Saturday, March 16, 2019

नववर्ष व कॅलेंडर

नववर्ष व कॅलेंडर
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या शाळेला ‘नाताळची सुटी’ लागायची, ती जवळपास बारा दिवस असायची. अर्थात त्या सुटीचा आम्हा मुलांना, आमचे शिक्षक ‘अभ्यासक्रम मागे राहिला आहे’ या कारणाने शाळेतच त्या विषयांचे जास्तीचे तास घेवून, आनंद घेवू द्यायचे नाही, हा भाग वेगळा !
त्या नाताळच्या सुटीत मात्र अभ्यासाठीचे वातावरण थोडे निवांत असल्याने, त्या निमित्ताने आम्हा मुलांत चर्चा सुरू व्हायची, ती ‘कोणत्या दुकानदाराने या वर्षाचे कॅलेंडर छापले आहेत’ याची ! सर्वांनाच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पुढील नवीन येणाऱ्या वर्षाचे वेध लागत असत. मग त्या निमित्ताने गाजावाजा सुरू होई, त्यांत विषय डायऱ्या, संक्रांतीचे वाण, कॅलेंडर, नवीन संकल्प हे असत. नवीन संकल्प, डायऱ्या आणि संक्रांतीचे वाण हे विषय, आम्हा मुलांच्या दृष्टीने काही कामाचे नसत. मात्र ‘कॅलेंडर’ हा विषय फार जिव्हाळ्याचा व महत्वाचा असे.
‘कॅलेंडर’ यांवर आमच्यात सांगोपांग चर्चा पण होत असे. कॅलेंडर या वर्षी तरी कसे असावेत, त्यांवर चित्रे कोणाची असावीत, कोणत्या कागदावर असावीत, ती कशी असावीत येथपासून ते यंदा ‘कॅलेंडर’ कोणी छापावयास हवी, हे पण असे. चित्रकलेत माझ्यासारखे अनेक जण गती नसतांना पण चित्रातील चुका काढून दाखवायचे. पण खरी मजा यायची, ती गांवात कोणी, कोणत्या दुकानदाराने कॅलेंडर्स छापली, हे नक्की समजलं की ! मग आमची मोर्चेबांधणी सुरू होई; आपल्याला सर्वात प्रथम ते कसे प्राप्त होईल ते याची. ज्यांना अगोदरच कोणाकडून मिळालेलं असेल, त्यांना तज्ञ व अनुभवी सल्ला येथे आमच्या कामांस यायचा. अडचण असायची, त्यासाठी दुकानातून काहीतरी खरेदी करायला लागे कारण कॅलेंडर मिळावं, यासाठी त्याच्या दुकानातून काही तरी वस्तू घेतल्याशिवाय मिळणार नाही हे नक्की असायचं ! मग शेजारपाजाऱ्यांना पण काही खरेदी करावयाची असेल तर, ‘शामची आई’ या पुस्तकातील धड्याप्रमाणे ‘शेजाऱ्यांना मदत करावी’ ही शिकवण कामास येई.
‘मुलं शहाणी आहेत, अगदी दुकानातून काही हवं का, हे विचारून आणून देतात पहा वस्तू !’ शेजारच्या काकूंच्या कौतुकाची थाप, कॅलेंडरवरील चित्र डोळ्यांसमोर दिसत असल्याने, जाणवत नसे. पण मग त्यांना हवी असलेली वस्तू त्यांच्याकडे आणि त्यासोबत मिळवलेले कॅलेंडर आपल्याकडे, अशी वाटणी असे.
अहो, त्यावेळी रूपयांत खर्च हाच कमी प्रमाणात होई, पैशांमधेच वस्तूंच्या खरेदी होत, रूपया क्वचितच हाती मिळे. दूध सव्वा रूपया लिटर, साखर दोन रुपयाचे दरम्यान, गोडेतेल सहा रुपयाचे दरम्यान ! भाज्या दहा ते चाळीस-पन्नास पैसे ! घोळ-चिवळ वगैरेचे तर भाजीवाली पैसे पण घेत नसत. खर्च या प्रमाणात, तर स्वाभाविक उत्पन्न पण याच प्रमाणात ! या अशा सगळ्या काटकसरीच्या प्रयोगात आणि तुटपुंज्या व कमी रकमेच्या बजेट काळांत, काय कोणत्या खरेदीवर कॅलेंडर मिळणार ? मग कोणाची तरी अदपाव-पावशेर सुपारी घेतली तरी, त्या दुकानदाराला कॅलेंडर मागण्याचा हक्कआपल्याला प्राप्त होतो, हा आमचा समज ! दुकानदार पण हसून कॅलेंडर देत असे, त्याची पण जाहीरात होई. काही वेळा शेजारच्याला कॅलेंडर देतांना, ‘कॅलेंडर संपली’ असे पण ऐकून घ्यावे लागे. कोणताही माल व वस्तू मिळायची, पण कॅलेंडर कसे संपायचे, हे आश्चर्यकारक होते. पण बहुतेक तो द्यायचाच, त्यासाठीच तर त्याने पण छापलेले असत. त्यांच्या दुकानांतला कोणीतरी सूक्ष्मदर्शी कामाला असलेला, मात्र ‘याला परवा दिलं होतं’ हे त्याच्या मालकाच्या लक्षात आणून देवून, प्रामाणिकपणे नोकराचे आपल्या मालकाप्रती कर्तव्य बजावी. चमत्कारिक अवस्थेतून बाहेर पडायला मार्ग शोधावाच लागे.
‘परवाचे दिलेले नटीचे होते, आता देवाचे द्या.’ मी. बिचाऱ्या दुकानदाराला निष्कारण धर्मसंकटात पाडून, आम्ही ते देवाचे कॅलेंडर घेवून दुकानाबाहेर पडत असू.
त्यावेळी कॅलेंडर छापणारे दुकानदार म्हणजे लोहार स्टोअर्स, मे. आर. जी. लोहार, श्रीराम कन्हैयालाल अग्रवाल, मे. अवधूत मगन वाणी वगैरे ! काही ठिकाणी कॅलेंडर्स असायची, पण तेथील वस्तू आम्हाला विकत आणता येत नसत. खतविक्री करणाऱ्यांकडे मस्त कॅलेंडर्स असत, पण खते विकत घ्यायला आम्हाला कोण पाठवणार ? मग वडिलांसोबत त्यांच्या दुकानांत जायचे आणि निघतांना, ‘भाऊ कॅलेंडर घ्यायचे राहिले.’ म्हणत त्यांना आठवण करून द्यायची. दुकानातील माणूस निमूटपणे मग बांधलेलेच असल्याने देत असे. काही वेळा पुन्हा बसावे लागून, ‘अण्णा, बसा हो.’ म्हणत ते चहा सांगत. त्यांच्या चहा पिण्याचा वेळात आपले कॅलेंडर कोणी विसरून जायला नको, म्हणून मनाची जी घालमेल होई ती सांगता येत नाही आणि आज पण विसरतां येत नाही.
कॅलेंडरवर आता अजूनही आठवतात त्या ननट्यांच्या विविध पोझेस मधील चित्रे ! ती वैजयंतीमाला, नूतन, मुमताज, आशा पारेख, हेमामालिनी, रेखा, शर्मिला टागोर या तत्कालीन चित्रपटसृष्टीतील गाजत असलेल्या नट्यांची आणि धर्मेंद्र, राजकुमार, राजेंद्रकुमार, जितेंद्र, अमिताभ, मिथुन वगैरे नटांची चित्रे ! काही वेळा एखाद्या चित्रपटातील प्रसंगांचे पण चित्र असायचे ते ! योगायोगाने आपण जर तो सिनेमा बघीतला असेल, तर निष्कारणच काॅलर ताठ झाल्यासारखे वाटायचं. अर्थात तशी वेळ अपवादानेच यायची. रावेरसारख्या गांवात, नवा चित्रपट लागून, तो आम्हाला पहायला मिळून, मग त्याचे कॅलेंडर त्याच वर्षी आम्हाला मिळणं, हे कठीणच ! मग रस्ताने लावलेल्या पोस्टरवरून नट-नट्यांना ओळखून त्यांत समाधान मानावं लागे. विजय माल्याची कॅलेंडर्सचे नांवच आता ऐकतोय, पण कधी हातात मिळाले नाही बघायला, आता तर ती पण शक्यता नाही.
काही वेळा सुनील गावसकर, विश्वनाथ, बेदी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर वगैरे सारख्या क्रिकेटपटूंची पण कॅलेंडर्स असत. परदेशी खेळाडू पण अवतरत काही वेळा यांवर ! वह्या तर हमखास यांच्या चित्रांनी सजलेल्या असत.
देवादिकांची चित्रे, संत मंडळींची चित्रे जास्तीत जास्त असत ! त्यांतील एखाद-दुसरं चित्र जर खरोखर चांगले, आकर्षक असेल, तर ही अशी चित्रे कापून, त्याला फोटोग्राफरकडून नीट मढवून, ते फोटो म्हणून बैठकीत लावली जात. गणपती, बालाजी, लक्ष्मी, हनुमान, रामपंचायतन, दत्तगुरू, देवी यांना मागणी जास्त असे. संतमंडळीत मला आज पण आठवतात, ते म्हणजे संत सावता माळी यांच्या ह्रदयातील पांडुरंग आणि समोर भाजीपाल्याचा मळा, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज, गोरा कुंभार हात जोडलेल्या अवस्थेत आणि त्याच्या मडक्यांच्या आव्यातील मांजरीची पिल्ले ! किती सांगावीत ? आमची संस्कृती, धर्मवैशिष्ठ्ये, संतपरंपरा या कॅलेंडरच्या रूपात घरोघरी जिवंत होती, प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर होती. वेड्यावाकड्या चित्रांची पण कॅलेंडर्स असतील, पण ती आमच्या दृष्टीस पडत नसत, फक्त ऐकीवात येत.
मला आठवते, मी जळगांवला शिकत असतांना, तर भाजीवाले, कांदे-बटाट्यांचे व्यापारी पण कॅलेंडर छापायचे आणि भाजी घेतल्यावर आवर्जून द्यायचे. एका वर्षी तर घरांत इतकी कॅलेंडर्स झालीत, की ‘हे तर कसे रसवंती, गुऱ्हाळासारखे वाटतेय’ असे एक म्हणाले.
कॅलेंडर छापण्यासाठी दसऱ्यापासून तयारी होई. त्या कंपनींचे प्रतिनिधी त्यांच्याकडे असलेल्या चित्रांचा भलामोठा कॅटलाॅग घेवून प्रत्येक महत्त्वाच्या दुकानांत जात. ती सर्व चित्रे दाखवायची, त्याचे दर, त्यांवर छापला जाणारा मजकूर, कॅलेडरची पाने, त्याचा पोत वगैरे सर्वांवर कॅलेंडरची किंमत ठरे. ही सर्व छपाई बहुतेक दक्षिण भारतातील प्रांतात होई. तेथून साधारणत: डिंसेबर पर्यंत ही कॅलेंडर्स येत. नाही आली तर दुकानदार मग त्या प्रतिनिधीला पैसे देण्यात हात आखडत. पैसे कॅलेंडर आल्यानंतरच पूर्ण दिले जात. मात्र ते आले नाही. तर दुकानदारांपेक्षा, आमच्याच जीवाची घालमेल सुरू होई.
आता कॅलेंडर म्हणजे चित्रे गेली, त्याची ओढ कमी झाली. का कमी झाली ? त्यातील वैफल्य समजले का पोकळपणा समजला, कोण जाणे. तशी आता दुकानांत जास्त देतांना पण दुकानदार दिसत नाही. जाहीरातीचे प्रकार वाढलेत. आर्जवी पद्धतीची जाहिरात, समजावून सांगण्याची जाहिरात, आपल्या विवेकाला व सद्सद्विवेक बुद्धीला साद घालणारी जाहिरात गेली. आता आपल्यावर आक्रमकपणे कोसळणारी, आपल्याला फसवणारी, मूर्ख बनविणारी असे तिचे स्वरूप झाले. लहानपण संपून मोठं झाल्यावर जाणवलं, लक्षात आलं ते हे ! या फसव्या जगात महत्व येणार ते फसव्या नात्यांना, फसव्या जाहिरातींना, हे स्वाभाविक; त्यांत विशेष काही नाही.
आता पण मला कॅलेंडर मिळते, ते मी कॅलेंडर घेतो, मात्र काही खरेदी केल्यावर मिळत नाही ते, तर विकत घेतो ! कारण चित्र काही वर्षभर बघणे होत नाही, दिनांक मात्र वर्षभर बघाव्या लागतात. मग फक्त दिनांक समजण्यासाठी ‘कालनिर्णय’ घ्यावे. काही बॅंका, मोठ्या कंपन्या छापतात. ‘कालनिर्णय’ मधे तिथी वगैरे सर्व माहिती असतेच. अडचण पडत नाही. अर्थात गुढीपाडव्याला नववर्षाचे पंचांग असतेच, त्यांत खंड नाही.
आपल्या स्वप्नातलं आयुष्य प्रत्यक्षात उतरेल तेव्हा उतरेल, पण कॅलेंडरच्या रूपात तरी आपण अनुभवून घ्यावे, हा पण विचार असलेली मंडळी, याची जाहीरात करत ! तुम्हाआम्हा सर्वांना ती त्यांची स्वप्न या रूपांत देत असत. आपण पण ती घेत असू ! आपली तरी स्वप्न कोणती वेगळी असायची ? आमचं तर स्वप्न बघायचंच वय ! परमेश्वराने त्याची सर्व शक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता वापरावी, ही आपली इच्छा ! आपण काही त्याचे इतके लाडके नाही, की दुकानदाराकडून आणून कॅलेंडर आपल्या घरात ठेवले, तरी आपली स्वप्ने पूर्ण होतील. चालताचालता स्वप्न बघायचं वय सरलं, चित्रांची कॅलेंडर्स ज्यांच्या कामाची असतील त्यांनी घ्यावी; आपल्या कामाची नाही, याची जाणीव झाली. आणि आपल्याला फक्त बसल्याबसल्या सहज दिसेल अशा बारा महिन्यांच्या दिनांकाचे कॅलेंडर आणि ज्यात शनिवार-रविवारचे पण स्वतंत्र पान आहे, अशी डायरी गरजेची आहे, हे समजलं ! शनिवार रविवार सुटीचा दिवस मानतात, पण आम्ही कामांत असतो, करावंच लागतं. आता अशी चित्रांची कॅलेंडर्स जास्त कोणी छापत पण नसावीत, दुकानांत त्यावेळच्या आमच्या वयातील मुलं दिसत नाही मागतांना. स्वप्नसृष्टीतून बाहेर येवून सत्याची जाणीव झाली की मग असे चित्रांचे कॅलेंडर मागे पडते.

14.1.2019

No comments:

Post a Comment