Thursday, June 27, 2019

लहानपण देगा देवा —- ?

लहानपण देगा देवा —- ?
जो लहानपणीचा काळ आपल्याला आठवत नसतो, त्या काळातच आपले, खूप लाड झाल्याचे आपल्याला नेहमी सांगीतले जाते. मग जरा शाळेत जाण्यासारखे झाले, की मग ‘न आठवणारे’ लाड संपतात आणि हे लाड अचानक कुठे जातात काही समजत नाही.
मराठी शाळेत गेल्यावर, त्या लाकडी आडव्या खांबावर विविध सुभाषिते, म्हणी, सुविचार की काय म्हणतात, ते लिहीले असायचे. ‘पेरले ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते’ यांत नवल ते काय हा आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा ? ‘मना सज्जना भक्तीपंथेचि जावे’ किंवा ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ यांतून या मोठ्या मंडळींना विशेष असे काय सांगायचे असते, ते अजिबात लक्षात येत नसे. बोलल्याप्रमाणे चालणाऱ्या माणसांचे पाय कशाला पडायचे ? ‘चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे’ यामुळे तर दातांची काळजी वाटायची. रोज सकाळी स्वच्छ दात घासून, बळकट करायचे, ते मोठेपणी ‘लोखंडाचे चणे’ खाण्यासाठी कारण त्यामुळं ब्रह्मपदावर नाचता येते. पण मी म्हणायचो, लोखंडाचे चणे खाल्ल्यावर तोंडातले दांत पडतील का रहातील ? आणि या दांत नसलेल्या व रक्तबंबाळ तोंडाने, असे कोणते ब्रह्मपद आहे की तिथं नाचता येईल ? भयंकर गोंधळात टाकणारे, हे अगम्य असलेले सुविचार का लिहीतात हे समजणे, तर खरोखरच कठीण असे.
त्यातल्या त्यात ‘प्रयत्नांती परमेश्वर’, किंवा ‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी’ किंवा ‘ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा’, तसेच ‘देव तारी, त्याला कोण मारी ?’ असे लिहीलेले पोटाला आधार देणारे, मनांतील भिती घालवणारे, आपल्या तोंडाला ऊसाच्या रसाची चव आणणारे व रसाळ वाटत !
मुलांना शिस्त लावणे, त्यांना शिकवणे, त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणे यांत शिक्षकांनी ठरवलेले काही नियम व आदर्श होते. ‘लहान मूल हे मातीचा गोळा असते, त्याला आकार देण्याचे काम पण शिक्षक आणि मोठी माणसे करतात. त्यामुळे मुले मोठेपणी ‘मोठी माणसं’ बनतात’ हे आणि अशा स्वरूपाचे काही ऐकवले जाई. हे ऐकल्यावर आपला हात, पाय, डोकं काय चिखलाचे झाले, काही समजत नसे. मोठ्या माणसांनाच स्वत:ला कुंभार बनण्याची आणि लहानांना मात्र माती बनविण्याची काय हौस असते, ते मला अजिबात समजत नसे. एखादे वेळेस लहानांनी पण कुंभार बनले, तर काय हरकत आहे ? हे मनातले विचार त्यावेळी मनातच रहात, कारण एकदा कुंभारवाडीत जाण्याचा प्रसंग आला होता, आणि लहान मुलांना माती व मोठे माणसांना कुंभार म्हणण्यातील साम्य जाणवले होते.
कुंभार माती तुडवतो किंवा मळतो, त्याप्रमाणे मुलांना हाताने तिंबणे. माती जास्तच कडक व त्रास देणारी असेल, तर मुले पक्षी माती पायाने तुडवणे. हे सर्व झाल्यावर, भविष्यातल्या परिक्षेच्या चाकावर बसवले, म्हणजे जरा कच्चा माठ तयार झाला, की मातीच्या क्षमतेप्रमाणे व कुंभाराच्या ज्ञानाप्रमाणे, लहानमोठा आकार देत मडके, माठ वा रांजण बनवणे. हे झाले, की लाकडाने सडकून काढणे, त्यानंतर उन्हांत वाळवणे वगैरे सर्व प्रयोग सर्रास व्हायचे. फक्त माठ भाजण्यासाठींचे आवे, जसे कुंभार लावतात तसे, ‘वळण लावण्यासाठीचे मुलांना भाजायचे आवे’ हे काही माझ्या पहाण्यात नव्हते. असो. एक मात्र बरे होते, की मला पहिल्यापासूनच मार्क्स चांगलेच मिळत असल्याने, या कृती माझ्यावर क्वचितच झाल्या; मी बहुतेक याचा प्रेक्षकच असे. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांचा हा भितीदायक, थरारपट असलेला खेळ मोफत असे. काही वेळा, एखादा विद्यार्थी आटोपेनासा झाला, की त्याच्या पालकांना पण वर्गात प्रयोग पहाण्यासाठी विशेष निमंत्रण असे ! पण हा पालक, प्रेक्षकाची भूमिका सोडून, त्या थरारक प्रयोगात शिक्षकाबरोबर भाग घेई ! हा थरारक प्रयोग करण्यात, कोण कमी आणि कोण जास्त, हे ठरवणे कठीण असे, पण बहुदा शिक्षक हार मानून पालकाला आवरत असे, आणि हा प्रयोग थांबे. आमचे घाबरलेले जीव मुकाटयाने आम्हीच उघडलेल्या आमच्या वह्या-पुस्तकांत पडत ! मात्र या दोघांचे पण प्रयोग पहाण्याचे भाग्य (?) अपवादानेच आमच्या नशिबात येई.
‘रम्य ते बालपण’ किंवा त्यापुढील वेडाचार म्हणजे, ‘लहानपण देगा देवा’ ही कोणत्याही शहाण्या माणसाला सुचलेली कल्पना नसून, बऱ्यापैकी वेडसर माणसाला सुचलेली कल्पना आहे, हे माझे त्यावेळी ठाम मत होते. असे असले तरी पुन्हा आमची सत्वपरिक्षा पहाण्यासाठी ‘रम्य ते बालपण’ हा विषय शिक्षक निबंधाला देत, आणि त्यांवरसुद्धा लिहून मार्क्स मिळवावे लागत. यापेक्षा दुर्दैव ते काय ?
अलिकडे अभ्यासक्रम बऱ्यापैकी बदललेला असून, निबंध लिहीण्याचेच बंद झालेय असे ऐकतो. शिस्त लावण्यासाठी मुलांवर शाळेत ‘माती आणि कुंभार’ हे प्रयोग करण्याचा प्रयत्न केल्यावर त्या शिक्षकाला पोलीस स्टेशनची वारी आणि त्या कुंभाराला पक्षी शिक्षकाला, त्या मातीची पक्षी विद्यार्थ्याची क्षमा मागावी लागली, हे पण कानावर आलेय !
अलिकडच्या लहान मुलांसाठी खरोखरच ‘रम्य ते बालपण’ सुरू झालं की काय ? —- तसं असेल तर परमेश्वराजवळ ‘लहानपण देगा देवा’ मागायला काय हरकत आहे ?

25.6.2019

No comments:

Post a Comment