Wednesday, June 13, 2018

बंद झालेले व्यवसाय - भाड्याची सायकल

बंद झालेले व्यवसाय - भाड्याची सायकल
‘देवाने मला हे मजबूत दोन पाय दिलेले आहेत, तुझ्या तकलादू गाडीचा माज दाखवू नको. आता पण उठलो अन् चालायला लागलो तर, बोलबोलता पाच कोस सहज चालून जाईन.’ हे बोलणारा दिसायला मजबूत असायचा किंवा नसायचा पण ! मात्र त्याचा मजबूत आवाजच सांगायचा, की हा खरंच आता चालायला लागला, तर पाच कोस सहज चालून जाईल. ही वाक्ये आम्ही ऐकताऐकता लहानाचे मोठे झालो. जसजसे लहानपण सरत होतं, वयाने मोठे होत होतो, तशी ही वाक्य दमदारपणे म्हणणारी माणसं पण कमीकमी होत गेली. आता तर कोपऱ्यावर जरी जायचं असले, तरी पायी जाणे शक्य नसते, तेथे जायला आम्हाला कोणतेतरी वाहन लागते. स्वत:चे नसले तर भाड्याचे, रिक्षा, टॅक्सी वा कोणाची तात्पुरती गाडी लागते.
पायी चालणं हे नैसर्गिक असल्याने यांत लाजिरवाणे काही नाही. तसा समज पण कोणाचा नव्हता, तर उलट पायी चालणे हे सर्वमान्य होते. फारच झालं तर काही जण यासाठी बैलगाडी, सायकलचा उपयोग करत. त्यातल्या त्यात, एखाद्यास आसपासच जायचं असेल, तसेच लवकर जायचं असेल व पायी जाण्यापेक्षा बऱ्याच वेळा सायकलवर जावं लागायचं. जास्त माणसं असली तर मग बैलगाडी हवीच ! तशी सायकलपण सर्रास सर्वांकडे नसायची. त्यामुळे आपली लाख इच्छा असो, सायकलवर जाता येत नसे, कारण आपल्याजवळ सायकल असेल तरच जाता यायचे. अशा वेळी, एकतर उधार उसनवार अशी कोणाची तरी सायकल घ्यायची, किंवा मग सायकलच्या दुकानातून भाड्याने सायकल घ्यायची, हे दोन मार्ग उपलब्ध असत.
माझ्या घराच्या मागच्या बाजूला बऱ्यापैकी मोकळी जागा होती, त्याला नाल्याचा भाग म्हणत ! त्या खालून गांवाचा नाला गेलेला आहे. गांवातील सार्वजनिक सभा घेण्याची ठिकाणे ठरलेली असत. बैठक किंवा थड्यावरील मोकळ्या जागेत, गांधी चौकात, नाहीतर गांवाच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘नाल्यावर’ ! आसपासची गांवे येणार असतील तर मग थोडी गांवाबाहेरची जागा म्हणजे, देवघरवाल्यांची ‘रामबाग’ !
येथे नाल्यावर बऱ्यापैकी मोकळी जागा असल्याने, बाळगोपाळ मंडळी घाईगर्दीत सायकल चालवू शकत. जवळच बैठक व थडा हा भाग असल्याने, नाल्यावरून त्या भागांत सायकल चालवत नेणे सोपे असे. तेथे नाल्यावर एकाचे सायकल भाड्याने देण्याचे दुकान होते, त्याचा मालक गुरव ! गावांत अजून एक लोहार स्टोअर्सशेजारी दुकान होते, त्या दुकान मालकांना पेंटर म्हणून ओळखले जाई. त्यांच्याकडे भाड्याने सायकलीच नाही, तर लग्न मिरवणूकीत, सभा किंवा कार्यक्रम असल्यास लागणाऱ्या गॅसबत्त्या पण भाड्याने मिळत.
त्यावेळी जरा वेळ मिळाला, हातात चार-आठ आणे असले, की काहींना सायकल शिकायची फार हौस येई. स्वत:ची सायकल असली तर प्रश्नच नसे, मात्र स्वत:ची सायकल घेवू शकणारी फार मंडळी नव्हती त्यावेळी ! मग मार्ग काय, तर नाल्यावर सायकली भाड्याने देणाऱ्या दुकानात जायचे. भाड्याने सायकली घेवून आपले काम करून घेणे, यांत कोणीही, कसलाही कमीपणा मानत नसत. शहरात गेल्यावर अगदी मालदार मंडळी पण, भाड्याची सायकल घेवून दोन-चार कामे उरकून टाकत.
सायकली या लहान मुलांच्या व मोठे माणसांच्या, अशा दोन प्रकारच्या सायकली असत. मात्र या नाल्यावरच्या दुकानात जास्त गर्दी लहान मुलांचीच ! लहान सायकलचे भाडे म्हणजे, सुरूवातीला दहा पैसे ते नंतर वाढत चार आणे तासाला झाले. ही अशी वाढत जाणारी महागाई मी बघीतलेली आहे. ही सायकल कशी असायची, हे बघीतले, तर दुकानदार ग्राहकाची किती काळजी आपल्या काटकसरीपायी घ्यायचा, हे दिसेल. या सायकलला मागे बसण्यासाठी व सायकल उभी करता येण्यासाठी स्टॅंड नसायचे. सायकल चालवतांना, पुढे चालणाऱ्यास, आपल्या मागून सायकल येते आहे, ही सूचना मिळावी, यासाठी पण सायकलला घंटा नसायची. ब्रेक पण यथातथाच, कारण सायकलची कंडीशन दुकानदाराने कितीही व्यवस्थित ठेवली, तरी ही अशी आणि इतकी मंडळी, अशा पद्धतीने सायकल वापरणारी असल्यावर तिची कंडीशन, काय आणि कशी रहाणार ? तसेच किती दिवस ठीक रहाणार, याचा अंदाज येवू शकतो. सायकल भाड्याने घेतल्यावर निदान ती किंवा त्यावरील स्वार दोन-तीन वेळा रस्त्यावर पडल्याशिवाय, ती परत केली जात नसे.
सुरक्षित सायकल चालवता यावी, तर मग सर्व भर चालविणाऱ्याच्या आरड्याओरड्यावर ! या वेळी चालवणारा जसा हाका द्यायचा, तसेच ही सायकल धरून, त्या सायकलच्या मागे, त्याला सायकल शिकवणारे किंवा याच्यानंतर याच सायकलवर लगेच सायकल शिकणारे, यांच्या पण हाका, त्यांत असायच्या. काही वेळा दोनापेक्षा जास्त जण जर सायकल शिकण्याची अपेक्षा धरत असतील, तर त्याला छोट्या वरातीचे स्वरूप यायचे ! मग हा एक नवरदेव सायकलवर बसलेला आणि मागून हीऽऽऽ वरातीतील सर्व मंडळी हाकारे देत पळत आहे. त्यामुळे सायकलपुढे चालणाऱ्याला, आपल्या मागून हे आवाज करणारे, काय भलमोठं येतं आहे, याचा अंदाजच यायचा नाही. तो घाईघाईने रस्त्याच्या कडेला सरकायचा, तेवढ्यात इतक्या बाळगोपाळांमधील एक तरी त्याच्या अंगावर बेसावधपणे यायचा, आणि दोघे रस्त्याच्या कडेला गटारीत घसरायचे. गटारीत पाणी नसायचेच, नुसतीच घसरगुंडी ! हा उठेपर्यंत त्या बाळगोपाळांना वेळ कुठं असायचा ? त्यांची वरात आरडाओरड करत केव्हाच पुढे निघून गेली असायची. ‘पोट्टे, **डीचे बेफाम सायकली चालवतात ! सरळ चालणं कठीण झालंय !’ असे काहीबाही बोलत हा पण चालायला लागायचा. त्याच्या हातातलं काही सामानसुमान पडून नुकसान झालं किंवा समाजातील जरा ‘प्रतिष्ठीत’ व्यक्तीवर जर हा प्रसंग आला, तर ‘शिव्यांच्या प्रयोगाचे’ दोन अंक जास्त व्हायचे, यापेक्षा जास्त काही नाही. ज्यांच्यामुळे हे प्रयोग व्हायचे, ते निर्विकारपणे पसार झालेले असायचे. शेवटी रस्त्यावरचा, एरवी कधीही पैसे घेतल्याशिवाय काहीही न देणारा दुकानदार, हा ‘जावू द्या, पडले तर पडले ! पोरं हाय ती ! ती खेळणार नाय, तर मग कोण खेळणार ?’ असा मोफत सल्ला याला द्यायचा. हे ऐकल्यावर त्याची तोपावेतो, कसलीही आग करत नसलेली जखम, आग करायला लागायची.
आपण सायकलवर बसलो, म्हणजे सायकल आपोआप चालत नाही, तर ती आपल्याला चालवावी लागते. ती चालवता यावी असे वाटत असेल, तर पहिले ती सायकल शिकावी लागते. चालवतांना तोल सांभाळावा लागतो. आम्हा बाळगोपाळ मंडळीत सायकल शिकणे हा पैसेवाल्याचा खेळ मानला जायचा. सायकल भाड्याने घ्यायची तर पैसे लागायचे, तासाप्रमाणे ! सायकल शिकवायला, ज्यांना सायकल चालवता येते हे जसे तयार असायचे, त्यापेक्षा जास्त उत्साह हा, ज्यांना सायकल चालवता येत नाही, त्यांचा शिकवण्याबद्दल असायचा. ‘तू फक्त सायकलवर बैस आणि पायडल मारत रहा. सायकल आपोआप पुढे जाते.’ इतकं त्यांचे साधसोपं शिकवणं असायचे ! हा शिकणारा पण सुरूवातीला तसाच करायचा. त्याची मोठी अडचण व्हायची, ती सायकल चालवता चालवता पायडलवरून पाय निघाला, की मग ते पायडल पायाला लवकर सापडायचं नाही. पोटरीला, पायाला फाडकन् लागायचं पण पायाला मात्र सापडायचं नाही. पायडल कुठं आहे, हे शोधायला खाली बघावं, तर लगेच सूचना असे, ‘समोर बघ, खाली बघू नको.’ या सगळ्या गदारोळात समोरून कोणी आलं किंवा वळण आलं तर मोठीच पंचाईत ! पायाला पायडल जरी सापडत नसले तरी, त्याची उणीव ही सायकल शिकवणारे सायकल ताकदीने लोटून भरून काढायचे. त्यामुळे चालवणारा पायडल मारत जरी नसला, तरी त्याने फार काही बिघडायचे नाही, ही सायकल पुढे जातच असायची ! शेवटी सायकलवर बसणाराच ब्रेक शोधायचा व खच्चून दाबायचा. त्याबरोबर, मागे मडगार्डपाशी असलेले एकदम हॅंडलपाशी येत. काही वेळा चालवणारा भूमातेला साष्टांग नमस्कार घालायचा. त्यामुळे बाकीचे काही जण आपोआपच, त्यांच्या काही लक्षात यायच्या आंत साष्टांग नमस्कार घालत ! हाताचे कोपरे, गुढगे रक्ताळत पण त्यामुळे सायकल थांबत नसे कारण एकाची सायकल थांबल्यावर दुसरा लगेच तयार असायचा.
जरा जास्त गोंधळ व्हायचा, तो संध्याकाळच्या वेळी ! त्यावेळी गांवाबाहेर चरायला गेलेली गुरे, घरी परत येण्याची वेळ झालेली असायची. त्यांचे याच रस्त्याने परत येणे आणि हा बाळगोपाळांचा सायकलचा गोंधळ ! यांचा संगम झाल्यावर मग काय विचारतां ? गायी, म्हशी शेण टाकत व शेपट्या, मान हालवत चालायच्या. या गडबडीत कोणाला शेणाच्या शेपटीचा सपकारा बसायचा, तर कोणी शेणावरून घसरून पडायचा. हातापायाला लागायचे, सायकल आणि शरीर विभक्त व्हायचे किंवा आतापर्यंत सायकलवर बसलेला सायकलस्वार असे काही चमत्कारिक आयन करायचा की क्षणात याच्या शरीरावर सायकल स्वार व्हायची ! रस्त्याचे, वाहतुकीचे किंवा मानवनिर्मित कोणतेही नियम पाळण्याचे बंधन त्या गुरांवर नसल्याने, ते त्यांच्या नियमाने रस्त्याने जायचे. ढोरांच्या मागचा ढोरकी हा संत तुकाराम महाराजांच्या चिंतनात असल्याप्रमाणे - ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे’ म्हणत जात असल्यासारखा दिसायचा ! त्याला कुणी, ‘ढोरं हाकतोय, का गंमत करतोय *****’ असं काही म्हटलं की त्याच्या अंगात मग समर्थ रामदास संचरायचे - ‘आधी गाजवावे तडाखे, तेव्हा भूमंडळ धाके’ आणि ‘हत् हिच्या बाड ******* *************तिच्या’ म्हणत समोर दिसेल त्या ढोरावर हातातील काठीचा उपयोग करायचा. याचा परिणाम एकच व्हायचा, जी ढोरं त्यांच्या नियमानुसार बऱ्यापैकी रस्त्यांने रांगेत जात असायची, ती उधळायची आणि पळत सुटायची. हे पाहिल्यावर सायकल चालवणारी बाळगोपाळ मंडळीच नाही, तर इतरही लगबगीने रस्त्याच्या कडेच्या दुकानावरील ओट्यावर जावून उभे रहात, व सर्व रस्ता हा ढोरांना व त्यांच्या ढोरक्यांना मोकळा करून देत. ही खूण म्हणजे मुलांना सायकल चालविण्याची वेळ संपल्याची असे. संध्याकाळ झाल्यावर सर्व सायकली त्या गुरवाच्या दुकानावर जमा होत.
आता भाड्याने घेवून सायकल शिकणारे राहीले नाही आणि सायकल चालवता येत नसतांना पण, शिकवायला तयार असणारे, बाळगोपाळ पण राहीले नाहीत. सायकल शिकायची तर ती विकत घेवूनच शिकावी लागते. ‘मोटार ड्रॉयव्हिंग क्लास’ सारखे दरमहा फी घेवून शिकण्याचे ‘सायकल ड्रॉयव्हिंग क्लास’ नाहीत. शिक्षणातून फावला वेळच मिळेनासा झालाय, मिळाला तर त्यांना त्यावेळी अवांतर क्लास असतात किंवा टी. व्ही.वर काही बघायचे असते. मग सायकल कोण चालवणार ? आता तो गुरव पण तिथं नाही आणि भाड्याने सायकल देण्याचे पण दुकान नाही. सायकल भाड्याने देण्याचा व्यवसायच कुठं राहीलाय आता ?

८. ५. २०१८


No comments:

Post a Comment