Tuesday, October 24, 2017

पहिली फूलपॅंट व पहिला कोट

पहिली फूलपॅंट व पहिला कोट
ज्याला लहानपणी स्वत:ची चड्डी पण सावरता येत नाही, त्याला पण आपण मोठ्या माणसांसारखे ‘फूल पॅंट’ घालून ऐटीत फिरावेसे वाटते. ‘फूल पॅंट’ घातल्यावर ऐटदार दिसतो का हाप चड्डीच चांगली आहे ? या वादात मला शिकायचे नाही. पण हा मानवी स्वभाव आहे, आपल्याजवळ जे नाही ते आपल्याला नेहमीच हवेसे वाटते. यांत काही वेळा आपल्यापाशी असलेल्या बहुमूल्य वस्तू आपण विसरतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हा पण माणसाच्या स्वभावाचाच भाग आहे.
सातवीतील गोष्ट असेल ! मला पण वाटू लागले, आसपास पाहून, आपण फूलपॅंट शिवावी. तो पावेतो, कपडे म्हणजे काय तर बहुतांश विद्यार्थ्यांचे शाळेचेच गणवेश असायचे - खाकी हाप चड्डी आणि पांढरा सदरा ! कोणालाही परवडेल, सहजसाध्य असेल असाच गणवेश असावा. सर्व एकच आहोत ही भावना निर्माण व्हायला मदत होते. अलिकडे काही शाळांमधून असलेले गणवेश व त्यांच्या किंमती पाहिल्यावर हा विचार बदलत चालला आहे की असे वाटते.
मला फूलपॅंट हवी म्हणजे मागणार कोणाजवळ, तर वडिलांकडे ! एकदा वडिलांसोबत चिमणाराम मंदीरात गेलो होतो. कै. बाबुकाका डोखळे यांना भेटायचे होते. तेथे कै. नाना शिंपी पण आले होते. कै. नाना शिंपी म्हणजे काळसर उभट चेहरा, डोक्यावर मळकटच म्हणता येईल अशा रंगाची काळी टोपी. पांढरा पायजमा आणि पांढरा मनिला ! उंची बेताची ! नाना शिंपी हे त्या काळातील ‘कोट स्पेशालीस्ट’ होते. ‘कोट शिवावा तर नाना शिंप्यांनी !’ ही त्यांची प्रसिद्धी ! खेडेगांवात, तालुक्याला पण नियमीत कोट घालणारी मंडळी होती त्यावेळी ! त्याला गरिबी आडवी येत नसे. नाना शिंपी रहायचे कै. वसंतकाकांच्या समोरच ! कै. वसंताकाका वकिल होते. त्यांच्याकडे म्हणजे नाना शिंप्यांकडे तसे जाणे येणे असायचेच ! त्यांच्याकडे संतोषीमातेचे व्रत कै. लक्ष्मीकाकूंनी केल्याचे अजून आठवते. जेवायला बोलावलेल्या मुलांत मी पण होतो.
त्या वेळी कोणीही कोणाकडे न विचारतां आणि कसल्याही कामाशिवाय जावू शकत असे. लहान मुलांना तर कसलाच धरबंद नसे. ओळखीच्या सर्वांच्या घराचा उपयोग हा आमच्या सारख्यांला बालगोपाळ मंडळींना खेळण्यासाठी असतो, ही त्यावेळची आमची समजूत ! या समजूतीला धक्का लावणारी मंडळी त्या काळी कमी होती, त्यांचा जरी काही विरोधी सूर असला, तर तो बहुसंख्य मंडळी, ही आम्हाला दटावून दाबून टाकत असे. ‘अहो, पोरं खेळणार नाही तर काय आपण खेळणार आहे ? खेळू द्या त्यांना, कशाला रागवताय ?’ हे कोणीही म्हणत असे. हा विरोधी स्वर त्यांच्या घरातूनसुद्धा येई. हे त्यांना म्हटल्यावर मग आपल्याला, ‘कारे पोरांनो, काय मस्ती लावली आहे ? खेळायचं तर नीट खेळा ! मस्ती काय करताय ?’ असे म्हटले जाई. आता मस्ती आणि खेळ यांत नेमका फरक काय हे शोधण्यात आम्ही वेळ घालवत नसू व थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा खेळायला म्हणजे मस्ती करायला लागत असू.
तर चिमणाराम मंदीरात ते, नाना शिंपी, दिसल्यावर माझ्या फूलपॅंट या विषयाने पुन्हा उचल खाल्ली, ‘मग केव्हा शिवायची ?’ मी वडिलांना विचारले. ‘काय म्हणतोय पोरगा, अण्णा ?’ त्यांनी विचारले. ‘नसते मागणे, फूलपॅंट शिवायची म्हणतोय.’ वडिल उत्तरले. बहुतेक सर्वांच्या वडिलांना मुलांच्या मागण्या या अवास्तव वाटतात. ही एक प्रथाच पडलेली आहे. ‘घेऊन द्या त्याला. काय मोठंस त्यात ? तुम्ही कापड आणून द्या. मी शिवून देईन !’ नाना शिंपी बोलले. झालं, मला बरंच झालं. ‘केव्हा, जायचं आणायला कापड ?’ मी वडिलांना विचारले. हा विषय दोन-तीन दिवस चालला. शेवटी वडिलांनी, बहुतेक कंटाळूनच, मला म्हटले, ‘चल, नानाला सांगून ये. गांधी चौकात ये. कापड घ्यायचेय तुला.’ ही बातमी मी अजिबात वेळ न दवडता त्यांच्या घरी जाऊन सांगीतली. ‘काका, लवकर चला, गांधीचौकात. फूलपॅंटचे कापड घ्यायचे आहे. वडिलांनी बोलावले आहे तुम्हाला.’ मी निरोप देवून वडिलांसोबत गांधीचौकात कपड्याच्या दुकानांत गेलो. तेथे वडिलांच्या व दुकानदाराच्या गप्पा सुरू ! नाना शिंप्यांचा पत्ता नाही. ही मोठी माणसं काम सोडून इतर गप्पा का मारतात हे लहानपणचे कोडे अजून सुटत नाही, — कारण आता मी गप्पा मारत असतो, मुलांना कुठे घेऊन गेलो तर ! नाना शिंपी दुकानांत आले. दुकानदाराने कापड समोर ठेवलेलेच होते. त्यातले कापड निवडले, पॅंटला किती लागेल ते वडिलांनी त्यांना विचारले. त्यांनी सांगीतले, ‘नाना पॅंट माझ्या पोराची शिवायची आहे. आपली नाही.’ यांवर दुकानदाराला पण हसू आले. ‘अण्णा, फूलपॅंटला कापड इतकेच लागते. लहानमोठा असे काही नाही.’ इति नाना शिंपी ! शर्ट व पॅंटचे कापड घेतले. ते कापड घेऊन गेले. जातांना, ‘काका मला दसऱ्याला पॅंट घालायची आहे. लवकर द्या.’ मी सांगीतले.
शिंप्याच्या हातात गिऱ्हाईकाचे कापड आल्यावर ज्याला कपडे शिवून घ्यायचे असतात, त्याच्या कोणत्याच गोष्टीला शिंपी नकार देत नाही; मात्र त्याला जे करायचे असेल तेच करतो. हा शिंप्यांचा परंपरागत गुण अलिकडे नाहीसा होत चालला आहे, चक्क वेळेवर कपडे देतात. ही काळजीची बाब आहे. त्यांनी ज्या दिवशी कपडे शिवून तयार होतील असे सांगीतले असते, त्या दिवशी प्रत्यक्षात कापड कापलेले पण नसते. आपण कपडे घ्यायला गेल्यावर तो कापड कपाटातून किंवा आपल्या खालून काढतो आणि कात्री घेतो. अगोदर घेतलेले माप पाहून घेतो, काही वेळा पुन्हा माप घेऊन खात्री करून घेतो. कपड्यावर त्याच्याजवळच्या खडूने किंवा पेन्सीलीने त्यांवर वेड्यावाकड्या रेषा मारून ते कापड खराब केल्याची आपली खात्री करतो. मग त्या भल्यामोठ्या लाकडी टेबलावर कात्री टेकवून, तिचे एक पाते कापडाच्या खाली आणि एक वर असे ठेवून ‘कच्यॉंग कच्यॉंग, कच्यॉंग किच्च’ असे करत कापतो. फार छान वाटतो तो आवाज ! ते नव्याकोऱ्या कापडाचे हे असे सर्व तुकडे केलेले पाहिल्यावर आता याची पॅंट किंवा शर्ट कसा होणार, ही आपल्याला शंका असते. पण तो खरच कलाकार असतो. अगदी आपल्या मापाला बसेल असे कपडे शिवतो. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ उगीच म्हणतात का ? आपल्यासमोर कापड कापल्यावर आता आपली खात्री होते.
हे त्यांनी माझ्या फूलपॅंट बद्दलही केले. मग मी ‘काका, हे काय तुम्ही आत्ता कापले कापड, नवरात्र सुरू होईल दोन तीन दिवसांत !’
‘हॅं, रात्रीतून शिवून होईल. पण तू नवरात्राच्या पहिल्या माळेला ये.’ त्यांचे उत्तर !
मी पहिल्या माळेला गेल्यावर ते तुकडे अर्धवट शिवलेले दिसत होते, पण ‘आज होऊन जाईल. तू दोन दिवसांनी ये.’ त्यांचे उत्तर ! मी बरोबर तिसऱ्या माळेला त्यांचेकडे. ‘काका, पॅंट !’
‘काचबटन राहिले आहे. परवा ये.’ त्यांचे उत्तर ! पण बरीचशी पॅंट शिवली होती. मी बरोबर तिसऱ्या दिवशी त्यांचेकडे !
‘काका, झाली का पॅंट ?’ मी रडवेला.
‘बैस जरा. इस्त्री करतो आणि देतो. का संध्याकाळी येतो ? असं कर, उद्या घेऊन जा !’ त्यांचे उत्तर. हे असे सवालजबाब त्यांचे माझ्यासमोर येणाऱ्या इतर गिऱ्हाईकांसोबतही चालूच होते. ‘सणावाराचे काम पडून असते.’ काय करणार ?’ त्यांचे स्पष्टीकरण ! दुसऱ्या दिवशी मी पुन्हा हजर !
‘काका, सर्व नवरात्र संपत आले. पॅंट तयार नाही.’ मी रडवेला. ‘पोराला काय त्रास देताय ?’ माझा आवाज ऐकून आतून काकू !
बैस जरा, घेऊन जा !’ त्यांचे उत्तर. त्यांनी इस्री काढली. त्यांत कोळसे टाकले ते पेटवले. शेजारच्या पाण्याच्या वाटीतील पाणी कपड्यांवर शिंपडत इस्त्री केली. नविन फूलपॅंट व शर्ट माझ्या हातात होते, दसऱ्याला घालायला. ही माझी पहिली फूलपॅंट कै. नाना शिंपी यांनी शिवलेली.
मध्यंतरी बरीच वर्षे गेली. सन १९८५ सालातील गोष्ट ! मी सातवी ते एल् एल्. बी. चे शेवटचे वर्ष हा पल्ला पार केला होता. मध्यंतरी शिक्षणा निमीत्ताने बाहेरगांवी रहात असल्याने, गांवाशी संबंध कमी यायचा. पण वकिली सुरू करायची होती. एल् एल्. बी. चा रिझल्ट यायचा होता, तो आला. मी एल् एल्. बी. झालो, पहिल्या वर्गात ! नाना शिंपी आता पार थकले होते. अशीच त्या दरम्यान एकदा भेट झाली त्यांची व वडिलांची ! वडिलांनी त्यांना सांगीतले, ‘पोरगा वकिल होतोय. रिझल्ट आलाय.’ हे त्यांचे बोलणे होत नाही तर ते वडिलांना म्हणाले, ‘त्याचा वकिलीचा कोट मी शिवणार आहे. कापड पाठवून द्या.’ घरी आल्यावर हे वडिलांनी मला सांगीतले. मी काही बोललो नाही. जळगांवला असाच कामानिमीत्ताने गेलो होतो. कोटाचे काळे कापड घेतले. दुकानदार म्हणाला, ‘शेजारी टेलर आहे. शिवून देईल.’ मी एक क्षण थांबलो व सांगीतले ‘नंतर शिवायचा आहे.’ कापड घेवून मी घरी आलो.
दुसऱ्या दिवशी कापड घेऊन नाना शिंपी यांचेकडे गेलो. म्हटले ‘काका, कापड आणले आहे. कोट शिवायचा आहे. पण वेळेवर द्या. पॅंटसारखे नको.’
‘पोरा, कोणते कपडे केव्हा द्यायचे हे माहिती आहे आम्हाला ! हे कोटाचे काम आहे, कोर्टाचा कोट आहे. नविन सुरूवात आहे. वेळेवर देईन. काळजी करू नको.’ ते म्हणाले, ‘पूर्वीचे दिवस वेगळे होते. काम भरपूर होते. आता होत नाही आणि काम पण नाही. कोट घालणारे पण कमी झाले आहे. तुम्हाला पण कोट घालावाच लागतो म्हणून तुम्ही शिवताय, नाहीतर तुम्ही पण कशाला शिवला असता.’ त्यांचा स्वर बदलला. आंतमधे डोकावून बघत, ‘अग, अण्णांचा मुलगा वकील झालाय. कोट आणलाय शिवायला, आपल्याकडे.’ त्यांनी काकूंना सांगीतले. त्या बाहेर आल्या. ‘वकिल झालास. छान ! तुझ्या काकांकडून आता होत नाही रे काम पहिल्यासारखे ! पण करावे लागते ना ? जेवायला तर लागते भूक लागली की ? यांच्यासारखा कोट शिवणारे आहे तरी कोण आता ?’ ती माऊली आपली अडचणीची परिस्थिती सांगत होती, आपल्या नवऱ्याची प्रकृती व म्हातारपण सांगत होती का नवऱ्याचे कौशल्य सांगत होती ? त्यांत कोणती भावना नव्हती. म्हातारपणी नवऱ्याला विश्रांती, आराम मिळणे तर दूर पण पोटासाठी काम करावे लागते, हे खूप दु:ख असते पत्नीसाठी !
‘काका, शिलाई किती द्यायची याची ?’ मी विचारले.
‘मोठा आला आहे शिलाई द्यायला ? तू अजून वकिली सुरू करतोय ! काय घ्यायचे ते घेईल अण्णांकडून ! दोनशे काय सव्वादोनशे घेईन ! पण माझी आठवण राहील असा कोट होतो की नाही बघ.’ त्यांचे उत्तर ! त्यांच्याने पुढे बोलवेना. त्या काकाकाकूंना नमस्कार करून त्यांच्या घरून निघालो.
त्यांनी अगदी वेळेवर कोट दिला. माझा पहिला कोट ! छानच शिवला होता - ‘कोट शिवावा तो नाना शिंप्यानीच ! काही वर्षांनी तो कोट मला होईना. दुसरा शिवला. दुसरीकडे शिवावा लागला. त्यावेळी कोट शिवायला नाना शिंपी नव्हते, ते जग सोडून निघून गेले होते. माझ्या पहिल्या कोटाची आठवण मागे ठेवून !

२२ ऑक्टोबर, २०१७

No comments:

Post a Comment