Monday, October 16, 2017

आणि त्याने कपाळाला लावला हात ---

आणि त्याने कपाळाला लावला हात ---

जसा जन्म होतो, तसा शाळेत प्रवेश घ्यावाच लागतो तो 'जीवनाच्या शाळेत' आणि शिकावेच लागते प्रत्येकाला अनुभव घेत घेत ! तुमची इच्छा असो व नसो ! या शाळेत मग काही अनुभवाने शहाणे होतात, तर काही आयुष्यभर शिकल्यावर देखील शहाणे होताच नाही. प्रत्येकाच्या क्षेत्रातील अनुभव हे त्याचे स्वतःचे आणि त्याच्या व्यवसायातूनच मिळतील, असे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव असतात ! माझा व्यवसाय हा 'वकिलीचा' ! यांतील अनुभवाचे भाग म्हणजे - पहिले म्हणजे ज्यांना कोणीतरी फसविले ती मंडळी, दुसरे म्हणजे जे अगदी व्यवस्थीत व योजनाबद्ध पद्धतीने दुसऱ्याला फसवतात ती मंडळी आणि तिसरे म्हणजे कोणताही संबंध नसतांना जे संकटात सापडतात ती मंडळी ! पण, एक मात्र गंमत असते, यातील प्रत्येकाला या संकटातून सुटका, अगदी कायदेशीर सुटका हवीच असते. मग न्यायालयाशिवाय दुसरा मार्ग नाही, जो सर्वसंमत आहे. बस, या निमित्ताने असेच काही आलेले अनुभव आणि घडलेल्या घटना आपल्याला गप्पा मारत, सांगाव्यात असे मनांत आले. बघू या, आपल्याला आवडतात का आणि आपणांस यातून काही शिकता येते का ? 

साधारणतः फेब्रुवारी १९९८ मधील घटना असावी. सातपुड्याच्या पायथ्याच्या गांवातील महाराष्ट्रातील एक कुटुंब ! हिंदू कायदा लागू असलेले ! सर्वसाधारण गरीबच म्हणता येईल, पण शेतीबाडी बाळगून असलेले ! दिवसेंदिवस कुटुंब वाढणार आणि मिळणारे उत्पन्न त्या मानाने नाही, हे ठरलेले ! शेवटी कुटुंबाची एक शाखा १९३०-३२ चे सुमारास मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या गावी पोटापाण्याच्या उद्योगाला गेली. कुटुंबात खाणारी माणसे कमी झाली. गाव वा घर सोडतांना सोनेनाणे, पैसाअडका, भांडीकुंडी नेता येतात, काही वेळा पोटापुरते का होईना पण काही दिवसाचे धान्य नेता येते. पण कुटुंबाची स्थावर मिळकत म्हणजे घरदार, शेतीबाडी कशी नेणार ? ती तेथेच रहाते, तेथे राहणाऱ्या मंडळींसाठी ! हे सर्व माहित असणारी पिढी जोपर्यंत जिवंत असते, तो पावेतो त्यातील सदस्यांना वाटते, 'घर सोडून गेलेल्यांच्या पण यांत हिस्सा आहे, हक्क आहे. अधूनमधून ते तसे बोलतात पण, आणि त्यांच्या वागण्यातूनही ते जाणवते. तो पावेतो ठीक असते असे समजावे लागते. काळपरत्वे माणसे जग सोडून जातात आणि कारभार पुढच्या पिढीच्या हातांत येतो. घर सोडून गेलेल्याबद्दल काही कृतज्ञता असेल किंवा मागील पिढीने काही सांगितले असेल आणि ही पुढील पिढी त्याचा मान ठेवणारी असेल, तरी पण ठीक असते. मात्र कालांतराने ही पिढीपण निघून जाते. नातेसंबंध विरळ होत जातात आणि स्वार्थाची वीण घट्ट होत जाते. जे काही आहे ते सर्व आपलेच आहे, यांत कोणाचाही कसलाही संबंध नाही असे ते सुरुवातीला दबक्या आवाजात आणि नंतर खुल्या, मोठ्या आवाजात सांगू लागतात ! कालांतराने ते आपल्याच मनाला समजावतात की 'हे आता सर्व आपलेच आहे, कोणाचाही कसलाही संबंध नाही'. गंमत म्हणजे त्यांचाही हळूहळू हाच समज होत जातो. याला 'वरवर कायदेशीर' स्वरूप देण्याचे काम करतो ते, ब्रह्मदेवसुद्धा जे कोणाच्या ललाटी लिहू शकत नाही ते लिहीणारा 'सरकारी नोकर तलाठी' ! आपल्या सर्वांच्या परिचयाचा ! गांव सोडून गेलेल्या मंडळींची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नांवे ७/१२ चे उताऱ्यावरून गुप्त करणे हे त्याच्या दृष्टीने काही विशेष नसते. एक दिवस गाव सोडून गेलेल्या पिढीतील सर्वांची नांवे ७/१२ च्या उताऱ्यावरून पूर्णपणे अदृश्य होतात आणि ही मिळकत सरकारदप्तरी फक्त यांचीच दिसायला लागते. १९३०-३२ मध्ये ओंकारेश्वरला गेल्या पिढीचे, त्यांच्या वारसांची नांवे १९९७-९८ पावेतो पूर्णपणे गुप्त, नाहीशी झालेली होती. त्या शेतीशी असलेला त्या कुटुंबाच्या शाखेचा ७/१२ च्या उताऱ्यातून दिसणारा संबंध संपला, संपवला गेला, तसे दाखवले गेले.

दरम्यानच्या काळांत त्यांनी उताऱ्यावरील असलेल्या किती मिळकती एकट्याने, एकट्याच्याच समजून विकल्या, त्याची कल्पना त्या ओंकारेश्वरच्या शाखेला दिली किंवा नाही हे त्या 'ओंकारेश्वरच्या ममलेश्वरालाच' माहीत ! हा विषय आजचा नाही. शेवटची शेती राहीली होती विकायची, व्यवहार ठरला. त्या अगोदर ७/१२ चे शेतीचे उतारे घेणाऱ्याने बघीतले. बऱ्याच वर्षांचे जुने उतारे वरवर बघीतले तरी त्यांत शंका येण्यासारखे काही दिसत नव्हते, कारण गेल्या कित्येक वर्षांत त्या गावांत हे एकटेच कुटुंब राहत होते, हे एवढेच कुटुंब आहे, असा समज होण्यासाठी पुरेसे होते. अशी कोणास ठाऊक, पण ही बातमी ओंकारेश्वराला त्या कुटुंबातील सर्वात वृद्ध माणसाला समजली. 'येथे आपली वडिलोपार्जित शेती आहे. ती आपण विकलेली नाही', हे त्याला माहीत होते. त्याने हे मुलाला सांगीतले. मुलगा पत्रकार होता, तो त्याच्या शेतीच्या तालुकाच्या गांवाला आला. 

तहसीलदार कार्यालय आणि तालुका कोर्ट एकाच आवारांत होती. तेथील माहिती मिळण्याच्या दृष्टीने भरवशाचा म्हणजे 'स्टॅम्प व्हेंडर' ! त्याचे जवळ कोणता माणूस कसा, कोणता वकील कसा आणि कोणता साहेब कसा वगैरे सर्व अनधिकृत माहीती अधिकृतपणे असते. त्या पत्रकार मुलाने त्याला ही सगळी कथा सांगीतली. त्याने तर ऐकून कपाळाला हातच लावला. इतके दुर्लक्ष्य, दिरंगाई आणि आळशीपणा त्याने देखील अद्यापपावेतो पाहीला नव्हता. शेवटी 'एक वकील आहेत, हिंदू कायद्यातील किडा म्हणतात त्यांना ! पण ते कागदपत्रासाठीच  फिरवतात, माणूस कंटाळून जातो. कामाचा नाद सोडतो नाहीतर त्या वकीलाला सोडतो. पण त्याने जर कागद हातात घेतले तर समजावे काही तरी तथ्य आहे.' स्टॅम्प व्हेंडर म्हणाला. 'भरपूर वर्षे झालेली असल्याने तुमचे सर्वच मुदतीबाहेर गेलेले आहे, काहीही अर्थ नाही.' हे सांगणारे बहुतेक होतेच. यावर 'शेती कायमची जाण्यापेक्षा, कागदपत्र काढून काय आहे नेमके ते तरी पाहिलेले बरे' हा विचार त्याने केला आणि त्यांच्याकडे जातो म्हणून सांगीतले. 'नुसता जाऊ नको तर सर्व कागद घेऊन जा, म्हणजे उत्तर लगेच मिळेल,' असे त्या पत्रकाराला व्हेंडरने सांगितले आणि त्यांनी गांव सोडल्यापासून म्हणजे १९३०-३२ पासून ते आजपर्यंतचे ७/१२ चे उतारे आणि हक्कपत्रकाच्या नोंदी काढण्यास सांगीतल्या. हे ऐकल्यावर मात्र त्या पत्रकाराला 'शोध पत्रकारिता' ही संकल्पना आठवली. फेऱ्या मारून त्याने सर्व कागद काढले. 

माझा कारकून श्री. पंढरीनाथ श्रावक याला मला भेटण्याबद्दल विचारले, 'बाररूममध्ये आहे. भेटा पण कागदपत्र आणलेत का ? नाहीतर पुन्हा यावे लागेल. ते सांगतील काय आणायचे ते.' त्याने विचारले. 'हो, आणलीत,' पत्रकार म्हणाला. मला भेटला, मी कागद ठेवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी ऑफीसला येण्यास सांगीतले. सकाळी पत्रकार आल्यावर, काय शंका विचारावयाचे होत्या त्या विचारल्या आणि समाधान झाल्यावर, 'दोन दावे करावे लागतील वेगवेगळे. दुसरा थोडा नंतर केला तरी चालेल.' हे सांगीतले. फी ठरली, अपेक्षेपेक्षा जास्त देण्यास तयार झाला. बरं वाटलं. ज्याच्याशी शेती विकण्याचा व्यवहार केला आणि ज्याने केला त्याचे विरुद्ध पत्रकाराच्या वडीलांचे नावाने मनाईहुकूमाचा दावा केला. त्यांत भरपूर जुनी माहीती लिहिली आणि वाटणी संबंधाने दुसरा दावा संपूर्ण माहिती मिळाल्यावर दाखल करावयाचा आहे, हे पण लिहीले. तात्पुरता मनाईहुकूम त्यांत मागितला. समन्स निघाले, सर्व हजर झाले, चांगले जुने-जाणकार वकील लावून. पण खुलासा कोणी देईना. 

दोन आठवड्यानंतर मला सामनेवाल्याकडून निरोप आला. दरम्यानच्या काळांत दाव्यातील माहितीला संयुक्तिक काय उत्तर देता येईल हे त्याच्या वकीलाला त्याने विचारले. 'यातील माहीती जर खरी असेल तर आपसांत करणे योग्य राहील' हे त्यांनी सांगीतले. 'मी माहीती काढली आहे, सर्व खरे आहे. त्याचे उत्तर ! 'आपल्याला फक्त मुदतीचा आधार घेता येईल. पण कठीणच आहे. त्यांचा हिस्सा आहे हे सध्या तरी दिसत आहे.' हे त्याच्या वकिलांचे उत्तर ! शेवटी मला त्यांचेकडून विचारले गेले की 'आपसात काही करता येईल का?' मी हा निरोप पक्षकाराला दिला, त्याला आश्चर्याचा धक्का ! त्याने त्याच्या वडीलांना सांगीतले, त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. 'गावातील शेतातून साठ-सत्तर वर्षांत पहिल्यांदाच पैसे मिळणार!' तो म्हातारा माणूस ऑफिसवर गाडी करून ओंकारेश्वरहून आला. 'शेवटचे येथे येणे आहे. ते जर मला या शेताचे पैसे देत असतील तर आपल्याला काही अडवायचे नाही, अगोदरची शेती काय होती आणि काय नाही यांत आता मला जायचे नाही, जे काही गेले असतील तर शंकराला दिले!' जवळपास ऐंशी-पंच्यांशी वर्षाचा म्हातारा बोलत होता. दुपारी बैठक झाली, कोर्टातच !

शेत खरेदी करणाऱ्याने सर्व पैसे आणले होते. खरेदीखत व्हेंडरने लिहीले. त्यावर या म्हाताऱ्याने मालक म्हणून स्वाक्षरी केली. म्हाताऱ्याच्या डोळ्यांत पाणी होते. 'शेताचे पहिले आणि आता शेवटचे पैसे! ठीक आहे. जाऊ द्या, देवाला डोळे आहेत.' म्हाताऱ्याने डोळे पुसले आणि स्वाक्षरी केली. पत्रकाराने साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. मूळ करार करणारा सामनेवाल्याने म्हाताऱ्याकडे रागाने पाहत स्वाक्षरी केली. शेताचा खरेदीचा व्यवहार झाला, १९३०-३२ सालांत गांव सोडून गेलेल्यास सन १९९८ सालांत मालक म्हणून मान्यता मिळाली. माझ्या आजोबाच्या वयाचा तो म्हातारा माणूस मला नमस्कार करण्यासाठी वाकू लागला, मी वरच्यावर उठवले. 'लेकरा, एवढेच मिळाले आजपर्यंत !' त्याच्याने पुढे बोलवेना.                

हिंदू कायद्यानुसार हिंदू कुटुंबात ज्या क्षणी व्यक्ती जन्माला आली, त्या क्षणाला तिचा त्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीत आपोआप हिस्सा निर्माण होतो. हा हिस्सा, त्या कुटुंबातील त्या नंतर होणाऱ्या जन्ममृत्युवर कमीजास्त होत असतो. जो पावेतो त्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीच्या अंतीम वाटण्या सरसनिरस मानाने होत नाहीत, तो पावेतो त्या कुटुंबातील व्यक्तीचे नांव त्या मिळकतीवर सरकार दप्तरी वा ७/१२ वर असो किंवा नसो, तिचा  हिस्सा मात्र त्या मिळकतीत असतोच असतो. तो आपोआप संपुष्टात येत नाही. सरकार दप्तरी अथवा ७/१२ चे उताऱ्यावरील नांवे याचा उपयोग हा फक्त सरकारी वसूल जर काही असला तर तो कोणाकडून वसूल करावयाचा एवढ्याचपुरता मर्यादीत असतो. दरम्यानच्या काळांत झालेल्या नोंदी आणि त्यांची कायदेशीरता महत्वाची असते. ही महत्वाची बाब बहुसंख्य समाज दृष्टीआड करत असल्याने उताऱ्यावरील नोंदीला निष्कारण अनाठायी महत्व प्राप्त झाले आहे. 

(प्रसिद्धी  लोकमत - दिनांक ८ ऑक्टोबर २०१७ आणि १५ ऑक्टोबर २०१७)   



  

No comments:

Post a Comment