Friday, June 22, 2018

चावरेऽऽ वकीऽऽऽल

चावरेऽऽ वकीऽऽऽल
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कै. सुधाकर मुकीमबुवा रावेरकर हे आमच्या गांवातील ! नारदीय पद्धतीचे अप्रतिम कीर्तन करायचे ! यांच्याकडे पूर्वीपासूनच, समर्थ रामदास स्वामींचा ‘दासनवमी’ हा उत्सव खूप जोरात साजरा व्हायचा. दरवर्षी माघ महिन्यात वद्य प्रतिपदा ते नवमीपर्यंत दिवसभर दासबोध या ग्रंथाचे सर्व भाविकांनी इच्छेप्रमाणे जसे जमेल तसे, वाचन करायचे. हा ग्रंथ त्यांच्याकडे देवासमोर ठेवलेला असायचा. थोडक्यात तिथं दिवसभरांत जो कोणी येईल, तो ग्रंथातील तोपर्यंत जो भाग वाचला गेला असेल, त्याच्या पुढे वाचायला सुरूवात करायचा. यांत कोणालाही मज्जाव नसायचा. या उत्सवाच्या निमित्ताने मग बुवासाहेबांची गांवातीलच परिचित मंडळी नाही, तर खेडोपाडीची प्रेमी आणि शिष्यमंडळी देखील, आमच्या गांवी यायची. मनोभावे समर्थ रामदासांच्या चरणी आपली सेवा समर्पित करायची. उत्सव समारोप म्हणजे दासनवमीला भंडारा आणि रात्री किर्तनाचा कार्यक्रम ! रात्री किर्तनाच्या वेळी यांत मग हौशी किर्तनकार, ज्यांना समर्थांच्या उत्सवात किर्तनसेवा करायची, ते पण किर्तन करायचे. शेवटी मग कै. मुकीमबुवा किर्तन करायचे. जवळपास रात्रभर हा कार्यक्रम चालायचा. आम्ही लहान असल्याने इतका वेळ जागे रहाणे शक्य नसायचे, आम्हाला कोणी जागरण पण करू देत नसत. मग असे रात्रभर किर्तन व्हायचे, हे आम्ही फक्त ऐकलेले, पण प्रत्यक्ष किर्तन ऐकण्याचा योग मात्र त्यावेळेस आला नाही. आता येणं अवघडच ! या उत्सवाला मात्र आम्हा बाळगोपाळ मंडळींची आवर्जून हजेरी असायची, ती म्हणजे भंडाऱ्याला !
घटना जुनी, त्यावेळी मी शाळेत शिकत होतो, कदाचित आठवी-नववीत असेन ! त्या वर्षी देखील मी असाच दासनवमी उत्सवाच्या निमीत्त तेथे, मुकीमबुवांकडे, दुपारी भंडाऱ्याला गेलो होतो. जेवणे सुरू होती. वाढण्याचा आग्रह सुरू होता. माझ्या समोरच्या रांगेत, पंगतीत प्रकृतीने मजबूत म्हणता येईल असा उजळ पण सावळासा, चष्मा घातलेला तरूण बसलेला होता. मोकळेपणाने त्याचे सर्वांशी बोलणे सुरू होते. मी आपला तेथील गंमत बघत व ऐकत होतो.
‘काय रे, तुझे नांव काय ?’ त्याने मला विचारले. मी सवयीने पूर्ण नांव सांगीतले.
‘हं, म्हणजे अण्णांचा मुलगा तू !’ त्याचे उद्गार !
तेवढ्यात, ‘प्रकाश, तू नुसत्या गप्पा मारतो आहे, का जेवण करतो आहे ? अरे, याला वाढा. पुण्याला जरी शिकतोय तरी गांववाल्याला विसरून कसे चालेल ?’ बुवासाहेब बोलले आणि त्यांनी जवळच असलेल्या वाढणाऱ्याला आग्रह करून तिथे थांबवले, त्याच्या पानांत वाढायला सांगीतले.
‘बुवासाहेब नको. पोट भरत आलंय. जास्त होईल. नको.’ तो पानावर हात धरून म्हणतोय.
‘पोट भरत आलं आणि पोट भरले, यांत फरक आहे.’ हे अगोदरच्या वाक्यावर उत्तर देतानाच, वाढणारा थांबलेला पहाताच, ‘अरे, तू त्याच्याकडे लक्ष देवू नको. तू वाढ ! तू का थांबला ?’ हे वाढणाऱ्याला समजावीत, पुन्हा त्या तरूणाला, ‘हे पहा, प्रकाश, नेहमी माणसाने तब्येतीने आणि तब्येतीप्रमाणे खावे.’ बुवासाहेबांचे बोलणे सुरूच होते. गप्पा मारण्यात आणि जेवतांना जेवणाऱ्याला वाढण्याचा आग्रह करण्यात ते कोणालाही हार जाणार नव्हते. त्याने मग अरे, अरे म्हणेपर्यंत त्याच्या पानात पदार्थ पडलेला होता.
‘प्रकाश, तुझ्याकडे व तुझ्या तब्येतीकडे न पहाता, आम्ही तुला जर चिमणीच्या घासाएवढे वाढले, तर समर्थ काय म्हणतील ?’ इति बुवासाहेब ! जेवतांना भरभक्कम आग्रह, हा मुकीमबुवांचा स्थायीभाव ! कमकुवत जेवणारे कच्चे लिंबू, त्यांना चालत नसत.
‘माणसाने आपल्या पानात कितीही पडले, काहीही पडले, तरी तिकडे लक्ष देवू नये. अहो, खाण्याचेच पदार्थ वाढणार जेवतांना ! बस, आपलं थोडंथोडं खात रहावं. मग नक्की एकवेळ अशी येते, की आपल्या पानातलं आपोआप सर्व संपलेले असते. मग वाटलं तर पुन्हा घ्यावं. पुन्हा हेच ! अहो, आद्य शंकराचार्य म्हणतातच, ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ !’ बुवा रंगात आले होते.
‘बुवासाहेब, आपलं जेवण झाल्यावर उठता तर आले पाहीजे, घरी जायला.’ तो तरूण !
‘उठता न यायला काय झालं ? चावरेंचे घर किती लांब आहे इथून ? जेवणानंतर खरकटे हात धुवायला घरी जाता येईल.’ मुकीमबुवांचे उद्गार ! मग मला समजले की हा तरूण म्हणजे प्रकाश चावरे !
तसं पाह्यलं तर, या चावरे कुटुंबाचे आणि आमचे तीन पिढ्यांचे गांवातील संबंध ! यांचेच काय, पण गांवातील इतर मंडळी देशमुख, आठवले, प्रचंड, दीक्षित, रावेरकर, देव, डोखळे, डोहळे, विटवेकर, केऱ्हाळकर, मुजुमदार, महाजन, दलाल, वाणी, पाटील वगैरे अशी कित्येक घरे होती, की या मंडळींचे संबंध हे आमच्या घराशी पिढ्यांमधे मोजले जात, वर्षांमध्ये किंवा दिवस-महिन्यात नाही. अर्थात त्यावेळी तसे संबंध ठेवणारी पण मंडळी असायची, म्हणून हिशोब हा वर्षांचा किंवा महिन्यांचा किंवा दिवसांचा नसायचा, तर थेट पिढ्यांच्या संबंधाचा असायचा. आता पिढीजात संबंधाबद्दल कोणाला क्वचितच विचारले जाते. विचारले तर, ‘आपली यांची कधीपासून ओळख ?’ असे विचारले जाते. यांवर आपण काय उत्तर देणार ? मग सांगावे लागते, ‘काही नाही, तशी ओळख ही अलिकडचीच, म्हणजे याच किंवा फार तर गेल्या वर्षातलीच’ असे विचारणाऱ्याला सांगावे लागते. आता गांवातील मातीत आणि त्या मातीत बांधलेल्या जुन्या वास्तूत रूजलेल्या पिढ्या संपल्या, आणि दुर्दैवाने, हो, दुर्दैवानेच म्हणेन मी, पण त्याबरोबर पिढ्यांचे संबंध पण संपले. गांवातला माणूस परगावी गेल्यावर लॉजवर उतरला वा बाहेर जेवला हे समजले, तर गांवी आल्यावर ते लक्षात ठेवून आपल्या घरी येवून, सर्वांसमक्ष आपली याबद्दल बिनपाण्याने हजामत करणारे, सर्व जातीतील न्हावी, आता कमी होत चाललेय ! खानावळी आणि विश्रामगृह वाढताय, घरं कमी होत आहेत. आता ओळख झाली आणि ओळख होऊन किती दिवस झालेत, हे सांगण्याचे दिवस आलेत. कालाय तस्मै नम: ।
तर प्रकाश चावरे यांच्याबद्दल नंतर पुन्हा एकदा ऐकायला मिळाले, ते त्यांच्या पुतण्यांकडून ! या माझ्या आईकडे गाणं म्हणजे शास्त्रीय संगीत शिकायला यायच्या. आमच्या भागातील शास्त्रीय संगीत शिकलेला किंवा शिकलेली, ही एकतर माझ्या आईकडे शिकलेली असते किंवा तिच्याकडे जो शिकलेला आहे, त्याच्याकडे शिकलेली असते. डॉ. चावरे हे आमच्या गांवातील प्रसिद्ध डॉक्टर ! ॲड. प्रकाश चावरे हे त्यांचे बंधू ! मी बहुतेक दहावीत होतो. माझी शालांत परिक्षा झाली होती, त्यामुळे निवांतपणा होता. उन्हाळा संपून पावसाळा हा असा तोंडावर होता, आणि या सर्व पळतपळत घरी आल्या. पुढे जावून कोण पहिले बातमी सांगते, या धावपळीत आल्या, अन् ‘बाई, बाई, आमचा प्रकाशकाका हा बी. ए. (आॅनर्स), एल् एल्. बी. झाला.’ असे म्हणत त्यांनी पेढे दिले. त्यावेळी समजले की प्रकाश चावरे हे आता आपल्या गांवातील नविनच वकील झाले आहे.
माझी त्यांच्यासोबत, चावरे वकिलांसोबत, खरी उठबस झाली, ती मी वकिल झाल्यानंतरच ! वर्ष सहा महिने मुंबईला काढल्यावर, मी परत आमच्या भागांत, जसा गांवच्या कोर्टात जास्त रमायला लागलो, त्याचवेळी ! इकडे जसा आलो, तसा मी आपला गावच्या कोर्टात माझी नेहमीची बॅग घेवून आलो. आमच्या गांवचे कोर्ट म्हणजे, तेथे पोलीस स्टेशन, तहशीलदार कार्यालय, सबरजिस्ट्रार कार्यालय, वनविभाग कार्यालय, भूमापन कार्यालय, ट्रेझरी वगैरे जवळपास सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी ! आमची बाररूम म्हणजे फक्त बारा बाय सहा फूट, अशी दोन चौक्याची खोली आणि बाजूला तीन चार खोल्या या कोर्टासाठी ! तेथील सर्व इमारत ही कौलारू, जुन्या पद्धतीची व एकमजली बैठी ! बाररूममधे एकासएक लागून दोन गाद्या टाकलेल्या, समोर सागवानी लाकडी टेबल, त्याच्या दोन्ही बाजूला लाकडी हाताच्या जुन्या खुर्च्या ! दरवाज्याजवळच लोखंडी कपाट त्यांत बाररूमची सर्व कागदपत्रे, पुस्तके, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी म्हणून घेतलेल्या डिशेश, कपबशा ! त्या दरवाज्या समोरच पाण्याचा माठ मावेल एवढीच छोटी मोरी व पाण्याने भरलेला माठ ! टेबलावर सर्व वकिल मंडळींच्या बॅगा, एकावर एक व शेजारी शेजारी ! काही निवांतपणा हवी असलेली वकिल मंडळी, ही तेथे पसरलेल्या गादीवर, लोडास टेकून एक पाय दुसऱ्या पायाच्या गुढग्यावर टेकवून आराम करताहेत ! आणि वर ‘कुच्युंऽग कुच्युंऽऽग कुच्च’ असे आवाज करत फिरत असलेला, निदान त्या कौलारू घराच्याच वयाचा छताला लटकून फिरणारा पंखा !
माझ्या डोळ्यांसमोर असलेले पूर्वीचे आणि आताचे दिसणारे चावरे वकील यांच्यात बराच फरक दिसला. त्यावेळची मजबूत तब्येत आता उतरली होती. उजळ सावळावर्ण जावून गोरेपणा वाटायला लागला होता. हनुवटीकडे किंचीत निमुळता होत जाणारा चेहरा, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा ! डोक्याला टक्कल पडलेले आहे, हे जाणवू लागलेले. मात्र चेहऱ्यावर बुद्धीचे असलेले तेज अजूनच झळाळू लागले होते. माझे निरीक्षण चालू होते, तेवढ्यात कोर्ट हॉलकडून, पांढरी स्वच्छ दाढी असलेल्या अब्दुलचा, कोर्टाच्या शिपायाचा पुकारा ऐकू यायचा, ‘च्चाऽऽव्वरे वकिऽऽऽल’ ! मग चावरे वकिल, समोरचे पायाजवळचे चामडी अथवा कापडी बूट पायात, झटकन घालून उठून कोर्टाकडे चालायला लागत. काही वेळा पक्षकाराला धीर निघवत नसे, तो सोबत आलेल्याला बाररूमच्या दरवाजावर उभा करायचा. तिकडच्याने खूण केली, की ‘चला, साहेब पुकारा होतोय.’ म्हणून चावरे वकिलांना घाई करायचा.
‘अरे, ऐकू तर येवू दे. काम व कोर्ट कुठं पळून जात नाही. माझ्याशिवाय काम सुरू होणार नाही.’ म्हणत ते उठू लागत. उठून फाईल घेवून कोर्टात जात. काम सुरू करत. पक्षकाराची तपासणी आणि सामनेवाल्या साक्षीदाराची उलटतपासणी ते उत्तम घेत. माझे काका कै. वसंतराव भोकरीकर हे पण तिथं पूर्वीचे नावाजलेले वकील ! स्वाभाविकच त्यांचा प्रभाव तेथील बऱ्याच नवशिक्या व जुन्या वकीलांवर ! मला मात्र त्यांना प्रत्यक्ष काम चालवतांना पहाता आले नाही. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच ते वारले. त्यामुळे त्यांच्या कोर्टातील गोष्टी समजल्या, या तेथील वकील मंडळीनी सांगीतल्यावरच !
‘वसंतराव नेहमी म्हणायचे, एकवेळ सामनेवाल्याची उलटतपासणी सोपी, कारण ती आपण घेतो; पण जर आपला पक्षकार मूर्ख असेल, तर त्याची सरतपासणी कठीण ! कारण वाटेल ते, हा पठ्ठ्या आपल्या तपासणीतच कबूल करतो, मात्र यावेळी कोर्टासमोर आपल्याला बोलता येत नाही. त्याला काही सांगता पण येत नाही, की हे असे बोलू नको. मग स्वत:च्या केसचा बट्ट्याबोळ हा स्वत:च करतो.’ त्यांचे मला सांगणे ! ‘पण मग विरूद्ध बाजूचे वकील पण काही वेळा आपल्या मदतीला येतात आणि उलटतपासणीत काहीतरी चमत्कारिक प्रश्न त्यांच्या उलटतपासणीत विचारून, सरतपासणीत कमावलेल्यावर पाणी फिरवतात.’ ते सांगत त्यांचा अनुभव !
‘हे पहा, माझे मत म्हणजे, आपण आपला धीर सोडायचा नाही, अगदी शेवटपर्यंत ! मग समोरच्याच धीर सुटायला लागतो. प्रयत्नांती परमेश्वर मिळतो. मग हे काय घेवून बसलात, आपली काळजी देवालाच !’ माझे उत्तर.
‘तुझा देवावर भलताच भरवसा दिसतोय रे !’ त्यांचा प्रतिवाद !
‘पण आपण आपले काम निष्ठेने करावे. गीता सांगते.’ मी !
‘भगवद्गगीतेशिवाय तू बोलत नाही.’ त्यांची कोपरखळी !
‘मी अगदी लक्षात ठेलंय, तुझे काका, वसंतराव फौजदारी लिहीत, ती फक्त दीड-दोन पानात ! पण त्यांत सर्व घटना आणि संबंधीत सेक्शनचे सर्व मुद्दे आले असत.’ त्यांचे मला एखादे वेळी सांगणे होई.
दुपारच्या वेळी चहाला बरोबर जायचे, ते लालचंदच्या हॉटेलमधे ! तिथं लालचंद गंजी पाटील आणि मदनलाल बोरा यांची जोडी उभी असे. चहा पिऊन झाला की आम्ही बाहेर पडत असू. ‘पैसे कोणाकडे ?’ मदनचे विचारणे.
‘सिनीअर कोण आहे ?’ माझे उत्तर !
‘बास, या वेळी मी सिनीअर म्हणून आठवते. इतर वेळी नाही.’ चावरे वकिल कृतककोपाने पैसे देत बोलत.
‘तुम्ही मग आर. जी. चौधरी साहेबांना सोबत आणत जा. सोपा उपाय !’ माझे उत्तर !
‘तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.’ चावरे वकील असे बोलत व आम्ही बाररूमकडे चालू लागत. त्यांचे पक्षकारांना बसवून ठेवण्याचे ठिकाण म्हणजे कोर्टाच्या दरवाज्याजवळच बसलेल्या पंढरीजवळ ! श्री. पंढरीनाथ श्रावक म्हणजे त्यांचे काय, सर्वांचेच कारकून !
तसे त्यांच्या माझ्या वयांत बरेच अंतर ! बोलतांना हे विसरले जाई. मनापासून गप्पा चालत बाररूममधे ! तसे आमच्या बाररूममधे वातावरण अगदी निर्मळ ! विरूद्ध बाजूच्या वकीलाला पण कायद्यातील काही शंका विचारायला नविन वकील मंडळी कचरत नसत आणि नवीन वकीलांना मार्गदर्शन करणे, हे जेष्ठ वकीलांचेच काम व कर्तव्य आहे, ही भावना, ज्येष्ठांची असे. काही वेळा किरकोळ वाद व्हायचे, नाही असे नाही; पण मग येथील जेष्ठ मंडळी, विशेषत: कै. ॲड. आर. जी. चौधरी ते निपटून काढत. त्यांचे बोलणे हे गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यासारखे असे ! तुरटीने पाणी स्वच्छ होते, तसे यांच्या बोलण्याने गढूळ वातावरण स्वच्छ होई.
चावरे वकीलांची शेतीबाडी, घरदार गांवातच ! माझे पण जवळपास तसेच ! काही वेळा दुसरीकडे जायचे विचार माझ्या मनांत येत, नाही असे नाही. मी त्यांच्याकडे बोलून पण दाखवीत असे.
‘अरे, आपली शेतीवाडी, घरदार इकडे आहे. काय करतो, दुसरीकडे जावून ? तुझ्याकडे काम येत नाही का ? ते तर भरपूर येतंय ! मग चलबिचल करू नको.’ असे ते नेहमी मला सांगत, समजावत. काहीवेळा कोर्ट कामाच्याच नाही तर, खाजगी, घरगुती बाबींबाबत पण गप्पा होत. काही माहिती किंवा शंका त्यांना असली, तर माझ्या संपर्कामुळे मला काही विचारत. मग जर चहा पिण्याची वेळ झाली असेल, तर मी मुद्दाम म्हणायचो, ‘साहेब, तुमचा प्रश्न, समस्या कठीण आहे.’ ते माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात. मग घड्याळ्याकडे पाहिल्यासारखे दाखवत, नाईलाज झाल्यासारखे दाखवत, ‘आणि या वेळी तर माझं अजिबात डोकं चालत नाही.’ हे मी म्हटल्यावर, ‘बस, तुला माझ्याकडून चहापाण्याला कारणच हवं !’ असे त्यांचे उत्तर येई. ‘वेळेचा परिणाम’ असे मी म्हणत आम्ही लालचंदच्या हॉटेलकडे चालू लागत.
‘हे पहा, जास्त गाजावाजा करू नको. गुपचूप जाऊ.’ असे ते म्हणाले की आपण ओळखून घ्यावे की आज त्यांचा मूड बरा आहे. त्यांनाच गाजावाजा हवा आहे. मग रस्त्यात कोणाचा पण ओळखीचा भेटला की त्याला काहीही कारण नसतांना मी निरोप देई, ‘हे पहा, पंढरी किंवा आर. बी. चौधरी वकील भेटले, तर निरोप द्या, की आम्ही लालचंदकडे आहे. लगेच येतो आहे.’ तो माणूस आवर्जून निरोप देई. निरोपाचा योग्य तो बोध घेतला जाई, आणि आमचा चहा तयार होतो आहे, तोच ॲड. रमेश चौधरी, ॲड. टी. डी. पाटील वगैरे सर्व मंडळी लालचंदच्या येथे येतांना दिसे.
‘अरे, चावरे साहेब तुम्ही इथं ? आम्ही तुम्हाला तिकडेच बघतोय !’ ॲड. रमेश चौधरी मुद्दामहून !
‘सालं, चहा प्यायचा म्हटले तरी शांतता नाही.’ चावरे वकील.
‘एकटे एकटे पिताय वाटतं चहा !’ ॲड. टी. डी. पाटील.
‘लालचंद, दे रे भो सगळ्यांना चहा ! मदन, तुला हसायला काय झालं ?’ चावरे वकील.
‘यांचा निरोप मिळाला की आम्ही इथंच आहोत. लगेच येतोय.’ माझ्याकडे हात दर्शवत ॲड. आर. आर. पाटीलांची प्रतिक्रिया !
‘भोकरीकरला बरोबर नेले की सगळं गांव गोळा होतं आपोआप !’ चावरे वकिलांचा वरवर संताप ! तेवढ्यात पंढरी त्यांना सांगायला येतो की ‘ॲड. आर. जी. चौधरी त्यांना पहात होते.’ हे ऐकल्यावर, ‘त्यांना इथं असल्याचा निरोप द्या.’ सांगून पाठवले जाई. हे होईपर्यंत सगळ्यांचा चहा तयार व्हायला वेळ लागे. मग रमतगमत तिकडून ॲड. आर. जी. चौधरी, ॲड. एम् ए खान व ॲड. युसूफ येतांना दिसत !
‘क्यो, अकेले अकेले चाय चल रहीं हैं !’ ॲड. एम् ए खान !
‘तुला कोण अकेले दिसतंय ? सर्व बार जमा झालाय ! चहा प्यायला !’ चावरे वकील. ते आणि ॲड. एम् ए खान वर्गबंधू ! खास मित्र !
‘वास्तविक सगळ्यांना इथं बोलावण्यापेक्षा बारमधे चहा बोलावला असता, तर आणला नसतां का मदनने ?’ माझा प्रश्न — मुद्दाम !
‘अब देखो, मै नहीं बोल रहा, तुम्हारा खास आदमी बोल रहा हैं !’ ॲड. एम् ए खान ! असे काहीबाही बोलत, हसतखेळत चहापान होई. ही अशी वेळ आमच्या बारमधे कोणावर पण येई आणि असेच संवाद होत निभावली जाई. अत्यंत निरोगी व निर्मळ वातावरण !
त्यांचे आणि माझे गुण जमण्याचे अजून एक कारण म्हणजे - शास्त्रीय संगीत ! दोघांनीही त्याची आवड ! एकदा मला समजले की जळगांव आकाशवाणीतर्फे संगीत सभा आहे, कृषक भवनांत ! गायक होते, पं. प्रभुदेव सरदार ! चावरे वकीलसाहेबांना मी निरोप दिला. चलायचं का म्हणून विचारले. त्यांनी होकार दिला. त्यांच्या स्कूटरवर दुपारच्या सुटीनंतर निघालो. गप्पा मारत, रस्त्याची अवस्था बघून, त्याची कशी वाट लावली आहे वगैरे बोलत बामणोद गांव लागले. तिथं वळणावर कॉफी चांगली मिळते हे त्यांना माहीती होते. मग थांबून कॉफी घेतली व निघालो.
कुठं, काय खाण्याचं चांगलं मिळतं ही माहिती त्यांच्याजवळ अगदी अद्ययावत असे ! त्यांना खाण्याची मोठी आवड ! जळगांवचा महालक्ष्मी आणि पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा, बुरहानपुर येथील मिलन मिठाईचे दुकान, बुरहानपुर येथील मोरे यांचा चिवडा, धनजीशेटचे गाठीशेव, आसोदा-भादलीचे भरीत, सातव यांच्याकडचा दराबा, नगरिया आणि रेल्वे स्टेशनवरच्या कचोऱ्या, शिंदे तसेच मानकर यांच्या हॉटेलमधील झणझणीत मिसळ वगैरे अशी ही भलीमोठी यादी होती.
‘प्रभुदेव सरदार हे नाट्यगीत आठवणीने म्हणतात. पुण्याला यांचे नेहमी कार्यक्रम होत. ऐकले आहे मी.’ चावरे साहेब मला सांगत होते. त्या रात्री पं. प्रभुदेव सरदार यांचे गायन खरोखर चांगलेच रंगले. त्यांनी नाट्यगीते पण सुरेख म्हटली. दुसऱ्या दिवशी सकाळी जळगांवहून परत घरी ! येतांना ज्या संगीतावर गप्पा झाल्या त्यांत, त्यांनी टीव्हीवर शास्त्रीय संगीताचे खूप छान कार्यक्रम असतात, हे सांगीतले. पं. किशन महाराज यांचा तबल्यावर कार्यक्रम असायचा रात्री नऊच्या दरम्यान, याला येत जा ! ‘कोणी सोबतीला रसिक असला तर ऐकायला पण बरं वाटतं’, ही त्यांची भावना !
गेल्या एक तपाहून जास्त काळ मी इथं गांव सोडून, वकिलीच्या निमित्ताने उच्च न्यायालयांत औरंगाबादला आलो आहे. तिथं गांवाकडे जाणं तसं कमी कमी होत गेलं. एकदा समजलं की राम नवमीच्या उत्सवाचे वेळी गांवात झालेल्या दंग्यात डॉ. चावरे यांचे संपूर्ण घर पेटवून दिले गेले. त्यांच्यापैकी कोणी तिथं नव्हते. चावरे वकिलांवर पण हल्ला झाला. नंतर त्यांची प्रकृती बिघडलीच. दवाखान्यात जळगांवी भेटायला गेलो होतो. त्यांना बोलायचे नेहमीप्रमाणेच खूप होते. ‘माझे मन ते माझे जळत असलेले घर बघीतले आणि विदीर्ण होवून गेले.’ ते एवढे बोलले आणि गप्प बसले. त्यांना फार काही बोलता येत नव्हते का भावना दाटून येत होत्या ? माझा हात त्यांनी हातात घेतला. काही वेळ शांतपणे बघत होते. मलाच काही रहावेना. मीच आपल्या येथील आठवेल त्या गोष्टी सांगायला लागलो. त्यांना बरं वाटत असल्याचे जाणवत होते. थोडा वेळ थांबून मी निघालो. निघावेच लागते. नंतर तब्येत सुधरली, नेहमीप्रमाणे कोर्टात जावू लागले.
नंतर एखादे वेळी गांवी जाणे झाले, तर भेट होई. कोर्टात गेलो, तर घरी ते आवर्जून बोलावत. ‘तुम्ही बोलावले म्हणजेच मी येईन आणि बोलावले नाही तर येणार नाही, असं वाटतं का तुम्हाला ?’ या माझ्या प्रश्नावर ‘तुला यायचं असेल तर ये.’ हे नॉर्मल उत्तर आले की मला पण बरं वाटे. त्यांच्या घरीच काय पण संपूर्ण गांवाला हा आमचा अकृत्रिम स्नेह माहीत होता.
‘बरं झालं, तू औरंगाबादला गेला ते. तुझी कमाल आहे. खडकावर नाव चालवतोय तू ! काळजी करू नको आणि हिंमत हरू नको. जगाच्या पाठीवर कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो, तरी आपल्याकडे पक्षकार आपल्याला शोधत येतील. आपली प्रॅक्टीस मेरीटची आहे. निघेल अडचणीतून मार्ग !’ माझ्यावर आलेल्या असंख्य, कल्पनातीत अडचणींची त्यांना कल्पना होती.
बरं, केदार भेटतो की नाही. त्याच्याकडे लक्ष ठेव.’ त्यांची त्यांच्या मुलाबद्दलची चौकशी !
‘तुम्ही या एकदा तिथं !’ माझा आग्रह !
‘मी आता जळगांवला पण जास्त जात नाही. पण तिथं आलो, तर तुझ्याकडे नक्की येईल.’ त्यांचे उत्तर ! असेच गडबडीत एकदा औरंगाबादला थोडा वेळ घरी आले होते, पक्षकाराबरोबरच ! गप्पा झाल्या. आठवणी निघाल्या. माझ्या बायकोला माझ्याबद्दल धीर दिला.
‘आपल्याला पेन्शन नाही, प्रॉव्हीडंट फंड वा ग्रॅच्युइटी नाही. नियमीत पैसे किती मिळतील याचा भरवसा नाही. पक्षकार असे तर कोर्टाची परिस्थिती अशी ! मोठी कठीण अवस्था असते वकिलांची ! पण तुझ्या काकांचे, वसंतरावांचे वाक्य मला नेहमी आठवते, ‘आपण रस्त्याने जे सुखरूप चालतो आहे ना, ते कोर्ट आहे म्हणून !’ काय खोटं आहे यांत ? बरं झालं, तू इथं आलास. मोठं क्षेत्र मिळालं.’ त्यांच्या शुभेच्छा होत्या, आशीर्वाद होते का माझ्याबद्दलचे ह्रदगत होतं कोणास ठावूक ? पण माझी भेट झाल्यावर ते पूर्वीपेक्षा भरभरून बोलत.
‘अरे, बारमधे बोलावे, कोणाशी बोलल्यावर बरं वाटेल अशी माणसं पण कमी होत चालली आहे. त्यांची सर्व गणितंच वेगळी. ‘पंच, साक्षीदारांचे तू पाहून घे, मग बाकी मी सांभाळतो.’ असे खुशाल पक्षकाराला सांगतात.’ ते बोलत होते.
‘सर्व साक्षीदार पंच, फोडल्यावर केसमधे काय रहाते ?’ माझा प्रश्न !
‘तेच म्हणतोय मी ? मी पक्षकाराला सांगायचो, ‘सांग साक्षीदाराला माझे चावरे वकील आहे. किती फिट पडायचा तो पड. मी पहातो.’ चावरे वकील स्वत:ची व्यथा सांगत होते का व्यवसायाची दुर्दशा सांगत होते, समजत नव्हते.
एक दिवशी गांवाहून असाच निरोप आला, ‘चावरे वकील गेले’ ! मी सुन्न झालो. सुचेना काही. कोर्टातून कसाबसा घरी आलो आणि मिळेल त्या गाडीने रात्री गांवी पत्नीसह पोहोचलो. रस्त्याने त्यांच्या माझ्या परिचयांच्या सर्वांना या दुर्दैवी, धक्कादायक बातमीचे मेसेज पाठवीत होतो. सकाळी उठून त्यांच्या घरी निघालो. त्यांच्या घरी पोहेचेपर्यंत निदान दहा लोकांनी, ‘चावरे वकील’ गेल्याची बातमी सांगीतली. माझे घर ते त्यांचे घर पाच मिनीटाच्या अंतरावर, त्यासाठी वीस मिनीटे लागली. तेथे श्री. अरविंद पाठक बसलेले होते. त्यांनी मी आलेलो आहे, हे अगोदरच सांगीतले होते. मला बघीतल्यावर त्यांनी, ‘तुम्ही येथे आलात म्हणजे याचसाठी ! हेच मी सर्वांना सांगीतले. फार वाईट झाले.’
त्यांचे जाणे हे त्यांच्या घरासाठी तर वाईट होतेच पण गावासाठी पण वाईट होते. पक्षकाराच्या पाठीशी समर्थपणे उभा राहून, प्रामाणिकपणे लढणारा लढवय्या वीर गेला.
आमचे येथे राहून गेलेले न्यायाधीश ही बातमी ऐकल्यावर बोलून गेले, ‘तुमच्या बारचे ‘नानी पालखीवाला’ गेले ! मला पण खूप शिकायला मिळाले.’
त्यांच्याकडून कोणाला शिकायला मिळाले नाही ? नवोदित वकिलांना व न्यायाधीशांना पण ! दावा कसा लिहावा, कैफियत कशी लिहावी, नोटीस केव्हा द्यावी वा देवू नये, केव्हा आपसात करावे वा करू नये, तपासणी व उलटतपासणी कशी घ्यावी, त्यांत काय बोलावे वा बोलू नये, काय विचारावे वा विचारू नये ! युक्तीवाद कसा करावा, सामनेवाल्याचे म्हणणे प्रतिवादात कसे खोडून काढावे, वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय कसे द्यावेत ! असंख्य गोष्टी आहेत, काय व किती सांगणार ?
काही जण आपल्या आयुष्यात येतात. त्यांची आपल्यासाठीची भरभक्कम भूमिका बजावतात. आणि आपल्याला न विचारतां कायमचे निघून जातात. ‘ज्ञान दिल्याने वाढते, साठवून ठेवल्याने कमी होते, काही दिवसांनी लुप्त होते’ यांवर श्रद्धा असलेल्या माझ्या हितचिंतकांपैकी एक नांव कायमचे मिटले गेले.

17.
6.2018

No comments:

Post a Comment