Wednesday, June 13, 2018

नूतन मराठा कॉलेज जळगांव

नूतन मराठा कॉलेज जळगांव
सन १९७८ साली, नुकत्याच दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उच्च माध्यमिक परिक्षा होत्या, त्याची अकरावीची (वाणिज्य) परिक्षा मी दिली. वर्गात सर्वप्रथम आलो आणि बारावीत गेलो. आता पुढील वर्षी बोर्डाची परिक्षा ! त्यानंतर पुढे शिक्षणासाठी रावेरला कॉलेज असेल का ? नसले तर मग काय करणार ? यापेक्षा यंदा, बारावीलाच बाहेरगांवी शिकायला जावू, म्हणजे पुढच्या वर्षीच्या कॉलेज वातावरणाची सवय होईल, वगैरे वगैरे ! त्या वयांत जितके परिपक्व आणि / किंवा मूर्खपणाचे विचार इतरांचे असतात, तितकेच माझे पण होते. हा मित्र ‘इथं आपल्या गावी काही खरं नाही’ असं म्हणाला की मग आपल्याला पण ‘इथं काही खरं नसल्याचा साक्षात्कार’ होवू लागतो. ही लागण मग मित्रमंडळीत जोरात पसरते. शेवटी ‘या रावेरसारख्या खेडेगांवात, (तालुका असला तरी) काही खरं नाही. मुलांना शहरात शिकायला पाठवलं पाहीजे’, हा निष्कर्ष पालकमंडळी पण, कंटाळून वा पुत्रप्रेमाने, काढतात. शेवटी त्यातल्यात्यात आपल्या आवाक्यातले शहर बघायचे आणि मुलांना तिथं शिकायला ठेवायचे, हा सरधोपट मार्ग पालक अवलंबतात.
माझ्या बाबतीत मनांतील शिक्षणासाठी पहिली निवड ही जरी पुणे वा मुंबई असली, तरी ती घरी असलेला आर्थिक ताण पहाता शक्यच नव्हती ! मग त्यानंतर जिल्ह्याचे गांव म्हणजे जळगांव ! ते आजोळ असल्याने मला पूर्वीपासूनच परिचित ! हे ठीक होते. बरं, मग प्रवेश कोणत्या कॉलेजला घ्यायचा, हा प्रश्न ! तिथं त्यावेळी दोन कॉलेज होती, मूलजी जेठा कॉलेज आणि नूतन मराठा कॉलेज ! मूलजी जेठा कॉलेजचे नांव होतेच, ते खूपच जुने, तसा तेथील शिक्षकवृंद सर्वच ! नूतन मराठा कॉलेज तुलनेने नवीन पण संस्था जुनी ! पण हा रिकामा तपशील आता देतोय. त्यावेळी ‘जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज, याचे चेअरमन कै. ॲड. एस्. आर. उपाख्य नानासाहेब चौधरी हे होते. यांचे आमचे जुने घरोब्याचे संबंध ! त्यांच्या कानावर ही चर्चा टाकल्यावर, ‘मुलांना माझ्या कॉलेजला टाका. माझे लक्ष राहील मुलांवर. तुम्हाला काळजी रहाणार नाही’, म्हणत त्यांनी तो विषय संपवला.
मुलीमुलांना परक्या ठिकाणी शिकायला ठेवतांना, पालकांना मुलांच्या भविष्यातील मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जापेक्षा पण, त्यांची वैयक्तिक काळजी जास्त असते. आपल्याजवळ असलेल्या पुंजीतून मुलांचा खर्च वेगळा काढून मुलांना देणारे पालक, नंतर आपल्या कोणत्यातरी खर्चाला अनावश्यक म्हणून काट मारत असतात. एरवी त्यापूर्वी सर्वच आवश्यक असणारा खर्च, मुलं बाहेरगांवी शिकायला गेल्यावर अनावश्यक का ठरतो ? आपण मुलाच्या भूमिकेत असतो, त्यावेळी हे समजत नाही; समजते ते हा मुलगा पालक झाल्यावर, त्या भूमिकेत गेल्यावर ! तो पावेतो काहीवेळ मुलगा, आपल्या पालकांना आवश्यक व अनावश्यक खर्चाचे अर्थशास्त्र समजावून सांगतो. या कौटुंबिक प्रेमातून निर्माण झालेल्या ‘काळजीच्या अर्थशास्त्राला’ पुस्तकी अर्थशास्त्राचे नियम लागत नाही, हे त्याला कोण सांगणार ? इथं नियम लागतात ते आपणांस आपण आईवडील झाल्यावर समजतात व ते असतात निसर्गनिर्मीत आंतरिक नियम समजणाऱ्या निसर्गाचे !
मुलांवर नीट लक्ष ठेवणारे कोणी असले की मग पालकांची काळजी कमी होते. मुलं काय, अभ्यास करतील आणि गुणवत्ता वाढवतील ! पण त्यांच्यावर मायेची पाखर आणि संरक्षण व सुरक्षिततेचं कवच असले तरच त्याला अभ्यास उमजेल, करावासा वाटेल. तसं काही नसलं तर मग कसला अभ्यास आणि कसले काय ? त्या काळांत येणाऱ्या समस्या सोडवता सोडवता, घरच्या उबदार संरक्षणाची आठवण येते. हे घरी नीट सांगीतलं तर योग्य मदत येते, सूचना येतात व निभावून नेता येते. नाहीतर मग, त्याला तोंड देतादेताच विद्यार्थ्याचे वर्ष संपते, काही वेळा दुर्दैवाने आयुष्यातील प्रगती संपते, सर्वच संपते.
एकदाचा मी ‘नूतन मराठा कॉलेजला’ बारावीच्या वर्गात सन १९७८ ला प्रवेश घेतल्यावर साधारण जुलैमधे नियमीत वर्ग सुरू झाले. आमचा वर्ग भरायचा, तो कडुलिंबाच्या झाडाजवळच्या खोलीत ! शेजारीच कॉलेजचे प्राचार्य कै. के. आर. सोनवणे यांचे अॉफिस होते, त्यामुळे वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत शांतता असायची. कॉलेजचे वर्ग बहुतेक अकराला सुरू व्हायचे. मी घरून जेवण करून आलेलो असायचो आणि मग शिकवणे सुरू व्हायचे, मग काही वेळा येणारी झोप जास्त का शिक्षकांच्या लेक्चर्समधून मिळणारे ज्ञान जास्त ! दोघांत तुल्यबळ लढाई व्हायची. झोपेचा विजय होवू नये असे मलाच काय, पण माझ्या शेजारी बसणाऱ्या माझ्या मित्रांस, भरत गांधी व कासट यांना पण वाटायचे. काही वेळा त्याच्या पलिकडच्या हकीम, विधाते यांना पण वाटायचे. काही वेळा क्वचितच ही जबाबदारी आडमार्गाने शिक्षकांनी देखील नीटपणे पण अप्रत्यक्ष पार पाडली असावी.
माझी झोप अत्यंत सावध असल्याने, मी जागा आहे किंवा झोपेत आहे, याबद्दल दोन वेववेगळ्यांची परस्पर भिन्न मतं देखील यायची. मी झोपलो होतो, असे म्हणणारे मला ‘वर्गात काय शिकवणं सुरू होतं ?’ हे विचारल्यावर मला जे अंधूक ऐकल्याचे आठवत असे ते मी सांगे. प्रश्न विचारणारा चकीत होई, कारण मी बरेच बरोबर सांगीतले असे. वर्गात सांगीतलेले सर्व तर विचारणाऱ्याला पण समजत नसायचे, तर आठवणार कोठून आणि सांगणार काय ? मी जागा होतो याची खात्री नाईलाजाने का होईना पण करून घेतल्यावर, त्यांवर दुसऱ्याचा विश्वास बसत नसे. त्याने मला डोळ्याच्या पापण्या जड झालेल्या अवस्थेत आणि प्राणपणाने झोपेला परतून लावण्याच्या प्रयत्नात शेवटी थकल्याने, मी काही क्षण डोळे मिटलेले, बघीतलेले असे. शेवटी ‘मला झोपेत ऐकू येत असेल’ असा काहीसा विचित्र निष्कर्ष ते काढत व विषय संपवत. ही सवय मला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडली आहे, त्याबद्दल नंतर !
बारावीला आम्हाला ‘अकाउंटन्सी’ शिकवायला प्रा. रमेश लाहोटी हे होते. तब्येतीने उत्तम, उंची चांगली, सावळासा रंग असलेले, राजेशखन्ना टाईप भांग पाडणारे हे सुरूवातीला कॉलेजला शेवाळी रंगाच्या ‘लुनाने’ येत. त्यांची तब्येत आणि त्या ‘लुनाची’ तब्येत यांची तुलना करता आम्हाला त्यांच्या तब्येतीपेक्षा त्या ‘लुनाच्याच तब्येतीची’ जास्त काळजी वाटे. नंतरच्या काळांत ते अधूनमधून स्कूटरने येवू लागले. यांची एक चांगला कवि म्हणून पण ख्याती होती. आकाशवाणी जळगांव केंद्रावर व विविध कवी संमेलनात यांची उपस्थिती आवर्जून असायची. इतकं वेगळेपण असल्यावरपण शिकवणे छान ! विषय हसतखेळत व विनोदी अंगाने पण सुंदर कसा शिकवावा, हे त्यांच्याकडून शिकावे. काही वेळा अगदी आमच्या वयाचे होवून ते शिकवत. त्यामुळे विषय सोपा वाटे आणि वर्गात प्रचंड गर्दी !
एकदा असाच काही गोंधळ सुरू होता. प्रा. लाहोटी सरांनी त्यातील एकाला उठवले, ‘काय गोंधळ करतोय ?’ म्हणून विचारले. ‘मी नाही सर ! हा, सारखा खिडकीबाहेर पहातोय.’ दुसऱ्याकडे बोट दाखवत याचे उत्तर ! ‘काय म्हणतोय तो ?’ सरांनी विचारले. ‘काही नाही, हा सारखा बाहेरच्या कोंबडीकडे पहातोय !’ तो उत्तरला. वर्गात हास्याचा धबधबा ! मग क्षणभर शांतता झाल्यावर, सरांनी आपल्या खास आवाजांत व स्टाईलने म्हटले, ‘का रे बाबा, एवढा बारावीत गेला आणि अजूनही कोंबडीकडेच पहातो. कसं व्हायचं ?’ वर्गात हास्याचा प्रचंड स्फोट ! या अशा वातावरणामुळे तर काही विनोदी तास वाटत असल्याने तर काही चांगले शिकवतात म्हणून सदैव हजर असत. मात्र यांच्यातील पालक आणि शिक्षक हा सदैव कडक व कठोरपणे जागा असतो, याचा अनुभव संगमनेरला पुणे विद्यापीठाचा ‘यूथ फेस्टीव्हल’ होता, त्यावेळी आला.
प्रा. बी. बी. देशमुख आणि प्रा. अजित वाघ त्यावेळी वाणिज्य विषयीचे विषय शिकवायचे. प्रा. देशमुख हे उंचीने बेताचेच ! संपूर्ण वर्गात चक्कर मारत, बेंचेसच्या वेगवेगळ्या रांगांमधून फिरतफिरत शिकवण्याची यांना सवय ! पुस्तक हातात घेवून यांनी क्वचितच शिकवले. ज्ञान डोक्यात असले की ते सांगतांना अडचण होत नाही. यांची माणुसकी दर्शवणारी एक आठवण तर माझ्या कायम स्मरणांत राहील, ती म्हणजे माझ्या चुलत भावाचा उजवा हात परिक्षेच्या वेळी फ्रॅक्चर झाला होता. त्या हाताने पेपर लिहीणे त्याला शक्य नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांचा पुतण्या, म्हणजे आताचे प्रा. राजेंद्र देशमुख यास सांगून लेखनिक म्हणून ठेवले आणि सर्व प्रकारची परवानगीची मदत केली. सर्व पेपर परिक्षेत माझ्या भावाने तोंडी सांगीतले व लेखनिक म्हणून प्रा. राजेंद्र देशमुख यांनी लिहीले, एका स्वतंत्र खोलीत !
प्रा. अजित वाघ म्हणजे व्यवस्थितपणा व टापटिपीचा नमुना ! हातात एक वहीवजा डायरी, त्या विषयाचे पुस्तक व खडू घेऊन उंचपुरे सर वर्गात शिरत ! त्यांचा शर्ट पॅंटमधे नीट खोचलेला. पॅंटवर चामडी पट्टा आवळलेला, पायात बूट ! कपड्यांची रंगसंगती सांभाळलेली ! वेडेवाकडे रंग व कपडे - चुकूनही नाही ! साधारणत: तीस मिनीटे मनापासून छान शिकवायचे व पंधरा मिनीटे आम्हाला नोटस् लिहून घेण्यास सांगायचे. या नियमीतपणाचा, टापटिपीचा व शिस्तीचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला होतोच होतो. मला पण झाला. अजून त्यांची मला न विसरतां येणारी आठवण म्हणजे, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्यास ठेवलेले बक्षीस मला मिळाले होते.
मराठी शिकवायच्या त्या सौ. सुलोचना साळुंके ! मराठी सुंदर शिकवायच्या ! त्या बहुतेक नुकत्याच लागल्या असाव्यात त्या वेळी ! त्यांचा आमच्या वर्गावरचा पहिलाच तास ! त्यांनी आल्यावर स्वत:चा परिचय करून दिला, ‘मी सौ. सुलोचना एम्. साळुंके. तुम्हाला मराठी शिकवायला आहे. आता आपण सर्वांनी आपला परिचय करून द्यावा.’ असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांनी परिचय करून देण्यास सांगितले. सर्वांनी परिचय करून दिला. मग त्या शिकवायला लागल्या. थोडावेळ गेला. त्यांना कोपऱ्यातून कुजबुज आल्याने त्यांनी एका विद्यार्थ्याला उभे केले.
‘काय बोलतोय ? काय शंका आहे ? मॅडमनी विचारले. ‘मॅडम, मला काही शंका नाही. याला आहे, आणि हा सारखा माझं डोकं खातोय.’ विद्यीर्थ्याचे उत्तर.
‘बोल काय म्हणतो तो ? मी सांगते.’ मॅडमचे यांवर उत्तर.
‘तो म्हणतो - सौ. सुलोचना एम्. साळुंके यांतील ‘एम्’ म्हणजे काय ?’ चेहऱ्यावर कमालीचा निरागसपणा दाखवत तो उत्तरला. वर्ग हसूहसून डोक्यावर ! मुलींनी तोंडावर ते छोटे रुमाल लावत कसेबसे हसू दाबत खाली माना घालत, डोळ्यातील पाणी पुसले ! त्यानंतरचा वर्गातील हास्याचा धबधबा थांबल्यावर, मग अगदी मनापासून हसतच मॅडमनी त्या विद्यार्थ्याला म्हटले, ‘मी मागच्या वर्षातील, अकरावीमधील एक शंका विचारते. माझी शंका त्याने उत्तर देवून निरसन केली की मग त्याच्या शंकेचे निरसन करते.’ यांवर ‘हॅंऽऽऽऽऽ’ असा विद्यार्थ्यांचा आवाज ! येगायोगाने पुढे काही बोलणार, तोच मराठीचा तास संपला. या मनमोकळ्या, हजरजबाबी वातावरणांत वर्षभर मॅडमनी मराठी कडकपणे, समजावत, रागावत पण अत्यंत उत्तम शिकवले. आपण पुस्तकातील फक्त धडेच वाचायचे नसतात तर त्यामागचे आणि न दिसणारे पण वाचायचे असते, हे त्यांनी शिकवले. माझी सरदार जी. जी. हायस्कूल सोडल्याची खंत, जाणीव मला नूतन मराठा कॉलेजमधील सर्वांनीच मला कधीही होवू दिली नाही. खूप वर्षांत मराठीच्या सौ. सुलोचना मॅडम व माझी भेट नाही.
इंग्रजी शिकवायला, प्रा. भावसार, प्रा. व्ही. जी. पाटील व प्रा. जी. बी. पाटील हे होते. इंग्रजी हा विषय म्हणजे परक्यांची भाषा असली तरी त्यांत मार्कस् मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास करणे पण आवश्यक आहे, हे कायम ध्यानांत ठेवल्याने यांत पण अडचण आली नाही. अर्थशास्त्र शिकवायचे प्रा. डी. एन्. पाटील ! हे खरं तर पैलवान व्हायचे ते इकडे आले. उत्तम शरीरयष्टी आणि उत्तम पण विनोदाचा शिडकावा असलेले शिकवणे.
या सर्व शिक्षकांनी कॉलेजच्या वाचनालयांत जर अभ्यासाची काही पुस्तके मला हवी असतील तर त्यांच्या नांवावर, अगदी संदर्भ ग्रंथ देखील घेण्याची परवानगी दिलेली होती. या अशा वातावरणांत वर्ष संपले, बोर्डाची वार्षिक परिक्षा झाली. आम्ही सुटीचे घरी गेलो. रिझल्टच्या दिवशी जळगांवला आलो. मार्कशीट घ्यायला दुपारी तीनसाडेतीनला कॉलेजला गेलो. नांव सांगीतले. तेथे श्री. महाडीक होते. मला बघीतल्यावर, ‘हं, हा आलाय भोकरीकर ! अरे पहिला आलाय तू कॉलेजमधून ! कमाल आहे. आम्ही केव्हाची वाट पहातोय !’ मला आनंद तर नक्कीच झाला, पण डोळ्यांत पाणी पण आलं ! कोण कुठला मी ! वर्ष झालं, इथं आलोय ! आणि मी लवकर यावं, यासाठी माझी वाट पहाताय ही मंडळी ! कशासाठी ? काही असो. पण त्यानंतरही बी. कॉम. पर्यंत मी तिथं होतो. असंख्य सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. माझ्या प्रेमापोटी कॉलेजच्या नियमांना मुरड घालून पण या मंडळींनी माझ्यासाठी खूप केलेले आहे. अतिशय प्रेमळ व कडक कॉलेजने मला गेली तीसपस्तीस वर्षे निरपेक्ष मैत्री सांभाळणारे मित्र पण दिले. माझ्यावर या कॉलेजच्या चेतन, अचेतन वस्तूने खूप प्रेम केले. बरीच वर्षे झाली, यांतील बरीच मंडळी, शिक्षक भेटले पण नाहीत. भेट झाली नाही, म्हणून आठवण येत नाही असे थोडीच होते. क्वचित एकदोनदा प्रा. अजित वाघ हायकोर्टात औरंगाबादला भेटले होते. ‘माझा विद्यार्थी’ म्हणून त्यांनी तेथील दुसऱ्यांस ओळख करून दिली, बरं वाटलं !
आज कॉलेजवरून जात होतो, गेटवरील कॉलेजचे नांव वाचले. त्याचा फोटो काढावासा वाटला आणि या आठवणी दाटून आल्या.

२२. ४. २०१८

No comments:

Post a Comment