Saturday, March 16, 2019

राग - तोडी

राग - तोडी
मी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असेल, जळगांवच्या नूतन मराठा कॉलेजला ! त्यावेळी जळगांवला पाच चित्रपटगृह होती. चित्रा टॉकीजला मराठी चित्रपट हमखास लागत. तिच्या जवळच पुढच्या बोळवजा गल्लीत अशोक टॉकीज होती. तिथं त्यावेळी सिनेमा लागला होता, ‘मीरा’ ! सिनेमे बघण्याची इच्छा त्यावेळी तर असायचीच ! या सिनेमाशी संबंधीत नांवे तर खरंच जबरदस्त होती, त्यामुळे हा बघीतलाच पाहीजे असे ठरलं ! तसं तर, मला एकट्याला सिनेमालाच काय, पण चहाला पण एकटं जाणं आवडत नाही, मी जात नाही. मग ‘सिनेमाला जावू’ म्हणून, माझ्या मित्राला तयार केले. ‘मीरा’ या नांवावरून तो नाराज होता. धार्मिक चित्रपट काहींना आवडत नाही, पण त्यांत विनोद खन्ना, अमजदखान, हेमामालिनी, डॉ. श्रीराम लागू, शम्मी कपूर, शाहू मोडक, ओम शिवपुरी वगैरे मंडळी आहे, म्हटल्यावर तो यायला तयार झाला.
योगायोगाने माझी आई पण आली होती, जळगांवला त्यावेळेस ! तिला पण सिनेमाला येण्यासाठी आग्रह केला, ‘चल’ म्हणून ! ती शक्यतोवर चित्रपट बघायचीच नाही. पण चित्रपटाचे संगीत पं. रविशंकर आणि पं. विजय राघव राव यांनी दिले आहे. त्यातील गाणी वाणी जयराम आणि पं. दिनकर कैंकणी यांनी म्हटली आहे; हे सांगीतल्यावर, तिने मग जास्त ताणले नाही. ती यायला तयार झाली. नाहीतरी तिचे आमच्या गांवाला सिनेमाला जाणे, म्हणजे दुर्मिळच ! तिची आवड म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ! धार्मिक सिनेमा आहे, यांत शास्त्रीय संगीतातील कलाकार मंडळी पण आहेत, हे बघीतल्यावर, ती पण तयार झाली. सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गुलजार यांचे होते, आणि त्यातील गीते म्हणजे तर संत मीराबाईंच्याच रचना !
संत मीराबाईंच्या जीवनावर आधारलेला हा ऐतिहासिक व्यक्तीचा भव्य चित्रपट ! राजघराण्यातील असलेली आणि राजघराण्यांच्या दिलेली, ही विरक्त, संन्यस्त वृत्तीची राणी ! भगवान श्रीकृष्णाला आपले सर्वस्व मानणारी, 'मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा ना कोई' असे म्हणत, केवळ आपले आयुष्य जगणारीच नाही, तर आयुष्य संपविणारी देखील ! ‘मीरा’ या चित्रपटांत, हिंदी चित्रपटसृष्टीतील स्वप्नसुंदरी समजली जाणारी हेमामालिनी, यांनी ही 'मीराबाईची' भूमिका समर्थपणे उभी केली आहे. संत मीराबाईचे आयुष्य देखील स्वप्नवत गेले, ते श्रीकृष्णाच्या नामस्मरणांत ! मीराबाईचे पती राणा भोजराज, याचे काम विनोद खन्नाने केले आहे. पत्नीला न्याय द्यावा, का राजाचे कर्तव्य म्हणून तिला दंडीत करावे, या द्विधा मनस्थितीतील, अगतिक वाटणारा राणा भोजराज ! पत्नीला जशी विविध नाती सांभाळायची असतात, तसेच पतीला पण आपल्या वेगवेगळ्या, म्हणजे घरातील आणि समाजातील नात्यांना सांभाळून घ्यावे लागते. दोघांना ही तारेवरची कसरत सुखरूपपणे करता आली, तर या दोघांचा संसार सुखाचा होतो, त्यांना संसारसुख मिळते, नाहीतर ते कठीण होऊन बसते, संसाराच होत नाही. पती-पत्नीची नाती वाऱ्यावर उडतात, ते आपल्या संसाराचे अस्तित्व घेवूनच ! चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांचा हा दोघांच्या मनस्थितीतील प्रेम आणि दुरावा दाखविण्याचा प्रयत्न, हा आपल्याला माहित असलेल्या मीराबाईंच्या चरित्रापेक्षा, वेगळे भाव घेऊन मांडलेले चरित्र, या चित्रपटात या अशा वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा होता. हा चित्रपट मात्र आर्थिकदृष्ट्या म्हणावा तसा यशस्वी झाला नाही म्हणतात, पण रसिकांना, जाणकारांना मात्र त्यांनी, या चित्रपटाद्वारे खूप काही दिले. पं. रविशंकर यांचे अप्रतिम संगीत आणि त्याला असलेली आणि पं. विजय राघव राव यांची साथ ! यांनी दिलेली संत मीराबाईची भजने आणि वाणी जयराम तसेच पं. दिनकर कैंकणी यांच्या आवाजांत !
या चित्रपटाचे संगीतकार भारतरत्न पं. रविशंकर, जगद्विख्यात सतारवादक ! त्यांनी खूप पूर्वी काही चित्रपटांना संगीत दिले होते, अलिकडच्या काळात नाहीच, आता तर ते आपल्यातच नाही ! पद्मश्री पं. विजय राघव राव हे विख्यात बासरीवादक ! यांचा चित्रपटसृष्टीशी थोडा संपर्क असायचा, तो भारत सरकारतर्फे विविध 'डॉक्युमेंटरी' करण्याच्या निमित्ताने ! ही दोन्ही नांवे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मोठी, वजनदार नांवे ! त्यातील गीते गाण्यासाठी गायक व गायिका त्यांनी निवडले होते, ते वाणी जयराम आणि पं. दिनकर कैंकणी ! वाणी जयराम पण हिंदी चित्रपटसृष्टीत जास्त रूळली नाही. पं. दिनकर कैंकणी हे तर बोलूनचालून शास्त्रीय गायकच ! यांचा आणि चित्रपटसृष्टीचा माझ्या माहितीप्रमाणे संबंधच आलेला नाही. वाणी जयराम यांनी, या चित्रपटांत संत मीराबाईच्या सर्वच रचना अप्रतिमपणे म्हटल्यात ! पं दिनकर कैंकणी सोबत गायलेली रचना आणि इतर पण सर्व रचना, कमालीच्या कर्णमधुर आणि ह्रदयाला भिडणाऱ्या ! संत मीराबाईंच्या भक्तीभावाने ओथंबलेल्या प्रासादिक शब्दांना, पं. रविशंकर यांचे संगीत आणि स्वर वाणी जयराम यांचा !
चित्रपटाची कथा तर बहुतेकांना माहितीच आहे. आपल्या भक्तिभावासाठी घरदार सोडणारी ही कृष्णभक्त संत मीराबाईचे पहिले गीत सुरु होते, 'मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोई', ती बसलेली असते आपल्या वडिलांजवळ ! ती गात असलेले गीत, तिची सखी लिहून घेत असते, मीराबाईच्या वडिलांच्या डोळ्यातील वात्सल्य दिसत असते. मीराबाईच्या विवाहापूर्वी हा प्रसंग, तिच्या समोर कृष्णाची मूर्ती असतेच ! नंतरचे गीत आहे ते मीराबाईचा विवाह झाल्यावर, तिच्या लग्नाची वरात जात असते,ती सासरी जात असते त्यावेळचे ! मीराबाई डोलीत असते आणि मागे गीत ऐकू येते - ' बाला मै बैरागन होंगी'. इकडे सासरी आल्यावर, तिला आता कृष्णाशिवाय कोण ? मग आपोआपच ओठावर येते 'करूणा सुनो' ! ती आपले मन रिझवत मंदिरात म्हणत - 'शाम मने चाकर राखोजी' भगवान कृष्णाला विनवत असते ! 'मै सांवरे के रंग राची' म्हणत वाळवंटात देखील आनंदात नामस्मरण सुरु असते मीराबाईचे. 'जागो बँसीवाले' म्हणत मंदिराच्या ओट्यावर बसत, अत्यंत साध्या पेहरावात, करुणेने त्याला जागवत असते. 'बादल देख दरी' हे आळवत कृष्णाच्या मंदीरात. 'जो तुम तोडो पिया, मै नाही तोडू' हे गीत तर, मीराबाईच्या होणारी जीवाची घालमेल दाखवते. 'अरे तुझ्याशी प्रीत तोडली तर कोणाशी प्रीत करावी ?' म्हणत शेवटी मीराबाई घर सोडून जाते. मीराबाईचे कृष्णप्रेम, तिचे सर्वसामान्य लोकांमध्ये वावरणे, गाणे-नाचणे हे स्वाभाविकच सासरी पसंत नसते. त्यातून विसंवाद होतात, परिणामी याचा, घरादाराचा त्याग करायची भावना प्रबळ होते, घराचा त्याग करते.
घरदार सोडून, सर्व भक्तमंडळीच्या सोबत वारीसाठी जात असलेली मीराबाई - 'करना फकिरी फिर क्या दिलगिरी, सदा मगन मे रहेना जी' म्हणत आनंदाने त्यांच्यासोबत विहरते. हत्ती, घोडे, बंगला हे सर्व सोडून आल्याचे तिचे बोलणे, ती हसत म्हणत असली तरी, ते ऐकतांना आपले हृदय मात्र पिळवटून जाते. नदीनाल्यातुन, डोंगरदऱ्यातून ही फिरत असलेली राजकन्या, आणि राजाची राणी, सर्वस्वाचा त्याग करून जात असते, जमिनीवर पण झोपावे लागेल, याची कल्पना आहे हे तीच सांगत असते, आपल्या भगवंताला, त्या गिरीधर गोपाळाला ! कशासाठी जात असते, कुठे जात असते, सर्वस्व मिळवण्यासाठी आणि ते मिळणार असते भगवान श्रीकृष्णाच्या पायापाशीच ! त्यानंतर 'मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा ना कोई' हे 'संन्यासिनीची वस्त्रे अंगावर परिधान करून, मंदीरात म्हणत असते, त्यावेळी पायऱ्या चढत, कमरेला काहीही वस्त्र नसलेले एक बालक रांगत रांगत पायऱ्या चढत वर येत असते, तिच्याकडे येत असते का भगवंताकडे येत असते का प्रत्यक्ष हा लंगडा बाळकृष्ण तिच्याकडे येत असतो ? तत्कालीन तानसेनापेक्षा वरचढ असे कोण गाऊ शकतो, या उत्सुकतेने किंवा शंकेने, सम्राट अकबर येतो; तर मिया तानसेनला कल्पना असते, या दैवी भक्तीची आणि त्यातून होणाऱ्या सुरील्या भावनेची. हे जाणून नंतर पायाशी येऊन बसतो तो भजन ऐकण्याच्या निमित्ताने सम्राट अकबर आणि मिया तानसेन ! मीराबाईच्या गीतातील भाव ऐकून स्वतः तानसेन तिच्या गाण्याला साथ करून गाऊ लागतो आणि ती डोळे उघडूनपहाते, हसते आणि त्याच्यासोबत गाते. अप्रतिम भाव !
चित्रपटातील शेवटचे दृश्य आणि रचना - ‘एरी तो मैं प्रेमदिवानी’ ! ही तोडी रागातील रचना आणि सोबतचे दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारे ! संत मीराबाईला विषाचा पेला पिवून जीवन संपविण्याची दिली गेलेली शिक्षा, ती आपल्या अंतीम, शेवटच्या महायात्रेला निघालेली, सर्व जनता मूकपणाने तिच्या सोबत ! राणा भोजराज, मीराबाईचा पती याची अगतिकता,लोकांचे तिच्याकडे, तिच्या चालण्याकडे पहात पहात धडपडत चालणे आणि मागे ‘एरी तो मैं प्रेमदिवानी’ हे शब्द आणि तोडी रागाचे सूर ! पांढऱ्या शुभ्र साडीतील, हातात एकतारी घेऊन निघालेली मीराबाई ! चेहऱ्यावर एक प्रकारचा निश्चय, परमेश्वराला, आपल्या गिरिधराला, कृष्णाला आता भेटायला मिळणार याचे समाधान, कृतार्थता ! तोंडाने 'एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने कोई' म्हणत जेंव्हा भगवान श्रीकृष्णाच्या मंदीरात येते, तो तर बांसरी ओठाला लावूनया सर्वाकडे बघत हसतच असतो. आपल्या भक्ताची ही आता शेवटची अवहेलना, यापुढे तिला वेदना सहन करू द्यायचाच नाही. कायमचे आपल्याजवळच बोलावून घ्यायचे, मग ही मंडळी तिला त्रास द्यायला शोधणार तरी कसे ? मीराबाई तिथे सर्वांना फक्त मंदिरात जातांना दिसते आणि नंतर तिथं जाऊन बघीतल्यावर, फक्त तिची एकतारी असते. धूपाची वर्तुळाकार वरवर जाणारी धुराची वलये, मागील खिडकीतून येणारी प्रकाशकिरणे ! वाळवंटातील पुढे पुढे जात,आपल्या दृष्टीसोबत, उमटत जाणारी तिची फक्त पाऊले, बस ! ती दिसत नाही, कशी दिसणार ? तिचा रस्ता तर आता भगवंताचा असतो, तो तिलाच दिसत असतो. तिलाच त्या रस्त्याने येण्याची भगवंताने परवानगी दिलेली असते. डोळ्यांसमोरचे चित्र अजून हलत नाही. एखाद्या भक्ताच्या प्राणापलीकडच्या भक्तीभावाचे, या अशा करुण अवस्थेत रूपांतर करून त्या भगवंताला तरी काय मिळते कुणास ठावूक ?
करुण आणि भक्ती, असे दोन्ही रसाविष्कार दाखविणारा हा 'तोडी' राग ! 'एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने कोई' या मीराबाईच्या गिरीधर गोपालाबद्दलच्या भावनेला, भजनाला 'तोडी' या राग रंगापेक्षा अजून दुसरा कोणता राग योग्य असणार ? पं. रविशंकर यांनी अप्रतिमपणे बांधलेल्या या रागातील रचनेस, गायिका वाणी जयराम हिने मनापासून साथ दिली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दहा थाट जे मानले गेले आहेत, त्यांतील ‘तोडी’ हा एक थाट आणि याच नांवाचा राग पण ! याचे विविध प्रकार बिलासखानी तोडी, गुजरी तोडी, देसी तोडी, हुसेनी तोडी, तसेच आसावरी तोडी याला कोमल रिषभ आसावरी पण म्हणतात. मिया की तोडी किंवा दरबारी तोडी किंवा शुद्ध तोडी याला आपण तोडी म्हणून ओळखतो. सकाळी उशीरा म्हणजे दुसऱ्या प्रहराला गायला जाणारा, हा संपूर्ण जातीचा राग !
आरोह - सा रे ग मा ध नी सा
अवरोह - सा नि ध प मा ग रे सा
वादी - कोमल धैवत आणि संवादी - कोमल गंधार
यांत रिषभ, गंधार आणि धैवत हे कोमल आणि किंचीत खालच्या स्वरात म्हणजे अति कोमल घेतात, तर तीव्र मध्यम हा तीक्ष्ण वाटेल इतपत तीव्र घेतात. बाकी सर्व स्वर हे शुद्ध आहेत. भक्ती आणि करूण रस असलेला हा राग. याचा पूर्वांग षडज ते पंचम आणि उत्तरांग धैवत ते षड्ज असा, पूर्वांग आणि उत्तरांग दोन्ही सारख्याच प्रभावाने गाता येतो. गांधार मध्यम धैवत आणि निषाद हे स्वर आणि त्याचा योग्य वापर म्हणजे या रागाचा प्राण !
खूप वर्षांपूर्वी पुण्याच्या 'सवाई गंधर्व महोत्सवाला' गेलो होतो. तीन दिवस पूर्ण रात्रभर आणि पहाटेपर्यंत बसलेलो होतो. उस्ताद बिस्मिल्लाखां, पं. भीमसेन जोशी, पं. फिरोज दस्तूर, विदुषी गंगुबाई हंगल, पं. जसराज, पं. राजन मिश्रा आणि साजन मिश्रा, उस्ताद अली अकबर खा, उस्ताद अमजद अली खा, पं. जितेंद्र अभिषेकी, उस्ताद रशीद खान, विदुषी परवीन सुलताना, पं. प्रभाकर कारेकर, येसूदास, विजय कोपरकर अशी काही मंडळी त्यावेळी ऐकलेली आठवतात. त्यावेळी ऐकलेली बरीच मंडळी आता तर आपल्यांत नाहीत. 'पं. भीमसेन जोशी' हे पण आपली देखरेख आता 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' या मार्फत वरून ठेवतात. यंदा पुण्याहून पुढे जायचे होते. दरम्यान हा संगीत महोत्सव आला. सवाई महोत्सवाला जाण्याची इच्छा आणि कोर्टाचे काम, या कात्रीत माझे मन. शेवटी मुलाने पास काढला, माझ्याबरोबर स्वतः यायचे आहे म्हणून सांगीतले. मग वेळ काढून ऐकायला गेलो. दोनच दिवस होतो, १२ आणि १३ डिसेम्बरला ! महोत्सवातील सर्व कार्यक्रम पण ऐकता आला नाही. अजून ऐकता आला नाही तो राग तोडी ! येथेच मागे पं. भीमसेन जोशी, पं. राजन मिश्रा आणि पं. साजन मिश्रा यांचा 'तोडी' ऐकला होता. आदल्या दिवशीचा कार्यक्रम ऐकता ऐकता, दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली होती. तोडी रागात गायलेले, परमेश्वराच्या भक्तीभावाने ओथंबलेले स्वर, ते काळजाला चिरत जाणारे शब्द, साक्षात परमेश्वर नादब्रह्माच्या रूपात आपल्यासमोर उभे करतात. आपल्यासमोर आपल्या पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या, मात्र अमूर्त स्वरूपात प्रकट होतात, आपले भान हरवून टाकतात. सवाई गंधर्वाच्या कार्यक्रमाला गेलो आणि आठवणी जागल्या त्या वेगळ्याच !
शब्दांचीच चित्रे रंगविण्यापेक्षा प्रत्यक्षच ऐका -
१. वाणी जयराम - चित्रपट - मीरा
२. पं. बुधादित्य मुखर्जी - सतार
३. विदुषी मालिनी राजूरकर
४. पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खान - यांवर उस्ताद विलायत खाॅं यांची मार्मिक टीपणी
५. कै. पु. ल. देशपांडे - हार्मोनियम
६. कै. सुधीर फडके - चित्रपट - पिंजरा
७. लता मंगेशकर - अभंग - अगा करुणाकरा - संत तुकाराम
८. उस्ताद मुनीर खान - सारंगी
९. विदुषी इंद्राणी मुखर्जी
१०. विदुषी एन. राजम - व्हायलिन
११. उस्ताद बडे गुलाम अली खान
१२. पं. जितेंद्र अभिषेकी

20.12.2018

No comments:

Post a Comment