Tuesday, October 3, 2017

लहानपण दे गा देवा !

लहानपण दे गा देवा !
शेजारची 'यु के. जी.' तील सध्या एकसारखी टणटण बोलणारी मुलगी ! हं, ती 'एल्. के. जी.' तील नाही ! तिला 'एल्. के. जी.' तील म्हटले की राग येतो. आज आली होती, रोजच येते वेळी अवेळी ! बोलत बसते काहीही ! तिला अगदी बोलता देखील येत नव्हते तेव्हापासून माझ्याशी व विशेषत: हिच्याशी ती तिच्या भाषेत बोलत आली आहे. ती मागच्या जन्मीची आमची किंवा आम्ही तिचे कोणीतरी आहोत, हा सर्व शेजाऱ्यांचा सुरूवातीचा समज व आता असलेला विश्वास आहे.
आमच्या घरी कोणीही लहान मुले नसून, लहान मुलांना खेळण्यासारखी कसलीही साधने नसल्यावरही संपूर्ण बिल्डींगमधील लहान मुले आमच्याकडे येऊन तासनतास काय करतात, हा तर शेजारीपाजारी बिल्डींगमधे पडलेला प्रश्न आहे. कधी नव्हे ती त्या मुलांची आई आली तर, कुठले खाऊ कोणत्या डब्यात आहे, हे त्यांची मुले त्यांच्या आयांना न विचारतां सांगतात. एखादे वेळी पक्षकार आले तर जरा दार उघडतां येणारी किंवा येणारा न सांगता दार उघडतो.
आज विषय निघाला तो नवरात्रीचा ! नवरात्र कसे, देवीचा फुलोरा कसा, पापड्या कशा कराव्या लागतात, देवीच्यावर कसा फुलोरा बांधावा लागतो, नऊ दिवस दिवा कसा तेवत असतो, पुरणपोळीचा नैवेद्य कसा हे सांगत होतो. मग सांगीतले, 'आमच्याकडे दोन देव पाहुणे आले आहे ग ! कायमचे !' मी म्हणालो.
आमच्या देशावर पाहुण्यारावळ्यांची कमतरता नाही. हे पाहुणे कायमचे आले त्याबद्दल अजिबात त्रास नाही किंवा वाईट वाटत नाही. आम्हा भोकरीकरांचे भाग्य की प्रत्यक्ष तुळजापूरची भवानी आणि प्रत्यक्ष तिरुपतीचे बालाजी आमच्याकडे पाहुणचारासाठी आले ! कायमचे रहिवासी झाले !
मी हे म्हणालो. माणसं पाहुणे येतात ही माहिती तिला होती, देव पाहुणे येतात; ही माहिती तिला नवीन होती. 'काय सांगू ? तुळजापूरची देवी आणि तिरुपतीचे बालाजी पाहुणे आहेत !' मी सांगितले. 'बरं, पाहुणे आल्यावर चहापाणी करावेच लागते काका.' ती ठमकाई सांगत होती. 'अग, पण देव जर पाहुणे आले तर त्यांना चहा चालेल का ?' माझा प्रश्न ! तिने पण आजपावेतो देवाला चहा दिलेला पाहिला नसल्याने, 'खरंय काका ! चहा चालणार नाही हो त्यांना !' ठमकाई बोलत होती.
'काका, पण त्या पाहुण्यांना काय द्यायचे मग ?' त्या बालबुद्धीला पडलेला प्रश्न ! 'अग, अंबाबाईला व बालाजीला पुरळपोळीचा नैवेद्य लागतो !' मी म्हणालो, 'भजे लागतात, पापड-कुर्डया लागतात !' यांवर 'हे चांगले आहे काका, पाहुणे आलेले चांगलंच आहे मग ! आमच्याकडेही पाठवा हो ! बाळापूरला ! चांगला झोका पण आहे, वरच्या मजल्यावर !' ती ठमकाई तिच्या बाळापूरच्या, नांदेड जिल्ह्यातील घराचे कौतुक सांगत होती. 'पण आमचे पाहुणे आहे तर मला पण रहावे लागेल त्यांच्यासोबत ! पण मी कोर्टात कसा येऊ रोज ?' माझा प्रश्न ! 'काही लांब नाही काका ! बाळापूर व औरंगाबाद ! येता येईल रोज तुम्हाला !' तिचे उत्तर !
'पण मग मी इकडे कोर्टात औरंगाबादला आल्यावर इतका वेळ ते बाळापूरला एकटे कसे रहातील ?' मी म्हणालो. 'खरंय काका, एकट्याला भिती वाटते काका ! त्यांना पण भिती वाटेल ! तुम्ही मग तिथेच थांबा त्यांच्याजवळ ! मग नाही भिती वाटणार त्यांना ! कोर्टात तुमच्या साहेबांना सांगून द्या फक्त !' ती ठमकाई बोलत होती.
प्रत्यक्ष तुळजापूरच्या भवानीला व तिरूपतीच्या बालाजीला ते एकट्याने राहीले तर भिती वाटेल ही काळजी घेणारा जीव ! आहे का, तुमच्या आमच्या जवळ एवढे तादात्म्य, एकरूपता !

दिनांक २३ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment