Wednesday, June 13, 2018

साडेतीन मुहूर्तातील - गुढीपाडवा !

साडेतीन मुहूर्तातील - गुढीपाडवा !

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, वैशाख शुद्ध तृतिया म्हणजे अक्षय्य तृतिया, अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजया दशमी तथा दसरा आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बली प्रतिपदा तथा दिवाळीचा पाडवा ! हे दिवस आपण वर्षातील साडेतीन मुहूर्त मानतो. या दिवसांचे महत्व म्हणजे काही शुभ कार्याची वा नवीन कामाची सुरूवात करायची असेल, तर या दिवशी केल्यास वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही, हे सर्व दिवस चांगले मानले गेलेले आहेत.
मला आठवणारा गुढीपाडवा म्हणजे सकाळी नेहमीपेक्षा थोडे लवकर उठायचे. बाहेर जावून आवर्जून कडुलिंबाच्या काही डहाळ्या, आंब्याची पाने व डहाळ्या आणाव्यात. येतांना काही फुले आणावीत. घरी आल्यावर स्नान वगैरे आटोपून मग नेहमीप्रमाणे देवपूजा झाली, की या दिवशीची विशेष पूजा विद्येची पूजा ! अर्थात ही पूजा या सर्व साडेतीन मुहूर्तांवर केली जाते.
या सरस्वती पूजेची वा विद्येच्या पूजेचा आम्हाला फारच उत्साह, अगदी शालेय वयापासून ! त्यात गुढीपाडवा येतो ते दिवस म्हणजे आमच्या वार्षिक परिक्षेचे दिवस ! वर्षभर केलेल्या किंवा न केलेल्या अभ्यासाचा हिशोब होणार असायचा. त्यावेळी एकतर परिक्षा बहुतेक सुरू झालेली असायची किंवा सुरू होणार असायची. सुरू झालेली नसेल तर अगदीच दृष्टीच्या टप्प्यात असायची. मग परिक्षेचे सर्व पेपर चांगले जावून त्या वार्षिक परिक्षेत चांगले मार्क्स पडायला हवेत, ही तर आम्हा सर्व विद्यार्थी असलेल्यांची स्वाभाविकच इच्छा असणार ! आम्हापैकी काहींची तर, या पूजेनेच जर काम भागणार असेल तर फारच बरं, वर्षभर अभ्यास करण्यापेक्षा आणि त्यांत आपला मौल्यवान वेळ अभ्यास करण्यात निष्कारण वाया घालवण्यापेक्षा, वर्षभरांत या अशा साडेतीन मुहूर्तावर चार वेळा पूजा केली की झाले ! तो अभ्यास न करून वाचलेला महत्वाचा वेळ, इतर म्हणजे यापेक्षा जास्त महत्त्वाच्या कामांत गुंतवतां येतो. तेव्हा खरं सांगायचं तर, बहुमताने विचार करता संपूर्ण वर्षभरात चार वेळा पूजा, हा वास्तविक फारच सोयीचा उपाय होता, पण हा उपाय आम्हा विद्यार्थ्यांनी कितीही पसंत असला तरी, आमच्या घरात कोणालाच पसंत नसे. लोकशाही व बहुमताची किंमत यांना केव्हा समजणार आणि त्याचा आदर करायला ही वडीलधारी मंडळी केव्हा शिकणार ? हा विचार माझ्या शालेय वयात खूप वेळा मनांत यायचा, आणि माझी स्मरणशक्ती चांगली असल्याने तो आज पण आठवतो, माझी आजची भूमिका ही पूर्णत: बदलली असली तरी ! त्यावेळी अभ्यासाचे त्यांचे सूत्र फारच सोपे व सुटसुटीत असे ! पुस्तकाच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत सर्व पुस्तक वाचून काढावे. ते पण असे वाचले गेले पाहीजे की त्यातील कोणत्याही धड्यावर कोणताही, कसलाही प्रश्न आला, तरी आपल्याला त्याचे उत्तर देता यायला हवे. प्रश्न अगदी फिरवून फिरवून विचारला, तरी तो आपल्याला समजला पाहीजे आणि विशेष म्हणजे त्याचे परिपूर्ण उत्तर पण देता आले पाहीजे. ही उत्तरे पण नीट व सुवाच्य, वळणदार अक्षरांत लिहीता यायला हवीत. ती देखील सर्व परिक्षेच्या ठरलेल्या वेळेतच लिहीण्याची सवय व्हावी, परिक्षेत प्रश्न लिहायचे राहून जायला नको, सर्व प्रश्न सोडवले गेले पाहीजे, एवढेच नाही तर एखाद्या प्रश्नाबद्दल खात्री नसेल तर जमल्यास विकल्प म्हणून असलेले प्रश्न पण सोडवावेत. हे सर्व नीट जमायला हवे म्हणून आपण वर्षभर शुद्धलेखन लिहायचे, म्हणजे मजकूर आपल्या हाताखालून जातो. हे सर्व आणि इतके जर वर्षभर नियमीतपणे होणार असेल तर त्या सरस्वती देवीने पूजेतून सूट द्यायला काहीच हरकत नव्हती, पण तशी सूट नव्हती. अर्थात आम्हाला पण तशी सूट नको होती, या निमीत्ताने तो दिवस तरी जरा अभ्यासातून सुटका आपोआप मिळायची.
आमच्या घरात शाळेत शिकणाऱ्या प्रत्येकाचे निदान एक किंवा दोन पुस्तक तरी पूजेला ठेवले जाई, कारण सर्वांची सर्व पुस्तके ठेवायची म्हटले तर मग पसारा फार होई. आवरायला त्रास ! मग त्यातल्या त्यात मध्यम व सुरक्षित मार्ग निवडायचा, म्हणजे जो विषय आपल्याला कठीण असेल त्या विषयाच्या पुस्तकाला पूजेत हमखास स्थान मिळायचे. त्या खालोखाल जो विषय कठीण असेल, त्या विषयाचे पुस्तक ! जो विषय आपल्याला चांगला समजला असेल, सोपा जात असेल, त्याला मग पूजेच्या पुस्तकांत स्थान मिळायचे नाही.
आपल्याला अनुकूल असलेल्यांची पूजा करायची नसते, त्याची आवश्यकता नसते; मात्र जे आपल्याला अनुकूल नाहीत, कठीण जाणार आहे, त्यांची पूजा करावी लागते. अनुकूल असलेले गृहीत धरणे आणि अनुकूल नसलेल्यांची पूजा ! आपल्या लहानपणीच आपल्याला आयुष्यांत भविष्यात उपयोगी पडणारे धडे, हे अशा कठीण विषयांच्या पुस्तकांची पूजा करून प्रात्यक्षिकाने दाखविले जातात. हे मात्र आपल्याला बऱ्यापैकी मोठे झाल्यावर समजते.
सर्वांची पुस्तके काढून व व्यवस्थित रचून झाली की मग आठवण यायची, की आपल्याकडे असलेल्या संगीताच्या साहित्याची पण पूजा करायची असते. मग घरचा हार्मोनियम, तबला, तानपुरा आणि आईच्या गाण्याच्या वह्या, पुस्तके ठेवायची. त्यामुळे बघताबघता सर्व नवीकोरी सतरंजी या वस्तू पुस्तकांनी भरून जाई. नंतर मग पाठ लिहायचा प्रत्येकाने, म्हणजे कोणत्या तरी पुस्तकातला उतारा पांढऱ्यास्वच्छ कोऱ्या कागदावर शाईच्या पेनने लिहायचा. तो उतारा म्हणजे, मी भगवद्गीतेतील काही श्लोक लिहायचो किंवा संतमंडळींचे काही अभंग असायचे. कागदाच्या मध्यभागी डोक्यावर ‘श्री’ किंवा ‘ॐ’ लिहून सुरूवात ! त्या खाली, श्री गणेशाय नम: म्हणून सुरूवात, नंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, गुरू, मातापिता, कुलदैवत यांना वंदन !
यानंतर आपल्या पारंपरिक पद्धतीने सरस्वतीची प्रतिमा ! पाच, सात अशा विषम संख्येने अंकगणितातील एक (१) अंक एका ओळीत लिहून, पहिल्या अंकापासूनची रेघ त्याच्या खालून घेत थेट त्याच्या शेवटच्या एक (१) अंकापर्यंत न्यायची. असे करत पुढील अंक घ्यायचा व त्याची रेघ अगोदरच्या रेघेखाली घेत तसेच करायचे. ही प्रतिमा तयार होते. मग आपल्याला हवा तो पाठ लिहायचा. त्यानंतर आपले पूर्ण नांव व त्या दिवशीची तिथी लिहायची. मी त्यावेळी कोणत्या वर्गात शिकत आहे, हे पण उत्साहाने लिहायचो. अगदी इयत्ता ६ वी (ब) किंवा इयत्ता ९ वी (अ) हे पण त्यांवर लिहीले जाई. मात्र माझी जसजशी पुढची इयत्ता येत गेली, तसतसा इयत्ता, शिक्षण लिहीण्याचा उत्साह कमी होत गेला. शिक्षण जास्त झाले की उत्साह कमी होत जातो. झालेले शिक्षण व असलेला उत्साह यांचे व्यस्त प्रमाण असते की काय कोण जाणे ?
हे सर्व झाले की यानंतर मग त्या वर्षाचे नवीन पंचांग यांवर ठेवले जायचे. ते पंचांग व त्यावरील गणपती यांचे हळद, कुंकू, अक्षता वगैरे वाहून पूजा करायची. नैवेद्य दाखवायचा. आरती म्हणायची - गणपतीची व देवीची ! कापूर उदबत्ती लावलेली असायची. वातावरण आपोआपच पवित्र वाटायचे. देवाने आपल्याला खूप चांगली बुद्धी द्यावी, सर्व वर्गात सर्वप्रथम यावे, ही प्रार्थना आपोआप मनांत यायची आणि देव ती पूर्ण करेल हा विश्वास पण वाटायचा. ही पूजा जर लवकर झाली तर मग आई एखाद्या रागातील चीज म्हणायची, त्याला ‘हजेरी लावते’ असे म्हणायची. मग रामकली वा पहाडी मधील ‘रामनाम तुम सब हो प्यारे’ हे असायचे, शंकरा मधील ‘जय देवी अंबीका’ हे असायचे, यमन मधील ‘श्री देवी शारदा’ हे असायचे किंवा अजून कोणते असायचे. स्वयंपाक तर वाटच पहात असायचा. नेहमीपेक्षा गोडधोडाचा स्वयंपाक त्यावेळी छान वाटायचा, श्रीखंड पण असायचे काही वेळा ! हा जेवणाचा भाग झाला की रिकाम्या टेलटिकोऱ्या त्या दिवशी व्हायच्याच !
त्यानंतर संध्याकाळी दर्शनाला सारे गांव निघायचे, ते साठे यांचे मोठे राम मंदीर, डोखळे यांचे चिमणा राम मंदीर आणि बालक राम मंदीर हे रामदास भैयाजी बुवा यांच्या मंदीरात ! मंदीरात भजन मंडळी बसलेली असायची कोपऱ्यात तर कुठून तरी कै. सुधीर फडकेंच्या आवाजातील आधुनिक वाल्मिकी कै. ग. दि. माडगूळकर यांचे ‘गीत रामायण’ यांतील ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ हे गाणे ऐकू यायचे आणि आपण त्या प्रभू रामचंद्रांच्या सभेत बटू कुश व लव यांचे शेजारी उभे आहे असं वाटायला लागायचं ! ही गांवातील सर्व मंडळी उत्साहात दर्शन घ्यायची गप्पा मारायची, तेवढ्या गर्दीत पण एखाद्या महिलेला ‘आता आली आहे अनायसे, तर घरी चल. कुंकू लावते. कधी येत तर नाही’ असे म्हणत एखादी महिला प्रेमळपणे दुसरीला आपल्या घरी घेवून जायची आणि ‘कुंकवाला गुढीपाडव्याच्या दिवशी नाही कसे म्हणायचे’ म्हणत ही पण जायची. दोघींच्या मनसोक्त भरपूर गप्पा व्हायच्या आणि ‘कधी नव्हे ते बाहेर पडलं की वेळ होणारच. तरी त्या *** हिच्याकडे जायचे राहून गेले तर तिला राग आला’ हे ऐकत, त्या दिवशीचा गुढीपाडवा मावळायचा !
आज सकाळी सकाळी आंघोळ पूजा वगैरे आटोपून कामाला बाहेर पडावे लागले, अन् हे आठवलं ! बालपणातील न बदलणारा साडेतीन मुहूर्तातील हा वर्षातील पहिला दिवस व सर्वप्रथम मुहूर्त, पण बालपण गेल्यावर आपल्याला उगीचच बदललेला वाटायला लागला.

१८. ३. २०१८

No comments:

Post a Comment