाठी जात असायचो.

दिनांक - १५. १०. २०१७

No comments:

Post a Comment