Tuesday, October 3, 2017

कै. सीताराम भाऊ वाणी !

कै. सीताराम भाऊ वाणी ! 

आता कै. लिहावं लागणार आहे, सीताराम भाऊंच्या मागे ! आज समजले, सीताराम भाऊ आपल्यातून दि. १३.९.२०१७ रोजी निघून गेले.
जगात जो जन्माला आला आहे तो एकदा हे जग सोडून जाणारच, यांत शंका नाही. मात्र रावेरची ही जी वडीलघारी मंडळी होती की ज्यांचा रावेरला आदर वाटे, धाक वाटे आणि दरारा वाटे. त्यांत कै. विश्वनाथ भाऊ बोचरे, कै. जनूभाऊ नाईक आणि आता कै. सीताराम भाऊ वाणी ! ही मंडळी सर्व रावेर गांवाची भाऊ होती म्हणून मी भाऊ म्हणतो ! बाकी वयाने खूप मोठी ! ही सर्व स्वातंत्र्य सैनिक !
कै. विश्वनाथ भाऊ बोचरे हे स्वातंत्र्यसैनिक ज्यांचा रावेर नगरपालिकेतील सत्कार मला थोडा आठवतो. त्यांच्या पत्नी, कै. गंगाआजींनी मला लहानपणी खूप सांभाळल्याचे माझी आई सांगते. नंतर ते रावेर सोडून मुलाकडे जबलपूरला गेले. त्या नंतर मुलगा व सून त्यांना रावेरला घरी घेऊन आले होते. रावेरमधे आयुष्य गेलेल्या या माणसाने आपले पेन्शन घेण्यासाठी का होईना पण रावेरला यायला मिळेल म्हणून रावेरला पेन्शन ठेवले होते.
कै. जनूभाऊ उर्फ जनार्दन रामचंद्र नाईक हे व्यवसायाने वैद्य ! लहानपणापासून यांच्याकडे, यांच्या मंदीरात जाणे येणे. वयोमानाने त्यांनी रावेर सोडले व वरणगांवला मुलाकडे गेले. कधी बातमी मुलांकडून समजली तर समजायची !
आणि आता कै. सीताराम भाऊ वाणी ! त्यांच्या घराचा ओटा हे जनतेसाठी सार्वजनिक ठिकाण होते, वर्तमानपत्र वाचण्याचे ! कोणाला कधी नकार नाही का त्याची तक्रार नाही ! असंख्य वेळा माझे वडील, काका आणि अगदी माझ्याशी यांच्या त्यांच्याशी गप्पा होत. रावेरहून पुण्याला पुतण्यांकडे जायला बरीच वर्षे झालीत. विचारसरणी भिन्न असणे पण त्यात प्रामाणिकपणा असणारी माणसे राहिली नाहीत फार ! त्यातील ही एक कडी गेली.
पिढ्यांपासून संबंध असणारी ही अशी माणसे निघून जातात कायमची पण आपल्यावर ओझं ठेवून जातात जुन्या संबंधांचे, ते पुढील पिढीवर, त्यांनी पाळावे म्हणून !

दिनांक १४ संप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment