Saturday, March 16, 2019

कठीण गणित सोपे करून शिकवणारे - दीक्षित सर !

कठीण गणित सोपे करून शिकवणारे - दीक्षित सर !
सन १९७६ साली, इयत्ता ९ मधून पास होवून, इयत्ता १० वी ला आलो. जुनी मॅट्रीक, म्हणजे ११ वी, त्यावेळी बंद होवून दोन वर्षे झाली होती. नवीन पद्धतीने व अभ्यासक्रमानुसार होणारी ‘एस् एस् सी’ ची म्हणजे ही १० ची परिक्षा ! नवीन मॅट्रीक ही पूर्वीच्या मॅट्रीकपेक्षा सोपी आहे, का कठीण आहे, यांबद्दल परस्पर विरूद्ध मते होती. काहीबाही ऐकू यायचे.
‘काय यंदापासून सर्वांना पुढे ढकलून पास करणार आहे म्हणे ! — या नव्या मॅट्रीकला ! अहो, साधी गोष्ट, ११ वी मॅट्रीक, ही १० वी मॅट्रीकच्या कशी बरोबर असेल ? ११ बरोबर १० ? कसं काय ?’ एक जुने नाॅन-मॅट्रीक !
‘वाटेल ते सांगू नका. सध्या मराठीत पण नापास होताय पोरं ! एक वेळ इंग्रजी-गणितात समजलं ! अरे, पण मराठीत !’ मॅट्रीकच्या परिक्षेचाच भयंकर धसका घेतलेले आणि इंग्रजी व गणित हे विषय नापास होण्यासाठीच मॅट्रीकच्या परिक्षेला असतात, असा समज असलेले अजून एक !
‘मराठीत नापास होणार नाही तर काय ? त्यांची भाषा ऐका ! ‘अबे काय ? तुबे काय ?’ कोण मराठीत पास करेल यांना ?’ तो पूर्वीचा नाॅन-मॅट्रीक !
‘विषय येत नाही म्हणून मॅट्रीकला इंग्रजी-गणिताची शिकवणी लावावी लागते, हे ठीक आहे; पण आता नव्या मॅट्रीकची परिक्षा द्यायची, तर मराठीची पण शिकवणी लावायची वेळ आली, म्हणजे कठीणच !’ मॅट्रीकचा धसका घेतलेला.
‘जुन्या मॅट्रीकला पण इतिहास-भूगोलात नापास होत. वाटेल ते लिहील्यावर होणारच, पण मराठीत होताय म्हणजे काहीतरीच दिसतंय ! पेपर तपासत नसतील ! नुसते — ! बस !’ हाताने पैसे घेण्याची खूण करीत, तो नाॅन-मॅट्रीक !
या अशा गोंधळाच्या, दमट वातावरणांत, मी या नवीन मॅट्रीकला आलो. नवीन मॅट्रीकला असलेली, माझी तिसरी बॅच ! पूर्वीच्या दोन बॅचचे रिझल्ट काही फार आशादायक नव्हते. हा एक अजून धोकादायक सिग्नल ! या सर्व मतमतांच्या गलबल्यांत, बिचाऱ्या पालकांना एकच समजले, की आपल्या मॅट्रीकला असलेल्या मुलांना, किमान इंग्रजी-गणिताची तरी शिकवणी लावावीच लागणार आहे.
मी शिकायला होतो आमच्या सरदार जी. जी. हायस्कूलला ! मला गणित व भूमितीची शिकवणी लावावी, हा रेटा सर्व बाजूने यायला लागल्यावर, माझ्या वडिलांनी साधारणत: गौरी-गणपती झाल्यावर, शिकवणीचे विचारले, ते दीक्षित सरांना !
‘माझा आणि अण्णांचा मुलगा आता मॅट्रीकला आहे. इंग्रजीची शिकवणी आपल्या भोईवाड्यातील मुजुमदारांकडे लावली आहे. गणिताची काही लावली नाही अजून ! त्यांची शिकवणी घेत जा. त्यांचे मॅट्रीकचे वर्ष आहे. वाया जायला नको.’ माझे वडील !
दीक्षित सरांचा, घरी शिकवण्या घेण्यावर अजिबात विश्वास नसायचा. कदाचित ‘आपल्या विद्यार्थ्याला शिकवणी लावावी लागतेय’, हे अपमानास्पद पण वाटत असेल.
‘दिवाळी नंतर पाहू, काय करायचे ते ! आणि मुलांचे वर्ष कशाला वाया जाईल ? आणि तसं काही अभ्यासात अडले, तर केव्हाही पाठवत जा पोरांना ! त्यांना का घर माहीत नाही ? का मी माहीत नाही ? त्यासाठी शिकवणी कशाला ?’ दीक्षित सर !
असे म्हणून शिकवणी हा विषय त्यांनी दिवाळीपर्यंत टाळला.
आमच्या शाळेतले दीक्षित सर, म्हणजे विष्णु बळवंत दीक्षित ! सडसडीत बांधा, उभट व तरतरीत वाटणारा चेहरा, गव्हाळ वर्ण, सरळ कपाळातून पेन्सीलीसारखे आलेले छोटेसे धारदार नाक, डोळ्याला पुढील बाजूने काळ्या किंवा गडद तांबड्या रंगाची फ्रेम आणि काड्या बहुतेक सोनेरी असलेल्या, असा चष्मा ! केस नीट व्यवस्थित बसवलेले. बहुतेक अर्ध्या बाह्याचा सोबर वाटणारा, हलक्याशा रंगांचा शर्ट आणि काळी किंवा करड्या, राखाडी रंगाची पॅंट ! काही वेळ फूल बाह्यांचा पण शर्ट ! मात्र शर्ट पॅंटमधे नीट खोचलेला आणि पॅंटला चामडी पट्टा ! पायात काळे बूट ! अव्यवस्थितपणा अजिबात नाही. व्यक्तीमत्व टापटीप ! — आणि चेहऱ्यावर बुद्धीमत्तेचे तेज ! एकेक पाऊल दमदारपणे टाकत, जरा हळू चालण्याची सवय !
त्यांचा आणि आमचा संबंध तसा नवीन नाहीच, निदान तीन-चार पिठ्यांचा ! गांव छोटं असलं की संबंध हे छोटे रहात नाही, ते नातेसंबंधापलिकडे व्यापून रहातात. ते माझ्या वडिलांपेक्षा मोठे ! लहानपणी त्यांचेकडे आणि भाऊंकडे नेहमीच जाणे व्हायचे ! भाऊ म्हणजे डाॅ. भाऊ आठवले ! डाॅ. भाऊ आठवले हे संध्याकाळची वेळ असली तर, निवांतपणी रस्त्याच्या कडेलगत असणाऱ्या त्यांच्या शहाबादी फरशीच्या ओट्यावर सतरंजी टाकून बसलेले असायचे आणि त्यांच्या आसपास घरातील व बाहेरची नातवंडे असायची ! यांच्या घरासमोरच दीक्षितांचे घर ! तिथं त्यांच्या ओट्यावर एक लांब, दोन्ही बाजूने हात असलेला, लाकडी बाक होता, त्यांवर बऱ्याच वेळा बाळूकाका किंवा क्वचित अन्नपूर्णा काकू असायच्या ! बाळूकाका म्हणजे दीक्षित सरांचे वडील आणि अन्नपूर्णा काकू, म्हणजे त्यांची आई ! माझे वडील त्यांना काका व काकू म्हणत, त्यामुळे कानावर हाच शब्द पडे ! माझे वडील हे डाॅ. आठवले यांच्याकडे आले, की त्यांचे दीक्षितांकडे हमखास जाणे होई. माझे वडील, दीक्षित सर यांच्या कसल्या कसल्या गप्पा सुरू असत. रेडिओवर बातम्या ऐकणे, हा त्यावेळी बहुतेक सर्व घरांतील मुख्य कार्यक्रम असे. त्या मधल्या खोलीत ऐकल्या जात. त्यानंतर त्या बातम्यांवर चर्चा, मतप्रदर्शन ! त्यावेळी या गप्पांत काहीवेळा सौ. उषाकाकू पण भाग घेत ! दीक्षित सरांना खरं तर पूर्वी मी ‘बापू काका’ म्हणायचो, हायस्कूलला गेल्यानंतर ‘सर’ म्हणावे लागे. लहानपणी शाळेत न जाण्याच्या वयातील आपले संबंध, शिक्षण घेत जातो तसतसे किंचित दूरचे होत जातात की काय, देव जाणे ?
आम्हाला तसे हे सहावीला सायन्स शिकवायला होते. मी ‘ब’ वर्गात होतो. ते बहुतेक नुकतेच ‘सुपरवायझर’ झाले होते. मुलांवर त्यांचा दरारा असायचा. पण खरं तर, त्यावेळी त्यांनी जास्त शिकवले नाही, का आम्ही अभ्यास केला नाही, सांगता येत नाही. ते चांगले शिकवायचे, हे मात्र नक्की ! नंतर सातवी संपल्यावर, आठवीला सर्व वर्गातील मुली या ‘गर्ल्स हायस्कूल’ला जायच्या. एकाच संस्थेची शाळा होती. आठवीनंतर, मग ‘अ’ वर्गातील काही जागा रिकाम्या व्हायच्या, मग त्या ‘ब’ मधील काही विद्यार्थी घेवून भरून काढल्या जात. दहावीला आम्हाला गणित-भूमिती व भौतिकशास्त्र शिकवायला दीक्षित सर आले. त्यांच्या उत्तम शिकवण्याबद्दलची किर्ती तोवर आम्ही भरपूर ऐकली होती, पण शिकवायला मात्र ते येत नव्हते. आमची शाळा नववीपर्यंत ही सकाळची आणि ते तर दुपारी शिकवायचे ! मॅट्रीकला ‘हायर मॅथेमॅटीक्स’ शिकवणारी ही शिक्षक मंडळी, त्यातील एक हे ! मात्र जसं जुनी मॅट्रीक बंद होवून नवीन मॅट्रीक’ सुरू झाली, तसे ‘उच्च माध्यमिक’ वर्ग म्हणजे ११ वी आणि १२ वी सायन्सला पण दुपारी त्यांना शिकवावे लागत असावे.
ते आम्हाला १० वी ला आल्यानंतर, ‘अनुभवी’ विद्यार्थ्यांनी ‘यांच्या पिरीअडचे काही खरं नसते’ हे सांगीतल्यावर, त्याचा नेमका अर्थ लगेच समजला नाही. पण मग काही दिवसांतच, ते त्यांच्या पिरीअडला शिकवायला येतीलच, याचा भरवसा नसायचा. मग त्यांचा तास दुसरे कोणते तरी शिक्षक आनंदाने घ्यायचे, कारण त्यांच्या विषयाचा अभ्यासक्रम पुढे जायचा. मात्र असा एखाद-दुसरा आठवडा गेला, की एखादे दिवशी पहिल्याच तासाला दीक्षित सर वर्गावर गणित किंवा भूमितीचे पुस्तक आणि मुठीत पाच-सहा खडू घेवून हजर ! काही वेळा आमच्याजवळ पुस्तक असायचे, तर काही वेळा नाही ! त्यांना शिकवण्यासाठी पुस्तक नांवालाच लागे. गणित किंवा भूमितीतील कोणता भाग शिकवायचा हे सांगीतल्यावर त्याची उदाहरणे, ही वैशिष्ट्यांसह समजावून देत. तो भाग शिकवल्यानंतर गणित हा इतका सोपा विषय असू शकतो, हीच भावना होई. भूमितीचे एखादे प्रमेय ही किती विविध पद्धतीने सिद्ध करता येवू शकते, हे पुस्तकात दिले नसले आणि आम्हाला अभ्यासक्रमात अपेक्षित नसले, तरी ते शिकवत. फक्त अभ्यासक्रमातीलच नाही, तर त्यासाठी आवश्यक ते सर्व शिकवावे, ही बहुतेक सर्वच शिक्षकांची सवय !
एखाद्या गणितावरील आलेल्या अडचणीच्या वाटणाऱ्या निमीत्ताने, त्या गणिताच्या मागील मूलतत्त्व काय, हे शिकवणे त्यांना आवश्यक वाटे. लाॅगरिथमच्या प्रत्येक अंकाची तीच किंमत का, वेगळी का नाही आणि ती कशी येते, हे त्यांनी आम्हाला तपशीलवार शिकवले होते. कोणत्याही संख्येला एक या संख्येने गुणल्यास उत्तर तीच संख्या येते आणि शून्याने गुणल्यास उत्तर शून्य येते, हा सर्वांना माहीती असलेला नियम कसा तयार झाला, हे त्यांनी शिकवले. गुणाकार वा भागाकार करतांना तो तोंडी कसा करता येवू शकतो, हे त्यांनी शिकवले. वर्ग व वर्गमूळ हे तोंडी कसे काढता येते, हे दाखवले. त्रिकोणमिती ही कठीण नसून सोपी कशी आहे, तिचा आपल्या सर्वांच्या जीवनांत कसा उपयोग होतो, हे त्यांनी सांगीतले. भौतिकशास्त्रातील किरण, प्रकाश, त्वरण वगैरे विविध कल्पना, आपल्या रोजच्या आयुष्यात कशा येतात, पण आपले कसे लक्ष नसते, हे सांगीतले.
विविध प्रकारांनी शिकवलेली गणिते आणि भूमितीतील सिद्धता, या त्यांच्याकडून शिकून घेणे, ही एक खरोखर ज्ञानप्राप्ती असे. फळ्यावरील त्यांनी सोडविलेले उदाहरण किंवा प्रमेय, हे आम्हा विद्यार्थ्यांना वहीवर उतरवून घेण्यासाठी फारच धडपड करावी लागे; कारण ते पुस्तकांत मिळेल याची शाश्वती नसे. विविध पद्धतीने त्या गणित आणि प्रमेय सोडवले गेल्याने, ते विसरणे कठीण असे. तेवढ्यात जर ‘टण्ण टण्ण टण्ण’ अशी हरिभाऊने दिलेली, तास संपल्याची घंटा वाजली, तर आम्ही काही वेळा एकदम दचकत असू, मात्र दीक्षित सरांच्या कानांवर ती घंटा गेलेली नसे. खडूने फळ्यावर वळणदार अक्षरे व अंक लिहून उजव्या हाताची बोटे खडूने भरलेली असत, त्यांची चाळवाचाळव करत त्यांवर फुंक मारत, खडूची भुकटी अशी हातावरून उडवण्याची त्यांची लकब ! या शिकवण्याच्या नादात, पुढच्या तासाचे त्या विषयाचे शिक्षक दरवाज्यापाशी उभे राहून चुळबूळ करत, ते दिसले तर मग त्यांच्या लक्षात येई, की तास संपला म्हणून !
‘अरे, संपला का तास ?’ हे आम्हाला विचारत, ‘हा तुमचा तास मी घेतो’ असे त्या दरवाजापाशी उभे असलेल्या शिक्षकांस सांगत, आणि ते शिकवायला लगेच सुरूवात करत. सलग चार-चार तास त्यांनी एकाचवेळी गणित-भूमितीसारखे विषय शिकवले आहे, आणि आम्ही पण आमची बैठक न हलवतां शिकलो आहे.
अशा शिक्षकांना शिकवणीचे विचारणे, हे त्यांच्या शिकवण्यावर अविश्वास दाखवण्यासारखे, किंवा वर्गात नीट शिकवत नाही, हा संशय घेण्यासारखेच त्यांना वाटले, तर त्यांत नवल ते काय ? दिवाळीनंतर ज्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना पुन्हा शिकवणीचे विचारले, त्यावेळी तर त्यांनी क्लायमॅक्स केला.
‘ही काय शिकवणी लावायची वेळ आहे ? आता मार्चमध्ये परिक्षा होतील ! अरे, ते शिकवणीचे जावू दे, पण पोरांना काय समजले नाही, ते तर सांग !’ इति दीक्षित सर ! मी त्यांच्या सोबत होतोच.
‘सर्व समजते, सर !’ मी मनापासून सांगीतले.
‘त्याला सर्व समजते आणि तू कशाला शिकवणीचा आग्रह धरतो आहे ?’ दीक्षित सर !
‘त्याला काय समजते ? मॅट्रीकचे वर्ष आहे ! विषय रहायला नको.’ त्यांच्यामधील पालक आणि बाहेरची गणिताबद्दलची भिती बोलली.
‘काही होत नाही तसं ! मी आहे काही झालं तर !’ दीक्षित सर !
शेवटी नोव्हेंबर - डिंसेबरच्या दरम्यान मॅट्रीकचे वर्ष असल्याने मी आमच्या घराजवळच असणारे वाणी सर, यांच्याकडे शिकवणी लावली. मात्र तोपर्यंत बराचसा गणित-भूमिती व भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आटोपत आणला होता. त्यांनी मात्र वेळ तसा कमी असतांना सर्व पुन्हा शिकवत आणले. वार्षिक परिक्षेच्या अगोदर पूर्व परिक्षा व्हायची ! त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पेपर अत्यंत कठीण तर काढले जायचेच, पण त्यापेक्षा कडक तपासले जायचे. ते तपासून मिळालेले मार्क आणि आमचे चेहरे पाहून, पुराणिक सरांसारखे धीर द्यायचे.
‘आता तुम्हाला जितके टक्के असतील, त्यापेक्षा दहा टक्के तुम्हाला वार्षिक परिक्षेत जास्त मिळतील. —- अजून अभ्यास केला तर !’ हे पुराणिक सरांचे म्हणजे धीर पण देणारे असायचे आणि घाबरवून पण सोडणारे असायचे. ते इंग्रजी व संस्कृत शिकवत.
मी पूर्व परिक्षेचा भौतिकशास्त्राचा पेपर दिला. पेपर चाळीस मार्कांचा होता. मला छत्तीस मार्क होते. दोन प्रश्नांना तपासल्यावर पण मार्क दिलेले दिसत नव्हते. मी सरांकडे गेलो.
‘सर, या दोन प्रश्नांना मार्क दिलेले नाही.’ मी !
त्यांनी पेपर बघीतला. किती मार्क मिळाले, ते बघीतले. इतके मार्क कसे दिले गेले, याची काळजी असावी. त्यांत दोन प्रश्नांना मार्क दिले नाही, हे दिसतंय ! हे मार्क दिले तर — बेचाळीस होतील !
‘चाळीसपैकी बेचाळीस मार्क हवे आहेत ? कधी ऐकले होते ? हे जास्तीचे प्रश्न सोडवले आहेत. इतके मिळाले माझ्याकडून, हेच खूप झाले.’ इति दीक्षित सर ! माझ्या मॅट्रीकच्या परिक्षेचा निकाल लागला, मी सेंटरला इंग्रजीत दुसरा, तर इतर सर्व विषयांत पहिला होतो. सर्वांनाच आनंद झाला, दीक्षित सरांना तर होणारच होता.
त्यानंतर तसा त्यांचा आणि माझा शिकवण्यासंबंधाने संबंध आला नाही. मी काॅमर्स घेतले. आणि मला सरांचे गणित-भूमिती व विज्ञान शिकवणे कायमचे थांबले. नंतर मी बारावीला तर जळगांवी शिकायला गेलो. सरांची भेट होणे पण कठीण होवू लागली, कारण आता आपली शाळांच सोडली. ही वेळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात केव्हातरी येतेच, आणि तोपावेतो त्याने गोळा केलेली शाळेतील शिदोरी, त्याला आयुष्यभर पुरवायची असते. दीक्षित सर नंतर शाळेचे मुख्याध्यापक झाले. आपली करडी शिस्त त्यांनी शाळेला लावण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप ते निवृत्त झाले.
शाळेच्या जबाबदारीत असेपावेतो, ज्या कारणांसाठी त्यांना वेळ मिळत नव्हता, किंवा कमी मिळायचा आणि भाग घेण्यात काही बंधन यायचे, त्या सामाजिक क्षेत्रात मग ते आवडीने भाग घेवू लागले. विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम वा संघाच्या कार्यक्रमांत ते आवर्जून अग्रभागी असायचे, नवोदितांना मार्गदर्शन करत ! मी जशी वकिली सुरू केली, तसा काही काळानंतर गांवी आलो. त्यांच्या मनाने घेतले, आता आपण किती दिवस काम करणार ? नवीन पिढीच्या हातात हे काम द्यायला हवे. गांवातील शंभरी पार करण्याच्या बेतात असलेले, ‘सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव मंडळ’ याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला घ्यायला लावली. सोबत तसेच हुरहुन्नरी तरूण एकनाथ महाजन, अशोक शिंदे, जयंत कुलकर्णी, प्रल्हाद महाजन मंडळी होती. असे एकंदरीत सुरू होते.
मुलगा पुण्याला असल्याने, त्यांना पुण्याला जावून रहाणे तर क्रमप्राप्त होतेच. पुण्याला गेल्यावरसुद्धा ते स्वस्थ बसणे शक्य नव्हते. मग ऐकू यायचे त्यांना पुण्यातील प्रसिद्ध खाजगी क्लासने गणित-भूमिती व भौतिकशास्त्र शिकवायला नेहमीसाठी बोलावले. काही वेळा ऐकू यायचे, यावर्षी त्यांना उन्हाळयात पाचगणीच्या शाळेत उन्हाळी कोर्ससाठी बोलावले. अगदी स्वाभाविक होते, चांगली शिकवणारी मंडळी, अशी मिळतात कुठं हो ? रावेरच्या राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयांत एकदा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. यू. म. पठाण व्याख्यानांस आले होते. त्यांच्या भाषणांत पण त्यांच्या रावेर येथील शालेय काळातील आठवणीत, दीक्षित सरांचे, डी. टी. कुलकर्णी सर, लोहार सर, जोशी सर, मोकाशी सर, एस् आर कुलकर्णी सर यांचे नांव आवर्जून निघाले. शाळेतील कोणताही विद्यार्थी कधी कुठं भेटला तर ही नांवे त्यांच्या काळानुरूप निघतातच !
नंतर जसा औरंगाबादला आलो, तसा गांवाचा प्रत्यक्ष संपर्क बऱ्यापैकी तुटला. जो काही होता, तो फक्त बातम्या ऐकण्यापुरताच ! सर अधूनमधून रावेरला असायचे. त्या वर्षी दिवाळीसाठी सर आणि सौ. उषाकाकू रावेरलाच रहाणार असल्याचे समजले. योगायोगाने त्यावर्षी माझी मुलगी दहावीला होती. आणि मग पुन्हा माझ्या मनाने जबरदस्त उचल खाल्ली, की तिला सरांनी शिकवायलाच हवे. एरवी मुलांना शाळेतील सरांचे ‘ते कसे शिकवत असतील’ याचे कुतूहल होतेच, पण अनुभव नव्हता. मी सरांना भेटायला येतो, म्हणून कळवले. मुलीला शिकवा, म्हणूनही विनंती केली.
‘भेटायला ये. त्यासाठी परवानगी कशाला ? मग पाहू !’ दीक्षित सर !
मी गांवी गेलो. घरी काकांना मी हे सर्व सांगीतल्यावर ‘सर शिकवणी घेतील का ?’ ही पहिली शंका व्यक्त केली. मी त्यांच्याकडे गेलो.
‘सर, ही माझी मुलगी. यंदा दहावीला आहे. दिवाळीच्या सुटीत मुद्दाम इथं ठेवतोय. तुम्ही गणित-भूमिती शिकवावे म्हणून !’ मी.
‘अरे, आता वेळच वेळ असतो. पण तशी खूप इच्छा होत नाही. तसं तर, तिच्या आजोबाला पण शिकवलंय ! आता हिला शिकवायचे, म्हणजे तिसऱ्या पिढीला शिकवायचे !’ सरांचे उद्गार !
‘तुम्ही आता शिकवले तरच तिसरी पिढी होईल !’ मी.
सर हसले. ‘तू हायकोर्टात असतो. माहीत आहे. तुझी मुलगी आहे, हे पुरेसं आहे. मी शिकवेल. नाहीतरी आता कोणा नातेवाईकांकडे कोणी दहावी-बारावीला असलं, की मला आवर्जून बोलावणं असतं, ‘मुलाला शिकवायला या’ ! आयुष्यात आपण दुसरं काय केलंय, शिकवण्याशिवाय ?’ दीक्षित सर !
मुलगी शिकायला जावू लागली. सरांची हातोटी तिला लक्षात यायला लागली. बघता-बघता दिवाळीची सुटी संपली. मुलीला घ्यायला गांवी गेलो. सरांना भेटायला गेलो.
‘मुलीला मुद्दाम शिकवण्यासाठी पाठवायची काही गरज नव्हती. तिची तयारी चांगली आहे. तुझीच पोरगी ! बघ, नीट लक्ष दे, जगांत नांव कमवेल ती !’ सर.
मनांशी ठरवलेच होते, तसे अगोदरच काही पैसे घालून असलेले, बंद पाकीट सरांच्या हातात दिलं आणि मी व मुलीने नमस्कार केला.
‘किती आहेत रे पाकिटात ?’ सर !
‘तुम्ही शिकवलेल्या इतके अजिबात नाही. मी देवू पण शकत नाही.’ मी म्हणालो !
‘मग कशाला देतो आहे ?’ सर !
मुकाट्याने पाकीट परत घेतले व न बोलता निघालो. घशांतून शब्दाऐवजी आवंढा आला. शिकवणीचे पैसे अगोदर ठरवून, नंतर विद्यार्थ्याची शिकवणी सुरू केली जाते, हे बघीतलेल्या व अनुभवलेल्या या जगांत, शिकवल्यानंतरही ते शिकवण्याचे पैसे न घेणारे श्रीमंत शिक्षक असतात, हे पण पुढच्या पिढीला समजायला हवं ! त्यांची व समाजाची श्रीमंती वाढवायची असेल तर ! मुलगी दहावीला उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाली, तिच्या शाळेत पहिलीच होती.
मग कधीतरी गांवी जाणं व्हायचं. सर असले आणि जमलं तर भेटणे व्हायचे. सौ. उषाकाकू गेल्याचं समजलं आणि आम्ही दोघं, म्हणजे मी आणि माझी पत्नी, सरांना भेटायला गेलो. आठवणीतील एकेक माणसं आपल्याला सोडून जातात, टाळता येत नाही. आम्ही घराच्या पायऱ्या चढून वर गेलो. सर बंगळीवर बसले होते. शेजारी छोटा लोड ! बंगळी उगीचच पुढेमागे झुलत होती. समोर दोन-तीन लाकडी खुर्च्या !
‘ये बैस ! तुझं कसं काय चाललंय ?’ सरांचा प्रश्न ! ‘याच्याकडे लक्ष देत जा. हा नुसता कामांत रहातो.’ हे पत्नीला उद्देशून !
‘माझं ठीक आहे सर ! उषाकाकू गेल्याचं समजलं आणि आलो.’ मी !
‘हं ! ती गेली. बरं नव्हतं तिला, गेली. येणारा एक दिवस जाणार !’ सर ! त्यांच्या डोळ्यात खळकन् पाणी आले. चष्मा काढला डोळे पुसले, आणि थोडावेळ ते स्वस्थ बसले. आम्हाला पण काय बोलावे सुचेना.
‘बाकी काय !’ काही तरी संभाषण सुरू ठेवावं म्हणून त्यांची विचारणा.
मी यांवर काय बोलणार ? मला समजत होतं, त्यांना खूप बोलायचे आहे, पण बोलता येत नव्हतं. मग थोड्या शांततेनंतर - ‘पण आता इथं एकटं वाटतं ! कोणीतरी येतात तसे. पण !’ सरांना नेमके काही सुचेना !
‘तुमचे विद्यार्थी तर सर्व गांवात आहे.’ मी !
‘हो, दरवाजा उघडला, तर रस्त्याने जाणाऱ्या दहा माणसांतील निदान आठ माणसं मला ओळखत असतात. निदान त्यातील तीस टक्के माझे विद्यार्थी असतील. केव्हाही बोलावले तर नक्की येतील. अजून काय हवं माझ्यासारख्याला ?’ सरांतील गणिताचा शिक्षक जागा होत होता.
‘सर, पुण्याला जातांना तरी एकदा मुद्दाम औरंगाबादला या.’ मी आपले सांगण्याचा प्रयत्न केला.
‘येईन रे. न यायला काय झाले ? तुम्ही विद्यार्थी आणि माझा नंदू, काय फरक आहे ? पण तुझं जरा व्यवस्थित होवू दे.’ नंदू म्हणजे, त्यांचा मुलगा, आनंद ! त्यांना हे बोलतांना माझ्यावरील अडचणी व संकटे आठवत असावी. त्यांच्यातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणारा शिक्षक जागा होता.
‘येत जा, कधी रावेरला आला तर ! पुण्याला आला तरी घरीच ये ! अरे, जुने संबंध का असे संपतात. माझा फोन नंबर आहे ना. हा पत्ता पण लिहून घे.’ त्यांचा आग्रह !
‘आहे माझ्याजवळ !’ मी.
‘लिहून घे. ऐनवेळेस हरवतो आणि सापडत नाही मग ! भेट राहून जाते. अरे बघ, तुझी काकू नाही आता चहा करायला !’ मग मी जास्त बोललो नाही. त्यांनी दिलेला पत्ता पुन्हा घेवून मी त्यांच्याकडून निघालो.
त्यांच्या आयुष्यातल्या जवळपास पन्नास वर्षांवर तरी सौ. उषाकाकूंच्या असंख्य सांगता येण्यासारख्या, न सांगण्यासारख्या, सुखदु:खाच्या आठवणी असतील. माणसाने आठवायच्या तरी किती, आणि मोजायच्या तरी किती ? अत्यंत कठीण गणिते व भूमितीतील क्लिष्ट प्रमेय चुटकीसरशे आणि विविधप्रकारे, वेगवेगळ्या पध्दतीने सोडविणाऱ्या गणिताच्या या शिक्षकाला, आपल्या आयुष्यातल्या साथीदाराने कायमची साथ सोडल्यावर येणारी समस्या सोडवता येणार नव्हती. परमेश्वर पण काय ओळख नसलेले दोन जीव कधीतरी एकत्र आणतो, त्यांच्यातील संबंध असे काही जुळवतो, जोपासतो की त्यांना नंतर वेगळेच करता येत नाही. बस ! हेच दाखविण्यासाठी भगवान शंकराने, जगताच्या संहार देवतेने ‘अर्धनारीनटेश्वराचे’ रूप घेतलेले आहे.
असेच काही दिवस गेले, त्यांची ख्यालीखुशाली म्हणजे ते रावेरला आहे का पुण्याला आहे, हे समजत होतं. जास्त काही समजत नव्हतं. आणि एका दिवशी रावेरहून फोन आला —-‘दीक्षित सर गेले !’ ही बातमीच अशी होती, की मला काही बोलणं सुचेना. माझा चेहरा पडलेला बघीतला आणि बायकोने विचारले ‘काय झाले ?’
‘दीक्षित सर गेले !’ मी उत्तरलो. आणि माझ्याबरोबरच माझ्या मुलीच्या पण डोळ्यात पाणी उभे राहीले.

20.1.2019

No comments:

Post a Comment