Thursday, June 27, 2019

सध्या कोणीतरी कसली भूमिका करतांना, भलभलती दृश्ये दिली आहेत, यावरची गदारोळ ऐकतोय. मी ते बघीतलेले नाही. हे यापूर्वी पण विविध माध्यमांचा उपयोग करून दाखवून झाले आहे. समाजाच्या एका भागाच्या वेदनेला वाचा फोडणे, हा वेगळा विषय आहे; तर त्या वेदनेचा उपयोग आपल्या ऐहिक लाभासाठी करून, ती वेदना तशीच राहू देणे. ती तशीच रहावी, म्हणून काळजी घेणे, जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, ही दुसरी बाजू आहे. आपण पहिल्या विषयाला हात घातला आहे, याचा गाजावाजा करत, दुसऱ्या बाजूचे भरणपोषण व संवर्धन करत आहोत.
हे सार्वजनिकरित्या दाखवणे अयोग्य आहे. विकृती असणे, पापाचार करणे ही वस्तुस्थिती असेल, सत्य असेल पण ते साहित्य नाही. ते साहित्य नव्हे. ‘साहित्यासाठी कला का कलेसाठी साहित्य’ हा वाद जुना आहे. त्यात अजून भर घालता येईल, ती ‘समाजासाठी कला का कलेसाठी समाज ?’ समाजातील भीषण वास्तव जर लक्षात आले असेल, तर त्याचा कठोरपणे निपटारा करा. त्या वास्तवाचे हिडीस प्रदर्शन करून, त्याचा तमाशा बनवून त्याचे ‘आपल्या पोळीवर तूप ओढण्यासाठी’ कार्यक्रम करून पैसे मिळवू नका. यालाच ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणं’ म्हणतात.
या ‘सत्यकथा’ भडक व विकृत पद्धतीने सांगून, त्यांतून मानवी मन भलत्याच दिशेला नेले जाते. त्याने समाजहित साध्य होत नाही. तर यांतून या अशा व्यक्तींच्या भावना चाळवल्याने, ही अपरिपक्व व विकृत मनोवृत्तीची माणसे वेगळा निष्कर्ष व संदेश घेऊ शकतात, नव्हे घेतात. समाजविघातक विचारांचे विष हे सत्याच्या शर्करावगुंठीत गोळीखाली दिले जाते. आपल्याला वाटते, हे सत्य आहे पण आपण ‘विकृत विघातक विचारांचे’ विष प्राशन करत असतो. त्याचे परिणाम आज वा उद्या दिसणारच असतात, आपल्याला भोगावे लागणारच असतात. त्यातून आपली दुर्दशा निश्चित असते.
‘पाप केल्याशिवाय पोट भरत नाही’, हा विचार मूलगामी व वस्तुस्थितीनिष्ठ म्हणूनच सत्य आहे, हा इतका काही चुकीने सार्वत्रिक केला जातोय, की सरळमार्गी माणूस हा मूर्ख, बावळट आणि समाजाला निरूपयोगी ठरतोय, हा विचार जोर धरू लागलाय. हे भीषण आहे.
हा आणि यासारखे सरळमार्गी, न्यायाधिष्ठीत, नितीमूल्याधारीत विचार जेव्हा माझ्यासारखे पण सांगतात, त्यावेळी ‘तुम्ही मनुवादी आहेत. सत्यापासून दूर पळता आहेत.’ हे टोमणे ऐकवले जातात. त्याचवेळी ही मंडळी हे विसरत असतात, की समाजातील आमच्या वावरण्यात, आम्ही या विकृत विचारांचा पाचोळा अंगाला लागू न देता, जे निरीक्षण केले आणि त्यातून जे निष्कर्ष निघतां आहेत, ते भयानक व हलवून टाकणारे आहेत. वैयक्तिकच नाही, तर समाजविनाशी आहेत. चांगूलपणावरची भावना, विश्वास संपवून टाकणारे आहेत. आपण समाज म्हणून, कुटुंब म्हणून विनाशाकडे चाललो आहे, हे दर्शविणारे आहेत.
आम्हा समाज घटकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे सुदृढ, निकोप व निरोगी समाज तयार करण्याची. त्यांत ही अशी आलेली विकृती, ठळकपणे का दाखवतात, हे समजत नाही. यासाठी जी कारणं सांगतात ती पण समर्थनीय नक्कीच नाही. सबब ही व अशाप्रकारची विकृती ही आपण, समाजहितासाठी, व्यापकहितासाठी, त्यांवर योग्य व कठोर उपाय योजून दूर करायला हवी.
(Sourabh Ganpatye यांच्यामुळे लिहीलेली ‘रिकामी पोस्ट’)

6.5.2019

No comments:

Post a Comment