Saturday, October 14, 2017

दादर - ‘शिवाजी मंदीर’

दादरच्या ‘शिवाजी मंदीर’ आणि ‘प्लाझा टॉकीज’ यांनी मला बरंच काही दिले, ते अजूनही आठवते अधूनमधून !
मला बऱ्याच वेळी कोर्टाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालय किंवा महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण येथे जावे लागे. महसूल न्यायाधिकरण त्यावेळी ‘ओल्ड सेक्रेटरिएट’ मधे होते. सध्या कुठे आहे कल्पना नाही कारण अलिकडे मुंबईला जाण्याचे तसे काम तुलनेने कमी पडते. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे सुरू झाले नव्हते. जळगांव जिल्हा पण बराच नंतर जोडला गेला, औरंगाबादच्या खंडपीठाला ! आपल्या भागातील बहुतेक कामे ही त्या त्या भागातील वकिलांकडे जात असतात. ओळख परिचय असतो माहिती असते. येथे औरंगाबादला येऊन तप उलटले.
मुंबईला जाण्यास माझ्या गांवाहून रेल्वेची चांगली सोय आहे. भरपूर गाड्या, त्या वेळी तिकीट पण सहज मिळून जायचे. रात्री घरून बसले की पहाटे मुंबई व मुंबईहून रात्री बसले की पहाटे घरी ! निवांत झोपून प्रवास व्हायचा. कोर्टाचे काम आटोपले आणि एखादा दिवस मुंबईत अजून घालवावा असे वाटले की मग तेथील मुक्कामाचे कार्यक्रम तयार व्हायचे. जेवण हे श्रीकृष्ण बोर्डिंग किंवा एक जवळच ‘दवे यांची खानावळ’ होती. रूचीपालट म्हणून एखादेच वेळी दुसरीकडे पण ती वेळ अगदी क्वचितच !
मी जिथं थांबायचो ती जागा म्हणजे ‘गोखले रोड नॉर्थ’ अमर हिंद मंडळाजवळ ! शिवाजी मंदीर जवळच ! आम्हाला सिनेमे बघायला मिळायचे पण नाटक अजिबात नाही. मी मराठी असल्याने स्वाभाविकच नाट्यवेडा आहे. नाटक जरी बघीतली नसली किंवा बघायला मिळत नसली तरी त्याची भरपाई मी आमच्या गांवच्या लायब्ररीतून नाटकाची पुस्तके आणून वाचून काढायचो. पण संगीत नाटक असेल तर मी कित्येक वेळा गरज नसतांना मुंबईचा मुक्काम वाढविला आहे. त्यामुळे वेळ जायचा व खर्च पण वाढायचा. ते पण स्वाभाविक - मराठी माणसाला धंदा व हिशोब समजत नाही.
अहो, दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे ‘संगीत सौभद्र’ आहे. नाट्य कलाकारांचा संच हा रूख्मिणीच्या भूमिकेत कै. भक्ती बर्वे, कृष्णाच्या भूमिकेत पं. शरद गोखले आणि बलरामाच्या भूमिकेत साक्षात दाजी भाटवडेकर ! इतरही तितकेच सक्षम कलाकार, पण आठवत नाही आता ! तबल्यावर साई बॅंकर होते हो ! सन १९८६-८७ च्या दरम्यान असेल ! हे सगळे सोडून गांवी न्यायालयात जावून ‘वादीने दाव्यांतील कलम ५ मधे उल्लेख केलेला मजकूर हा कबूल नसून, खोटा आहे.’ अशी कैफियत तयार करायची ! सत्वपरिक्षा म्हणजे दुसरे काय यालाच म्हणतात ! मी उत्तीर्ण आहे की नाही ते परमेश्वरालाच माहिती !
त्या दिवशीचा तो प्रयोग फारच रंगला. भक्ती बर्वे नाटकांत काम करतात हे माहिती होते पण गातात कशा ही कल्पना नव्हती. त्यांनी पदे म्हटली नाहीत. पण पं. शरद गोखले यांनी अप्रतिमच पदे म्हटली ! दाजी भाटवडेकर यांच्या स्वच्छ व स्पष्ट शब्दोच्चारातील बलराम माझ्या अजूनही लक्षात आहे.
अजून एक लक्षात राहीलेली आठवण म्हणजे - ‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि येत उष:काल हा’ ! हे पद ! काय म्हटले पहा ! मी ‘वन्स मोअर’ त्या वेळी खरे पाहिले. रूख्मिणीला घेऊन गेलेल्या कृष्णाला परत स्टेजवर यावे लागले. ते पद म्हणावे लागले. त्या वेळी पं. शरद गोखले म्हणाले, ‘देवा, आता एकदाच गाईन मात्र !’ संगीताची ताकद मोठी की रसिकांचे त्यांवरील प्रेम जास्त, हा न सुटणारा प्रश्न आहे. रेशीम गाठ भल्याभल्यांना सोडवता येत नाही. ती आपण काय सोडविणार ?
भूप व देशकार राग अप्रतिमपणे रसिकांना दाखवत, दादऱ्यातील लग्ग्यांच्या लडांवर हिंदोळे घेत, त्या कृष्ण-रूख्मिणीचा पुन्हा उष:काल झाला आणि ते विंगेत गेले.

दिनांक ८ ऑक्टोबर २०१७

https://www.youtube.com/watch?v=90m4ZDDHz88

No comments:

Post a Comment