Saturday, March 16, 2019

पं. रामस्वरूप रतौनिया !

पं. रामस्वरूप रतौनिया !
आज रविवार ! नेहमीप्रमाणे लवकर उठलो. पहाटे संगणक सुरू केला. शनिवार-रविवारी कोर्टाचा आठवड्याचा बोर्ड येतो. तो वेबसाईटवरून बघीतला. एकेक दिवसाचा बोर्ड मग डायरीत लिहीला. सप्लीमेंटरी बोर्ड आदल्या दिवशी रात्री येतो. रोज या दोन्ही बोर्डांची कामे ठेवलेली असतात. मी नियमीत बोर्ड लिहीतो, कारण मग मला आठवड्याचा कामाचा अंदाज करायला सोपे जाते, पक्षकारांना महत्वाचे असेल तर कळवतां येते, म्हणून मी नेटवरून जरी बोर्ड रोज काढता येत असला, तरी तो इथं आल्यापासून डायरीत लिहीतो. खालील कोर्टात पुढील तारीख ही त्याच दिवशी देत असल्याने, तिथं प्रत्येक तारखेचा आपला बोर्ड आपोआप तयार होतो. हायकोर्टात पुढील नेमकी तारीख अपवादाने देतात. कामे कोर्टाच्या सोयीप्रमाणे, आपल्या सर्क्युल्शनप्रमाणे लागतात. असो. पण गेल्या कित्येक वर्षांच्या डायऱ्या माझ्याकडे आज पण आहेत.
नंतर मग काम आटोपल्यावर चाळा म्हक्णून फेसबुक उघडले. त्यांत नेहमीप्रमाणे उजव्या बाजूला आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत, याची आठवण म्हणून यादी होती. त्यांत एक नांव होतं, पं. रामस्वरूप रतौनिया ! ते आज आपल्यात नाहीत. पण फेसबुकला काय कल्पना ? त्याने यांत्रिकपणे पंडितजींचा जन्मदिनांक तिथं अगोदरच भरलेला असल्याने, आपल्या तंतोतंत कार्यक्षमतेला जागून आठवण करून दिली. — आणि माझी एक जुनी आठवण जिवंत केली.
मी काॅलेजला शिकत होतो जळगांवला ! तिथं हाउसिंग सोसायटीत, प्रा. फडके रहायचे. त्यांचे नातेवाईक हे चांगले सतारिये ! ते ग्वाल्हेरला रहायचे. काही घरगुती किंवा अन्य कारणांनी ते जळगांवी आले असतील. ते अनायसे आल्याने, स्वाभाविकच या रसिक मंडळींनी त्यांचा घरगुती कार्यक्रम ठेवला, त्यांच्या सतारवादनाचा ! सोबत पोरगेलेसे तबलजी होते, त्यामुळे कार्यक्रमासाठी, जळगांवी वेगळे तबलजी त्यांना पहावे लागले नाही. सर्व परिचितांना या कार्यक्रमाची निमंत्रणे गेली. कार्यक्रम रात्री होता. मी पण गेलो होतो. मघ्यंतरांत काॅफीपान झाले. एक मात्र नक्की, जळगांवला संगीत रसिकांनी व आकाशवाणीने मला संगीत खूप ऐकवले.
कार्यक्रम अप्रतिम झाला. सुषिरवाद्य, तंतवाद्य याची साथ करतांना, तबलावादकाने कशी साथ करावी, हे बघायला व ऐकायला मिळाले. नेमके लपेटना आणि सवाल-जबाब हे काय असतात ? ते दोन्ही बघायला मिळाले. त्यावेळी मी कै. बबनराव भावसार यांचेकडे तबला शिकत होतो, त्यामुळे तबल्यात थोडी जास्त रूची ! त्या सतारिये श्री. फडके यांच्या साथीला तबलजी होते, रामस्वरूप रतौनिया ! त्या वेळी प्रथम त्यांचा तबला ऐकला. मध्यंतरांत ग्वाल्हेर गायकी, पं. कृष्णराव पंडीत, त्यांचे चिरंजीव पं. लक्ष्मणराव पंडीत आणि त्यांचे जळगांव येथील गुरूबंधू कै. गोविंदराव कुलकर्णी वगैरे, बऱ्याच गोष्टी मोठ्या माणसांच्या गप्पांतून समजल्या. ग्वाल्हेरचे जळगांवशी कसे नाते आहे, हे जळगांवच्या श्रोत्यांनी पण सांगीतले. आपुलकी निर्माण व्हावी, ही भावना !
तिथं कार्यक्रमांत वल्लभदास वालजी वाचनालयाचे पदाधिकारी आले होते. नंतर त्यांनी अगत्याने त्यांचा कार्यक्रम वाचनालयांत ठेवला. माझे घराजवळच त्यावेळी श्री. विनायक फाटक, हे जळगांव आकाशवाणीचे तबलावादक रहायचे. त्यांचेकडे बऱ्यापैकी जाणेयेणे असायचे. या वाचनालयांतील कार्यक्रमाचा निरोप त्यांना स्वाभाविकच पोहोचविला.
अशी ती आठवण मनांत होती. मग इथं फेसबुकवर आल्यावर, ही अशी आठवणीतील माणसं इथं फेसबुकवर शोधली. त्यांना संकोच न करता, मैत्रीची विनंती पाठवली. त्यांच्या मी लक्षात असण्याचे काही कारण नव्हते, पण विनंती स्विकारली. पंडीतजींना पण विनंती पाठवली. ते आकाशवाणीवर डायरेक्टर होते. त्यांची कधीतरी पुन्हा भेट होईल असे वाटले, पण तो योग नव्हता. दोनतीन वर्षांपूर्वीच ते गेले.
फेसबुकवर अशी कधी भेटलेली वा न भेटलेली माणसं पण मित्र आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली, म्हणजे आपला ज्या क्षेत्राशी संबंध येतो, तिथली माणसं स्वाभाविकच भेटतात. काहींचा प्रत्यक्ष भेटायचा योग येतो, बऱ्याच जणांचा येत नाही, तर ते अप्रत्यक्षपणे कामांतून, संपर्कातून भेटतात. काही मोठ्या माणसांची तर भेटीची पण शक्यता नसते; तरी आपल्या मित्रांच्या यादीत आहे, यामुळे मनाला बरं वाटतं. त्यांच्याकडून काही ऐकायला मिळतं, त्यांनी लिहीलेलं नवीन वाचायला मिळतं आणि त्यातून शिकायला पण मिळतं. आज पंडीतजींचा वाढदिवस मला निदान १९७८-७९ मधे काॅलेजच्या वयांत घेवून गेला ! पंडीतजींना प्रणाम !

3.3.2019

No comments:

Post a Comment