Wednesday, June 13, 2018

वाचनालय आणि आदर्श

वाचनालय आणि आदर्श 

माझ्या शालेय जीवनांत मला वाचनाची गोडी लागली होती. ती व्यवस्थित वाढवण्याचे काम हे केवळ घरातील वडिलधाऱ्या मंडळींनीच नाही केले, तर समाजातील सुविचारी, सह्रदय माणसांनी पण केले. मी आपल्या वाचता येण्याच्या वयापासून रावेर येथील ‘राजे रघुनाथराव देशमुख वाचनालय’ येथे पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र वगैरे वाचायला जात असे. हे वाचनालय तसे जरा लांबच आहे गांवापासून, असे त्यावेळी वाटायचे. आता जसजशी वस्ती वाढू लागली, तशी वाढत्या वस्तीने ही पूर्वी गांवापासून लांब वाटणारी सर्व ठिकाणे आपल्यांत गिळंकृत करून घेतली. मग हे १ जानेवारी, १९१४ रोजी सुरू झालेले वाचनालय असो, सन १९२७ साली सुरू झालेली ‘सरदार जी. जी. हायस्कूल’ असो का पार यापूर्वीपासून असलेले ‘शनिमंदीर’ असो ! अगदी थेट रावेर गांवाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत वस्ती झालेली आहे. गांवाबाहेर फिरायला जाणं हा विषयच कमी झाला आहे. फिरायचे तर गांवातच फिरल्यासारखं करावं लागतं !
माझे वडिलांपेक्षा मोठे असलेले, काका, नानाकाका म्हणायचो आम्ही त्यांना ! वाचनाचे माझे वेड त्यांना दिसत होते. वाचनालय उघडल्यावर जायचे तर ते बंद करूनच यायचे, ही माझी सवय ! तिथं संध्याकाळी खूप डांस चावायचे कारण तो भाग सर्व आसपास शेती, झाडंझुडूपं असलेला होता. पण त्या भल्यामोठ्या डांसांना हाकलत, हाताने मारत आमचे बाकावर बसून वाचन चाले. पुस्तके इकडेतिकडे जावू नये म्हणून सर्व मासिके ही एका दोऱ्यात बांधून टेबलावर ठेवलेली असत. काहीवेळा एखादा घायकुतीला आलेल्या वाचकाने त्याला हवे असलेले मासिक ओढले की त्यामुळे रंगात आलेल्या दुसऱ्या वाचकाचे पुढे असलेले मासिक झरकन ओढले जायचे व नाहीसे व्हायचे ! त्याची तंद्री भंग पावायची. या अशा गोंधळात सर्वांचे वाचन सुरू असायचे. त्या वाचनालयांत मासिके, पुस्तके, वर्तमानपत्रे यांची अक्षरश: लयलूट असायची. तिथे वाचनालयांत बसून हवी ती पुस्तके वाचायला मिळत, पण ती घरी नेता येत नसत. त्यासाठी वाचनालयाचे सभासद व्हावे लागे. पहिला वर्ग, दुसरा वर्ग व तिसरा वर्ग असे तीन सभासद प्रकार होते. सोमवार सोडून रोज पुस्तक बदलविता यायचे, त्यामुळे दिवसभर पुरले पाहीजे असे पुस्तक न्यावे लागे. ही वाचनालयाची पुस्तके वाचण्यात मोठी अडचण असायची, ती म्हणजे शाळेची अभ्यासाची पुस्तके व रोजचा शाळेचा अभ्यास ! त्या अडचणीतून कसाबसा मार्ग काढत ही पुस्तके वाचावी लागत. मोठे कष्टांचे पण आनंदी दिवस होते.
माझे नानाकाका, ते पण प्रचंड वाचन करायचे. त्यांचे नोकरीचे सर्व आयुष्य हे मुंबईला गेले. सन १९४४ सालातील ते मुंबई विद्यापीठाचे ‘बी. ए. (ऑनर्स)’ होते. त्यावेळी आमच्यासमोर ते मोठमोठी इंग्रजी पुस्तके वाचायचे, हे पाहून तर आम्ही थक्क व्हायचे. इंग्रजी पुस्तके इतकी मोठमोठी असतात, आणि ती वाचली जातात, हे कधी बघीतलेच नव्हते. मराठी, संस्कृत पुस्तकेच काय ती तब्येतीने बरी असतात, हा आमचा समज ! एकदा मी असाच वाचनालयात बसलो होतो. त्यांनी मला बोलावले आणि आम्ही दोघे, त्या वेळचे वाचनालयाचे ग्रंथपाल सोनू बुलाखी वाणी जिथे बसायचे तिथं घेवून गेले. ‘सोनू, याला सभासद करून घे.’ त्यांनी माझ्याकडे बोट दाखवत, त्यांना सांगीतले. हे सांगीतल्यावर त्यांनी म्हणजे कै. सोनू बुलाखी वाणी यांनीच, सदस्य होण्याचा फॉर्म भरला, माझी सही घेतली. दोन ओळखीच्या सदस्यांची शिफारस लागायची बहुतेक, पण त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. माझी प्रवेश फी व वर्षभराची वर्गणी त्यांनी नानाकाकांनी भरली. मी या वाचनालयाचा सदस्य झालो, बहुतेक इयत्ता चौथीत ! ‘याला चांगले पुस्तक द्यायचे, वाटेल ते द्यायचे नाही.’ हे ग्रंथपाल, सोनू बुलाखी वाणी यांना सांगून, मग आम्ही दोघं तेथून बाहेर आलो.
मी पुस्तके कोणती नेतो आहे, यांकडे मात्र कै. सोनूकाकांनी शेवटपर्यंत लक्ष ठेवले. मुलाने चांगले वाचावे, त्यांतून चांगले शिकावे, ही भावना त्या पुस्तकांची हाताळणी व वर्गवारी करता येईल इतपत ज्ञान असणाऱ्या या माणसास वाटे. मोठ्यांची मासिके, पुस्तके जर कोणी शालेय वयातील वाचत असला, आणि जर हे कोणाच्या लक्षात आले तर खैर नसायची, कारण असे काही दिसले की गांवातील कोणासही त्या मुलाला दरडावून ‘काय वाचतो आहे ?’ हे विचारण्याचा अधिकार गांवाने दिलेला होता आणि त्या मुलाच्या पालकांची त्याला संमती असायची. आपल्याबद्दल कोणी विचारल्यावर सर्व वाचकांचे लक्ष आपोआपच त्याच्याकडे जायचे. लाजेने तो अर्धमेला व्हायचा. भारतीय राज्यघटना ही त्यावेळी पण अंमलात होती, मात्र ‘आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य्याची गळचेपी होते आहे’, असा कोणी गळा काढला नाही, वाचनालयावर मोर्चे आणले नाही, कोणाला यासंबंधी घेराव घातले नाही किंवा तालुका तहसीलदार यांना निवेदन दिले नाही. साधी निषेधाची सभा नाही, निदान वैयक्तिक जाहीर निषेध ? तो पण नाही. अशा दडपशाहीने चाललेल्या वातावरणांत आम्ही वाढत होतो.
यानंतर तेथील असंख्य पुस्तके वाचलीत. त्यांत एकदा ‘Rage of Angels’ हे Sidney Sheldon या लेखकाच्या पुस्तकाचे मराठी भाषांतर वाचले. नंतर मूळ इंग्रजी कादंबरी पण वाचली. या कादंबरीचे कथानक खूप सुंदर आहे. आपल्याला खिळवून ठेवते, जागचे अगदी हलू देत नाही.
एक तरूण महिला वकिल, जेनिफर पार्कर, हिच्या भोवती ही सर्व कादंबरी आहे. या तरूण महिला वकिलाला पाठोपाठ आपल्या मेहनतीने, बुद्धीने यश मिळत असतं. एक वेळ अशी येते की राजकीयदृष्या सर्वशक्तीमान बनणाऱ्याच्या आयुष्यातील कायम सहकारी बनण्याऐवजी ती कुप्रसिद्ध गुंड माफियाची शिकार कशी बनते आणि तिचे आयुष्य कसे उध्वस्त होते. त्या राजकीय नेत्याचा शपथविधी, सत्कार कार्यक्रम, अशा सुन्न अवस्थेत, एकटी, एकाकी अवस्थेत एका खोलीत टीव्हीवर पहात असतांना, तिला आठवलेल्या तिच्या गतायुष्यातील घटनांची मालिका ही कादंबरी पुढे नेते. मनाला सुन्न करून टाकते.
आपल्या आयुष्यातील आपण घेत असलेला किंवा आपल्याला घ्याव्या लागणाऱ्या एकेक निर्णयाचा क्षण व हा निर्णय आपल्या आयुष्याच्या अंतीम चांगल्या किंवा वाईट उत्तरावर परिणाम करत असतो. तात्कालिक लाभ किंवा मग्रुरी ही कायम टिकणारी नसते. जे काही चांगलं असेल ते अंतीमत: चांगलंच असतं किंवा अंतीमत: चांगलं असणारच खरोखर चांगलं असतं ! जे सत्य असेल ते शेवटी सत्यच रहातं, काही काळ तुम्हाला त्याच्या सत्यतेबद्दल शंका आली तरी ! काहीही केले तरी असत्याचे रूपांतर सत्यात किंवा वाईट गोष्टींचे रूपांतर चांगल्या गोष्टीत किंवा दुर्गुण हे आपल्याला सद्गुण म्हणून दाखवता येत नाही. तुम्ही जे काही भलेबुरे कृत्य केले असेल त्याचे तसेच फळ तुम्हाला मिळणार हे नक्की ! आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोणता रस्ता निवडायचा ? चांगला का वाईट ? आपल्याला काय हवं आहे, समाजाची प्रगती का समाजाचा विनाश ? समाजाचा विनाश म्हणजे आपला पण विनाश हे लक्षात ठेवले पाहीजे. समाज राहीला नाही तर आपण एकटे कसे रहाणार ? कोण राहू देणार आपल्याला ?
मध्यंतरी औरंगाबाद येथे दुर्दैवी संकेत संजय कुलकर्णी याची आपल्या चारचारी गाडीने अक्षरश: चिरडून संकेत प्रल्हाद जायभाये याने भर दिवसा, भर वस्तीत हत्या केली. समाजमन सुन्न करून टाकणारी ही घटना ! कुठं चालली आहे ही नवीन पिढी ? यांच्यासमोर कोण आदर्श आहेत, कोणते आदर्श आहेत आणि कसे आदर्श आहेत. समाज या अशांना सहन करणार का ? असंख्य प्रश्न डोळ्यांसमोर येतात आणि आपण आपल्या संस्कारांची व्याख्या आपल्या कुटुंबापासून, आपल्या घरापासून, आपल्या जातीपासून, आपल्या धर्मापासून, आपल्या देशापर्यंत बदलवत नेलेली आहे. ‘अति तिथं माती’ ही म्हण आपल्याला चांगली माहिती आहे. सर्वांना शेवटी मातीतच जायचं आहे पण आपल्या या अशा कृत्याने आपण आपल्यासोबत घरदार, नातेवाईक, समाजालाच मातीत घालायला बसलो आहे. अशांना, आपल्या जीवावर उठलेल्यांना सहन करायचे का, कितपत सहन करायचे हे ठरवायची आज वेळ आलेली आहे. नीट ठरवावे लागेल, कठोरपणे ठरवून निर्णय घ्यावे लागतील. आता नाही ठरवले तर ती आपल्या समाजस्वास्थ्याची मृत्युघंटा ठरेल !

१. ४. २०१८

No comments:

Post a Comment