Wednesday, June 13, 2018

फटफट्या आणि स्कुटर्स



















फटफट्या आणि स्कुटर्स 

आमच्या शाळेच्या वार्षिक परिक्षा झाल्या आणि उन्हाळ्याची सुटी लागली की आमच्या गल्लीत त्या वेळी होणाऱ्या ‘सुटीतील धुडगुसाला’ कशाची उपमा द्यावी, हे मला अजूनही समजत नाही. सुटी लागल्यावर एकेकाच्या डोक्यात इतक्या काही विलक्षण कल्पना यायच्या की हेच भावी ज्ञानेश्वर किंवा जगदीशचंद्र बोस किंवा सी. व्ही. रामन किंवा विश्वेश्वरैया तरी नक्कीच !
एखाद्याचा विचार म्हणजे मोटारसायकलच्या सायलेंसरमधे रात्री पातळ शेण भरून ठेवावे. शेण मिळवणे हे अजिबात कठीण नसायचे. दृष्टी जरा बाजूला टाकली की आसपासच गुरेढोरे बांधलेली असायची, सर्व प्रकारचे शेण ! हे असे शेण सायलेंसरमधे भरले, म्हणजे मग सकाळी सुरू करण्यासाठी जर मोटारसायकलला किक मारली तर त्याचा काय परिणाम होईल ? फटफटी सुरू होईल का नाही ? जर फटफटी सुरू झाली, तर सायलेन्सरमधून सुरू झाल्यावर लगेच शेणाचा फवारा बाहेर येईल, का फटफटी सुरूच होणार नाही ? जर ती सुरूच झाली नाही आणि मग नाईलाजाने तिला गॅरेजवर नेले, तर त्या गॅरेजवर ती फटफटी कशी दुरूस्त करतील ? तिथे असलेल्या छोट्या घमेल्यात मशीन व सायलेन्सर उघडल्यावर, हा शेणाचा मोठ्ठा पो पडल्यावर त्या गॅरेजवाल्याची काय प्रतिक्रिया होईल ? त्याला शेणाच्या वासाने फटफटी नीट दुरूस्त करता येईल का ? नाही करता आली तर काय होईल ? — या शेवटच्या चिल्लर प्रश्नाकडे व त्याच्या संभाव्य परिणामांकडे आपण लक्ष द्यायचे नसते, किंबहुना या अशा अडचणी, या काही मूलभूत संशोधमात्मक काम करायचे असले तर येतातच, याची असलेली जाणीव ! ही मोठ्या तंत्रज्ञांची लक्षणे आमच्यापैकी बऱ्याच जणांकडे होती.
काहींचा प्राथमिक विचार म्हणजे पेट्रोलच्या टाकीला जी रबरी नळी, पेट्रोल इंजिनमध्ये येण्यासाठी जोडलेली असते ती इंजिनपासून काढून त्या नळीने पेट्रोल बाटलीत पेट्रोल काढणे ! हा तर बालवाडीतील विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम होता.
मग अजून विचार पुढे यायचा की पेट्रोलमधे साखर टाकल्यावर काय होईल ? या कमालीच्या गोड कल्पनेने तर बऱ्याच जणांना झोप लागत नसे किंवा बऱ्याच जणांची झोप उडत असे. शेवटी मग नाईलाजाने तासनतास रेशनच्या दुकानासमोर रांग लावून घेतलेल्या, कार्डावरच्या साखरेतून छोट्या वाटीभर साखर आणली जाई व त्या पेट्रोलच्या टाकीत, चहाचे आधण ठेवलेल्या भांड्यात ज्या काळजीने घरी साखर टाकली जाते, हे घरी नेहमी बघीतलेले असल्याने, त्याच काळजीने टाकीत साखर टाकली जाई. मात्र येथे काळजीसोबत कुतूहल पण असे. चहाच्या आधणात साखर टाकली की थोड्यावेळांत चहा तयार होणार, हे घरी निश्चित ठरलेले असे, मात्र येथे साखर टाकल्यावर काय होईल याचे कुतूहल असे. कोणाला कसलाही अंदाज नसे. मग काही वेळ वाट पाहून काहीच होत नाही, हे पाहील्यावर नाईलाजाने त्या टाकीस झाकण लावून, हा नाद तात्पुरता सोडून द्यावा लागे. दुसऱ्या दिवशी ही पण फटफटी मग गॅरेजवर दिसे. तिसऱ्या दिवशी त्या फटफटीच्या मालकांची फटफटीच्या आवाजांत शिव्यांची फैर ऐकायला येई.
कोणत्याही फटफटीच्या टायरवर असलेल्या हवा भरण्याच्या स्क्रूवर तर बऱ्याच जणांचा डोळा असे. तुरखाटी टोचून, सायकलचा स्पोक टोचून, काही थोडे फिरवून तो नट ढिला झाला की फटफटीच्या ट्यूबमधील हवेच्या दाबाने मोठा हवा गेल्याचा आवाज होवून स्स्स्सSSSSS फुस्स्स्स करत वर एकदम उडायचा. अशा वेळी तिथं थांबायचे नसते हे उपजत ज्ञान प्रत्येकाजवळ असायचे. या हवा गेल्याच्या आवाजाने कोणी बाहेर आला, तर त्याच्या दृष्टीला अपवादानेच कोणी पडे. कोणीही नसतांना फटफटीच्या ट्यूबमधील हवा आपोआप जावू शकते, या यांत्रिक करामतीवर त्याचा विश्वास बसत नसे. ‘परिक्षा झाल्याय, उन्हातान्हात काय पोट्टे फिरताय आणि हवा सोडताय ! ही गाडी न्यायची कशी ?’ हा वैतागलेला स्वर ऐकू आल्यावर, ‘तो मी नव्हेच’ किंवा ‘इदं न मम’ हा असा अलिप्तभाव आणावा लागे.
त्यावेळी सर्वमान्य असलेली व बऱ्याच जणांकडे असलेली फटफटी म्हणजे ‘राजदूत’ ! या गाडीची त्या वेळी जाहीरात सिनेनट धर्मेंद्र करत असे. त्याच्या जाहीरातीतील शरीरयष्टीकडे पाहून आणि सर्वांनी या पूर्वीच त्याचे भरपूर मारधाडपट पाहीलेले असल्याने, ‘राजदूत’च्या मजबूतीबद्दल सर्वांना खात्री पटे. हे मात्र खरं की ही ‘राजदूत’ खेड्यापाड्यात, जंगलदऱ्यात, रानावनांत, शेतावर कुठेही कशीही जात असे. स्वस्त आणि कुठेही दुरूस्ती होवू शकेल, अशा भरवशाची ही गाडी ! शेतातील रहाटाचे दोर, जडजूड सामानाच्या गोण्या मागच्या स्टॅंडवर बांधल्या की निघाली राजदूत कामावर ! खेड्यावरून दूध आणणाऱ्या दूधवाल्यांची गाडी म्हणजे राजदूतच ! तुम्ही यांवर दोन जण बसा का चार ! कधी कुरकुणार नाही, दगा देणार नाही. निमूटपणे तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोहोचवेल. ही गाडी म्हणजे सर्वसामान्यांच्या, थोडा पैसा बाळगून असलेल्यांच्या आवाक्यातली फटफटी ! इथं हौसेपेक्षा उपयोगच जास्त पाहीला जाई.
जरा जास्त पैसेवाले व थोडे हौशी लोक, ‘जावा’ ही फटफटी घेत. हिच्या चालवतांना होणाऱ्या आवाजावरून या वाहनाला फटफटी हे नांव पडले असावे, ही मला खात्री आहे. केवळ हिलाच नाही तर या प्रकारच्या सर्वच गाड्यांना फटफटी हे नांव पडले होते, अशी जबरदस्त शंका मला आहे. माणूस ‘जावा’ मोटरसायकल चालवतो आहे, हे मुद्दाम कोणाला सांगण्याची गरज भासत नसे, इतका हिचा ‘फटफटफट’ आवाज दुरूनही ओळखता येत असे. हिला दोन्हीकडे सायलेंसर असत.
‘जावा’ या गाडीचीच पण थोडी नट्टापट्टा केलेली बहीण म्हणजे ‘येझदी’ ! ही पण तशीच पण दिसायला जरा बरी आणि आवाज थोडा कमी असल्याने, हिला किंमत जास्त असायची ! जास्त आवाज करणाऱ्यांची कमी किंमत आणि कमी आवाज करणाऱ्यांची जास्त किंमत, हा नियम इथं पण लागू आहे.
आता त्यावेळची गडगंज, गुलछबू स्वभावाची मजबूत गाडी म्हणजे ‘बुलेट’ ! ‘Enfield India’ आणि ‘Royal Enfield’ या दोन गाड्यांना ‘बुलेट’ म्हणून ओळखले जाई. या 350CC च्या असत, त्यामुळे ३५० पॉवरच्या असलेल्या गाड्या या एकमेवाद्वितीयच ! इतर गाड्यांवर आम्हाला असे पॉवरचे आकडे दिसायचे नाही, त्यामुळे या गाडीचे महत्व आम्हाला नेहमीच वाटे. ‘धगधगधग भगभगभग’ अशा दमदार संथ खर्जाच्या आवाजातील फायरिंग करत ही गाडी निघाली की दुरूनच आम्ही म्हणत असू, ‘बुलेट येतेय’ ! ही गाडी इतर गाड्यांच्या तुलनेने अतिशय जड ! गाडी बंद झाल्यावरही हिचा ‘हॉर्न’ म्हणजे ‘पीप पीप’ वाजायची, हे पण आश्चर्यच ! या गाडीवर कोणी सामानसुमान वाहून नेलेले मी अपवादानेच पाहीले. वास्तविक मजबूतीला ही वरचढच ! पण एकाच गांवातील दोन जण ! एक नियमीत चांगलाचुंगला खुराक खात, आपली तब्येत पिळदार, मजबूत बनवणारा पण काहीही कष्टांचे काम न करणारा पैलवान ! तर दिवसभर काबाडकष्ट केल्याने, त्या शारिरिक श्रमाने शरीर घट्ट व पिळदार झाल्याने मजबूत दिसणारा पण कसाबसा रोज पोट भरणारा कष्टकरी किंवा अगदी हमाल ! मला हाच फरक ‘बुलेट’ व ‘राजदूत’ मधे जाणवायचा !
स्कूटर वगैरे दिसायची ती शहरात गेल्यावरच ! आमच्या गांवात स्कूटर्स बाहेर गांवाहून बदली झालेले आणायचे. स्टेट बॅंक, युनायटेड वेस्टर्न बॅंक या दोन बॅंका त्या वेळी जोरात होत्या. यांच्या कर्मचाऱ्यांकडे स्कूटर्स दिसायच्या ! पण त्या या गांवातल्या पाहुण्या आहेत हे जाणवायचे.
काही जणांजवळ उगीच ‘लुना’ असत ! त्या वेळी नवीनच निघालेल्या होत्या. जरा मोठ्या सायकलमधे पेट्रोल भरले की ती आपोआप पायडल न मारता चालवता येईल, या भावनेतून या लुना निघाल्या असतील. गांवात फारतर तीन-चार असतील त्या ! मात्र लुना दिसायच्या त्या जळगांवातील नेहरू पुतण्याजवळ असलेल्या दुकानात आणि गांवात ! भरपूर ‘लुना’ आणि ‘लुना कायनाटिक’ ! लुना कायनाटिक मधे जरा जास्त ताकद असायची, डबलशीट बसतां यायचं. लुनावर डबलशीट बसायचे म्हणजे कोणत्या क्षणाला सायकलीसारखे पायडल मारून मागच्याला चालवावी लागेल याचा नेम नसायचा. जरा चढ आला की ही करामत व्हायचीच !
पुण्याला एकदा जाणे झाले तर ‘कायनाटिक स्कूटर्स’ मी खूप बघीतल्या. महिला वर्गाचा या वाहनावर विशेष लोभ होता. आपण काही बघतोय तोच सुळकन काहीतरी रंगीत पट्टा आपल्याजवळून ‘कायनाटिक स्कूटरवरून’ निघून जायचा.
सर्व वाहन चालवणारे जमीनीवरूनच त्यांची वाहने चालवतात मात्र त्यांच्याकडे जमिनीवरून चालणारे त्यावेळी कौतुकाने पहात असायचे. आता इतकी नवनवीन वाहने झाली आहे की कौतुकाने काय पहाता, त्याला वेळच नाही ! कसाबसा गर्दीतून मार्ग काढत जावे लागते व आपले गंतव्य स्थान गाठावे लागते.

१५. ४. २०१८

No comments:

Post a Comment