Wednesday, June 13, 2018

आकाशवाणी

काल रात्री आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, प्रसिद्ध नाटककार कै. विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहीलेले 'वीज म्हणाली धरतीला' या सुंदर नाटकाचे सादरीकरण कै. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेने सादर केले. त्यांत सर्व जुनी, थोर नाट्यकलावंत होती. कै. प्रभाकर पणशीकर, कै. सुधा करमरकर, श्रीमती फैयाज वगैरे. नाटकाचे दिग्दर्शन हे खास आकाशवाणीची माणसं, म्हणजे 'नटसम्राट' या सारख्या नाटकाचे शिवधनुष्य पेलणारे कै. पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे होते. नाटक लिखाण, नाट्य कलावंत व सादरीकरण उत्तमच होते. अभिनंदन !
मात्र यावरून अजून एक मुद्दा डोक्यात आला की अशी बरीच नाटके, जुन्या नाट्य कलावंतांच्या संचातील विविध आकाशवाणी केंद्रांजवळ आहेत. माझ्या आठवणीत व पहाण्यात आकाशवाणी जळगांव जवळ पण आहेत. ही जुनी व दर्जेदार मंडळी आता पहायला, ऐकायला पण मिळत नाही.
या शिवाय काही चांगली नाटकं, कार्यक्रम हे आकाशवाणी, दूरदर्शन यांच्याकडे आहेत. ही त्यावेळी माझ्यासारखी हौशी मंडळी असतील, नंतर दूर झाली असतील, पण तरी ती दर्जेदार निर्मीती असेल तर, केवळ काळजी न घेतल्याने वाया जायला नको.
आकाशवाणीजवळ जशी ही दुर्मीळ संपदा आहे, तशीच ही दूरदर्शन यांचेजवळ पण आहे. केवळ नाटकच नाही तर संगीत, विविध महापुरूषांची भाषणे वगैरे आहेत. ही सर्व संपदा योग्य मोबदला घेवून सर्व जनतेसाठी अधिकृतपणे उपलब्ध करून दिले तर दर्जा म्हणजे काय हे पण समजेल आणि दुर्मीळ गोष्टींचा बऱ्यापैकी प्रसार होवून त्या जपल्या जातील.
आकाशवाणीशी संबंधीत काहींशी हा विषय मागे बोललो होतो, पण तो तेवढ्यावरच राहीला. आता सर्वांसमोर आला आणि यांतून काही बऱ्यापैकी फलनिष्पत्ती झाली, तर चांगलेच !

२५.४. २०१८

No comments:

Post a Comment