Wednesday, June 13, 2018

आपण कसे घडत जातो

आपण कसे घडत जातो,

आपण कसे घडत जातो, लहानपणीच्या अनुभवांचा होणारा कळत-नकळत परिणाम आपल्याला पक्के बोट धरून इथपर्यंत आणतो. सुंदर लिहीलंय !
ज्यांना व्यवसाय म्हणून विविध प्रकारचे भरपूर वाचन करता येतं, तसेच केवळ उमेदीचाच नाही तर त्यानंतर स्थिरस्थावर झाल्यावरही ज्यांना निवांत, चवीने वाचन करायला मिळतं ही मंडळी खरंच भाग्यवान सारस्वत ! आपण त्यातले भाग्यवानपण आणि सारस्वतपण ! आमच्या काही बलवत्तर योगामुळे आपल्या सारख्यांच्या भेटी होतात व टिकतात.
आपल्यावर आपली जगण्याची व कुटुंबाला जगवण्याची जबाबदारी जोवर पडत नाही, अशा ‘बालपणीचा काळ सुखाचा’ या काळांत आपले बऱ्यापैकी वाचन होत होते. त्या काळांतील घरातील व्यवस्थाच तशी होती. मात्र जगण्याच्या धबडक्यात एकदा सापडले की मग त्यासाठी जे वाचन करावे लागेल ते मुख्य ! आपली आवड मग त्यात शोधावी लागते किंवा तेच मग आवडू लागते.
लिखाण व वाचन या एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी. प्रचंड वाचन असेल तर थोडेफार लिखाण करता येते. काही असतात, जन्मजात गाठोडं घेवून, की ज्यांना लिखाण सुचतच जातं, सुचतच जातं !
पण काही असले तरी वाचन व संगीत ही आपल्या खऱ्या विश्रांतीची जागा आहे. शांतपणे डोळे पानावरुन फिरवत डोळ्यातून मजकूर डोक्यात साठवत न्यावा आणि त्या धुंदीत तल्लीन व्हावे. —- किंवा डोळे मिटून ‘अनादी मी अनंत मी’ असे असलेले स्वर आपल्या कानांतून डोक्यांत आणि ह्रदयांत साठवत मुरवून ठेवावेत ! आपल्या ह्रदयांतील अंत:चक्षूंसमोर ते स्वर कसे खेळतात ते रमून जात पहावे ! शांतता अजून काय हवी ?
माझी इथं जी मंडळी मित्र झाली किंवा पूर्वीपासूनच माहिती असलेली पण इथं जी प्रत्यक्ष भेटली, त्यात अशी काही मौल्यवान आहेत, माझ्या विचाराला धक्का देतात ! बस, मग त्या धक्क्याने मी पुढे सरकतो. माझे जेष्ठ मित्र Praveen Bardapurkar यांचा हा असा सहभाग !

२०. ४. २०१८


No comments:

Post a Comment