Wednesday, June 13, 2018

आज मराठी भाषा दिन !

आज मराठी भाषा दिन !
नामदार उच्च न्यायालय मुंबई याचे खंडपीठ औरंगाबाद येथे आहे. मी औरंगाबाद आज सकाळी नेहमीच्या वेळेवर न्यायालयात जाण्याच्या माझ्या दिनचर्येप्रमाणे उच्च न्यायालयात गेलो. दोन न्यायाधीशांचे पीठासमोर काम होते. तेथे सुरूवातीची दोन-तीन कामे निर्णय देण्यासाठी ठेवली होती, ती आटोपली. मग माझे काम निघाले, एक जनहित याचिकेचे काम होते.
माझे काम त्यानंतर होते. ते निघाले. मी काही बोलणार, तोच अचानक तेथील न्या. संभाजीराव शिंदे साहेब म्हणाले, ‘आज मराठी भाषा दिन आहे. एरवी तर आपले काम इंग्रजीतच चालते. एखादे दिवस तरी आजचा दिवस लक्षात घेता, ज्यांना मराठीत बोलायचे आहे, ते बोलू शकतात.’ मी बोलून गेलो, ‘उत्तम, मी तयार आहे. आपली मातृभाषा आहे’ ! त्या कामातील सरकारी वकील श्री. गिरासे यांनी देखील मातृभाषेतील संवाद किती आपला वाटतो, हे सांगीतले. न्या. गवाणे साहेबांनी या खुल्या मनाने चाललेल्या चर्चेला हसून दाद दिली. न्यायालयातील वातावरणच बदलून गेले ! नेहमीची जाणवणारी थोडी कृत्रिमता जावून घरगुती हवा खेळू लागली.
दिवसभर जवळपास बऱ्याच वकिलमंडळीनी, मराठीत संवाद साधत, आज रोजी मराठी भाषा दिनी अशा पद्धतीने सामील होवून मराठी भाषा दिन साजरा केला. आज या जुळून आलेल्या योगायोगाचं खरंच बरं वाटलं पण !

२७. २. २०१८

No comments:

Post a Comment