Saturday, March 16, 2019

बालाजीवाले सर !

बालाजीवाले सर !
नंदकुमार काशीनाथ बालाजीवाले ! तसे ते मूळचे बुरहानपूरचे, म्हणजे सध्याच्या मध्यप्रदेशचे ! कधीकाळी बुरहानपूर हे खान्देशमधे असेल, पण भाषावार प्रांतरचनेच्या वेळी, त्याचा ‘बेळगांव, कारवार, धारवाड वगैरे’ इतका गाजावाजा झाला नाही. आमच्या गांवापासून दहा-अकरा किलोमीटरवर सध्याच्या मध्यप्रदेशची हद्द सुरू होते. त्यामुळे नातीगोती, शेतीबाडी यासाठी येथील रहिवाशांना महाराष्ट्र वेगळा वाटत नाही. गोंधळ होतो, तो काही वेळा आरक्षणाच्या बाबतीत ! इकडील काही मुली तिकडे दिल्या किंवा तिकडील इकडे आल्या, तर तिकडील काही जाती इकडे आरक्षणाच्या यादीत नाहीत. त्याचवेळी हा सगळा इतिहास न्यायालयांत सांगावा लागतो. नोकरी व्यवसायानिमीत्त इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे येणे, हे अत्यंत स्वाभाविक आणि नित्य सुरू असते.
बुरहानपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठा असतो. तेथील ‘नवरात्र व्याख्यानमाला’ तर नामवंत वक्त्यांसाठी एक पर्वणीच असायची, एकदा इथं कै. अटलबिहारी वाजपेयी हे पण वक्ते होते. इथं भगवान बालाजीचे मंदीर आहे. भगवान बालाजीचा मोठा उत्सव होतो, विजयादशमीला ‘भगवान बालाजीचा रथ’ निघतो. या मंदीरात बालाजीची पिढ्यानपिढ्या सेवा करणारे, म्हणून हे बालाजीवाले ! परमेश्वर कोणाला काही देतो, तर कोणाला काही ! इथं तर त्या बालाजीने आपले नांवच दिले यांना, ओळख म्हणून !
त्यांना आमच्या शाळेत, सरदार जी. जी. हायस्कूलमधे, यावे लागले ते नोकरीनिमीत्ताने आणि मग ते रावेरनिवासी झाले. ते मला मी शाळेत गेल्यावर विद्यार्थी म्हणून होण्याअगोदरच माहिती ! बऱ्याचवेळा गुरूवारी ते आमच्या गल्लीत यायचे, ते कै. ना. रा. भावे यांच्या घरी ! कै. ना. रा. भावे यांना आम्ही सगळे लहानथोरांपासून ‘आबा’ म्हणायचो ! त्यांचे घर हे आमच्या घरासमोरच ! त्यांच्या पत्नी या सर्वांना अक्का म्हणून परिचित ! त्यावेळी त्यांना, म्हणजे आबांना, पुणे आकाशवाणी केंद्रावरून ‘किर्तनाचे’ बोलावणे येई. ते जात त्यासाठी ! तिकडून आल्यावर मग त्यांचे किर्तन रेडिओवर कधी लागणार, हे सांगायचे ! त्या दिवशी मग रेडिओवर त्यांचे किर्तन ऐकायचे. त्यांच्याकडे तो व्हाल्व्हचा रेडिओ होता. तो तापायला वेळ लागायचा. त्यामुळे त्यावेळेच्या अगोदरच तो लावावा लागे. किर्तनातले आम्हाला काही समजण्याच्या वयाचे आम्ही नव्हतोच, मराठी शाळेतले आम्ही.
आबांकडे बहुतेक दर गुरूवारी भजन असायचे. या निमित्ताने गांवातील संगीतात रूची असणारी आणि धार्मिक अशी निवडक मंडळी जमायची त्यांच्याकडे ! मग जिल्हा सहकारी बॅंकेतील गोरेपान श्री. पाटील हे तबल्याला असायचे. कै. कान्हा महाराज हे आपली भलीमोठी बासरी घेवून यायचे. हातात कापडी नळकांड्यात मोठी बासरी, पांढरा स्वच्छ पायजमा व सदरा आणि खांद्यावर स्वच्छ छोटा रुमाल टाकून यायचे. आम्ही बाजारातील वित-दिडवितीची बासरीच बघीतलेली असायची, तेव्हा ही भली मोठी बासरी ऐकण्यापेक्षा देखील पहाणे पण मोठे कुतुहलाचेच असे. तिथं तबल्यासाठी श्री. बालाजीवाले सर यायचे. माझ्या आईला पण स्वाभाविकपणे बोलावणे असायचे. मी जायचो आईबरोबर ! तिथं यांची पहिली ओळख झाली. बऱ्याच वेळा आईला घरी अगोदरच जावे लागे, कामे करायची असायची. मला तिथं थांबायचं असायचं ! तबल्यावर बोटे फिरवल्यावर वेगवेगळे, कानाला आवडणारे आवाज येतात आणि त्या लाकडी नळीत फूंकल्यावर, छिद्रांवर बोटांची उघडझाप करून अगदी आपल्याला गाणं म्हटल्यासारखे वाटते, हे माझ्या आकलनाच्या पलिकडचे ! सर्व आटोपल्यावर मग या ओट्यावरून समोरच्या ओट्यावर मी आलो की घरांत प्रवेश !
माझी तबल्यातील रूची बघून आईने मला बहुधा सातवीत बालाजीवाले सरांकडे तबला शिकायला पाठवले. माझी शाळा सकाळी तर त्यांची दुपारी ! या सगळ्या सव्यापसव्यातून काही शिकायला मिळावे ही इच्छा ! मला बहुतेक ताल वाजवतां येवू लागले. गाण्याबरोबर ठेका धरतां येवू लागला. मात्र त्यावेळी मी फारसा रमलो नाही. शाळेचा अभ्यास, दिवसभराच्या उनाडक्या आणि मग एकदम दहावीच आली !
दहावीला आम्ही आल्यावर, मग आम्हाला तत्कालीन नावाजलेली शिक्षक मंडळी शिकवायला आली. त्यांत दीक्षित सर, वाणी सर, एस् एस् पाटील सर, बोरोले सर, जोशी सर, पुराणिक सर, वानखेडे सर, पितळे बाई हे होते ! मराठीला आम्हाला बालाजीवाले सर आले. राखाडी किंवा काळ्या रंगाची पॅंट आणि अर्ध्या बाह्यांचा शर्ट ! डोळ्याला वाचायच्या वेळी लागणारा काळ्या फ्रेमचा चष्मा ! नोकरीला लागल्यानंतर बालाजीवाले सरांनी ‘एम् ए’ केलं !
वर्गावर सर शिकवायला आले, की सरांचे शिकवण्यातील अत्यंत प्रभावी असायचे, ते त्या धड्याचे वाचन ! एकदा त्यांनी धडा वाचून दाखवला, की त्यात फारसे शिकवायचे काही राहिले आहे, असे आम्हास वाटत नसे. पाठ्यपुस्तकातील नाट्यउतारा वाचावा, तर बालाजीवाले सरांनीच ! त्यांच्यातील उपजत नाट्यकलावंताची ती तडफड असावी !
आम्हाला पाठ्यक्रमांत कै. वसंत कानेटकर यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील उतारा होता. कै. वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकातील उतारा होता ! शिक्षक शिकवतांना विद्यार्थ्यांना नेहमी सांगतात, ‘पुस्तकात पहा’ ! मात्र हे सर तसे कधी सांगत नसत आणि सांगीतले, तरी आम्ही विद्यार्थी त्यांचे बऱ्याच वेळी ऐकत नसू ! आम्हाला तोपर्यंत त्यांच्या शिकवण्याची कल्पना आली होती. सर शिकवत असतांना पुस्तकात पाहून जे काही, आणि जेवढे समजते त्यापेक्षा सरांकडे ते वाचत असतांना बघीतलं तर जास्त समजतं, त्यामुळे शिकवतांना, सर वाचत असले, तरी आमचे लक्ष पुस्तकांत कधीच नसे. त्यांच्याकडे असे. याची त्यांना पण कल्पना असायची.
त्यांनी आम्हाला शिकवलेली कवि कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता ! कविच्या मनांत काय आहे हे यांना कसे काय समजते, हा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर ते जाणून घेण्यासाठी त्याने बालाजीवाले सरांना अवश्य भेटावे. बरोबर उत्तर मिळेल व समस्या सुटेल. मला आजही त्यांनी 'पृथ्वीचे प्रेमगीत' ही कविता शिकविण्याची केलेली सुरूवात आठवते, मंदारमाला या वृत्तातील ही कविता -
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना ।
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करावी प्रीतिची याचना ।
त्यांनी त्यावेळी कविता वाचनांस असा काही स्वर लावला की त्या स्वराच्या सामर्थ्याने वर्गात एकदम शांतता पसरली आणि वातावरण गंभीर झाले. सर शिकवत होते, पुढीलपुढील ओळी ऐकू येत होत्या, त्या कानाला का मनाला का ह्रदयाला हे मात्र समजत नव्हते. आमचे चेहरे हिरमुसले होते. सरांचा स्वर लागला तो करूण होता का विरही होता का निर्धाराचा होता हे आजही नक्की सांगता येणार नाही, इतक्या संमिश्र भावना त्यांत होत्या. त्या स्वरांत ते वाचत होते -
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे ।
काय भव्य कल्पना ! आम्हाला आम्ही अंतराळात फिरत आहोत आणि तेथे हे संवाद ऐकत आहोत असे वाटत होते. शेवटी -
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलीकण ।
अलंकारण्याला परि पाय तुझे
धुलीचेच आहे मला भूषण ।
सर कविता वाचून खुर्चीवर बसले, आता कवितेत विद्यार्थ्यांना समजाविण्यासारखे काहीच राहिले नव्हते, कविता पूर्ण समजली होती: असे म्हणण्यापेक्षा कवितेचे पूर्ण आकलन झाले होते. आणि मला उगीचच भास झाला की आमचे ढोळे पाणावले का आमच्या वर्गाच्या भिंतीतून हुंदक्याचा स्वर आला !
थोड्या ओळींमधे काय आणि केवढा आशय दडलेला आहे, हे दाखवावे तर सरांनीच ! सर कोऱ्या कागदावरील त्या लिहीलेल्या काव्यरूपी शब्दांत कोणता आशय दडलेला आहे, हे ज्यावेळी एकेक उदाहरणे देवून सांगत त्यावेळी पांढऱ्या शुभ्र कागदावर आपल्या नादात चितारत असलेला चित्रकार डोळ्यांसमोर उभा रहातो.
तात्यासाहेब शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ यांतील आम्हाला अभ्यासक्रमाला असलेला उतारा वाचतांना, तात्यासाहेबांना दिसणारा वृद्ध नटसम्राट यांनी पण बघीतला असावा, ही खात्री पटायची ! ‘कुणीही कुणाचं नसतं’ यांतील भाव हे ऐकण्यासारखा !
त्यांनी वाचलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ म्हणा का ‘नटसम्राट’ या नाटकातील उताऱ्यांचे वाचन म्हणा, त्यातील वाक्ये आणि ते वाचतांना, सरांचे भाव, आवाजातील चढउतार, वाचतांना लागलेला किंवा लावलेला स्वर, त्यांचे वाक्यांनंतर किंवा एखाद्या शब्दावर थांबणे, एखाद्या शब्दावर जोर देणे किंवा एखादा शब्द निसटता तसाच सोडून देणे ! ही वाचण्यातील विविध सामर्थ्यस्थळे माझ्या अजून डोळ्यांसमोर आहेत आणि त्यांचे स्वर कानांत आहे. सरांचे ठेक्यांत सुरू असलेले धड्याचे तालबद्ध वाचन, हे आपल्याला एखाद्या रंगलेल्या संगीत सभेतील, गाण्यात तल्लीन झालेला व भान हरपून गात असलेला, गायक आपल्या ख्यालगायकीने त्या रागातील भाव आपल्या स्वराने व त्यांच्या रचनेने श्रोत्यांना उलगडून दाखवत असल्याप्रमाणे असे ! त्यांचे नाट्यवाचन म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीतसभाच !
‘अश्रूंची झाली फुले’ मधील बाईचे पारिजातकाची फुले देतांनाचे लाल्याला उद्देशून वाक्य, ‘या फुलांसारखा हो’ ! ती फुले जपून ठेवणारा इन्सपेक्टर लाल्या ! मग त्या विमानतळावरील प्रवेशातील सांगीतलेले वाक्य, लाल्याची ‘सर, हात पुढे करा’ हे विद्यानंदांना म्हणतानांची अगतिक कर्तव्यकठोरता सर आपल्या शब्दांतून जशी ऐकवता न ऐकवतात आणि आपल्याला दु:खी करतात, तोच पुढचे वाक्य आपल्या कानावर आदळून ह्रदयावर आघात करायचे ! ‘पाहू दे त्या विद्यानंदाच्या शिष्याची हिंमत’ हे विद्यानंदाचे वाक्य ! या चार-पाच शब्दांच्या वाक्यांत काय नसायचे ? जीवनांत जबरदस्तीने त्याच्या इच्छेविरूद्ध चुकीच्या रस्त्याला लागलेल्या, एका आदर्श जपणाऱ्या सज्जन शिक्षकाची होणारी तगमग, त्याचबरोबर जुन्या वैभवाच्या खुणा दाखवत असलेली, स्मारके म्हणून मिरवता येतील असे हे विद्यार्थी ! आपण पराभूत होतोय, पण आपले शिकवलेले, आपल्या विद्यार्थ्याला दिलेले ज्ञान पराभूत झाले नाही, ही ‘शिष्यात इच्छेत पराजयम्’ या वचनाची चालत अालेली आणि पुढच्या पिढीत आलेली संस्कृती ! आपण शिक्षक म्हणून केलेल्या कामाची इतिकर्तव्यता समोर दिसत असतांना, कोणत्या शिक्षकांस वाटणार नाही, की इथं आपलं आयुष्य संपले तरी चालेल ?
बऱ्याच दिवसांत सरांची भेट नाही. काल रात्री आकाशवाणीवर संगीतसभेतील शास्त्रीय गायन ऐकत होतो. त्यांत भूप आणि मालकंस नंतर, परज कलिंगडा गायला आणि कै. आबा उपाख्य भावे सरांची आठवण झाली ! बालाजीवाले सर लख्ख डोळ्यांपुढे आले. सकाळी उठलो, तर डोक्यातही तेच ! मनांतून आलेले लिहीले, बस !

24.2.2019

No comments:

Post a Comment