Wednesday, June 13, 2018

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
आज ‘भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे’ यांनी प्रकाशित केलेले ‘वैदिक सूक्तपाठ’ हे पुस्तक घेऊन बसलोय. आर्ष वाड•मय आवर्जून आपल्या समर्थ प्रतिभेने भाषांतरीत करून जनतेला समर्पित करणाऱ्या महामहोपाध्याय विद्यानिधी डॉ. सिद्धेवरशास्त्री चित्राव यांचेच हे पुस्तक आहेत, ते पुन्हा एकदा वाचले. त्यांची इतर पण अनेक पुस्तके आहेत. डॉ. सिद्धेवरशास्त्री चित्राव, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. सातवळेकर, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या आणि अशासारख्या माणसांचे काम बघीतले, तर आपण आपल्या आयुष्यात हे सर्व वाचू देखील शकणार नाही, आत्मसात करणे तर दूरच ! या अशा हे माणसांचं कार्य डोळ्यांसमोर आलं तर डोळे तर झुकतातच, पण आपोआप आपले हात जोडले जातात. ही परमेश्वरानेच, देवी सरस्वतीनेच पाठवलेली तिची माणसं ! तिचे काम करण्यासाठी !
आज वाचत होतो, सौरसूक्त ! वैदिक देवपंचायतनातील सूर्य ही प्रमुख देवता आहे. सूर्य देवतेचीच ऋग्वेदातील प्रमुख सूक्ते ही सौरसूक्ते म्हणून म्हटली जातात. बुद्धीदाता, आरोग्यदाता असलेला सूर्य आहे. ऋग्वेदातील सवितृ म्हणजे उदयाचलाचा सूर्य, आणि उदयापासून ते अस्तापर्यंत जो असतो त्यास सूर्य म्हणतात. सवितृचा म्हणजे आपण मानत असलेला, सूर्याचा प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’ हा बुद्धी मिळावी हीच प्रार्थना करतो. रोगशमन, रोगनाशन या साठी सूर्यप्रकाश हे उत्तम औषध आहे. सर्व सृष्टीला जीवन देणारे पाणी, हे पृथ्वीवरून ग्रीष्मऋतूत बाष्परूपाने शोषून घेवून तेच बाष्प पाण्याच्या रूपात मेघामार्फत पृथ्वीवर शिंपण्याचे काम वर्षाऋतूत सूर्य करतो. या जीवनदायी पाण्याने पृथ्वीवरील सर्व सृष्टी जगते, तिचे पालनपोषण होते. असा हा जीवनदायी सवितृ सूर्यनारायण !
सूर्यनारायणाचे सौरसूक्ते वाचण्याची अनिवार इच्छा झाली, ती काल कै. डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेले, कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले, कै. पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘तेजोनिधी लोहगोल’ गीत ऐकत होतो. ललत पंचम या रागातील हे गीत म्हणजे सूर्योदयाच्या थोडी अगोदरची व नंतरची सृष्टी आपल्या डोळ्यांसमोर उभी करते. मी खूप भाग्यवान की या सर्वांना मी समक्ष जवळून बघीतले आहे. ही ईश्वरी प्रतिभा घेऊन आलेली माणसं ! ते गीत ऐकत होतो आणि म्हणून या सौरसूक्तांची आठवण झाली. आपल्याला जीवन देणाऱ्या पंचमहाभूतांनची, निसर्गदेवाबद्दलची कृतज्ञनेची भावना जागी झाली असावी म्हणून !
राग ललत पंचम मधील स्वर जर बघीतले तर -
नि रे ग म, मा ग, मा ध नि सा । सा नि ध, मा ध मा म ग, प ग रे सा । मा ध नि, ध प, ध म, प ग, रे सा ।
रिषभ आणि धैवत कोमल, दोन्ही मध्यम आणि पंचमाचा योग्य वापर म्हणून हा, ‘ललत पंचम’ ! बाकी नेहमी ऐकतो त्या ‘ललत’ रागात पंचम नाही. याचा थाट भैरव मानतात. जाती षाडव-संपूर्ण, वादी स्वर मध्यम, संवादी षड्ज ! या रागातील हे सुंदर नाट्यगीत ऐका डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याच आवाजात ! आपल्यासाठी नाट्यगीत देतोय -
तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज
कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन-मरण, तेजातच नवीन साज
हे दिनमणी व्योमराज
ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणी व्योमराज

https://www.youtube.com/watch?v=C0uSv5FUni0&feature=share

११. ३. २०१८

No comments:

Post a Comment