Wednesday, June 13, 2018

फोन आणि एस् टी डी बूथ












फोन आणि एस् टी डी बूथ

आमच्या सरदार जी. जी. हायस्कूलसमोरच कृषी उत्पन्न बाजार समिती होती. आम्ही मुले केव्हातरी मधल्या सुटीत अधूनमधून बाजार समितीत जात ! कारण काय, काहीच नाही ! आपण काय धान्याचे लिलाव थोडीच घेणार होतो ? पण ती तेथील लिलावाची लगबग, वाढत जाणाऱ्या धान्याच्या भावाच्या बोल्या ! आणि शेवटी एकवार, दोनवार आणि तीनवार, म्हटले, की मग लिलाव फायनल आणि सर्वांनी पुढच्या धान्याच्या ढिगाकडे जायचे, सोबत आम्ही पण ! गंमत वाटायची, आमची मधल्या सुटीची वीस मिनीटे बघताबघता संपायची. यांत आमचा जर एखादवेळेस बरा योग असला तर, बाजार समितीत भुईमूगाच्या शेंगांचा लिलाव असायचा. छोटेछोटे ढीग असायचे मग, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे ! मग जरा धाकधुकीने, तसेच दुसरे कोणी उचलत असेल तर, आम्हाला पण, आमच्या शालेय छोट्या मुठीत, शेंगा उचलतां यायच्या ! शेंगाच्या मालकाचे व माल घेतलेल्या व्यापाऱ्याचे आमच्याकडे लक्ष असायचे, पण बघीतल्यावर काही कोणी बोलत नसे. आमच्या या शालेय मुठीत किती शेंगा मावणार ? फार तर पाच-सात शेंगा येत असतील. मात्र हा असा लाभ योग कमी यायचा, कारण आमच्या तिकडील भागांत भुईमूगाचा पेराच एकंदरीत कमी !
या मार्केट कमिटीच्या आवारातच, तिथं जवळच एका इमारतीत दूरसंचार विभाग म्हणजे ‘टेलिफोन एक्सचेंज’ होते. तिथं जाऊन आम्हाला त्यांचे काम बघायला पण गंमत वाटायची. दूरसंचारचे कर्मचारी त्यांच्या कामात असायचे. गांवातून कोणाचा तरी फोन यायचा, मग तेथील आॅपरेटर त्याच्याजवळचा विशिष्ट फोन उचलून, ‘कोणता नंबर हवा’ म्हणून विचारायचा. तिकडून नंबर समजल्यावर, कर्मचाऱ्याच्या हातातील वायर जोडलेली जाड दाभणासारखी व इंजेक्शन सारखी दिसणारी पितळी पीन, त्या बऱ्याच खाचा असलेल्या बोर्डवर, योग्य नंबरच्या ठिकाणी लावायचा व मग पुन्हा त्या विशिष्ट फोनमधून ‘हं, सुरेशशेट, लाईन लागली आहे, बोला आता !’ असे म्हणत निवांत बसायचा. तेवढ्यात दुसऱ्या कोणाचा फोन यायचा व पुन्हा हे असेच ! नुसती पितळी दाभणासारखी पीन टोचली की ती कोणत्याही माणसाचे बोलणे इकडून तिकडे पाठवते, कमाल आहे ! कोणी शोध लावला असेल बरं टेलिफोनचा ? आम्हाला फार म्हणजे फारच कौतुक वाटायचे, अगदी काहीच्या काहीच ! अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे नांव त्या वेळी शोधायला फार त्रास पडला.
खरं तर, त्यावेळी गांवात टेलिफोन फारच कमी होते. हा काळ्या रंगांची दहा छिद्र असलेली तबकडी असलेला, जड मजबूत फोन म्हणजे एक भारदस्तपण वाटायचे. आपले गांवातील प्रस्थ इतरांना दाखवण्यासाठी, टेलिफोन नंबर पण कामास यायचा. त्यामुळे गल्लीत, किंवा अगदी पलिकडच्या गल्लीत जरी फोन असला, तरी हा टेलिफोन नंबर, त्या गल्लीतील बऱ्याच जणांच्या, बाहेर गांवच्या नातेवाईकांकडे असायचा. मग कोणा एखाद्यासाठी बाहेरून फोन आल्यावर, ज्यांचा फोन आहे, त्यांना निरोप द्या किंवा जर घरगुती संबंध असले, तर तो निरोप ठेवून घ्यावा लागे, आणि त्याचेकडे कोणास तरी पाठवून निरोप द्यावा लागे. त्यावेळी बाहेरगांवासाठी फोन लावायचा, म्हणजे दिव्य असायचे. तो केव्हा लागेल, लागेल किंवा नाही, याचा नेम नसायचा. काही वेळा लगेच लागायचा, तर काही वेळा नाही. लवकर लागला नाही, तर मग ‘लाईन खराब आहे’ असा निरोप आपल्याला ‘टेलिफोन एक्सचेंजकडून’ मिळायचा. हे समजले की ‘मग, अर्जंट लावा’ असे सांगावे लागे. पण त्याचा देखील काही वेळा उपयोग होत नसे, मग ‘लाइटनिंग कॉल’ लावा असे सांगायचे. आपले नशीब चांगले असले तर लागायचा, बोलणं व्हायचं; नाहीतर शेवटी कंटाळून बुकींग रद्द करण्याचा पण निरोप द्यावा लागे. पण तसं बघीतलं तर त्यावेळी फोन करण्याएवढी तातडी कोणालाही अगदी अपवादानेच असायची. त्यामुळे लागला जरी नाही, तरी कोणाचे फार काही अडायचे नाही, दुसऱ्या दिवशी पण हा प्रयोग केला जायचा, मग लागायचा पण ! त्या जगन्नियंत्याला पण दया येत असावी, यांच्या वाट पहाण्याची. हे काहीही असले तरी पण या निमित्ताने ‘सरकारचा कारभार कसा ढिसाळ असून, त्याचं कसं काही खरं नाही’ ही टीका त्वेषाने करता यायची. सरकारला व सरकारी अधिकाऱ्यांना दोन शिव्या देता यायच्या. सरकार विरोधी पक्षाचे असेल तर दोनाच्या ऐवजी चार देता यायच्या, एवढाच काय तो फरक ! ‘हे पत्र म्हणजे तार समज आणि लगेच ये’ असं पोस्टकार्डात लिहीणारी मंडळी असलेल्या काळात, सर्वसामान्यांच्या आयुष्यांत फोनला काय महत्व असणार ? मुख्यत: फोन म्हणजे व्यापार करणाऱ्यांना लागायचे.
आमच्या टेलिफोन एक्सचेंजची क्षमता वाढली, पण त्याचवेळी प्रलंबित मागणीदारांची यादी बरीच मोठी असल्याने, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जरा जास्त फोन दिसायला लागले एवढेच ! त्यावेळी सहजासहजी टेलिफोन मिळतच नसे. आम्हाला टेलिफोन हवा होता, तर त्यावेळी खासदार कोट्यातून घेतला होता. याचा त्यावेळी केवढा गवगवा, टेलिफोन एक्सचेंजला ?
गांवात काळाची पावले ओळखत, नंतर ‘एस् टी डी’ची सोय आली आणि बघताबघता क्रांती झाली. कोणत्याही गांवाला, जिथं ‘एस् टी डी’ची सोय आहे, तिथं नुसते ‘कर्रऽऽटक् कर्रऽऽटक्’ करत डायल केले की भराभर फोन लागू लागले. लगेच तिकडून ओळखीचा आवाज येवू लागला. बुकींग कंटाळून कॅन्सल करायची गरज नाही ! फोन करतोय आणि लगेच बोलतोय ? चमत्कारच हा ! तासनतास थांबल्यावर पण, शेवटी बुकींग केलेला फोन टेलिफोन एक्सचेंजला सांगून रद्द करण्याची सवय असलेल्यांना, हा म्हणजे आश्चर्याचा धक्काच होता. कोणीही गंमत म्हणून ‘जरा, फोन लागतोय का म्हणून पहातो’ म्हणत फोन लावायचा. तो नक्की लागायचा. ‘आॅं, लागली की लगेच’ म्हणत तो हवं ते बोलायचा आणि स्वाभाविकच त्याचे बील त्या फोनधारकाच्या खात्यात धरले जायचे. मात्र याचा परिणाम हा नंतर दिसला. काहींना हजारांत बिलं आलीत. ‘एस् टी डी’ चे काही खरं नाही, बीलं हजारात येतात’, ही बातमी गांवभर पसरली. ‘हे नविन झेंगट आलंय ‘एस् टी डी’चे फोन लागतात, पण पैसे किती घेताय ? आपण काही बोललो की नाही पहा, तर आलं बील ! सरकार पैसे उकळतंय पहा नुसतं !’ अर्थात ‘सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते पैसे उकळण्यासाठीच असते’ हे त्याचे म्हणणे खरेच होते. मात्र हे असे म्हणत, बऱ्याच मंडळींनी आपापले फोन उचलून कोणाला सहजी दिसणार नाही, अशा ठिकाणी ठेवले. त्यामुळे त्याचा परिणाम फोन करायच्या वेळी किंवा बाहेरून आल्यावर होणाऱ्या धडपडीत, फोन हातातून खाली पडून काही वेळा ते नादुरूस्त होवू लागले. यांवर तोडगा म्हणून मग, काहींनी त्या डायलवरील दोन छिद्रात बसेल असे छोटे फोनचे कुलूप आणले, आणि त्याची छोटी किल्ली बंदोबस्तात ठेवली. कोणी आले फोन करायला तर, ‘तू माझ्याकडून जेवून जा. त्या फोनला हात लावायचा नाही. भयानक बील येते. बीलापायी घरदार विकावं लागेल’ म्हणत फोन बाजूला घेवू लागले. यांवर ‘जगात काय याच्याकडेच फोन आहे ? अरे फोन आहे तर बोलायसाठी नाही, तर कशासाठी ? कुलूप लावताय ! कंजूष —— ****’ असे पण बोलले जायचे. फोनवाला काहीवेळा दुर्लक्ष करायचा तर काही वेळा मासलेवाईक बोलायचा.
काहींचे डायलचे फोन नव्हते, तर नवीन निघालेल्या बटनांचे फोन होते. त्यांना हे असे लॉक लावता येईना. संपूर्ण आकडे झाकणारी झडप निघाली. त्याला कुलूप लावता येत असे, पण मग पुन्हा कोणाच्यातरी भीडेखातर ते उघडावे लागे व त्यांना फोन करू द्यावा लागे. फोनधारकाची परिस्थिती ही फोन रक्षकाची झाली. समोरचा म्हणेल तेव्हा किल्लीने कुलूप उघडून त्याला फोन करू द्यायचा अन्यथा बोलाचाली, टोमणे, एकमेकांचा उद्धार ठरलेला !
यांवर पण मार्ग काढणे भाग होते. फोन तर मोकळा दिसायला हवा, मात्र लावता तर यायला नको. या द्विसूत्रीतून कोड नंबरने फोन लॉक करता येतो, ही माहिती मिळाली. मग या धोरणी फोनधारकांनी टेलिफोन एक्सचेंजकडून लॉक करण्यासाठी ‘कोड नंबर’ मागीतले. सवय नाही कोणाला, त्यामुळं ही तर मोठीच गोंधळाची पद्धत ! पण पैसे वाचवायचे म्हटल्यावर काय ईलाज ? याच्या गमतीजमती तर विचारू नका ! एकदा मी असाच एका ठिकाणी बसलो होतो. त्याचेकडे फोन होता, एस् टी डी होता. विचारले ‘कारे, एस् टी डी आल्याने सोय झाली पहा. तुझ्याकडे आहे का ?’ हे मी विचारल्यावर, होकार देत तो म्हणाला, ‘रिकामी डोकेदुखी लागली आहे. फोन लॉक करावा लागतो. कोड नंबर दाबून. काय सांगू ? इतका गुंता होतो, बटन दाबतांना की विचारू नको.’
मग पद्धत अशी सुरू झाली, की त्या कोड नंबरचा फोन लॉकसाठी उपयोग करत. यांत मुत्सद्दीपणा पण दिसे. समोर फोन मोकळा दिसायचा. कोणी लावायला आले, तर काही बोलायचे नाही. पाच-पंचवीस वेळा बटन दाबून तो कंटाळायचा, संतापायचा ! हे त्याच्या बटनावर जोर देण्याच्या आविर्भावातून लक्षात यायचे ! बटन फोनच्या आंत जातील, असा जोर लावला जायचा. फोनवाला शांतपणे बघायचा. शेवटी मग फोन लावणारा, फोन सरकावून ‘पहा तर जरा, लागत नाही ये.’ याला सर्व माहिती असायचे, मात्र हा पण मग थोडे नाटक करून ‘खराब झालाय वाटतं’ म्हणत आपली असमर्थता, खाली मान घालून ओशाळल्या स्वरांत व्यक्त करायचा. ‘त्याच्या @&@*#% @&*%# सरकारच्या ! तिसरा फोन आहे हा, खराब झालेला ! दोन ठिकाणी गेलो, तिथं पण @&**%# साले खराब ! म्हटलं इथं जावं, इथं चांगला असेल तर इथं पण *%#*@& तेच, तिच्या &@%#*# ! अरे, द्यायचे तर चांगले द्या. खराब झालेले देताय @&*#% वगैरे वगैरे’ म्हणत तो याच्याकडे संशयाने पहात ‘सालं, कोण लबाडी करतंय, काही समजत नाही’ असे बडबडत व त्यासोबत या फोनधारकाला टॉंन्ट मारत निघून जायचा.
हा फोन लॉक करणे म्हणजे काही सोपं नव्हतं ! त्यांनी सांगीतलेल्या नियमाप्रमाणेच विविध आकड्यांची बटने दाबावी लागत, तरच फोन लॉक होत असे. निर्जीव, यांत्रिक फोन तो त्याच्या मेकॅनिझमप्रमाणे चालणार, आपल्या मनाप्रमाणे थोडाच चालणार किंवा लॉक होणार ? लॉक करायचा की पहिले हा चार आकडी नंबर, त्या नंतर दोन आकडी हा नंबर, मग हा तीन आकडी नंबर वगैरे असे दाबून पहावे लागत. शेवटी हे नीट जमलं की नाही, याची खात्री व ताळा करून पहाण्यासाठी बाहेरगांवी ‘एस् टी डी’ फोन करून पहावा लागे. फोन लागला नाही, की समाधानाने सुस्कारा सोडत. हे नेहमीचे होऊन बसले. तो एक चाळाच लागला.
प्रत्येकवेळी तुमच्या आयुष्यात सुखसमाधानच असते असं नाही. एखादा दिवस अडचणीचा पण येतो. यांत मग एकादे वेळी असा योग येई, की हे लॉक करण्याचे सव्यापसव्य होते न होते तोच, घरातून गृहमंत्र्यांचा निरोप येई की, ‘त्यांच्या चुलतमावशीच्या जावेच्या जावयाकडे फोन आहे, कुठं अहमदाबादला असतो. त्यांच्याकडे चारचार फोन आहेत म्हणे. ‘तुमच्याकडे एस् टी डी फोन नाही ना, त्यामुळे फोन करता येत नाही.’ असं नेहमी म्हणतो. त्याला लावा जरा, आपल्या इथं पण आलीय एस् टी डी ! समजू द्या जरा ! शिष्ट कुठला ?’ शेवटचे ‘शिष्ट’ हे कसल्याही व कोणाच्याही अध्यातमध्यात नसलेल्या, त्या कोणीही न बघीतलेल्या, अहमदाबादच्या जावायाला उद्देशून ! यांवर ‘दिवसा कुठं फोन करतेय अहमदाबादला. बील जास्त येईल.’ इतकं म्हणायचा अवकाश, ‘मी पहिल्यांदा सांगतेय फोन करायला, अगदी पहिल्यांदा ! आतापर्यंत एस् टी डी होती का ? तुम्हाला काय ? इथं एस् टी डी नसल्याने, चारचौघात मान खाली घालावी लागते. आता जरा कुठं संधी आहे, नाक ठेचण्याची, तर घरातूनच फितूर !’ ही अशी सरबत्ती झाल्यावर, काय करणार ? यांवर कुठं अपीलाची सोय नसल्याने, नुकताच समाधानाने सोडलेला सुस्कारा वापस घेत, बिचाऱ्याला पुन्हा तिथं अहमदाबादला फोन करण्यासाठी बटन दाबायला सुरूवात करावी लागे. मग या संतापासंतापात फोनचे ते कोड नंबर उलटसुलट होवून जात आणि तोपर्यंत सुतासारखा सरळ चालणारा फोन लॉक होवून जाई. नंतर कुठलेही, नंबर कसेही फिरवले तरी कुठेही फोन लागत नसे. ‘फोन बंद पडला’ या आपल्या सांगण्यावर, ‘माझ्याच वेळी बरे बंद पडतात फोन ! शेजारीपाजारी येवून फुकटात फोन करतात, ते बरं चालते तुम्हाला !’ असा शेरा मारत फणकाऱ्याने आंत जाणे होई. चारचौघात या फोनमुळे पुरुषांवर मान खाली घालण्याची अशी वेळ येई.
यांवर उपाय म्हणून निघाले ‘एस् टी डी बूथ’ ! दूरसंचार विभागाने सार्वजनिक वापरासाठी फोन, पण खाजगी व्यक्तीकडे असायचा, त्याबद्दल सेवा म्हणून काही रक्कम प्रत्येक कॉलमागे मिळायची व कदाचित कमिशन पण मिळायचे, अशी पद्धत काढली. यासाठी एखादी छोटी टपरी किंवा खोली असली की पुरे झालं ! रोडलगत असेल तर उत्तमच ! टेलिफोन एक्सचेंजमधे ‘एस् टी डी बूथ कनेक्शन’ साठी अर्ज करायचा. आतून बाहेरूनपण तो मिळण्यासाठी ‘वेगळी न दिसणारी लाईन’ काही वेळा टाकावी लागे. बेरोजगार दाखला, अपंगत्वाचा दाखला आणि कसलेकसले दाखले त्यावेळेस ‘एस् टी डी बूथ’ मिळावा म्हणून काढले जात. प्रत्येकालाच आपण काहीतरी बसल्याबसल्या कमवावे, हे वाटणे अगदी स्वाभाविकच होते. हा असा कसातरी हायउपस करत, लागेबांधे लावत, टेलिफोन मिळवायचा, अर्थात नियमाप्रमाणे पण मिळत असे, नाही असे नाही. नियमाप्रमाणे काही झाले तर त्याची चर्चा किंवा गवगवा जास्त होत नाही. ज्या गोष्टी गुपचूप ठेवायच्या असतात, त्याचीच उत्सुकता जास्त असते, म्हणून चर्चा जास्त होते. आणि सरतेशेवटी फोन मिळाल्यावर मग ‘एस् टी डी बूथ’ सुरू करायचा. फोनचे लोकांकडून बील वसूल कसे करायचे, या करण्याच्या हिशोबासाठी, बिलींग मशीन आणायचे आणि बस ! गिऱ्हाईकांची वाट बघायची ! ही सर्व गंमत नविनच असल्याने, प्रत्येकालाच बाहेरगांवी फोन करणे आवश्यक असल्याची आठवण यायची. त्यामुळे गिऱ्हाईक भरपूर ! ज्यांच्याकडे एस् टी डी नसेल पण फोन असेल यांना मग काहीतरी व्यवस्था करून घरातून बाहेर न पडता, त्याच्या घरच्याच फोनवरून एस् टी डी वरून बोलता यायचे.
बिलींग मशीनवरून आलेल्या बीलाच्या वैधतेबद्दल पण शंका उपस्थित केली जायची. काही बोलणे होवो किंवा न होवो, तुम्हाला तिकडून आवाज येवो किंवा न येवो, तुम्ही ज्यांना फोन लावला, त्याने तिकडून फोन उचलला की भरकन, इंडिकेटरवरचे लाल प्रकाशातील दिव्याने चमकणारे आकडे बिलाची रक्कम दाखवू लागत. बोलणे नीट सुरू असेल तर प्रश्न नाही. याने फोन ठेवल्यावरच ‘टर्रर्रऽऽऽ टक्क’ करून बील यायचं ! मात्र तिकडून फोन उचलला गेला आहे, याला इकडे काही ऐकू येत नाही. हा हॅलो हॅलो करतोय, तिकडील ऐकू येत नाही. शेवटी याचे हे ‘हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽऽ हॅलोऽऽऽऽऽऽऽऽ’ इतक्या मोठ्या आवाजात होते की ते एस् टी डी बूथच्या केवळ बाहेरच ऐकू येत नाही तर थेट पलिकडच्या फोनवर बोलणाऱ्याला पण ऐकू येत असेल, अशी खात्री पटते. या गडबडीत त्याने फोन ठेवला की लगेच टर्रर्रऽऽऽ टक्क’ करून बील आलेच ! हे बील त्याचे समोर दाखवल्यावर एस् टी डी बूथधारक व हा गिऱ्हाईक यांच्यात जी जुगलबंदी होते, त्यांत कोणाकोणाचा उद्धार होत नसे ? सरकारचा उद्धार हा तर आवश्यक असे, पण काही वेळा समोरचा मुद्दाम बोलत नसावा अशी शंका आली तर त्याचा पण होत असे.
एस् टी डी फोन करायचा असेल तर त्याचे दिवसा वेगळे दर, रात्री वेगळे दर, पहाटे वेगळे दर ! ज्यावेळी कमी दर असत त्याचवेळी एस् टी डी बूथवर गर्दी जास्त होणे, हे स्वाभाविक ! एकाचे बोलणे झाल्याशिवाय दुसऱ्याला बोलता येत नसे. तिथं पण नंबर लावा. दिवसा पूर्ण दर तर रात्री नऊनंतर निम्मा व रात्री अकरानंतर पहाटे सहापर्यंत पाव दर असायचा ! ज्यांना थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील, पण लवकर बोलता आलं पाहीजे असं वाटायचे ते नऊ ते अकरा दरम्यान येत. ज्यांना पैसे वाचवणे आणि जास्त बोलणे असे दोन्ही डाव साधायचे असत, अशी धोरणी, मुत्सद्दी व हुशार मंडळी रात्री अकरा नंतर येत !
येथे हिवाळयात चहावाल्याची टपरी आणि उन्हाळयात आईस्क्रीम, लस्सीवाल्याची गाडी हमखास टेलिफोन बूथच्या आसपास लागलेली असे. त्याला पण या टेलिफोन गिऱ्हाईकांच्या गर्दीमुळे दोन पैसे मिळत. कारण येथे गांवातीलच मंडळी असल्याने, रिकाम्या गप्पा पण बऱ्याच होत. चहापाणी, पानगुटखा वगैरे होई. त्यातून काही नवीन माहिती समजल्याने पण, बाहेरगांवी फोन करावा लागे. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेटीचा कार्यक्रम पक्का होई.
दूरसंचार विभागाने केलेल्या दरम्यानच्या आश्चर्यकारक प्रगतीने आणि खेडोपाडी झालेल्या फोनच्या सहज उपलब्धतेने सर्वदूरच फोनची संख्या बऱ्यापैकी वाढली. खूप घरांमधून फोन दिसू लागले. दरम्यान एस् टी डी बूथ मिळविणे पूर्वी जे कठीण होते, ते विशेष कठीण राहीले नाही. एस् टी डी बूथ पण उदंड झाले, मात्र गिऱ्हाईकच कमी झाले. स्वाभाविक परिणाम हे न परवडणारे व्यवसाय होवू लागले. त्यात कडी केली ती मोबाईलने, आणि मग ‘एस् टी डी बूथ’ चालवणे ही कल्पना अत्यवस्थच झाली. टेलिफोन पण हळूहळू परत करू लागले. बस, खिशात छोटा मोबाईल ठेवला की झाले ! फोन करायचा असेल तर तुमच्या खिशातच फोन असल्याने बूथवर कोण आणि का जाणार ? शेवटी हळूहळू ‘एस् टी डी बूथ’ या कल्पनेने राम म्हटला ! आज कुठं बघायला पण मिळतील की नाही शंकाच आहे !


२९. ५. २०१८

No comments:

Post a Comment