Wednesday, June 13, 2018

शिव जयंती - इतिहास आणि श्री. तिवारी सर

शिव जयंती - इतिहास आणि श्री. तिवारी सर





आज फाल्गुन वद्य ३ ! शिवजयंती, तिथीनुसार !
पूर्वी हा मान निर्वेधपणे वैशाख शुद्ध २ या तिथीला होता. त्यावेळी शके १५४९, प्रभव संवत्सरात शिवाजी महाराजांचा जन्म झाला, हे स्विकारले गेले होते, म्हणजे त्यांची जन्म दिनांक ग्रेगोरिअन कॅलेंडरनुसार ही गुरूवार, ६ एप्रिल, १६२७ मानली गेलेली होती. तेव्हा स्वाभाविकपणे शिवजयंती ही अक्षयतृतियेच्या आदल्या दिवशी असते, हेच आम्हाला बालपणापासून माहिती होते. तशीच ती साजरी केली जात असे, कसल्याही वादाशिवाय ! मात्र नंतरच्या संशोधनाने ही जन्मतिथी, शुक्रवार, फाल्गुन वद्य ३, शके १५५१ असल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे त्याची जन्म दिनांक ग्रेगोरिअन कॅलेंडरनुसार दि. १९ फेब्रुवारी, १६३० अशी येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनांत हिंदवी स्वराज्य निर्मितीची ज्योत पेटवली ती त्यांच्या मातापित्यांनी, त्यांच्या गुरूजनांनी ! आमच्या मनांत शिवछत्रपती या नांवाची ज्योत जागवली, प्रज्वलीत ठेवली, ती आमच्या मातापित्यांनी आणि गुरूजनांनीच ! आमची प्राथमिक शाळा म्हणजे जिल्हा परिषद जळगांव यांनी चालवलेली मराठी मुलांची शाळा, नं. २, ही त्यावेळी नाल्यावर भरत असलेली शाळा आणि माध्यमिक शाळा म्हणजे रावेर शिक्षण संवर्धक संघाची, सरदार जी. जी. हायस्कूल ही शाळा ! या दोन शाळांत माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले.
शिवजयंती म्हटल्यावर हा शाळेतील गतकाळ, इतिहास आठवतो, इतिहासातील विविध घटना आठवतात. काही प्रसंग ऐकतांना अंगावर रोमांच उभे रहातात, तर काही वेळा लज्जेने तोंड काळे पडते, काही वेळा दुर्दैव बघून डोळ्यांत पाणी उभे रहाते, तर काही वेळा हातात तलवार घेऊन रणांगणावर लढायला जावे अशी स्फूर्ती येते. इतिहास तोच, इतिहासातील घटना त्याच ! मात्र त्याकडे आपण कसे पहातो, यांवर बरेच काही अवलंबून असते. कोणताही चष्मा न लावता, आपण इतिहास बघायला हवा, तरच आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल. नाही तर ‘इतिहास हवाच कशाला पासून ते जुनी मढी उकरून काढून काय मिळणार आहे ?’ इथपर्यंत वेगवेगळी भूमिका घेऊन वाद घालणारे असंख्य आहेत.
मराठी शाळेत त्यावेळी आम्हाला वर्षभर सर्व विषय शिकवायला एकच शिक्षक असे. वेगवेगळे विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक, ही चैन त्यावेळेस तर अजिबात परवडणारी नव्हती. पहिली ते तिसरी तीन पैसे व चौथीला सहा पैसे असे विद्यार्थ्याला महिन्याला द्यावे लागत. ती फी होती का काही वेगळे होते, हे मला अजून समजले नाही. चौथीला आम्हाला शिकवायला होते ते, पै. दिलदारखॉं बलदारखॉं पठाण नांवाचे शिक्षक ! त्यावेळी इतिहासाचे पुस्तक होते, ‘शिवछत्रपती’ या नांवाने ! त्यांना शिवछत्रपती यांचा इतिहास शिकवतांना पठाण गुरूजी इतिहासांत अगदी रमून जात शिकवायचे.
सरदार जी. जी. हायस्कूलमधे पाचवीला मी आलो, पाचवीला श्री. श्यामाप्रसाद चौधरी सर इतिहासाला होते. सहावीला आल्यावर सहावी पासून ते थेट नववीपर्यंत श्री. एस्. एस्. तिवारी सर होते इतिहास शिकवायला. हिंदी पण त्यांनी एखादे वर्ष वगळता, इतिहासासोबतच नववीपर्यंत शिकवले.
आमची शाळा ही सकाळ व दुपार या दोन्हीवेळेस असायची, पण माझे दरवर्षीचे वर्ग हे शेवटपर्यंत जवळजवळ सकाळचेच असायचे. शाळा गांवाबाहेर ! शाळा भरायची, सकाळी ६.४५ वाजता. पहिले प्रार्थना आणि नंतर ६.५५ ला पहिला तास असायचा. प्रार्थना सापडायला हवी असेल, तर ६.४५ च्या आंत सकाळी शाळेत पोहोचले पाहीजे. आमच्या घरापासून शाळा निदान दोन किलोमीटर दूर असावी. आमची गल्ली, भोकरीकर गल्ली ही नाल्याजवळच ! श्री. तिवारी सर पण डॉ. आठवले यांच्या दवाखान्याच्या मागील बाजूस रहात, म्हणजे आमच्या गल्लीजवळच !
सकाळी प्रार्थना सापडायला हवी, ही टूम निघाल्यावर मग शाळेत सकाळी कोणकोण जाते हे दिसायला लागले. हे सर्व नवीनच होते. सकाळी साडेसहाला आंघोळ करून जर बाहेर पडले तर मग कशीबशी प्रार्थना मिळे. त्यावेळी रस्त्याने अत्यंत झपझप चालणारे श्री. तिवारी सर दिसत. डाव्या हातात तीनचार वह्यापुस्तकांची गड्डी हात दुमडून काही वेळा डाव्याबाजूस कमरेजवळ तर काही वेळा छातीजवळ घेतलेली, पायात काळ्या वा काळपट चपला, पांढरी वा पिंगट वा क्रिम कलरची पॅंट आणि जवळपास तशाच रंगाचा हाफ बाह्यांचा मनिला ! खिशाला पेन व खिसा त्यांत असलेल्या छोट्या उभट डायरीने फुगलेला ! त्यांच्या सोबत आम्हाला चालायचे म्हणजे जवळजवळ दुडक्या चालीने पळावेच लागे, ते पण त्यांना कोणतीही शंका येवू न देता आणि योग्य अंतर राखूनच ! पहातापहाता बावीसे गल्लीतून गेले की महालक्ष्मीचे मंदीर येई, मग राजे रघुनाथराव देशमुख वाचनालय, मग एस् टी स्टॅंड आणि मग शाळा ! आपल्या हातातील दप्तराची पिशवी किंवा पेटी आणि दुसऱ्या हातात मधल्या सुटीसाठी दिलेला खाण्याचा डबा; असे दोन्ही गुंतलेल्या हातांनी, आपली चड्डी खाली घसरू न देता किंवा त्यांत खोचलेल्या शर्टाची ऐसी का तैसी होवू न देता, हे सर्व पथ्य सांभाळत, त्या वेगाची बरोबरी करत, कुठलाही अपघात होवू न देता चालणे आणि शाळा गाठणे, हे अजिबात सोपे नसे. तोपर्यंत आमची दमछाक झाली असे. काही वेळा अपघात होई, म्हणजे कोणीतरी हाक मारी आणि मागे पहातापहाता कशावर तरी धडकून, डब्याचे झाकण उघडले जाई आणि मधल्या सुटीतील डबा भल्या पहाटेलाच रस्त्यावर लोळण घेई.
माझ्यासोबत बऱ्याच वेळा गणेश राणे असे कारण तो पण आमच्या गल्लीच्या तोंडाशीच रहात असे. काही वेळा लवकर जात असलो तर शाळेचा शिपाई हरिभाऊ पाटील, हा पण रस्त्याने जाताना दिसे. तेथे गेल्यावर मग शाळेचे गेट उघडणे आणि टण्णटण्णण्णऽऽऽ अशी शाळा सुरू झाल्याची घंटा होई. सर्व वर्गांच्या खोल्यांची, टीचर्स रूम, कार्यालयाची कुलूपे उघडली जात. शाळा गजबजू लागे. वर्गात दप्तरे ठेवून विद्यार्थी प्रार्थनेला जमत. प्रार्थना होई, सर्व मुले वर्गात जात.
वर्गात तिवारी सरांचा इतिहासाचा तास असला की सर झपझप चालत वर्गात येत. फळ्याकडे काय लिहीलं हे पहात, बऱ्याच वेळा हातानेच सर्व फळा पुसत, फुंक मारून हातावरील खडूची भुकटी फुंकून टाकत. काही वेळा फळ्याकडे पहात, विद्यार्थ्यांना उद्देशून ‘का बे, महाजन, या मास्तरनं काय शिकाडलंय ते काही सांगतो ? जमतं का काही शिकाडायले, या मास्तरले ?’ यांवर वर्गातील दहा महाजनांपैकी पाच महाजनांच्या पोटात गोळा आलेला असायचा ! कारण काही वेळा लहर लागली, तर त्या विषयाचे पण ते प्रश्न विचारायचे. अशा वेळी सुरक्षित मार्ग ही सर्व महाजन मंडळी वापरायची, तो म्हणजे आपला चेहराच सरांना दिसू नये असा, तो कोणाआड तरी लपवीत. सर मग मागील वेळी काय शिकलो, याचा थोडक्यात प्रश्न विचारून आढावा घेत आणि फळ्याच्या डाव्या बाजूला वरील कोपऱ्यापासून त्या तासाचे शिकवणे सुरू करत. एकेक वाक्यातील महत्वाचा मुद्दा फळ्यावर घेत शिकवणे व फळ्यावर लिहीणे सुरू असे. वळणदार, उभट अक्षरांचे त्यांचे लिखाण फळ्यावर खडूच्या कुरकुरीसोबत हळूहळू पुढे सरकत जाई आणि त्या दिवशी आपल्या डोक्यातून मनापर्यंत त्यातील आशय झिरपत जाई. साधारणपणे फळ्याचे तीन उभ्या भागांत, ते विभागणी करत. पहिला व दुसरा भाग लिहून संपला व तिसरा भाग सुरू झाला की तास संपायला साधारणत: पाचदहा मिनीटे जेमतेम उरलेली असत.
श्री. तिवारी सरांनी इतिहास शिकवतांना आम्हाला काय शिकवले नाही ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल म्हटले तर - त्यांनी आम्हाला रामायण महाभारतातील गोष्टी आपल्या मातेकडून व गुरूजनांकडून ऐकत राज्यधर्म शिकणारा बाल शिवबा दाखवला. आपल्या आप्तस्वकीयांना व आयाबहिणींना दिवसाढवळ्या लुटणाऱ्या राज्यकर्त्यांची अत्याचारी माणसं दाखवली, मग हे सहन न झाल्याने रोहिडेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन ‘राज्य व्हावे हे तो श्री ची इच्छा’ म्हणत व वयाच्या सोळाव्या वर्षी भगवा ध्वज फडकवत तोरणा किल्ला जिंकत, स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या तरूण शिवबाचे मन दाखवले.
‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचं’ असं म्हणत प्रत्यक्ष मृत्युला कवटाळून युद्ध करणारा महाराजांचा स्वराज्य स्थापनेतील सहकारी तानाजी मालुसरे दाखवला, वयाच्या ऐंशीव्या वर्षी भीष्माचार्याप्रमाणे कोंढाण्याच्या किल्लेदाराशी उदयभानूशी लढणारा तानाजीचा मामा, शेलार मामा दाखवला. ‘अरे, तुमचा बाप इथं मरून पडला आहे, आणि तुम्ही कुठं पळताय ? लढा नाहीतर कड्यावरून उड्या मारत जीव द्या.’ हे म्हणणारा सूर्याजी मालुसरे यांनीच दाखवला ! — आणि ‘गड आला पण माझा सिंह गेला’ म्हणणारे महाराज यांनीच शिकवले.
सिद्धी जौहारच्या वेढ्यातून निसटून जातांना प्रत्यक्ष लाखाच्या पोशिंद्याला, शिवरायांना, पालखीत घेऊन जीवापाड धावणाऱ्या त्या पालख्यांच्या भोयींच्या धावण्याचे मोल हे आलिंपिकमधील सुवर्णपदकापेक्षा किंचीतही कमी नाही, किंबहुना जास्तच आहे, हे त्यांनी आम्हाला सांगीतले. प्रत्यक्ष कळीकाळालाच आपल्या छातीवर धाडसाने घेणाऱ्या बाजीप्रभू देशपांडेचा पराक्रम पाहून, यमराजाला वाटावे की हा आपला बंधू बाजीप्रभूच्या रूपात आज पावनखिंड लढवतोय, त्याला आपले रूप मानण्यापूर्वीच आपल्याजवळ बोलावून घ्या’, हे त्यांनी शिकवले.
स्वराज्याच्या ह्रदयस्थानी म्हणजे प्रत्यक्ष पुण्यात असलेले संकट, शाईस्तेखान ! त्याच्यावर गनिमी काव्याची कमाल दाखवत चढवलेला हल्ला ! औरंगजेबाच्या या मामाची, शाईस्तेखानाची त्याच्याच महालात जावून त्याचीच बोटे कापून दाखवून, ‘जिवावरचे बोटावर निभावले’ ही म्हण त्यांनी आपल्या अनुभवास दिली.
चाकणचा किल्ला लढवतांना फिरंगोजी नरसाळे यांचा कृतांतकाळासारखा पराक्रम पाहून दिलेरखानाची वळलेली बोबडी दाखवली. मिर्झाराजे जयसिंग यांना हिंदवी स्वराज्यासाठी एकलिंगजीचा शब्द देत, एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे दाखवले. नंतर दुर्दैवाने करावा लागणारा तह व त्या मागची महाराजांची तडफड दाखवली. आग्र्याच्या किल्ल्यातील औरंगजेबाच्या दरबारातील मराठी बाणा दाखवला आणि ‘पिंजऱ्यातून पक्षी उडाला’ हे पण दाखवले.
विजापूरचा सरदार, अफजलखान, या पहाडी चुव्व्याला चिरडायला निघालेल्या रस्त्याने आयाबहिणींची कशी अब्रू लुटत गेला ते दाखवले. त्याने केलेला प्रत्यक्ष माझ्या तुळजापूरच्या भवानीवर, पंढरपूरच्या पांडुरंगावर हल्ला दाखवला ! ‘बोल, कुठे आहे शिवा ? माझ्या समोर तो कोण चुव्वा ?’ हा अफजलखानरूपी हिरण्यकश्यपू महाराष्ट्राच्या जनतारूपी प्रल्हादाला विचारत होता आणि शिक्षा देत होता. जनतेवर अत्याचार करत होता आणि आमचा हा शिवा कुठं होता ? प्रतापगडावर ! आपल्या पश्चातची सर्व व्यवस्था लावण्यात दंग ! मी गेल्यावर शंभूराजे व मासाहेबांचे ऐका, हे सांगत होता. हिंमत लागते, छाती लागते, हे सांगायला ! गडाबडा लोळण घेत, तडजोडीचे अपमानास्पद कलम स्विकारले नाही त्यांनी यावेळेस ! धडा शिकवायचा होता. त्यांना श्रीकृष्णाची वाणी आठवत होती - हतो वा प्राप्यसि स्वर्गं जीत्वा वा भोक्षसे महिम्’ खानाला मग गडाच्या पायथ्याशी बोलावले आणि या नरसिंहाने मग त्या अत्याचारी अफजलखानरूपी हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला. यांनी सैय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवणारा जिवा महाला दाखवला आणि जावळीच्या खोऱ्यात शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या शत्रूंची केलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी लांडगेतोड दाखवली.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे’ हे छत्रपतींना दाखवून देणारे समर्थ रामदास दाखवले. डोळ्याचे पारणे फेडणारा राज्याभिषेक सोहोळा दाखवला ! सरते शेवटी या धीरोदात्त राजाचे डोळ्यातलं पाणी न लपवतां देहावसान दाखवले.
असे काही प्रसंग आले, सण आले, उत्सव आले की आम्हाला असं काही आठवते आणि मग या पैकी सण, उत्सव, समारंभ काहीही नसले, अगदी आमच्या रोजच्या जीवनातले अडचणींचे प्रसंग असले तरी तिवारी सरांनी शाळेत शिकवलेले ‘शिवछत्रपती’ इतिहासातील ते धडे आठवतात ! —- मग शिवजयंतीला असं काही लिहीलं जातं !

४. ३. २०१८

No comments:

Post a Comment