Thursday, June 27, 2019

गांवची जत्रा, अन् कारभारी सत्रा !

गांवची जत्रा, अन् कारभारी सत्रा !
साधारण १०-१२ वर्षांपूर्वीची घटना ! आम्हा दोघांना जळगांवला जायचं होतं औरंगाबादहून ! जायचे तर रस्त्याने, एस् टी. बसशिवाय मार्ग नाही. त्यांत दोघांना जायचं म्हणजे, सर्व आवरून जावं लागतं घरातले ! माझी तयारी लगेच होते, पण माझी तयारी होणं, हे अजिबात महत्वाचे नसते. त्यावरील प्रतिक्रिया म्हणजे -
‘कपडे घातले म्हणजे झाली तयारी, असं नसते. घरातले सर्व नीट पाहून, झाकून-टोपून, गॅस बंद करून, दूध वगैरे कोणाला देवून, मग निघावं लागते.’ इति सौ. त्यामुळे मी सकाळी कितीही लवकर उठून कामाला लागलो, तरी त्याला काहीही अर्थ नसतो; तर हे सर्व आटोपून, जेवण वगैरे करून, निघतानिघता साधारणत: दुपारचे १२-१२.३० होतातच. त्याप्रमाणे आम्ही हे सर्व या नियमाप्रमाणे आटोपून एस् टी महामंडळाच्या स्टॅंडवर आलो. प्लॅटफॉर्मवर उभे राहीलो.
जळगांव, भुसावळ, जामनेर, रावेर, बुरहानपुर, मुक्ताईनगर वगैरे गाड्या सुटत होत्या, तिथं बघीतलं, तर काय समोरच भुसावळ गाडी लागली होती. म्हटलं ‘चला, ही जळगांवहून जाईल.’ तशी गाडीत विशेष गर्दी नव्हती. बरं वाटलं. मी गाडीत चढायला पाय ठेवला आणि चढताचढता विचारले, ‘जळगांवमार्गे का ?’
‘नाही. जामनेरमार्गे !’ गाडीतील कोणीतरी ! मी गाडीत पायरीवर चढलेला उतरलो.
‘नीट पाहून गाडीत चढत जा ! विचारले म्हणून बरे ! नाहीतर पहूरवरून जामनेरला पोहोचलो असतो.’ इतके स्पष्ट व निर्भीडपणे, बस स्टॅंडवरपण सर्वांसमक्ष कोण बोलले असेल, ते मी सांगत नाही. आपण अंदाज करावा. अनुभवींना याचा अचूक अंदाज येईल. पण उत्तर सांगू नका, मनांतच ठेवा. तोपर्यंत ती गाडी गेली.
थोड्याच वेळात दुसरी गाडी सरकन आली आणि उभी राहिली. ती पण भुसावळ ! तिची पाटी ती, जामनेरमार्गे असल्याची दाखवत होते. मी विचारले पण नाही आणि चढलो पण नाही. ती गाडी गेली, जवळपास रिकामीच होती. मग तिसरी आली व लागली प्लॅटफॉर्मला ! ती पण भुसावळ आणि जामनेरमार्गेच ! ती पण तशी रिकामीच गेली. मग चौथी आली, ती पण जामनेरमार्गे भुसावळ ! तोपावेतो जळगांवसाठी लोकांची गर्दी बऱ्यापैकी जमली होती. पण ती चौथी गाडी गेली. पाचवी व सहावी गाडी पण आली आणि आमच्या समोरून ‘टण् टण्’ अशी घंटी वाजवत कंडक्टरने नेली. आम्हा सर्वांचाच धीर सुटत होता. काही तर पुढे जावून, वाकडी मान वर करून, आपण नक्की जळगांवच्याच प्लॅटफॉर्मवर उभे आहोत ना ? याची पण खात्री केली. प्लॅटफाॅर्म जळगांवचा होता.
‘अहो, काही तरी करा. दीड तास झाला.’ सौ.
‘मी काय करू ? मी गाडीवाल्यांना सांगतोय का, की येवू नका म्हणून ?’ मी.
‘काहीही सांगीतले की तुमचे तिरपागडेच असते.’ सौ.
‘बरं. ठीक आहे. पहातो.’ माझी माघार ! तेवढ्यात सातवी गाडी आली. बॅगा घेवून मी पुढे जातो, तो ती गाडी पण ‘जामनेरमार्गे भुसावळ’ ! सर्वांना हे दिसल्यावर, -
‘काय टाईमटेबल करतात की गंमत करताय महामंडळवाले, कोणास ठावूक !’ एक प्रवासी !
‘पैसे घेवून नोकऱ्या लावतात xxxx !’ दुसरा. त्याच्या कोणाला तरी नोकरी मिळाली नसावी.
‘Xxxxx डिपार्टमेंटल सुरू करायला हव्या, म्हणजे समजेल !’ हा बहुतेक महसूल खात्यात असावा.
‘तिकडं कंट्रोलरला विचारलं, तर म्हणे येईल थोडं थांबा. अरे, कधी येईल ?’ एक सामाजिक कार्यकर्ता असावा. कंट्रोलरला नेमणूकपत्र देतांना ही अशी उत्तरे त्यांच्याकडून घनपाठी पद्धतीने तयार करून घेत असावीत.
तेवढ्यात तिकडच्या दरवाज्यातून ड्रायव्हर उतरला. मी ड्रायव्हरला म्हटले -
‘का रे भो, काही दया येतेय आमची ? सातवी गाडी आहे जामनेरमार्गे ! रिकाम्या जाताय नुसत्या !’
‘तुम्हाला कुठं जायचंय ?’ ड्रायव्हर.
‘जळगांवला ! किती गर्दी झालीय पहा. दीड तास झाला, गाडी नाही !’ मी. यांवर तो कंडक्टरशी काही बोलला. मग मला म्हणाला ‘साहेब, तुम्ही गाडीत बसा.’ आम्ही सामान घेवून गाडीत बसलो. तेवढ्या वेळात निदान चार वेळा मला सौ. ने ऐकवलं ‘ही गाडी जामनेरमार्गे आहे.’
‘अग, जरा स्वस्थ बसू दे ! दीड तास झाला मी उभा आहे.’ मी. नवऱ्याचा स्वस्थपणा बायकांना सहन होत नाही, हे ‘जागतिक सत्य’ म्हणून मान्य झाले आहे.
‘मग एकटे तुम्हीच काय, मी पण उभी आहे.’ सौ.
‘मग तू पण बैस जरा स्वस्थ.’ मी.
हे संभाषण वाढले असते, तेवढ्यात तो ड्रायव्हर आला. मी बाहेर आलो त्याच्याजवळ, गप्पा सुरू झाल्या.
‘साहेब, मी यातले पूर्वीचे तीन-चार जामनेरमार्गे भुसावळचे असलेले प्रवासी दुसऱ्या गाडीत बसवतो. ती गाडी इथून लागतेय. मग निघू.’ ड्रायव्हर !
‘कुठले भाऊ तुम्ही !’ मी.
‘कठोऱ्याचा ! तुम्ही कुठले साहेब ?’ ड्रायव्हर !
‘अरे भो, मी रावेरचा !’ मी.
‘माझी सासुरवाडी आहे रावेरची !’ ड्रायव्हर।
‘कोणाकडची ?’ मी.
‘शिवाजी चौकातील पाटील यांच्याकडची !’ तो.
‘अरे मग, सासुरवाडच्यांना असा त्रास देतोय का ? लक्षात ठेव, घरी समजलं तर, आज रात्री जेवण मिळणार नाही घरी !’ मी. त्याला पण हसू आले.
‘आमचे महामंडळ म्हणजे कसं आहे - ‘गांवची जत्रा अन् कारभारी सत्रा !’ सतरा कारभारी असले, की कामाचा असा बोऱ्या वाजतो. गाडी प्रवाशांसाठी आहे. आमच्या पगारासाठी नाही. साधी गोष्ट आहे, इथं आता एवढी गर्दी आहे, तर कमी प्रवासी लगेच दुसऱ्या असलेल्या गाडीत बसवायचे आणि ही त्याच रूटची गाडी आहे, तर तिकडे न्यायची ! प्रवासी जास्त असले की कलेक्शन चांगले येते. आमचा डेपो मॅनेजर मस्त आहे. त्याने आम्हाला पाॅवर दिलीय. काहीही करा, पण नियमात करा. माझी फुल परवानगी. पण बम्म कलेक्शन आणा. आमच्या डेपोचे कलेक्शन महाराष्ट्रात माहिती आहे. गाड्या चकाचक. प्रवासी दुसरी गाडी सोडून, आमच्या डेपोच्या गाडीत बसतात.’ हे इतके ज्ञान तर मला पण नव्हते. मी काही अजून विचारणार, तेवढ्यात कंडक्टर आला आणि - ‘जळगांवला जाणाऱ्या प्रवाशांनी या गाडीत बसा. जामनेरमार्गे जाणाऱ्यांनी शेजारच्या गाडीत बसा.’ हे खास आवाजात जाहीर केले. लोटालोटी करत सर्व प्रवासी चढले आणि गाडी जळगांवला निघाली.
लक्षात ठेवा, खंबीर निर्णय घेणाऱ्या एका डेपो मॅनेजरमुळे देखील, त्या डेपोचे कलेक्शन पण चांगले असते. त्याचे इतर सर्वत्र नांव होते. तो प्रवाशांना पण समाधान देतो. त्या डेपोच्या गाड्या जास्त चालतात. मात्र सतरा कारभारी असले, की प्रवाशांच्या दैनेला पारावार नसतो. माझ्यासारखा असा अनुभव, आपण यापूर्वी दहावर्षांपूर्वी घेतला होता कधी ?—- आता पण निर्णय घ्या !

22.4.2019

No comments:

Post a Comment