Thursday, June 27, 2019

भुरासिंग राजपूत

भुरासिंग राजपूत
आमच्या रावेरचे रेल्वेस्टेशन हे गांवापासून साधारणत: दोन-अडीच किलोमीटर दूर ! बसस्टॅंडबद्दल बोलायचे तर, पूर्वी गांवात पक्के असे बांधलेले बसस्टॅंड पण नव्हते. आमची ग्रामदेवता, महालक्ष्मी देवीच्या मंदीराजवळ महामंडळाच्या बसेस उभ्या रहायच्या, म्हणण्यापेक्षा थांबायच्या, तिथं महाराष्ट्राच्याच नाही, तर मध्यप्रदेशाच्या पण असायच्या. मध्यप्रदेश इथून अवघ्या अकरा किलोमीटरवर आणि बुरहानपूर हे फारतर पंचवीस किलोमीटरवर ! एक नक्की, पण आमच्या गांवचे रेल्वेस्टेशन खूप जुने ! अगदी वाघोडाजवळ, म्हणजे खानापूरजवळ, त्यावेळी रेल्वे, बहुतेक पंजाब मेल, पाडली म्हणून इंग्रजांच्या काळात केसेस पण झालेले क्रांतीकारी स्वातंत्र्यसैनिक आमच्या गांवात होते. थोडक्यात दिल्ली रेल्वे लाईनवरचे आमचे गांव ! भारतात विविध ठिकाणी, भारतातील सर्व भागांत खाल्ली जाणारी केळी, ही आमच्या गांवातील, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेली असण्याची शक्यता !
तसे गांव आमचे तालुक्याचे, फार मोठे नाही व लहान पण नाही. एका बाजूला बुरहानपूर सारखे सूर्यतनया तापी नदीवरील, मध्यप्रदेशातील मोठे व प्रसिद्ध ऐतिहासिक गांव ! त्या गांवाजवळच मुघलसम्राट औरंगजेबाने विषप्रयोग करून, कपटाने मारलेल्या, मात्र तरीही औरंगजेबाशी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असलेला हा योद्धा, यासाठी साक्षात शिवछत्रपतींनी पुढे केलेला मित्रत्वाचा हात नाकारणारे, भगवान एकलिंगजीचे भक्त, रणधुरंधर असे राजपूत सेनापती ‘मिर्झाराजे जयसिंग’ यांची समाधी वजा छत्री ! आणि रावेरच्या दुसऱ्या बाजूला भारतात नावाजलेले, भुसावळ हे रेल्वे जंक्शन, जिथून जाणारी प्रत्येक रेल्वे, इथं न विसावता पुढे जाऊच शकत नाही, असे रेल्वे स्टेशन ! या दोन मोठ्या रेल्वेस्टेशनच्या मधे जवळच असलेल्या आमच्या गांवात, काही फार अशा रेल्वे गाड्या थांबतच नसत ! तिथून पुढे जाणाऱ्या पॅसेंजर, व एक-दोन एक्सप्रेस, बास ! एवढ्यावरच रावेरचे प्रवासी समाधानी असायचे, —- अगदी नांवच सांगायचे झाले तर पूर्वी ‘मुंबई पेशावर’ म्हणून माहीत असलेली आणि आता ‘दादर अमृतसर’ म्हणून ओळखली जाणारी, टपाल आणणारी एक्सप्रेस म्हणून होती. ती थांबायची इथं !
स्टेशनवरून गांवात रात्री-अपरात्री काय आणि दिवसा काय, सामानसुमान घेऊन बाहेरगांवची मंडळी पायी यायचीच नाही. स्टेशनच्या दरवाज्यात बरेच टांगेवाले उभे असायचे, काही बाहेर येता येता भेटायचे; पण बहुतेक वेळा भेट व्हायची, ती भुरासिंग राजपूत यांचीच ! यांचा स्वभाव तसा प्रेमळ ! बऱ्यापैकी आणि निवांत असलेले हे व्यक्तीमत्व ! पांढरा म्हणता येईल असा कमरेला धुवट पायजमा व तसाच असलेला सदरा अंगात ! भव्य कपाळ, सरळ नाक, रंगाने गव्हाळ ! परिस्थितीने किंवा उन्हाने किंवा दोन्हींमुळे जरा काळपट झालेला चेहरा ! जरासा बसका आवाज आणि मागे झुकत चालण्याची लकब ! हातात वेताच्या काडीला पीळदार सुती दोरी असलेला चाबूक, त्याचा वापर घोड्यावर क्वचितच व्हायचा ! प्रवासी प्रत्यक्ष टांग्यात बसेपावेतो, त्यांच्या टांग्याच्या घोड्याच्या तोंडात दानाच्या तोबऱ्याची पिशवी लावलेली असायची किंवा समोर हिरवे गवत टाकलेले असायचे. गिऱ्हाईक मिळाले की घोड्याच्या तोंडावर असलेली पिशवी किंवा त्याच्या समोर पडलेले हिरवे गवत, त्या समोरच्या लाकडी गड्ड्यात टाकायचे. एक पाय पुढच्या पायताणावर रोवत पुढे टांगा हाकण्यासाठी बसायचे, हा नेहमीचा सराव ! आमच्या सारख्या पोराटोरांना टांग्याच्या पुढील भागांत बसायला मिळायला हवे याची अगदी फार इच्छा ! टांगाच्या पुढील भागांत, निवांत व ऐटीत त्यांच्या शेजारी बसणं, टांगाच्या लाकडी गड्ड्यात पाय टेकवायला मिळणं, ही आम्हा मुलांच्या आनंदी प्रवासाची उत्तम भैरवी ! बस, मग त्यांच्या टांग्यात मस्त पुढील भागांत बसून आपण गांवात यायचे. मधेच, हॅक हॅक, चकचक किंवा चाबकाची वादी वाजवत घोड्याला पळायला वेग दिला जायचा.
थोडावेळ घोडा चालला, की तो आम्हाला पळावा, असे वाटे. आपल्या टांग्याचा पहिला नंबर असावा, त्याच्यापुढे दुसऱ्या टांग्याने अजिबात जावू नये, असे निष्कारणच वाटायचे. मग त्यांना आम्ही तसे म्हणत पण असू, घोडा जोरात पळावा यासाठी ‘घोड्याला चाबूक मारा’ पण सुचवत असू. ते मात्र शक्यतोवर हॅकहॅक, चॅकचॅक हेच करत. त्यांचे हे असे शब्द व तोंड गांव येईपर्यत चालू राही, पण चाबूक काही ‘काड्कन्’ घोड्याच्या अंगावर पडत नसे. पडलाच तर थोपटल्यासारखाच पडे, अंगावर वळ उठत नसत, तर प्रेमाची थाप मारल्यागत ! माणसं माणसांशी वैरभाव जपण्याच्या काळात, हे त्या मुक्या जनावरावर का प्रेम करत असावेत ? काही प्रश्नांचे उत्तर सापडत नाही आयुष्यभर, प्रश्नच सांभाळावे लागतात.
‘भुराकाका, घोड्याला काय खाऊ घालता तुम्ही ?’ आमचा बालसुलभ प्रश्न !
‘चाराच खाऊ घातला जातो. अधूनमधून दान खाऊ घालावं. घोड्यात ताकद रहाते. थकत नाही तो चालताचालता !’ भुराकाका त्यांच्या व्यवसायातील खुब्या सांगायचे.
‘काका, दिवसभर खाऊ घालायचे, तर खूप लागत असेल, मग त्यापेक्षा एकदाच देत जा खाऊ त्याला.’ आमच्या मनांत त्यांच्या खर्च वाचवायच्या विचाराने, या अशा सूचना सुरू असायच्या. त्यांना पण उत्तर देण्यात आनंद असायचा.
‘बेटा, अरे कोणी पोटापेक्षा जास्त खाईल का ? पोट भरले की तोच आपली मान दुसरीकडे वळवतो.’ त्याचे उत्तर ! आमच्या काटकसरीच्या सूचनेचा पार धुव्वा उडालेला असे.
‘- आणि खरं सांगायचं, तर मी काय खाऊ घालू त्याला ? हाच आम्हा सर्वांना खाऊ घालतोय रोज !’ त्यांचे न समजणारे उत्तर !
टांगेवाले असलेल्या भुराकाकांचे हे वाक्य समजायला, मला बरीच वर्षे लागली. एरवी पण, घोडे हाकणाऱ्याला, भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेल्या गीतेसारखे तत्वज्ञान सांगण्याचा, आपोआप वारसा मिळतो की काय, समजत नाही. माणसाला परिस्थितीच खूप शिकवत असते, शहाणं करत असते. या अनुभवाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी त्याला मिळालेलं ज्ञान आयुष्यभर विसरत नाही.
रात्रीच्या, किंवा पहाटेच्या रेल्वे गाडीला भुराकाकांना बोलावले, की ते बरोबर त्या वेळी आमच्या गल्लीत येत. टांग्यात मागील व पुढील भागांत सामान ठेवणे. हे व्यवस्थित झाले, की त्यांवर लक्ष ठेवून, गल्लीबाहेर टांगा काढला जाई. आमची इच्छा म्हणजे, आम्ही टांग्यात बसलो रे बसलो, की टांगा सुसाट सुटायला हवा. बालपणीच्या सोप्या वाटणाऱ्या, तसेच आवडणाऱ्या इच्छा पूर्ण होणं किंवा करणं, हे सोपं नसते तर किंबहुना काही वेळा अशक्य असतं, हे समजेपर्यंत आपले बालपण संपलेले असते. बालपणातील अज्ञानाचा आनंद परमेश्वर आपल्याला, अकाली शहाणे करून हिरावून घेत नाही, ही पण एकप्रकारची कृपाच !
गल्लीतून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आलो, तरी त्यांच्या घोड्याने वेग घेतला नसायचा. डुगूडुगू चालत तो, टांगा ओढत असे. हा साधारण देवीच्या मंदीरापर्यंतचा अनुभव असे, तो तर असा निराशाजनक असे, की हा घोडा स्टेशनपर्यंत असाच चालणार, का कंटाळून थांबणार की मग रात्रीच्या वेळी आपल्याला स्टेशनवर पायी जावे लागते, अशी शंका यायला लागायची. ही शंका भुराकाकांना नसायची, मग त्यांचे समोरच्या चारा ठेवण्याच्या लाकडी गड्ड्यात पाय आपटणे सुरू व्हायचे.
हॅक, हॅक ! चॅक चॅक ! अगदी त्याला गाढव पण म्हटले जायचे, क्वचितच चाबूक हवेत फिरवून घोड्याच्या पाठीवर पडायचा. घोड्याला मग लय सापडायची. वाचनालय यायचे, लगेच बस स्टॅंड यायचे आणि मग ‘चालतो का नाही’ अशी शंका निर्माण करणारा हा घोडा ऐटदारपणे पळू लागायचा. हॅकहॅक करायची पण गरज नसायची. नुसता चाबूक हवेत फडफडवला, तरी घोड्याचा वेग वाढायचा. आम्ही मस्त खुशीत स्टेशन आल्यावर उतरायचो. त्यांचे टांगाभाडे दिले जायचे आणि त्यांना तिथंच सोडून रेल्वे पकडायला आम्ही धावत सुटायचो. एक काम पूर्ण झाले, ती गरज संपली, की त्याला सोडून दुसऱ्या मागे पळणे, हा तर मानवी स्वभाव !
आता टांगे दिसत नाही, त्याला ओढून नेणारे घोडे दिसत नाही आणि टांगा हाकलणारे टांगेवाले पण दिसत नाही. टांग्याचे घोडे हे फक्त त्यांत बसलेल्या प्रवाशांनाच त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ओढून घेऊन जात नाही; तर सोबत त्या टांगेवाल्याच्या संसाराचा भार पण ओढत असतात.
आता घोडे फक्त लग्न व वरातीपुरताच राहिले आहे. पूर्वी दूरवर जायचे असले, तर सर्वसामान्यपणे वाहनं समोर यायची, ती म्हणजे बैलगाडी, टांगे हीच ! मोटार वगैरे ही काही सर्वांच्या आवाक्यातली कधीच नव्हती. गोराकाका तर कधीच आम्हाला सोडून गेले. आमचे घोडे व टांग्याशी असलेले नाते पण आपल्यासोबत घेवून गेले.
—— ———-
खरं सांगू का ? माझा मित्र, अनिल गिनोत्रा यांच्या दुकानांत बसलो होतो, आणि मग त्यानेच म्हटलं, ‘हा युवराजसिंग म्हणजे भुरासिंगच्या घोड्यासारखा आहे. डुगडुगत, धडपडत सुरूवातीला निघतो, पण नंतर बेफामपणे ठिकाण गाठतो.’ कसल्यावेळी व कशावरून, मनांतली कुठली पण कळ दाबली जाते, आणि वर्षानुवर्षे कुठेतरी दबलेल्या आठवणी, एका क्षणांत वर येतात, कसली तरी वेदना सोबत घेऊन !
नुकतीच भारताचा क्रिकेटवीर युवराजसिंग यांनी क्रिकेटमधून आपली निवृत्ती घेतल्याची बातमी ऐकली, अन् हे सर्व आठवले. हा जिद्दी क्रिकेट खेळाडू ! सन २०११ च्या जिंकलेल्या ‘क्रिकेट वर्ल्डकप’च्या विजयाचा उठून दिसणारा शिल्पकार ! त्यवेळी काय आणि त्यापूर्वी काय, त्याने आपले सर्वस्व भारतीय क्रिकेटसाठी दिलं. तो वर्ल्डकप हा एकटा ओढत होता भारतासाठी !
याची क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा ऐकली. त्याने त्यानंतर भोगलेल्या वेदनांची आणि त्यातून उठून उभ्या रहाण्याच्या, कमालीच्या प्रयत्नांच्या जिद्दीची आठवण आली. भुराकाकांच्या घोडा आम्हा सर्वांना सुरूवातीला अडखळत आणि नंतर दमदारपणे स्टेशनपर्यंत, आमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात होता. भुराकाकांचा घोडा कधी निवृत्त झाला का नाही, ते आम्हाला माहीती नाही; मात्र शेवटपर्यंत, तो असेपर्यंत त्यांच्या कुटुंबाला तो आधार असणार ! —— युवराजसिंगला निवृत्ती जाहीर करतांना काय वाटत असेल ? कल्पना करू शकतो आपण ?

17.6.2019

No comments:

Post a Comment