Saturday, March 16, 2019

माझी पुष्पामावशी !

माझी पुष्पामावशी !
परवा सकाळी मंगळवारी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच मावसभावाचा मोबाईलवर मेसेज आला, ‘माझी आई मध्यरात्री गेली’. मी काॅम्प्युटरवर काम करत होतो. काही सुचेना, लक्ष लागेना. काॅम्प्युटरकडे बघत बघत तो यांत्रिकपणे बंद केला. उठलो, अन् मागच्या खोलीत जाऊन सौ. ला हे सांगीतले. नंतर शेवटी, कोर्टात येत नाही, हे कळवून टाकले. ‘पुण्याला वेळेत पोहोचणे शक्यच नव्हते, आणि जावून पण काय उपयोग असतो ? आपलं एक समाधान !
मग डोळ्यांसमोर दिसू लागलं, ते बालपण ! मी दुसरी-तिसरीत असतांना मामा-मावशांची कोणाचीच लग्ने झाली नव्हती. उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत आजोळचे बोलावणे ठरलेले असायचे, आणि मी जायचो. ही मावशी शिकवण्या घेई ! तिच्यासोबत शिकवणीला, तिच्या मैत्रिणींकडे, मंदीरात, फिरायला मी कायम सोबत असायचो. प्रत्येक दिवशी कोणाबरोबर फिरायला जायचे, हे मी ठरवायचो, मामाबरोबर का मावशीबरोबर ! ज्या कोणाकडे जायचो, तिथं माझी कोण म्हणून चौकशी व्हायचीच !
‘माईचा मुलगा आहे. सुटीचा आलाय !’ त्यांचे स्वाभाविक उत्तर असायचे. नंतर जर सुटीच्या दिवसांत, त्यांच्याबरोबर मी दिसलो नाही, तर तेच विचारत, ‘का रे, माईची मुलं, भाचेमंडळी आली नाही का ?’
घरापासून कोपऱ्यावर असलेल्या, काॅटन मार्केटच्या दत्त-मारूतीच्या दर्शनाला रोज जायचे हा तिचा नेम ! कधी चुकवला नाही तिने ! रोज रात्री मला झोपतांना गोष्टी सांगण्याचे काम, ती आवडीने करायची. तिच्या जवळच्या गोष्टी काही संपायच्या नाहीत.
माणसाच्या परिस्थितीच्या असंख्य अडचणी न कंटाळता ऐकणारा आणि वाटले तर, सोडवणारा पण एकच असतो. बस ! त्याच्याकडे गाऱ्हाणं मांडत असावी, ती पण ! या दुसरी-तिसरीतल्या मुलाला काय समजणार ? गरिबीत व संकटात खरी नातीगोती समजतात. नंतर लग्न झाले, बहुतेक १९७० साली ! मग तिचा आपोआपच संपर्क कमी झाला.इतक्या लांबवर भेटीला जाणं, त्यावेळी इच्छा असली, तरी परवडायचं नाही.
पुन्हा योग आला, तो मी पुण्याला एल् एल्. एम्. च्या परिक्षेसाठी जायचो, त्यावेळेस ! अगदी सन १९८५ नंतर ! साधारण दोन-तीन वर्षे परिक्षेसाठी ! निदान पंधरवाडा त्यांत जायचा, कारण पेपर सलग नसायचे ! त्यावेळी तिची मागची खोली, माझी स्टडीरूम व्हायची ! एल् एल्. एम्. झालो. मात्र नंतर पण काही तरी काम पुण्याला निघायचे आणि जाणं व्हायचं ! एकदा आईसोबत पुण्याला गेलो होतो. दोघा बहिणींची भेट झाली. आईने ‘रावेरला चलते का ?’ म्हटल्यावर तयार झाली. सोबत आली. बस ! तेवढाच तिचा मिळालेला, निवांतपणाचा सहवास. माझ्या बायकोशी प्रेमाने गप्पा, स्वयंपाकातील नीटनेटकापणा सांगणं, अगदी योगायोगाने त्यावेळी आलेल्या, आमच्या लग्नाच्या वाढदिवशी काहीतरी भेटवस्तू देणे ! मला जशी लहानपणी गोष्टी सांगायची, तशी माझ्या मुलांना पण तिने रोज गोष्टी सांगीतल्या. माझ्या मुलाबद्दल मात्र ती म्हणाली,
‘अरे, सर्व गोष्टी संपल्या. आरत्या झाल्या. स्त्रोत्र संपले, पण तुझा पोरगा झोपायचं काही नाव घेत नाही.’ त्यांत तक्रारीपेक्षा, नातवाचे कौतुकच जास्त होते.
इकडं मी औरंगाबादला आलो, तसं सर्वांकडेच जाणं जवळजवळ बंद झालं. फोनवर जी काय चौकशी होईल तीच !
तिचे जाणे तसे अनपेक्षित नव्हते, ते तिला होत असलेल्या त्रासामुळे ! मावसभाऊ व त्याच्या पत्नीला कराव्या लागणाऱ्या मावशीच्या सेवाशुश्रूसेने गुण यावा ही इच्छा ! पण अजून कितीही औषधपाणी व सेवाशुश्रूषा केली, तरी मावशीची प्रकृती सुधरण्याची काहीही शक्यता नव्हती, हे तिच्या ‘अल्झायमर’वर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनीच सांगीतले होते.
कधीमधी तिथं जाणं व्हायचं तर तसेच किंबहुना अजून वाईट स्थितीच दृष्टीस पडायची. काही वेळा मला व बायकोला ओळखायची, तर काही वेळा नाही.
‘कोण आलंय ?’ मावशीने आपल्या लाडक्या भाच्याला असं विचारणं, अपमानास्पद वाटत नव्हते, तर ह्रदयाला पीळ देणारे वाटत होतं. कुठेतरी शरीराच्या आंतील कप्प्यात कमालीच्या बंदोबस्तात साठवलेले पाणी डोळ्यावाटे टिपकायला आतुर व्हायचे. तशाच डोळ्यांनी, तोंडातून ओले उत्तर आवंढा गिळत यायचे -
‘मी, माधव भोकरीकर’ ! तिला माधव समजलेले नसे, मात्र -
‘हं, भोकरीकर म्हणजे रावेर !’ मावशी म्हणायची. मग काही तरी थोडावेळ गप्पा व्हायच्या ! आणि मधेच -
‘मला माफ कर, कोण तू ? माझ्या लक्षात रहात नाही आता !’ असे म्हणत पुन्हा विचारायची. मला पुन्हा उत्तर देणे भाग असायचे.
‘मी माधव भोकरीकर, आता रावेरला नाही, औरंगाबादला असतो.’ मी सांगायचो.
‘आणि ही कोण ? तुझी बायको स्वयंपाक चांगली करते.’ माझ्या बायकोकडे बघत विचारायची. माझ्या सुगरण मावशीने या अशा अवस्थेतपण दिलेल्या पावतीचा आनंद मानायचा, का तिने ओळखले नाही, याचं दु:ख मानायचं समजेनासे होई !
‘अरे, ही सूनबाई का तुझ्याबरोबर ? लक्षात नाही येत रे आता !’ मावशीच्या स्वरांत दु:खसुद्धा नसायचे. आपल्यालाच या संवादाने गलबलल्यासारखं व्हायचं !
अलिकडच्या दोन महिन्यांपूर्वीच्या भेटीत तर तिला काहीच समजत नव्हते ! मला काही वेळा तर वाटायचं की ‘देवा, हिच्या वेदना संपविण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही का ? नसेल, तर हिला बोलावून तरी घ्यावे. असा सर्वांना त्रास देण्यात काय आनंद मिळतो तुला !’ हे आपल्या सर्वांच्या मनांत खूप वेळा येतं, पण बोलायचा धीर क्वचितच होतो.
अजूनही गुरूवारी ‘धन्य धन्य हो, प्रदक्षिणा सद्गुरूरायाची’ किंवा ‘श्रीगुरूदत्ता जय अवधूता’ हा आर. एन्. पराडकरांचा आवाज ऐकला की मला तिची आठवण येते. आठवण आली, की तिला फोन करायचो. तिला वाटलं, लक्षात आलं तर ती बोलायची ! आता जरी आर. एन. पराडकरांचे 'दत्त भजन' लागले आणि आठवण आली, तरी मला कोणाला फोन करता येणार नाही. कधी काळी जावून गोष्टी पण आता ऐकायला मिळणार नाही, आणि मावशी तर लक्षात येण्याच्या पार निघून गेली आहे.

10.3.2019

No comments:

Post a Comment