Saturday, March 16, 2019

ओंकारेश्वर

आपण एकटं असलं, प्रवासात असलं किंवा असंच काही कुठं पण जरा निवांत असलं, डोक्यात नेहेमीच्या कामाचा विषय नसला, की कसल्या कसल्या आठवणी मनांत येतात नाही ? काही चांगल्या असतात, काही वाईट असतात, तर काही नुसत्याच घटना असतात. आपल्यावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम झालेला नसतो, पण आठवतात आपल्याला ! या आठवणी असतात, त्या मागील घटना आपल्याला, काही ना काही शिकवून गेलेल्या असतात, त्याच्या असतात. मनाचा वेग कोणाला मोजता आलाय ?
शाळेला कशाचीही सुटी असली, की आम्हाला आनंद व्हायचा. ‘महाशिवरात्र’ हा पण सुटीचा दिवस ! त्या दिवशी आमच्या गल्लीतील आणि वर्गातील मुलांचा, कार्यक्रम बहुतेक ठरलेला असायचा, तो म्हणजे आमच्या गावांपासून साधारण चार-पाच किलोमीटरवर असलेल्या छोट्या ओंकारेश्वरला जाण्याचा ! हं, अजून एक सांगायचं म्हणजे, आमच्या गांवापासून नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेले मध्यप्रदेशातील ‘ओंकार ममलेश्वर’ या नांवाने प्रसिद्ध असलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, असे ओंकारेशवर आहे. ते पण तसे जवळ म्हणजे शंभरेक किलोमीटरवर आहे. मध्यप्रदेश जवळ असल्याने तिकडे नातेगोते, व्यापारउदीम, येणेजाणे बरेच असते. त्यामुळे गांवाजवळच्या ओंकारेश्वरला जातांना आमच्या गांवात सांगणारा सहज सांगतो, ‘छोट्या ओंकारेश्वरला चाललोय !’ नदीच्या काठावर असलेले, हे अत्यंत जुने दगडातील महादेवाचे मंदीर ! मोठ्या ओंकारेश्वरला इतक्या सहजी जाणे व्हायचे नाही.
इथं जायचे म्हणजे घरून सक्काळी निघायचे, उत्तरेला गांवाच्या बाहेरच्या बाजूला ‘स्वस्तिक टाॅकीज’ लागायची. थोडं पुढील उतारावरून गेले, की मग दोन रस्ते लागायचे. डावीकडील रस्ता हा नवा, म्हणजे चांगला डांबरी रोड ‘बुरहानपुर अंकलेश्वर महामार्ग’ आणि उजवीकडील मार्ग हा जुना, कच्चा रस्ता ! त्याला ‘तामसवाडी रोड’ म्हणायचे, पुढे तामसवाडी खेड्याकडे जायचा हा रस्ता. तिकडे ओंकारेश्वरला जातांना बहुतेक उजवीकडून, जुन्या रस्त्याने जायचे. जुना रस्त्याने जरा जवळ पडायचे. सोबत रोजचे कपडे घेतलेले असायचे. जातांना इकडील दोन्हीबाजूंना असलेली पिवळसर मुरमाड जमीन दिसायची, शेतात पीके असायची. शेतात पाण्याची व्यवस्था असेल तर मात्र हिरवीगार केळीची बाग ऐटीत असायची. केळीचे वजनदार घड तोलत, केळीचे खोड उभे असायचे, क्वचित त्याला बांबूचा आधार पण दिला असायचा. साधारणपणे मध्यावर आले की रस्त्या उजव्या बाजूला साधारण पन्नासेक फुटांवर बेटासारखा भाग तयार झाला होता. तिथं एक वडाचे झाड लागायचे. सर्वबाजूने मोठा गड्डा आणि मध्यभागी असलेल्या छोट्या नेमक्या भागांत हे झाड होते, भारदस्तपणे आपल्या पारंब्यांसहीत ! हे झाड दिसलं, की मग निम्मे अंतर झालं, ही कल्पना यायची. मग पुढे मुरूमाच्या खदानी लागायच्या ! तसं तर या भागातील बहुतेक जमीन ही मुरमाड ! मग इकडेतिकडे पहातपहात चालताचालता, दिसायचे ते एकदम नदीचे पात्र ! वळणदार पात्रातील वाळू आणि उपसत असलेले ट्रॅक्टर ! कित्येक वेळा गाढवेसुद्धा दिसत, कारण विटावाळू वगैरे वाहून आणण्यासाठी गाढवांचा आणि बैलगाडीचा उपयोग सर्रास केला जायचा. ट्रॅक्टर्स इतके नसायचे. नदीचे पात्र दिसले, की पायांची गती आपोआप वाढायची ! ओंकारेश्वर आले असायचे.
नदीच्या पात्रात उतरून थेट पुढे जायचे, तिकडे धबधब्याकडे जातांना नदीच्या पात्रातून जावे लागे. जातांना आपल्या पायाला होत असलेल्या नदीच्या पात्रातील पाण्याच्या ओहोळाचा आणि वाळूचा आळीपाळीने होणारा थंडगार, कुरकुरीत स्पर्श ! पात्रातील खडकांवरून उड्या मारत, ढांगा टाकत जात असायचो. नंतर विलक्षण, संथ आवाज ऐकू यायचा आणि मग एकदम दिसायचा तो नदीच्या वरच्या भागावर असलेला छोटा धबधबा ! आम्हा सर्वांना तिथं आंघोळ करायची असायची, कारण स्नान करूनच महादेवाचे दर्शन घ्यायचे ! तिथं पाणी बऱ्यापैकी असायचं ! मनसोक्त डुंबल्यावर, बाहेर येवून अंग पुसून ओले कपडे पिळून, तिथल्याच कातीव दगडांवर वाळत घालायचे. मग सोबत आणलेले कपडे घालायचे. काही अजूनही डुंबत असायचे, त्यांना कसेतरी हायहुय करत बाहेर काढून सर्व तयार व्हायचे आणि ओल्या डोक्या, अंगानेच मंदीराकडे चालू लागायचे.
महादेवाच्या मंदीराजवळ बाहेर, आसपासच्या गांवातील काहींनी महाशिवरात्र असल्याने आपली छोटीछोटी दुकाने लावलेली असायची. कित्येक तर रस्त्यातच वस्तू घेवून बसलेले असायचे. बहुतेक दुकाने ही फुलांची, बेलाची, पूजेच्या साहित्याचीच असायची ! एखादा हाॅटेलवाला पण असायचा साबूदाण्याची खिचडी, पेढे, वेफर्स घेवून ! आम्हाला काही घ्यायचे नसायचे व खायचे पण नसायचे, त्यामुळे मंदीरात सरळ दर्शनाला !
महाशिवरात्र असल्याने तिथं गर्दी बऱ्यापैकी असायची, रांगेत उभे रहावे लागायचे काही वेळा ! ‘शंभोऽऽऽ हर हर शंभो’ कोणी म्हणायचे, तर कोणी ‘कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथा भृकुटी झळाळी’ म्हणायचं ! सभामंडपात काही भावीक निवांतपणे महादेवाच्या गाभाऱ्याकडे पहात हात जोडून बसलेले असायचे, डोळ्यांत त्यांना होत असलेल्या समस्यांच्या वेदनांचे पाणी घेवून ! नवीन जोडपी नक्की दिसायची, गांवापासून दर्शनाच्या निमित्ताने दूर, निसर्गात यायला मिळायचे. नुकतीच चालायला शिकलेली आणि शिकत असलेली लहानमुले सभामंडपात दोन्ही हात फैलावून, तोंडाचा ‘आऽऽ आऽऽ’ करत, आपल्या आईला आपले कर्तृत्व दाखवत असायची.
सभामंडपातील भल्यामोठ्या दगडी नंदीचे दर्शन घेवून, समोरच असलेल्या गाभाऱ्यात उतरायचे ! दगडी मजबूत उंबरा ओलांडून गाभाऱ्यात आले, की महादेवाच्या पिंडीवर अभिषेक सुरू असलेला दिसायचा. पुष्पदंताचे शिखरिणी वृत्तातील, काळजाला हात घालणारे, ‘महिम्न’ तालात ऐकू यायचं ! काही वेळा महादेवावर नवीन जोडपं अभिषेक करत असायचं ! महादेवाच्या पूजेत तल्लीन होवून पार्वतीमय रूपात गेलेली, त्या जोडप्यातील पार्वती हात जोडून बसलेली असायची. तिच्या महादेवाच्या हाताला हात लावत, या दगडाच्या महादेवाची पूजा करत असायची. मग आमचा हा मंदीरातील भोळा महादेव, केवळ पाण्याच्या अभिषेकाने आणि त्यांनी वाहिलेल्या बेलाच्या पानाने प्रसन्न होत, त्यांच्या पोटी पुढील वर्षी वंशाचा दिवा द्यायचा ! असं नंतर ऐकू यायचं !
तिथं लगतच महादेवांच्या दोन्ही मुलांची मंदीरे ! बुद्धीची देवता भगवान गणेश आणि कार्तिकस्वामी ! गणपतीचे दर्शन तर सर्वांनाच घेता यायचं, मात्र त्याचा बंधूचे, कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यायला महिलांना परवानगी नसायची ! महिला बिचाऱ्या या कधीही न बघीतलेल्या कार्तिकस्वामीने, महिलांवर घातलेले हे प्रतिबंध आपल्या पतीचे काही वाईट व्हायला नको, या भावनेने निमूटपणे पाळत असत. परमेश्वराच्या दर्शनापेक्षा आपले, आपल्या जिवसख्याचे अहित व्हायला नको, ही माणसाची भावना किती प्रबळ असते नाही ? परक्या जीवांबद्दल ही भावना जपावी, तर आमच्या माताभगिनींनीच ! मग आम्हीच पोरंसोरं आणि माणसं, खाली त्या छोट्याशा गाभीऱ्यात जावून दर्शन घ्यायचो आणि कार्तिकस्वामीला पाठ न दाखवता, उलट्याने पायऱ्या चढत वर यायचो.
मागच्या बाजूला असलेले पाण्याचे दोन कुंड ! एक मोठे आणि दुसरे छोटे ! गोमुखातून सतत वहात असणारे पाणी छोट्या कुंडात पडत असायचे, वहातवहात नदीच्या पात्राला जावून मिळायचे. वरच्या बाजूला एका साधूची छोटी समाधी ! तिथं बाजूलाच थोड्या अंतरावर रस्त्याला लागून, मंदीराच्या मागच्या भागाला, एक पायविहीरीसारखे कुंड अाहे. प्रभू रामचंद्र या वाटेने गेले, त्यांना तहान लागल्यानंतर त्यांनी बाण मारून इथं जमिनीतून पाणी वर आणले, अशी समजूत !
आणि हो, महादेवाच्या मंदीरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला छोट्या टेकडीवर काही पायऱ्या चढून गेल्यावर प्रभू रामचंद्रांचे मंदीर आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी मूर्ती ! समोर हात जोडून असलेला महाप्रतापी रूद्राचा अवतार असलेला, हनुमान ! ‘मनोजवं मारुततुल्यवेगं — म्हणत, मारूतीला नमस्कार करायचा. इथं राम मंदीरात मी यायचोच, कारण माझी आजी ! तिने कधीतरी सांगीतलेले -
‘ओंकारेश्वरला गेला की फक्त महादेवाचेच दर्शन घेवू नको, तर रामाच्या मंदीरात पण जावून दर्शन घे ! तुझ्या आजोबांनी मोठा कार्यक्रम केला होता, जिर्णोध्दाराच्या वेळी ! मी बसली होती पूजेला सोबत !’ आजीने हे सांगीतलेले, तिथं ओंकारेश्वरला पाय ठेवला की आठवायचे आणि मग आपोआपच त्या राम मंदीराच्या पायऱ्या चढत मी त्या टेकडीवरील मंदीरात चढायचो. कधीकाळी आपल्या आजीआजोबांनी पूजलेला हा राम, त्याच्या नातवाला पाहून काय म्हणेल ? ‘ध्यायेध्याजानु बाहु —‘ म्हणत मी रामाला नमस्कार करत प्रदक्षिणा घालायचो.
जरा उंचीवरून आसपास बघायचे असल्याने, राम मंदीराच्या गच्चीवर तर मुद्दाम जायचो, कारण तेथील कोपऱ्यातील कडुलिंबाची पाने मला खायची असायची. ऐकले आहे - वनवासात या भागांत असतांना, प्रभू रामचंद्रांना जेवतांना चटणी हवी होती. सीतामाईं त्या वनांत चटणी तरी कशाची करणार ? समोर कडुलिंब होता, म्हणून त्या कडूलिंबाच्या पानांचीच चटणी केली. प्रत्यक्ष सीतामाई आपल्या रामरायासाठी आपल्या पानांची चटणी करताय, म्हटल्यावर त्या कडुलिंबाने आपल्यातील कडुपणा टाकला आणि गोडवा धारण केला. ‘चटणी कशाची’, हे रामरायांनी सीतामाईंना विचारल्यावर, त्यांनी खरं काय ते सांगीतले. प्रभू रामचंद्रांना आपल्या पोटासाठी, आपला जन्मजात कडूपणा सोडणाऱ्या त्या कडुलिंबाबद्दल माया दाटून आली आणि ‘तुझा हा कडुपणा, आता यापुढे तुला पुन्हा येणार नाही’, हा वर दिला. काय असेल ते असो, तो तिथला कडुलिंब थोडा कमी कडू आहे.
तिथून उतरून निघायचे नव्या रस्त्याने, कारण त्या रस्त्याने असंख्य चिंचांची आणि कवठांची झाडे असायची. चिंचा लागण्याच्या बेतात असायच्या, मात्र कवठं बऱ्यापैकी असायची ! घरी घेवून जाता यायची ! घरी पोहोचल्यावर महाशिवरात्र पोटात जाणवायची !
महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला असतो. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्री असते. असे असले तरी, या दिवशी शैव पंथीयांबरोबरच सामान्य जनही उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीचे महत्व वर्णन करण्यात आले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे.
उद्या ‘महाशिवरात्र’ आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा वार ! उद्या सोमवार तर आहेच, पण ‘महाशिवरात्र’ देखील आहे. आता तिकडं महाशिवरात्रीला केव्हा जाणं होईल, काही सांगता येत नाही. असं काहीतरी आठवलं आणि लिहीलं !

3.3.2019

No comments:

Post a Comment