Saturday, March 16, 2019

मनातील गाणी

मनातील गाणी
नुकतीच गेले काही दिवस उच्च न्यायालयाला हिवाळी सुटी असल्याने, बाहेरगांवी जाता आले. प्रवास बऱ्यापैकी वेळ घेणारा असल्याने, प्रवासा दरम्यान गाडीत गाणे लावावीत का कथाकथन लावावे, हा एक प्रश्न होता. सोबत जास्त मंडळी असली की एकमत होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव इथेही येत होताच. शेवटी ठरले की एक दिवस माझ्या आवडीचे आणि इतर दिवशी त्यांच्या आवडीची गाणी लावावीत. कथाकथनाच्या विषयाने फारसा जोर धरला नाही.
'माझ्या आवडीच्या गाण्यांना एक दिवस तरी दिला, हे बरे झाले. इतर दिवशी तुम्ही तुमच्या आवडीची, हवी ती गाणे लावा, माझी काही हरकत नाही. पण ती ऐकतांना आपण गाणेच ऐकतो आहे, किमान असे तरी वाटू द्या. ते ऐकून यापुढे भविष्यांत कोणतेही गाणी ऐकायची मला दहशत बसायला नको.' मी आपली सरळ भीतीपोटी सूचना केली.
'तुमच्या आवडीची गाणी लावणार आहे ना, एक दिवस ? पुरे झाली तेवढी !' मुले आपल्यासोबत असली की सौभाग्यवती आपले काहीही ऐकत नाही. आपण लगेच अल्पमतात येतो. अशावेळी गप्प बसणे हिताचे असते. मी तेच केले.
त्यातल्या त्यात त्यांच्या अंदाजाने, मुलांनी पहिल्यांदा मला आवडतील अशी गाणे लावली. मी गाणी ऐकत होतो, काही वेळा उत्स्फूर्तपणे कोणी लिहिलेलं आहे आणि संगीत कोणाचे आहे, चित्रपट कोणता आणि आवाज कोणाचा ? लक्षांत असेल, तर त्या गाण्याची एखादी आठवण, चित्रपटाचा प्रसंग माझ्याकडून सांगीतला जाई. एकेक गाणे ऐकत असतांना, ते मला मनाने दूर कोठेतरी घेऊन जात होते. गत काळातील आठवणींची डोक्यांत गर्दी झाली.
सुरुवातीला गाणे लागले, सूर ऐकू आले आणि डोळ्यांसमोर प्रसंग उभा राहिला. जळगावच्या 'नटराज' थिएटरमध्ये बघीतलेला 'मॅटीनी शो' ! असे चित्रपट मॅटिनीलाच लागतात, कधीकाळी लागले असतील 'रेग्युलर शो' म्हणून ! ते सूर सांगण्याची गरज नव्हती, 'वो कौन थी' या चित्रपटातले होते. सन १९६४ शाळातील हा चित्रपट ! यातील गाणे कोणते लागणार, हा अंदाज होताच, त्याप्रमाणे सुरुवातीचे सूर लागले, आणि माझ्या तोंडातून पटकन निघाले, 'लग जा गले' आहे 'लता मंगेशकर' यांचे ! मदन मोहन यांचं अप्रतिम संगीत आहे. हे 'राजा मेहंदी अली खान' यांनी लिहीलेलं हे गाणं चित्रपटांत घेत नव्हते, ते घेतले ते 'मनोज कुमार' यांच्या आग्रहाने आणि नंतर या गाण्याने खरोखर इतिहास घडवला. निर्माते राज खोसला आणि दिग्दर्शकांनी, ‘हे गाणे घेतले नसते तर आमची चूक झाली असती’, हे नंतर कबूल केले.
यानंतर ‘शंकर जयकिशन' यांचा परिचित ठेका लागला आणि स्वर लगेच ओळखू आले. बस, गाणे लागणार होते - 'अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खतम, ये जिंदगी है कौनसी' ! सन १९६० मधील 'दिल आपण और प्रीत पराई', राज कुमार, मीना कुमारी आणि नादीरा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट. शैलेंद्र याने गीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजांत !
नंतर पुन: ‘शंकर-जयकिशन’ यांचेच संगीत ऐकू आले. वा, सन १९५५ सालातील 'श्री ४२०' या चित्रपटाचे संगीत सुरु झाले आणि 'प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यो डरता है दिल' याचे स्वर कानावर पडले. राजकपूर आणि नर्गिस लगटून सोबत जात असतात, आपल्या भविष्यातील, आपला दुर्दम्य आशावाद बोलून जातात, जाणवते त्या वेळी ती त्यांच्यातील आंतरिक ओढ ! ते एका स्वरात, गीतकार 'शैलेंद्र' यांच्या शब्दांत सांगतात,
रातों दसों दिशाओं से, कहेंगी अपनी कहानियाँ
प्रीत हमारे प्यार की, दोहराएंगी जवानियाँ
मैं न रहूँगी, तुम न रहोगे
फिर भी रहेंगी निशानियाँ -----------आपले मन विनाकारणच उदास होते. गाणे सुरूच असतात. गाणे ऐकविणाऱ्या यंत्राला भावभावना काय असणार ? जोपर्यंत बॅटरी आहे आणि रेकॉर्डींग व्यवस्थित आहे तोपर्यंत ते चालणारच !
तेवढ्यात 'अरेरेरे' असे 'आशा भोसले' यांचे खट्याळ स्वर झऱ्यासारख्या आवाजात खळखळत कानावर आला ! 'सीता और गीता' या सन १९७२ मधील चित्रपटातील किशोरकुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंदी गीत ऐकू आले. आनंद बक्षी यांचे गीत आणि राहुल देव बर्मन यांचे संगीत ! संजीव कुमार आणि स्वप्नसुंदरी हेमामालिनी डोळ्यासमोर उभे राहीले.
हवा के साथ साथ, घटा के संग संग
ओ साथी चल
मुझे लेके साथ चल तू, यूँ ही दिन-रात चल तू
सम्भल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू
ओ साथी चल- ओ साथी चल

'करवटें बदलते रहे सारी रात हम', हा लता मंगेशकर यांचा स्वर ऐकू आला. आप की क़सम' हा १९७४ सालातील चित्रपट ! 'आपकी कसम' यातील 'करवटें बदलते रहे सारी रात हम' या 'आनंद बक्षी' यांच्या गीताला 'राहुल देव बर्मन' यांनी सुरांत बांधले आहे. चित्रपट सृष्टीत 'सुपरस्टार' हे बिरुद सर्वप्रथम मिरवणारा 'राजेश खन्ना' आणि अपऱ्या नाकाची 'मुमताज' आपल्या डबडबलेल्या डोळ्यासमोर उभे राहतात. प्रतिमा दिसत नाही त्यांच्या ! मग गीताची परिणीती तर -
रूठ जायें हम तो तुम हमको मना लेना सनम
दूर हों तो पास हमको तुम बुला लेना सनम
कुछ गिला हो तो गले हमको लगा लेना सनम
टूट न जाये कभी ये प्यार की क़सम, आप की क़सम --------------- मात्र माणसाच्या आयुष्याची परिणीती कशांत होईल हे कोणाला सांगता येईल का ?

गाणी सुरूच होती - ‘कभी कभी’ या चित्रपटातील - कभी कभी मेरे दिलमें, हे कै. मुकेश तसेच लता मंगेशकर यांनी गायलेले आणि खळाळत्या संगीतात खय्याम यांनी बांधलेले गीत ! नवोढीची वस्त्रे लेवून, गत काळातील आठवणी आळवत, समर्थ अभिनेत्री राखी गात असते. ‘कभी कभी’ चित्रपट त्यातील वेगवेगळा अर्थ, आपल्याला आपल्या वेगवेगळ्या वयांत समजावतो. अमिताभ, शशी कपूर, राखी वहिदा रहीमान, नीतू सिंग, ऋषी कपूर ही मंडळी, चित्रपट सृष्टीच्या नभोमंडळातील तारे ! हा १९७६ च्या दरम्यानचा चित्रपट !
‘कोरा कागज’ या चित्रपटातील - ‘मेरा जीवन, कोरा कागज, कोरा ही रह गया’ ! कै. किशोरकुमारने काही गाणी अशी काही म्हटली आहे, की गाण्याचे स्वरसुध्दा न ऐकता, आपल्याला ऐकू येतात ते कै. किशोरकुमारचे सूर ! चष्मा घातलेली जया भादुडी झाडाच्या खोडाला टेकून बसली असते, हातात कसलेसे मोठे पुस्तक व समोर एकही पान नसलेले झाड, बाजूने आगगाडी धूर सोडत वेगात जात आहे. जीवन व त्यातील समस्या कोण निर्माण करत असेल बरं ?
नंतर ऐकू येते ती हार्मोनिअमवरील स्वरांची ओघळती व ओघवती लड ! हो, तीच ! ‘मुक्कदर का सिकंदर’ या चित्रपटातील आपल्या सर्वांची त्या वेळी झोप उडवणारी ‘रेखा’ ! म्हणते - इश्कवालोंसे ना पुछो, की उनकी रात के आलम —— सुरू होते, ‘सलामें इश्क, मेरी जान’ ! कल्याणजी आनंदजी यांचे हे कानाला मोहवणारे व मनाला वेदना देणारे संगीत ! १९७७ सालातील हा चित्रपट ! अमिताभ आणि रेखा, यांनी आपल्यावर केलेल्या चित्रपटातीत विविध प्रसंगांतील लयलूटीतील हा न विसरतां येणारा प्रसंग !
नंतर ‘चुपके चुपके’ दरवाज्या आड उभा असतो, तो ‘ही मॅन’ धर्मेंद्र ! घरांत सर्व कुटुंबियांच्या घोळक्यात गांत असते, पडद्यावर शर्मिला टागोर, ‘अब के सजन सावन में’ ! लता मंगेशकरला कोणता आवाज शोभत नाही ? कै. सचिन देव बर्मन यांचे संगीत !
आणि गंभीर आवाजात ऐकू येतं, ‘मैं और मेरी तन्हाई, ——‘ ! कोणाचा असणार हा आवाज ? कुठं आलो आपण ? कहा आ गये हम ? हो, मी टी वाय् बी काॅमला असतांना हा लागला होता ! प्रश्न पडायचा, कसं काय काम केलं असेल त्यांनी ? पत्नी सोबत असतांना तिच्या सोबत ? बघावाच लागणार ! बघीतला शेवटी - सिलसिला ! पं शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया या शास्त्रीय संगीतातील दिग्गजांचे संगीत ! प्रत्यक्ष आयुष्यातील यांच्या असंख्य भल्याबुऱ्या, चविष्ट बातम्या ऐकून चित्रपटाला आलेली मंडळी ! अमिताभ व जया भादुडी आणि संजीवकुमार व रेखा यांना रूपेरी पडद्यावर बघत होती ! त्या निसर्गाच्या रंगीत कागदावर, कोणासही न काढता येणाऱ्या पार्श्वभूमीवर आवाज येत होता - ‘ये कहा आ गये हम’ !
गाणे शांतपणे सर्व ऐकले आणि मुलाला सांगीतले, आता थोडा वेळ काहीच लावू नको ! माणसाच्या मनांत पण आपल्या, इतरांच्या आयुष्यातल्या घटनांची गाणी वाजत असतात, पुन:पुन: घडत असतात. बाहेर दिसत नाही कोणाला आणि ऐकू पण येत नाही, आपण सोडून !

12.1.2019

No comments:

Post a Comment