Wednesday, June 13, 2018

आकाशवाणी केंद्र जळगांव

आकाशवाणी केंद्र जळगांव 

जळगांव येथे आकाशवाणी केंद्र हे सन १९७४ वा १९७५ ला झाले. ते जळगांव ऐवजी दुसरीकडे व्हावे, अशी इच्छा असणारी पुढारी मंडळी देखील होती.
महाराष्ट्रातील वजनदार नेते, ज्यांनी रावेर विधानसभा मतदार संघाचे, म्हणजे आमच्या मतदारसंघाचे, बराच काळ प्रतिनिधीत्व केले. त्यांचे आमचे चांगले संबंध मात्र विचारधारा भिन्न ! वैचारिक वेगळेपण असले तरी कडवटपणा अजिबात नव्हता ! त्यांनी मंत्री म्हणून आणि नंतर विधानसभा अध्यक्ष म्हणूनही चांगले काम बघीतले असे कै. मधुकरराव चौधरी हे जळगांव जिल्ह्यातील होते. जळगांव जिल्ह्यात शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्यांतील ही व्यक्ती होती. लोकशिक्षणांत आकाशवाणी केंद्राचे महत्व त्यांना माहीती होते. त्यांनी तत्कालीन नभोवाणी मंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून असलेले कै. इंद्रकुमार गुजराल यांच्याशी असलेल्या स्नेहाचा उपयोग जिल्ह्यासाठी केला आणि आकाशवाणी केंद्र जळगांव येथे मिळाले. ही त्यावेळी माझ्या शालेय वयांत ऐकलेली जबरदस्त चर्चा !
असे आकाशवाणी केंद्र जळगांव येथे सुरू झाल्यावर तत्कालीन नभोवाणी मंत्री कै. वसंतराव साठे यांनी जळगांव आकाशवाणी केंद्राला भेट दिली होती. त्यांनी त्या केंद्राच्या गरजा बऱ्यापैकी मार्गी लावल्या, हे मात्र तेथे माझा साधारणत: सन १९७९ ते १९८५ पर्यंत बऱ्यापैकी वावर होता, म्हणून माहिती आहे. जळगांव आकाशवाणी केंद्राचा कदाचित तो सुवर्णकाळ असावा. पहिले केंद्र संचालक श्री. ल. गो. भागवत होते आणि सर्व सहकारी मंडळी पण खूप चांगली होती.
त्यानंतर कै. वसंतराव साठे यांनी नाशिक येथील धर्मवीर डॉ. मुंजे यांनी सन १९३७ साली स्थापन केलेल्या ‘भोसला मिलीटरी स्कूल’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमाचा वृत्तांत मी आकाशवाणी जळगांव केंद्रावरून ऐकला होता. त्या संस्थेचे आणि त्या संस्थापकाचे महत्व सांगीतले होते. आपल्या विद्येचे, ज्ञानाचे आणि शक्तीचे, बलाचे महत्व त्यांनी जाणले होते, म्हणून या संस्थेची स्थापना केली. स्वातंत्र्य मिळाले म्हणून या संस्थेचे कार्य संपले नाही, तर अजूनच महत्वाचे झाले आहे. आपल्याला आपले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. त्यासाठी डॉ. मुंजे यांनी त्या काळात हे रोवलेले रोप आपल्याला भरभक्कम वृक्षात बदलावयाचे आहे. या स्वरूपाचे त्यांचे भाषण अजून आठवते.
त्यांच्या गंभीर आवाजातील श्लोक अजूनही माझ्या मनांत घुमतो.
अग्रतचतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनू ।
इदं ब्राह्म इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।
Harshad Shamkant Barvearve यांनी ‘साठे’ या नांवावरून काढलेल्या खोडीवरून हे सर्व आठवले.)

No comments:

Post a Comment