Wednesday, June 13, 2018

भावडू न्हावी

भावडू न्हावी
लहानपणी मी सकाळी झोपेतून उठून ओट्यावर आलो, की मला बहुतेक सर्व घरांसमोर सडा टाकलेला दिसायचा. काहींच्या, म्हणजे गुरंढोरं असलेल्यांच्या घरासमोर तर शेण कालवून सडा टाकलेला असायचा. एखाद्या अंगणात काही जणी रांगोळी काढण्यात दंग असायच्या ! माझ्यासारखी शाळेत जाणारी मुलं रांगोळी पहात उगाचच रेंगाळत असायची, तर शाळा नसलेली बाळगोपाळ मंडळी त्या रांगोळीभोवतीच ठाणं मांडून, मान वेळावत, वाकडी करत, रांगोळी काढतांना पहात बसलेली असायची.
अशा सकाळी काही वेळा, हातात छोटी लोखंडी पेटी उजव्या हातात आणि डाव्या हातात धोतराचा सोगा घेवून निवांत रमतगमत इकडेतिकडे पहात, उजवा पाय किंचित उचलून पुढे टाकत, गल्लीतून भावडू न्हावी जायचा ! भावडू म्हणजे शिडशिडीत अंगकाठीचा ! रंगाने उजळ पण सावळा वाटावा असा रंग. कंबरेला सैनाचे धोतर व अंगात डोक्यातून घालावा लागणारा सदरा, डोक्यावर गांधी टोपी. तोंडातले दोन-चार दात पडलेले. चालतांना उजवा पाय किंचीत उचलून पुढे टाकण्याची लकब ! उजव्या हातात ही छोटी लोखंडी, त्याची अन्नदाती पेटी तर डाव्या हातात धोतराचा सोगा ! निवांत रमतगमत जायचा, घाईघाईने जावून उपयोग नसायचा. कोणाला दिसले तरच कटिंग दाढीसाठी थांबवले जाणार !
भावडूचा अनुभव लहानपणी मी कटिंगच्या वेळी नेहमीच घेतलेला आहे. लहान मुलांची कटिंग म्हणजे त्याच्या दृष्टीने दिव्य असे, तर आमच्या दृष्टीने संकट ! ‘लहान जीवाला कटिंग करतांना शस्त्र लागायला नको’, हा त्या म्हाताऱ्या जीवाचा विचार ! मग कटिंग करतांना आपली मान हलून वेडीवाकडी जखम होवू नये यासाठी, भावडू हा त्याच्या म्हाताऱ्या झालेल्या, पण ताकदवान अशा दोन्ही गुढघ्यात आपलं डोकं असं काही गच्च पकडायचा, की आपले डोकंच काय, पण आपल्याला पण हलता यायचं नाही. तो अजिबात त्याच्या गुढग्यातून आपलं डोकं बाहेर येऊ द्यायचा नाही, त्याच्या अगदी पूर्ण मनासारखी कटिंग झाल्याशिवाय ! आता ही सगळी अवघडलेली स्थिती आणि हे सगळं सव्यापसव्य आटोपतं केव्हा आणि आपल्याला मान वर करायची संधी मिळते केव्हा, यासाठी मी काय आणि सर्वच मुलं काय, इतके काही घायकुतीला आले असत की, त्याने गुढगे जरा ढिले केले, की आपल्याला पुन्हा जगांत आल्याचे समाधान मिळायचे ! हे सर्व त्याच्या एकदा मनासारखे झालं की कटिंग कशी झाली, हे आपल्या चेहऱ्यावर पहायला मग तो पारा उडालेला आरसा आपल्यासमोर धरायचा. त्यांत आपले नाक, डोळे, चेहरा, कान दिसायचे पण डोकं मात्र दिसू द्यायचा नाही. कटिंग कशी झाली याचा अंदाज आपल्याला यायचा नाही. त्याने कितीही बारीक कटिंग केली, तरी घरातील मंडळीच्या दृष्टीने कटिंगच झालेली नसे. आपले विशेष केस कापले नाही, या आनंदात आंघोळ झाल्यावर कपडे घालतांना घरातील आरसा बघीतला, की वस्तुस्थितीची जाणीव होई. डोक्यावर केस असतात, हे समजण्यापुरताच केस असत. नंतर आरडाओरड किंवा तणफण करून काहीही उपयोग नसे.
गल्लीतून भावडू रमतगमत जात असतांना, घराबाहेर कोणी शेजारचे, वा समोरचे काका ओट्यावर त्याची वाट पहात उभे असले तर, त्याला थांबवत, लगेच ‘भावडू, थांब जरा ओट्यावर, मी आलोच’ म्हणत त्याला थांबवायचे. तो थांबायचा, पायऱ्या चढून ओट्यावर यायचा. आपली छोटी लोखंडी पेटी खाली टेकवायचा. थोड्याच वेळात घरातून फक्त धोतरावर उघडेबंब होवून ते काका बाहेर येत. त्यांच्या एका हातात तागाचे गोणपाट आणि दुसऱ्या हातात पाण्याने भरलेली तपेली असे. तोवर भावडूने खाली बसत आपली खूरमांडी घातलेली असे. बाजूला ती छोटी लोखंडी पेटी ठेवलेली असे. पेटीतून एकेक वस्तू काढणे सुरू होई. आरसा म्हणता येईल असा, फ्रेम केलेला काचेचा तुकडा एका बाजूला काढलेला असे. त्या शेजारीच साबणाने वापरून वापरून बुळबुळीत झालेली पितळेची वाटी ठेवलेली असे. या वाटीचा आकार आमच्या नेहेमीच्या वाटीपेक्षा मोठा व पसरट असे. त्याच्या शेजारी थोडेफार केस शिल्लक असलेला व लाकडी मूठ असलेला ब्रश ! त्याच्या शेजारी वेगळी गोल प्लॅस्टीकची वाटी ! त्यात मध्यभागी खोलगट व आसपास शिल्लक आहे असा दिसणारा कंकणाकृती पांढरट खड्यासारखा दिसणारा व बऱ्यापैकी झिजलेला साबणाचा तुकडा, दाढीसाठी उपयोगाचा म्हणून !
तोवर भावडूने खाली बसत आपली खूरमांडी घातलेली असे. मग त्या पेटीतून एकेक साहित्य बाहेर यायचे. काय असायचे त्यात ? तर लहानमोठ्या, वेगवेगळ्या नंबरच्या केस कापायच्या मशीनस् ! तीन-चार वेगवेगळ्या साईजच्या, उंचीच्या आणि पाती असलेल्या कात्री ! दोन- तीन कंगवे, त्यातला एक मोठ्या साईजचा व सर्वदूर सारखेच दात असलेला आणि दुसरा एकीकडून दुसरीकडे दांत लहान होत गेलेला कंगवा ! तिसरा असाच मध्यम साईजचा कंगवा ! हाच कंगवा जरा बरा दिसे, बाकीच्या दोन्ही कंगव्याचे मधले काही दात सलगपणे तुटल्याने, ते कंगवे पण दांत पडलेल्या बोळक्या तोंडाप्रमाणे वाटत. आरसा म्हणून ओळखू येईल इतपत स्थिती असलेला, काचेचा फ्रेम केला चौकोनी किंवा आयताकृती तुकडा ! लाकडी मूठ असलेला व थोडेफार केस असलेला दाढीचा ब्रश ! गोल प्लॅस्टीकची थोडाफार कंकणाकृती साबण शिल्लक असलेली डबी, त्याचे झाकण असायचे किंवा नसायचे पण ! एक तुरटीचा मोठा तुकडा ! पितळेची जरा मोठ्या आकाराची पसरट वाटी, तिला कधी कल्हईचा स्पर्श झाला होता किंवा नाही, ही शंका यावी असे तिचे रूप ! एक लाकडी मूळ असलेला मोठ्या आकाराचा व एक जरा छोट्या आकाराचा वस्तरा ! वस्तऱ्याला घासून धार लावता येईल असा कसाचा दगड ! छोटी पोलादाची नखे काढण्यासाठीची नखाळी ! गळ्याला गुंडाळून दोन्ही खांद्यावरून घेतल्यावर खाली मांडी घालून बसले तर दोन्ही मांड्या पूर्ण झाकल्या जातील एवढ्या आकाराचे सैनाचे कापड, रंग शक्यतोवर पांढराच ! हे सर्व त्या छोट्या लोखंडी पेटीत काही वेळा बसतही नसे, मग तो सैनाच्या कापडाचा बोळा पेटीवर येई.
काकांनी थांबवलेले असे, ओट्यावर बसत त्याचे पेटीतील सामान काढून लावणे सुरू असायचे. तेवढ्यात त्याला आतून काका बाहेर आलेले दिसले, की मग नेट लावून, पण लगबगीने उठत भावडू त्यांच्या हातातील गोणपाट व तपेली हातातून घेई. मग गोणपाट नीटपणे उभट खाली नीट अंथरले जाई. गोणपाट म्हणजे जाड, दडस असे दुहेरी विणीचे तागाचे पोते असे. खाली ओट्यावर तरट अंथरून त्यांवर बसल्यावर ओट्याचा थंडावा जाणवत नसे, उब जाणवे ! पाण्याने भरलेली तपेली बाजूला, त्या छोट्या लोखंडी पेटीच्या शेजारी ठेवली जाई. काका मांडी घालून बसत आणि मग भावडू आपल्या हातात ते पांढरट क्रिम कलरचे सैनाचे कापड गळ्याभोवती गुंडाळण्यापूर्वी, ओट्याखाली दोन्ही हातात धरून जोरात झटके. फटाक् फटाक् आवाज आला, की उगीच वाटे की कापडाच्या सर्व सुरकुत्या गेल्या, त्यावरील सर्व केस झटकले गेले, कापड स्वच्छ झाले ! मग ते स्वच्छ झटकलेले कापडाचा एकीकडचा ठराविक भाग, त्या काकांच्या मानेभोवती गुंडाळून, दोन्ही खांद्यावरून घेत, मग छातीवरून खाली घातलेल्या मांडीवरून सोडून दिले जाई. काकांचा मानेपासून ते मांडीपर्यंतचा भाग कापडाने झाकला जाई.
भावडू तेथील तपेलीतले पाणी मग आपल्या पितळी वाटीत ओतून घेई. त्यातील थोडे पाणी आपल्या मुठीत घेऊन ती मूठ डोक्यावरील केसांवर सांडेल अशी उपडी केली जाई, तेल लावल्यासारखे तो पाणी लावी. मग आपोआपच तेवढा केसांचा भाग, त्याला पाणी लावल्याने चमकदार होई, असे दोन-चार वेळा केले की डोक्यावरील सर्व केस बऱ्यापैकी चमकू लागत. ही कटिंगची प्राथमिक तयारी झाली, की मग त्याच्या उजव्या हातात मोठ्या पात्याची पोलादी कात्री व डाव्या हातात मोठा कंगवा आलेला असे. कच्यांऽग कच्यांऽग कच्चऽऽ कच्यांऽग कच्यांऽग कच्च असे करत मग डोक्यावरील केसांत त्याचा कंगवा झपाट्याने फिरू लागे. क्षणाक्षणाने तो पुढेपुढे सरकत असे. त्या बरोबरच त्या कंगव्यावर आलेले केस, ही कात्री सपसप कापू लागे. पहातापहाता डोक्यावरील केसांचा भार कमी झालेला दिसे. मग तो उचलायचा ते लोखंडी मशीन ! उजव्या हाताने चिपळ्या वाजवतांना हाताची जशी हालचाल होई, तसे ते मशीन कटकटकटकट करत मानेभोवती मागून, कानाच्या लगत फिरे. मशीन फिरल्यावर त्यांवर केसांचा छोटा पुंजका आलेला दिसे, आणि मग आपोआपच काकांच्या मानेजवळील व कानाजवळील भाग स्वच्छ झालेला दिसे.
सर्व सोपस्कार होवून कटिंग झाली की भावडू दाढी करण्यासाठी तयारी करीत असे. हात वाटीतील पाण्यात बुडवून ते ओलसर हात, गालाला लावून पाणी लावून मालीश केल्यासारखे करीत असे. त्याला गालाची कातडी दाढी करण्याएवढी पुरेशी नरम झाली की मग तो शेजारची लाकडी मूठ असलेला व थोडेफार केस शिल्लक असलेला ब्रश वाटीतील पाण्यात बुडवून मग ओला करी. त्याला ओला केल्यावर त्या कंकणाकृती साबणाच्या वडीवर घसघस घासीत असे. साबणाचा फेस त्या साबणावर व ब्रशावर दिसायला लागला, की हा साबणाचा फेस गालावर झरझर फासला जाई. मग ब्रश खाली ठेवून, पेटीतील वस्तरा बाहेर काढला जाई. पायाची एक मांडी जमीनीवर व एक मांडी उभी या अवस्थेत बसलेला भावडू, मग त्या वस्तऱ्याची धार आपल्या पोटरीवर वरखाली करून तपासून घेई. धार कमी आहे असं वाटलं, तर मग पेटीतून आयताकृती छोटा काळा कसाचा मध्यभागी घासूनघासून खोलगट झालेला दगड बाहेर काढी. त्यांवर पाणी टाकून आपल्या उजव्या हातातील वस्तरा चट्कपट्क चट्कपट्क करत एकदा एका बाजूने डावीकडून उजवीकडे व दुसऱ्या बाजूने उजवीकडून डावीकडे घासत फिरवी. जरा धार आली असे वाटले की मग पुन्हा ती त्याच्या पोटरीवर तपासली जाई. समाधान झाले की मग लक्षात येई, की दाढीचा साबण वाळून गेला. पुन्हा वाटीतील पाण्यात बुडवून तो ब्रश गालावर फिरवून साबण ओला केला जाई. मग हळूहळू वस्तरा गालावरून फिरवत तो साबण साफ केला जाई व आपोआप दाढी होई. पुन्हा ब्रशने साबणाचा दुसरा हात जरा काळजीपूर्वक देवून दाढी पूर्ण होई. दाढीसोबतच मानेवरील केस वस्तऱ्याने नीट कोरून घेत दाढी व कटिंग पूर्ण होई. मग तुरटीचा खडा पेटीतून काढत, वाटीतील पाण्यात बुडवून गालावर फिरवला जाई. तेवढ्यात काका घरातून खोबरेल तेलाची बाटली मागवत. याचा अर्थ भावडूच्या लक्षात येई. हाताचा अंगठा खोबरेल तेलाच्या बाटलीच्या तोंडावर दाबून धरत डोक्यावर धरत किंचीत अंगठा उचलला जाई. डोक्यावर खोबरेल तेलाची बारीक धार डोक्यावर पडे. मग खसखसून डोक्यावर तेल केसांवर लावले जाई, डोक्यावर राहीलेले थोडे केस चमकू लागत. मग डोक्यावर चट्चट् चट्चट् करत दोन्ही हाताची आडवी उभी ओंजळ पाणी घेऊन वाजवत डोके, डोक्याचा वेगवेगळा भाग आपल्या अंगठ्याने, पहिल्या बोटाने जोर देत दाबला जाई. चिमटीने कातडी ओढली जाई. दोन्ही कानामागच्या नसा दोन्ही बोटांनी ओंजळीत मान घेवून दाबल्या जात. कपाळावरून तडतड् उडणारी शीर कपाळावर घट्ट हात दाबून धरत दाबली जाई. काकांची तंद्री लागलेली असे. ते आपले डोळे बंद करून हे सुख अनुभवत असत. शेवटी केस झटकायच्या ब्रशने सर्व उरलेसुरले केस झटकत डोकं साफ झालं की दाढीकटींग आटोपली.
समाधानाने काका म्हणत, ‘भावडू चहा घे.’ चहा होणार, याची भावडूला व काकांच्या घरातही कल्पना असायची, कारण कटिंगच्या दरम्यान घरातील छोटा मेंबर बाहेर ओट्यावर येवून डोकावून जात असे. घरात खोबरेल तेलाची बाटली मागवली की चुलीवर चहा ठेवला जाई. कटिंग आटोपली की एका हाताने चिमट्यात गरम चहाचे भांडे घेतलेले व दुसऱ्या हातात कपबशा घेवून कोणी येई. चहा कपबशांमधे ओतला जाई. काका हलक्या झालेल्या डोक्याने चहाचा घोटाघोटाने आनंद घेत, तोवर भावडूचा चहा पिवून, त्याने तपेलीतले उरलेल्या पाण्याने कपबशी विसळून ठेवून पालथी घातलेली असे. पैसे घरातून मागवले जात. तोवर भावडू चटचट लोखंडी छोट्या पेटीतून आपला बाहेर काढलेला पसारा परत ठेवण्यात दंग असे. घरातून पैसे आले की ते घेवून मग भावडू पुन्हा रमतगमत चालू लागे रस्त्याने, दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या दिशेने !

३०. ४. २०१८

No comments:

Post a Comment